Sunday, July 2, 2017

रजनीकांत काय करील?

rajinikanth meets fans के लिए चित्र परिणाम

गेल्या आठ महिन्यात तामिळनाडूचे राजकारण खुप गढूळ होऊन गेले आहे. गतवर्षाच्या अखेरीस तिथल्या लोकप्रिय नेत्या व मुख्यमंत्री जयललिता अकस्मात आजारी पडल्या आणि नंतर शुद्धीवरही आल्या नाहीत. पुढे दोन महिन्याच्या इस्पितळातील उपचारानंतर त्यांचा तिथेच देहांत झाला. तेव्हापासून क्रमाक्रमाने तामिळी राजकारण गोंधळलेले आहे. कारण मागल्या अर्धशतकात या मोठ्या राज्यात आधी द्रविडी अस्मितेने प्रभूत्व गाजवले आणि नंतर त्याच द्रविडी अस्मितेचा कब्जा चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांनी घेतला. क्रमाक्रमाने राजकारणावरील पक्ष व नेत्यांची पकड सैल होत गेली. त्यापैकी शेवटचा नेता म्हणून आपण करुणानिधी यांच्याकडे बघू शकतो. पण ते आता नव्वदीच्या घरात आहेत आणि प्रत्यक्ष नेतृत्व देण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्या हयातीतच त्यांना एमजीआर या अभिनेत्याने व नंतर त्याची नायिका जयललिताने, करुणानिधींना दुबळे करून टाकलेले होते. अशा पार्श्वभूमीवर आता तामिळनाडूचे नेतृत्व करू शकेल असा कोणी खमक्या नेता उरलेला नाही, की लोकप्रिय अभिनेताही राजकीय क्षितीजावर नाही. बहुधा त्याची जाणिव झाल्यामुळेच सुपरस्टार रजनीकांत याने राजकारणात प्रवेश करण्याची हालचाल सुरू केली असावी. त्याला अतिशय पोषक वातावरणही आहे. जयललिता व रामचंद्रन यांच्यानंतर रजनीकांत यांच्याइतका लोकप्रिय कलाकार तामिळी पडद्यावर झालेला नाही आणि आज तिथे जी राजकीय पोकळी आहे, त्यातही कोणी आपल्या बळावर जनतेला आवाहन करू शकेल, असा नेता उरलेला नाही. त्या दिशेने राजनीकांत वाटचाल करू लागला आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे. कारण खरेच हा सुपरस्टार राजकीय आखाड्यात उतरला, तर आजचा कोणीही नेता त्याच्याशी मुकाबला करू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मागल्या अर्धशतकात वेगवेगळ्या कारणाने का असेना तामिळनाडूच्या राजकारणाला चित्रपटाने व्यापून टाकले. रामचंद्रन व पुढे जयललितांनी आपल्या व्यक्तीमत्वाने जनमानस असे व्यापले, की करूणानिधी वा अन्य द्रविडी नेत्यांना आपला पायाही टिकवता आलेला नव्हता. दोन दशकापुर्वी जयललितांना पराभूत करण्यासाठी द्रमुकसह कॉग्रेसला रजनीकांत यांचे आशीर्वाद घ्यावे लागलेले होते. पण पुढल्या खेपेस रजनीकांत पाठीशी नव्हता आणि द्रमुकचा दारूण पराभव झाला. त्यानंतर संधी मिळाली तेव्हा करुणानिधी यांच्या घराणेशाहीने त्याला किड लावली आणि आता नव्याने पक्ष उभारण्याची शक्तीही कोणात राहिलेली नाही. दुसरीकडे अण्णाद्रमुक सत्तेत बसला आहे. पण त्याच्यापाशी एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे त्याचे अनेक गट पडलेले आहेत आणि पक्षाची संघटना विस्कळीत झाली आहे. त्यात पैसा हाती असलेल्या शशिकला तुरूंगात जाऊन पडल्या आहेत, तर आमदारांचे पाठबळ पलानीसामी यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. तिसरीकडे जयललितांनी ज्याच्यावर विश्वास दाखवला असे पन्नीरसेल्व्हम आहेत. त्यांना आमदारांची साथ लाभलेली नसली, तरी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. पण यापैकी कोणालाही पुन्हा निवडणूक जिंकणे अशक्य आहे. त्यामुळेच तामिळी राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ती रजनीकांत याच्यासारखा लोकप्रिय अभिनेताच भरून काढू शकतो. कारण आता द्रविडी राजकारणात अभ्यास वा विचारसरणी राहिलेली नाही. कोणा उद्धारकर्त्यावर अवलंबून रहाणे, ही तिथली मानसिकता झालेली आहे. सहाजिकच आपण करायचे काय, त्याचे आदेश देणारा कोणी नेता असू शकतो आणि बाकीच्यांनी त्याचे आदेश नि:शंक मनाने पाळायचे असतात. तितकी हुकूमत आज केवळ रजनीकांत याच्याकडे आहे. तितका अन्य कोणी लोकप्रिय अभिनेता नाही की नेताही नाही.

तामिळी राजकारणाची दुसरी बाजू अशी, की मागल्या अर्धशतकात हा प्रांत राष्ट्रीय राजकारणापासून पुरता तुटत गेला. अलग पडत गेला. कॉग्रेसने १९६७ सालात द्रमुक समोर पराभव पत्करल्यानंतर अशा घडामोडी घडत गेल्या, की कॉग्रेसने असलेली संघटना व पक्ष वाचवण्यापेक्षा राजकीय मतलबापुरते राजकारण केले. द्रमुकची दुफ़ळी व त्यात कॉग्रेसने निवडणूका जिंकण्यासाठी केलेल्या तडजोडी, यामुळे पक्ष पुन्हा उभा राहिला नाही. उलट उरलासुरला राजकीय अवकाशही फ़ुटीर द्रविडी पक्षांनीच व्यापून टाकला. १९८० नंतरच्या काळात दोन द्रविडी पक्षात अवघे राजकारण व्यापले गेले आणि त्यांच्या दुबळेपणाचा लाभ उठवित आणखी काही किरकोळ प्रादेशिक व जातीय गट उदयास आले. परिणामी राष्ट्रीय पक्ष व राष्ट्रीय राजकारण जवळपास निकालात निघाले. कॉग्रेसने संघटना टिकवली नाही आणि अन्य राष्ट्रीय पक्षांना आपला तिथे विस्तार करण्याची संधीही मिळू शकली नाही. आज देशात कॉग्रेसची जागा व्यापणार्‍या भाजपाला तिथे नेतृत्व उभे करण्यास अवधी मिळू शकलेला नाही. काळ बदलला आणि अनेक पिढ्याही बदलल्या आहेत. परिणामी तामिळी लोकांची मानसिकताही खुप बदलली आहे. पण तिचा अंदाज घेऊन राष्ट्रीय राजकारणाला चालना देणारा कुणी नेता तिथे उदयास येऊ शकलेला नाही. सहाजिकच पोकळी निर्माण झालेली असली तरी ती भरून काढण्यास कुठला राष्ट्रीय पक्ष पुढाकार घेऊ शकलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर रजनीकांत तिथे राजकारणात उतरू बघत असेल, तर तामिळी जनतेला त्यात दिलासा वाटणे स्वाभाविक आहे. कारण पर्याय नसल्याने अगतिकपणे ही द्रविडी जनता भारतीय मुख्यप्रवाहातून अलग पडलेली आहे. रजनीकांत त्या दिशेने राजकारण घेऊन जाऊ शकेल काय? तसे झाल्यास पन्नास वर्षानंतर पुन्हा हे दक्षिणी राज्य भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकेल.

रजनीकांत राजकारणात येणार म्हटल्यावर जे अनेक आक्षेप पुढे आले आहेत, त्यातला मुख्य आक्षेप तो लोकप्रिय तामिळी अभिनेता असला. तरी मुळचा द्रविडी वंशाचा नाहीम. पण हा आक्षेप टिकणारा नाही. रजनीकांत हा वंशाने मराठी व जन्माने कानडी आहे. पुढे तामिळी चित्रपटात यशस्वी झाल्याने त्याच्यावर तामिळी असा शिक्का बसलेला आहे. पण जयललिता वा एमजीआर यांची कथाही वेगळी नव्हती. तेही मुळचे द्रविडवंशीय नव्हते. एमजीआर हे मल्याळी वा केरळीय होते आणि त्यांचा जन्म श्रीलंकेत झालेला होता. पुढल्या वयात त्यांनी तामिळनाडूत येऊन आपले बस्तान बसवले. जयललितांची गोष्ट वेगळी नाही. त्याही कानडी वंशाच्या व आंध्रप्रदेशात जन्म घेऊन तामिळी चित्रपटाच्या लोकप्रिय नायिका बनल्या. पुढे राजकारणात येऊन त्यांनी आपले स्थान निर्माण केले. मग रजनीकांत मराठी असला म्हणून काय बिघडले? हे आक्षेप घेणार्‍यांना जुना इतिहास ठाऊक आहे आणि एमजीवार व जयललितांची पुर्वकहाणीही ठाऊक आहे. पण रजनीकांत समोर आपला टिकाव न लागण्याच्या भयाने त्यांना व्याकुळ केलेले असल्याने, त्यांनी वंश व भाषेचा विषय पुढे केला आहे. त्यामुळे रजनीकांतचे पाठीराखे विचलीत होण्याची अजिबात शक्यता नाही. ज्या पद्धतीने अलिकडे त्याने आपल्या चहात्यांच्या बैठकी घेतल्या व त्याला जो प्रतिसाद मिळाला; त्याकडे बघता, राजकारणात द्रविडी वंशाचा वा भाषेचा आक्षेप टिकण्याची बिलकुल शक्यता नाही. पण राजकारणाच्या विश्लेषणात अशा नगण्य आक्षेपांना किंमत नाही. बदल कुठला होणार याला प्राधान्य असायला हवे. ते प्राधान्य आहे तामिळानाडूत कोणता मोठा बदल रजनीकांत घडवून आणू शकणार याला. पन्नास वर्षापुर्वी तामिळनाडू राष्ट्रीय राजकारणापासून तोडला गेला, त्या प्रांताला पुन्हा रजनीकांत राष्ट्रीय प्रवाहात घेऊन येईल काय, हा म्हणूनच महत्वाचा प्रश्न आहे.

रजनीकांत हा आपल्या हाणामारी व चमत्कारीक चित्रपटासाठी ख्यातनाम आहे. पण व्यक्तिगत जीवनात तो अतिशय आध्यात्मिक व देशप्रेमी म्हणून ओळखला जातो. सहाजिकच त्याचे आजवरचे लागेबांधे बघितले, तर त्याचा ओढा भारतीयत्वाकडे आहे. ज्याला मागल्या पन्नास वर्षात तामिळनाडूने तिलांजली दिलेली होती. श्रीलंकेतील तामिळी वाघांचा विषय असो किंवा हिंदी भाषेच्या वापराचा मुद्दा असो, तामिळी राजकारण्यांनी त्यावर सतत काहूर माजवलेले होते. दुसरी गोष्ट धार्मिक आहे. द्रमुक हा पक्ष कझागम चळवळीतून आलेला आहे आणि त्याने सतत हिंदूधर्माच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत. रजनीकांत त्याला अपवाद आहे, एकूण तामिळी लोकसंख्या गाढ श्रध्दावान आहे. मोठमोठ्या मंदिरांच्या या राज्यात मोठ्या संख्येने लोक देवभक्त आहेत. त्यांच्याशी एकरूप होऊ शकणारा रजनीकांत हा नव्या बदलाची म्हणूनच नांदी ठरू शकते. कारण त्याला हिंदू असण्याचे वा आपला धर्म सांगण्याचे वावडे नाही. म्हणूनच त्याने राजकारणात उडी घेतली आणि लोकप्रियतेच्या बळावर बाजी मारली; तर तामिळी राजकारणातून द्रविडी आडमुठेपणाला मूठमाती दिली जाऊ शकेल. नुसताच हा दक्षिणेतॊल मोठा प्रांत राष्ट्रीय प्रवाहात येईल असे नाही, तर त्याला धार्मिक प्रवाहातही आणले जाऊ शकेल. त्यामुळेच रजनीकांत राजकारणात येऊन त्याने नवा प्रादेशिक पक्ष स्थापन केला, तरी तो भाजपाशी मैत्री करील अशी अनेकांना खात्री वाटते आहे. त्याचे पहिले कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी रजनीकांत याची सलगी आहे आणि त्याचा ओढाही राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. तामिळनाडूला प्रांतीय अस्मितेतून बाहेर काढून राष्ट्रीय प्रवाहात आणायला ती मोठी चालना असेल. तसे झाले तर अर्धशतकानंतर हा दक्षिणेतला मोठा प्रांत नव्याने राष्ट्रीय प्रवाहात आलेला असेल. त्याचा लाभ अर्थातच भाजपाला मिळू शकतो. कारण कॉग्रेस आज तरी तिथे काही करण्याची इच्छा गमावून बसलेला पक्ष आहे.

1 comment:

  1. मधे असे वाचण्यात आले होते की सुब्रमण्यम स्वामी म्हणाले भाजपने रजनीकांत ऐवजी शशिकलांबरोबर जावे. भाऊ आपल्याला यात काही राजकीय हिशोब दिसतो का हा वैयक्तीक आकसाचा भाग वाटतो. आपण जरूर लिहावे.

    ReplyDelete