Friday, July 21, 2017

संगीत मानापमान



व्यंकय्या नायडू यांना भाजपाने आपला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर केले आणि दुसर्‍याच दिवशी त्यांचा अर्ज मोठ्या थाटामाटात भरला गेला. त्यासाठी अर्थातच भाजपासह मित्रपक्षाचे बहुतांश नेते हजर राहिले होते. सहाजिकच तिथे भाजपाचे भीष्मपितामह मानले जाणारे लालकृष्ण अडवाणी सुद्धा हजर होते. पण सोहळा संपला आणि संसद भवनातून आपापल्या घरी जाताना बराच काळ अडवाणींना आपले वाहन मिळू शकले नाही. ते केविलवाणे होऊन तिथे घुटमळत होते, अशी बातमी एका वृत्तापत्रात आली. तसे अनेकदा होताना आजकाल बघायला मिळत असते. चालू राजकारणात अडवाणी संदर्भहीन झालेले आहेत आणि ते त्यांना ओळखता आलेले नाही. पण तशी त्यांची अवस्था त्यांनीच करून घेतलेली आहे. चार वर्षापुर्वी गोवा येथील पक्षाच्या कार्यकारिणी अधिवेशनात नरेंद्र मोदी यांची लोकसभेच्या निवडणूकीत प्रचारप्रमुख म्हणून निवड होणार म्हटल्यावर अडवाणींचे रूप बदलून गेलेले होते. अकस्मात त्यांनी गोवा सोडून दिल्लीला जाणे पसंत केले. त्यांच्या उपस्थितीत मोदींचे नाव निश्चीत होऊ नये, याची काळजी घेऊन त्यांनी आपला नकार जाहिर केला होता. मग प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यावर त्यांनी अकस्मात आपल्या सर्व पदांचे राजिनामे पक्षाकडे पाठवून पक्ष व्यक्तीकेंद्री होत असल्याची तक्रार केली होती. पक्षात व संघ परिवारात त्यांची डाळ शिजली नाही आणि त्यांना माघार घ्यावी लागली होती. पुढे एका समारंभाच्या निमीत्ताने मोदी अडवाणी एका मंचावर आले असताना, मोदींनी ज्येष्ठ म्हणून जाहिरपणे नतमस्तक होऊन आशीर्वाद मागितले होते. पण त्याकडे पाठ फ़िरवून अडवाणींनी दुर्लक्ष केले होते. इतका तुटकपणा दाखवल्यानंतर दुसरे काय व्हायचे? मिळणारा मान स्विकारण्याचेही औदार्य लागते. अडवाणींना तो मोठेपणा दाखवता आला नव्हता. ही वस्तुस्थिती नाही काय?

मोठेपणा नुसता वयातून येत नाही, तो वर्तनातूनही दिसावा लागतो. २००४ आणि २००९ अशा दोन निवडणूकात अडवाणींनीच भाजपाचे नेतॄत्व केले होते. त्यात त्यांना यश संपादन करता आले नाही. पण तरीही तिसर्‍यांदा त्यांना बोहल्यावर चढायचे होते. त्यामुळे त्यांना मोदी नको होते आणि तरीही लहान असून नव्या उमेदवाराने थोरल्याची नाराजी समजून घेतली. पण तितका मनाचा मोठेपणा अडवाणी दाखवू शकले नाहीत. लोकसभा मोदींनी निर्णायक बहूमताने जिंकली आणि वर्षभरातच २०१५ सालात आणिबाणीची चाळीशी आली. तेव्हा आताही तसेच भयंकर वतावरण असल्याची मुलाखत देऊन अडवाणींनी काय सिद्ध केले? पदोपदी आपल्याच कधी काळच्या चेल्याला अपशकुन करण्यापालिकडे अडवाणी मागल्या तीन वर्षात काय करू शकले आहेत? खरेतर आपला जमाना संपल्याचे ओळखून प्रत्येक समारंभात लुडबुडण्याचे त्यांनी थांबवायला हवे आहे. त्यांचा जमाना होता आणि आज नव्या पिढीचा जमाना आहे. तिथे आशीर्वादापेक्षा अधिक आपले काम उरलेले नाही, हे समजले तर असे समारंभ व सोहळ्याला गैरहजर राहूनही अडवाणी आपली प्रतिष्ठा कायम राखू शकतात. लोकसभा उमेदवार निवडीच्या कालखंडातही गुजरात की मध्यप्रदेश, असा बालीश हटवाद अडवाणींनी केला. तो त्यांच्या वयाला व अनुभवाला शोभणारा नव्हता. इतके झाल्यावर त्यांना कोणी अपमानित केले असे बोलण्यात अर्थ नसतो. तुमचा अपमान अन्य कोणी करू शकत नसतो. आधी तुम्हाला स्वत:ची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. तुम्हीच तुमच्या प्रतिष्ठेला शोभणारे वर्तन करणार नसाल, तर तुम्हीच आपला अपमान ओढवून घेत असता. अडवाणीच कशाला राजकारणात व अन्य क्षेत्रात आपल्याला अशा अनेक व्यक्ती व प्रसंग सांगता येतील. दिसायला त्यात इतर कोणीतरी अपमान केला असे वाटेल, पण प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीनेच तशी तजवीज केलेली असते.



शिवसेनेचे मनोहर जोशी यांची व्यक्तीगत कुवत राजकारणात नगण्य आहे. पण शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या कृपेने त्यांना प्रत्येक महत्वाच्या पदावर बसणे शक्य झाले. १९६८ सालात शिवसेना प्रथमच महापालिकेत निवडून आली, तेव्हा पालिकेतील गटनेता वा विरोधी नेता होण्याचा मान पंतांनाच मिळालेला होता. नंतर पालिकेतून विधान परिषदेत निवडला जाणारा पहिला आमदार म्हणून त्यांचीच वर्णी लागली. राज्यातले पहिले सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्रीपदी मनोहरपंत बसलेले होते. पुढे १९९९ सालात केंद्रात मंत्री व लोकसभेचे सभापती होण्याचाही मान त्यांनाच मिळाला होता. त्यांचा जमाना मागे पडला आहे आणि आता शिवसेनेत नेतृत्वही नव्या पिढीचे आलेले आहे. मग अजूनही मनोहरपंतांनी सत्तापदाचा हव्यास धरावा काय? मागल्या लोकसभेत मध्यमुंबईत त्यांना उमेदवारी हवी म्हणून गडबड चाललेली होती. पण राहुल शेवाळे या तरूण नेत्याचे नाव पुढे आले आणि पंतांनी काही शंकास्पद विधान केले होते. त्यामुळे बिथरलेल्या शिवसैनिकांचा रोष त्यांना ओढवून घ्यावा लागला होता. नंतरच्या दसरा मेळाव्यात शिवाजीपार्क येथे भर सभेत त्यांच्या भाषणाला आरंभ होताच आरोळ्या ठोकल्या गेल्या आणि पंतांनी व्यासपीठ सोडलेले होते. जाण्यापुर्वी त्यांनी पुत्राच्या वयाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या पायाला हात लावण्याचाही केविलवाणा खेळ केला होता. त्याची तेव्हा खुप चर्चाही झालेली होती. पण तशी वेळ त्यांच्यावर अन्य कोणी आणलेली नव्हती. पक्षाची शिस्त व आजवरचा अनुभव लक्षात घेता, पंतांनी उमेदवारीसाठी केलेली धडपड गैरलागू होती. त्यावरचे त्यांचे सूचक भाष्य संघटनेला गोत्यात घालणारे होते. त्याचीच प्रतिक्रीया मेळाव्यात उमटलेली होती. अडवाणी ज्यांना आठवतात, त्यांना आज मनोहरपंत आठवणार नाहीत. अर्थात तो प्रत्येक पक्षाच्या अनुयायाचा विशेषाधिकार असतो.

कॉग्रेसच्या अनेकांना अडवाणींचा कळवळा आलेला आहे. पण त्यांना तरी आपले अधिवेशनात निवडून आलेले अध्यक्ष सीताराम केसरी बाजुला करण्यात आल्याचा प्रसंग कुठे आठवतो? १९९८ नंतर सोनियांनी राजकारणात कृतीशील होण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यांच्यासाठी केसरींनी जागा रिकामी करण्याचा आग्रह धरला गेला, ते शक्य झाले नाही, तेव्हा कॉग्रेसच्याच ‘अतिउत्साही’ कार्यकर्त्यांनी आपल्या अध्यक्षाला मुख्यालयातून चपला मारून पळवून लावलेले होते. तुलनेने अडवाणीवर तितकी वाईट परिस्थिती आजून आलेली नाही. पण आज अडवाणींच्या प्रतिष्ठेची चिंता करणार्‍या कॉग्रेसजनांना केसरींचे पलायन आठवत नाही. असे चालायचेच. आपला तो बाब्या असतो आणि दुसर्‍याचा तो कार्टाच असतो. मुद्दा अडवाणी यांच्यापुरता नाही. आज समाजवादी पक्षात मुलायम यादव यांची कितीशी प्रतिष्ठा शिल्लक राहिली आहे? त्यांना त्याचे पुत्र व अनुयायीच विचारत नाहीत. मार्क्सवादी पक्षात तरी आयुष्य खर्ची घातलेल्या सोमनाथ चॅटर्जी यांना कशी वागणूक मिळालेली होती? २००९ सालात त्यांना पक्षाने तिकीट नाकारले आणि लोकसभेतही त्यांच्याच पक्षाचे सदस्य त्यांना पदोपदी अपमानित करीत नव्हते काय? अनेकदा सोमनाथदांनी आपल्या खुर्चीचा तरी मान राखा, अशी समज अनेक मार्क्सवादी खासदारांना दिलेली होती. म्हणूनच अडवाणी यांच्या अपमानाच्या कथा रंगवण्यात अर्थ नाही. राजकीय आखाडा अतिशय क्रुर असतो आणि तिथे परिस्थिती कोणाला दयामाया दाखवत नाही. ज्याचा जमाना असतो, त्याने चमकायचे असते आणि कालच्या सम्राटांनाही हाती फ़ुले घेऊन उभे रहावे लागत असते. नसेल तर अशा आखाड्यात फ़िरकू नये, किवा मानापमानाच्या गमजा करू नयेत. नव्वदीत पोहोचलेल्या अडवाणींना अजून हे समजले नसेल तर त्यांची कींव करावी तितकी थोडी आहे.

13 comments:

  1. बरोबर भाऊ,पण भाजपा किंवा खांग्रेस मोठ्ठे पक्ष आहेत शिवसेनेत मात्र मा बाळासाहेबां नंतर कुणिही नाव घेण्या सारखा आनुभवी माणूस नाही त्यामुळे प्रभु बाहेर पडल्या नंतर व मनोहरपंतांची किंम्मत शुन्य केल्यावर एका महान संघटनेची चिवसेना आज बघायला मिळत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. चुलकर्णीची पोटदुखी वाढतच राहो या सदिच्छा

      Delete
  2. २००४-०९ मध्ये अडवाणी विरोधीपक्षनेते होते. पण १९९० च्या दशकातील आक्रमक विरोधी पक्षनेता मात्र पूर्ण मावळला होता.बाकी पाकिस्तानात जाऊन जीनांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षपणाचे गोडवे गाणे आणि पाकिस्तान जर त्या मार्गावर चालला असता तर परिस्थिती वेगळी असती हे म्हणणे अत्यंत बेजबाबदार होते. जीना खरोखरच धर्मनिरपेक्ष असतील तर १९४७ मध्ये लाखो लोक धार्मिक उन्मादात मृत्युमुखी पडल्यावर तो मनुष्य किमान त्याविरूध्द काहीतरी बोलेल. तेवढे तरी जीनांनी केले का? आणि जीनांनी इतिहास घडवला असे काहीसे जीनांच्या कबरीच्या ठिकाणी जाऊन व्हिजिटर्स डायरीमध्ये अडवाणींनी लिहिले होते. जीनांनी इतिहास घडवला हे खरेच आहे पण तो इतिहास लाखो लोकांच्या रक्तावर घडवला होता त्याचे काय? आणि इतिहास घडविणे हा मापदंड असेल तर तसाच इतिहास गझनीच्या महंमदाने आणि औरंगजेबानेही घडवला होताच की. जीनांच्या 'धर्मनिरपेक्ष मार्गावर पाकिस्तान चालायला हवा होता' हे म्हणणे आणि परवेझ मुशर्रफने कुठेतरी (उदाहरणार्थ यु.एन मध्ये) दहशतवादाविरोधी तोंडदेखल्या एखादे वक्तव्य केले असेल त्याचा हवाला देत 'मुशर्रफने सांगितलेल्या दहशतवादविरोधी मार्गावर पाकिस्तानने चालायला हवे होते' असे कोणी म्हटले तर त्यात नक्की काय फरक आहे? अडवाणींनी याच पाकिस्तान दौर्‍यात ६ डिसेंबर १९९२ हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता असे म्हटले होते. हा तर ढोंगीपणाचा कळस झाला. बरं तो जर यांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असेल तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून यांनी नक्की काय केले? भाजप अयोध्या आंदोलनामुळेच १९९८ मध्ये सत्तेत गेला हे कोणीही अगदी शेंबडं पोरही सांगू शकेल. आणि त्याच सर्वात वाईट दिवशी झालेल्या घटनेवर आधारीत मिळालेल्या सत्तेत हे चांगले उपपंतप्रधान म्हणून वावरले आणि तसे करताना त्यांना कसले वैषम्य वाटल्याचे ऐकिवात नाही.

    ReplyDelete
  3. मोदींना विरोध म्हणून राजीनामा द्यायचे नाटक केल्यावर भाजप कार्यकर्त्यांची त्यांच्या घरापुढे निदर्शने झाल्यावर त्यांनी भिंतीवरील लिखाण समजून घ्यायला हवे होते. अब जमाना बदल गया है आणि अडवाणींचे नेतृत्व भाजप कार्यकर्त्यांनाही आता मान्य नाही आणि नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. १९९० च्या दशकात अडवाणींच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने होऊ शकली असती का? तरीही हे त्यावरच अडून राहिले. इतकेच नाही तर सप्टेंबर २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करायच्या वेळीही अडवाणींनी नाटके करून झाली. त्यांना फारसे कोणी विचारले नाही तरीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मोदी गांधीनगरमधून
    आपला पराभव घडवून आणतील म्हणून भोपाळला स्थलांतरीत व्हायचा विचार करून झाला. १६ मे २०१४ रोजी भाजपचा लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व विजय झाल्यानंतर "हा सामुहिक नेतृत्वाचा विजय आहे" अशी क्षीण प्रतिक्रिया देऊन आपल्याला द्येय नसलेले श्रेय घ्यायचा प्रयत्नही करून झाला. दिल्लीमध्ये केजरीवाल जिंकल्यावर केजरीवालांनाही अडवाणी भेटणार अशा बातम्या आल्या होत्या. खरेखोटे तो भगवंत, अडवाणी आणि केजरीवाल जाणोत. मग मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना देशात आणीबाणीसदृश परिस्थिती आहे अशी पिंक टाकून झाली. म्हणजे प्रत्यक्ष आणीबाणी होती त्यावेळी हे बंगलोरला तुरूंगात होते पण २०१५ मध्ये आपल्या दिल्लीतील निवासस्थानी राहून भरल्या पोटी असली मखलाशी मात्र त्यांनी केली आणि त्यात त्यांना काहीही विसंगत वाटले नाही.

    ReplyDelete
  4. बाकी अडवाणींनी जनसंघातून बलराज मधोकांचा काटा कसा काढला हे अनेकांना माहित नसते. १९७३ मध्ये अडवाणी जनसंघाचे अध्यक्ष पहिल्यांदा झाले आणि त्यानंतर बलराज मधोकांना पक्षातून काढायचा त्यांनी पहिला निर्णय घेतला. त्यामागे कारण असे दिले होते की बलराज मधोकांनी जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष यांच्यात युती व्हावी अशी मागणी केली आणि स्वतंत्र पक्षासारख्या उजव्या पक्षाबरोबर युती करणे वाजपेयी आणि अडवाणींना मान्य नव्हते. त्याबद्दल बलराज मधोकांना पक्षातून काढणे हाच उपाय होता का? समजा तसे मान्य केले तरी मग १९९० च्या दशकात भाजपने नरसिंह राव सरकारच्या नव्या आर्थिक धोरणांना बर्‍यापैकी पाठिंबा दिला आणि नंतर स्वतः सत्तेत आल्यावर खाजगीकरणाचा कार्यक्रम मोठ्या जोमात चालवला. अशावेळी जी मागणी बलराज मधोक १९७३ मध्ये करत होते त्याच वाटेवरून आपण आता बर्‍याच प्रमाणावर जात आहोत तेव्हा आता मतभेदाचे कारण नाही म्हणून त्यांना सन्मानाने परत पक्षात घेण्यासाठी भाजप अध्यक्ष असलेल्या अडवाणींनी नक्की कोणते प्रयत्न केले होते? यावरून असे वाटते की आपल्या नेतेपदाच्या मार्गात आव्हान नको म्हणून अडवाणी (आणि वाजपेयींनी सुध्दा) बलराज मधोकांना पक्षाबाहेर काढून परस्पर काटा काढला. बलराज मधोकही वाजपेयींसारखेच कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आणि तसेच तळमळीचे नेते होते. बलराज मधोकांचे मात्र वाईट वाटते. ते आपल्या तत्वापासून शेवटपर्यंत ढळले नाहीत. मागच्या वर्षी त्यांचे जम्मूमध्ये वयाच्या ९५-९६ व्या वर्षी निधन झाले. तोपर्यंत ते स्वतःचा भारतीय जनसंघ हा पक्ष चालवत होते. त्या पक्षाचे दहा सदस्य तरी होते की नाही कुणास ठाऊक. पण तरीही त्यांनी जी तत्वे प्रमाण मानली होती त्या तत्वांशी ते शेवटपर्यंत निष्ठा ठेऊन राहिले. अडवाणींप्रमाणे कोलांट्या उड्या मात्र त्यांनी मारल्या नाहीत. जर अडवाणींनी १९७३ मध्ये बलराज मधोकांना पक्षाबाहेर काढले तर त्यांनाही दुसरे कोणीतरी येऊन तीच दवा खिलवणार हा निसर्गाचा न्याय झाला. नशीब इतकेच की मोदींनी अडवाणींना पक्षाबाहेर काढले नाही. २००२ मध्ये मोदींची पाठराखण अडवाणींनी केली होती त्याची जाण मोदींनी ठेवली!!

    या सगळ्या प्रकारांमुळे अडवाणींविषयीचा एकेकाळी असलेला आदर मात्र नक्कीच कमी झाला आणि आता नसल्यात जमा आहे. मी २०१४ मध्ये भाजपला मत दिले ते केवळ मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते म्हणून. जर अडवाणी त्याजागी असते तर मी भाजपला नक्कीच मत दिले नसते. माझ्यासारखे अनेक मतदार होते/आहेतच. आपल्याला १९९० च्या दशकात होता तसा जनाधार आता शिल्लक नाही हे समजून घेऊन अडवाणींनी गप्प बसणे श्रेयस्कर ठरेल.

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा छान प्रतिक्रिया. वरील लेखास शोभेल अशी. अभ्यास पूर्ण.

      Delete
  5. एकूणच अडवाणींचा रूसवाफुगवा म्हणजे टिपीकल भारतीय कुटुंबांमधील खाष्ट सासूची आठवण करून देतो. मी माझ्या मुलाला पहिल्या दिवसापासून वाढवले आहे म्हणून मी सांगेन तसेच व्हायला हवे अशी म्हणणारी सासू आणि मी माझ्या पक्षासाठी पहिल्या दिवसापासून काम केले आहे म्हणून मी सांगेन तसेच व्हायला हवे असे म्हणणारे अडवाणी यात नक्की फरक काय? अडवाणींनी पक्षासाठी खूप काम केले आणि अत्यंत तळमळीने काम केले हे कोणीच नाकारत नाही. पण म्हणून मी सांगेन तसे आणि तसेच व्हायला पाहिजे हे म्हणणे म्हणजे पराकोटीचा दुराग्रह झाला.

    ReplyDelete
  6. फारच छान लेख भाऊ. प्रत्येकाच आंतरिक मन स्वत:च मुल्यांकन करतच असतो. पण प्रकट व्हायला मोठेपणा लागतो. वाढत्या वयात हे मोठेपण टिकवणं जरा कठीणच.

    ReplyDelete
  7. आमच्यासारख्या चाहत्यांना त्यांची ही अवस्था बघून वाइट वाटत.ते राष्ट्रपती व्हावे अस पन वाटत होत.शेवटी खरी परीस्थीती मोदीजी नाच माहित असेल किंवा अडवानी जी वयामुळे इतर वयस्कांसारखे मानसिकदृष्ट्या ठिक नसतील अस पन वाटत.दिरघ आयुष्यामुळ सगळ बघायला मिळतय पन अनुभवायला नाही याला काय म्हनाव तेच कळेना

    ReplyDelete
  8. सुंदर लेख भाऊ. नेहमीप्रमाणेच.
    "बाबरीचे पतन ही माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखदायक घटना" अशी टेप वेळी अवेळी आडवाणींनी वाजवली. यामुळे ते पुरोगाम्यांना तर स्वीकार्य झाले नाहीतच पण संघपरिवाराच्या नजरेतूनही उतरले. पाकिस्तानात जाऊनही जेव्हा त्यांनी तोच राग आळवला, तेव्हा मात्र कुठल्याही संवैधानिक शीर्षस्थ पदावर स्वतः बसण्याची त्यांची महत्वाकांक्षा नागपुरातूनच परस्पर कायपोछे करून टाकण्यात आली होती. संघाच्या काठीला आवाज नसतो. आडवाणींनी हे स्वतः ओढवून घेतले आहे.

    ReplyDelete
  9. अभिषेक मुळेJuly 21, 2017 at 8:36 PM

    भाऊ काही नाही हा दिल मांगे मोरचा खेळ आहे कितीही मोठे झाले तरीही समाधान नाही. नेहमीप्रमाणे मार्मिक लेख अचूक विश्लेषण. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार म्हणून गप्पा बसणे स्वभावात नाही मग अपमान होतात.

    ReplyDelete
  10. मनोहरपंतांना बाळासाहेब का किंमत देत होते हे कदाचित आजच्या नेतृत्वाला उमजत नसेल किंवा असे हि असेल की आजच्या नेतृत्वाच्या योजनांत पंतांची गरज नसेल. माणूस कालबाह्य होतोच, तसेही झाले असू शकते.

    ReplyDelete
  11. I understand that Hon.Advani exited Parliament house from a wrong door & went to parking lot.His staff waited for him at usual door.This can happen when repeated adjournments are made.Staff & Hon.Advani located each other after a while.
    Wrote in English as could not type Marathi in Unicode-Sorry !!!

    ReplyDelete