Sunday, July 16, 2017

बगदादीची दंतकथा

 baghdadi के लिए चित्र परिणाम


मागल्या तीन चार वर्षात इसिस नावाची एक विचित्र गोष्ट जगासमोर आली. त्यात अबु बकर अल बगदादी नावाच्या इसमाने इस्लामिक सत्ता म्हणजे खिलाफ़त स्थापन केल्याच्या बातम्या झळकल्या आणि मग त्याच्या एकामागून एक दंतकथा वाचायला व ऐकायला मिळू लागल्या. त्यातला हिंसाचार खरा असला तरी हा बगदादी कोण व त्याचे सामर्थ्य खरोखर किती आहे, त्याचा पुराव्यानिशी कुठला खुलासा कधी होऊ शकला नाही. तुलनेने त्याच्यापेक्षा तालिबान वा अल कायदा यांचा कारभार तरी खुप ‘पारदर्शक’ होता म्हणायचा. कारण अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचे फ़ोटो उपलब्ध आहेत. किंवा त्याची प्रत्यक्ष भेट घेतलेले काही पत्रकार लेखकही आहेत. त्यांनी अज्ञात स्थळी का होईना, ओसामाची कधीतरी भेट घेतलेली आहे आणि आमनेसामने त्याच्याशी बातचित केलेली आहे. ओसामाच्या विविध छावण्या वा लपायच्या जागीही काही लोक जाऊन आलेले होते आणि त्याच्या अन्य सहकार्‍यांशी बातचित केलेले कोणी तरी उपलब्ध आहे. बगदादीची गोष्टच वेगळी! त्याला भेटलेला वा मुलाखत घेतलेला कोणी पत्रकार नाही वा त्याचा अधिकृत फ़ोटोही कुठे उपलब्ध नाही. चार वर्षापुर्वी त्याने इराकच्या मोसुल येथीन अल नुरी मशिदीच्या सज्जावर उभे राहून एक भाषण ठोकले आणि तेव्हाच त्याने इस्लामिक खिलाफ़तची घोषणा केली. तेव्हाचे एक दुरून घेतलेले छायाचित्र वा अस्पष्ट दिसणारे चित्रण उपलब्ध आहे. त्यात काळ्या झग्यात दिसणारा कोणी फ़ेटेवाला दाढीवाला इसम, म्हणजे अबु बकर अल बगदादी मानला जातो. त्यापेक्षा त्याच्याविषयी कुठलीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. पण त्याची हुकूमत, त्याची संघटना वा त्याचे क्रौर्य इत्यादीच्या शेकडो कथा कहाण्या ऐकायला मिळत असतात. अशा कथा ऐकू येतात तशाच त्याची हत्या झाल्याच्याही कथा प्रसिद्ध आहेत.

एकूणच बगदादी आहे कुठे आणि करतो काय, हे जगातले नववे दहावे आश्चर्य म्हणावे अशी स्थिती आहे. कारण त्याची विविध हल्ल्यात हत्या झाल्याच्याही बातम्या खुप झळकल्या आहेत. आधी ठामपणे त्या बातम्या देण्यात आल्या व नंतर त्यांचा इन्कारही करण्यात आलेला आहे. ओसामा बिन लादेन जसा अफ़गाणिस्तानात लपला होता आणि नंतर कुठेच दिसेनासा झाला, तशीच काहीशी बगदादीची कहाणी म्हणता आली असती. पण अखेरीस ओसामाला अमेरिकेने पाकिस्तानात गाठले आणि एका धाडसी हल्ल्यात ओसामाचा खात्मा झालेला आहे. अगदी त्याची डिएनए चाचणी घेऊनच त्याच्या मृत्यूची अमेरिकेने जाहिरात केली. त्याच्या विरोधातली कमांडो कारवाई चालू असताना अध्यक्ष बराक ओबामा व त्यांचे सहकारी थेट प्रक्षेपण बघत होते. वैद्यकीय चाचणीचा अहवाल हाती आल्यावरच खुद्द राष्ट्राध्यक्ष ओबामांनी त्या हत्येची जाहिर घोषणा केलेली होती. पण बगदादीची तशी पक्की बातमी वा घोषणा कोणीही दिलेली नाही. तीनचार प्रसंगी तशा बातम्या आल्या. परंतु त्याची कुठूनही खातरजमा होऊ शकलेली नाही. कारण मुळातच हा इसम आहे कसा व त्याची ओळख कशी करावी, याचे उत्तर त्याच्या शत्रुंपाशी अजिबात नाही. समजा खरेच हा बगदादी अमेरिकन, इराकी वा सिरीयन सैन्याच्या हाती लागला असेल, तरी तोच बगदादी म्हणून त्यांनी त्याला ओळखावा कसा, याचा काही निकष उपलब्ध नाही. त्याचा फ़ोटो वा त्याला जवळून ओळखू शकणारा कोणी नाही. किंबहूना अलिकडल्या इतिहासातील एक वास्तव भासणारे एक भयंकर काल्पनिक पात्र, अशी त्याची ओळख रास्त ठरू शकेल. म्हणूनच तो जीवंतपणी जितके रहस्य होता, तितकेच त्याच्या मृत्यूनंतरही रहस्यच बनुन राहिला आहे. अलिकडेच मोसुलची लढाई इराकी सेनेने संपवल्याची घोषणा केल्याने बगदादी गेला कुठे असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

जी थोडीफ़ार माहिती उपलब्ध आहे ती त्याच्या पुर्वायुष्य़ाची आहे. इब्राहीम अवदल बद्री असे त्याचे मुळचे नाव मानले जाते. इराकची राजधानी बगदादच्या उत्तरेला समारा नावाच्या गावात त्याचा सामान्य कुटुंबात जन्म झाला. विद्यापीठीय शिक्षण घेण्याइतकी बुद्धी त्याच्यापाशी नव्हती आणि दुबळी नजर असल्याने त्याला सैन्यात प्रवेश मिळू शकला नाही. म्हणून त्याने धर्मशिक्षण घेण्याचा विचार केला. नेमक्या त्याच कालखंडात अमेरिकेने रासायनिक हत्यारांचा साठा केल्याचा सद्दामवर आरोप ठेवून, इराकवर आक्रमण केलेले होते. त्यानंतर इराक उध्वस्त होत गेला व तिथे अराजक माजले. त्यात धर्मश्रद्धेने भारावलेला इब्राहिम जिहादकडे वळला. तिथे इराकमध्ये जे कोणी अमेरिकेच्या सैन्याविरुद्ध लढायला सरसावले होते, त्यांच्यात हा तरूण सहभागी झाला व लौकरच त्याने अलकायदाचा त्या भागातील सरदार अबु मुसाब झरकावी याच्या गटात तो सहभागी झाला. पण दरम्यान त्याला अनेकदा अटकही झालेली होती. अमेरिकन सैन्याच्या तावडीत इब्राहीम सापडला होता. पण काही दिवसातच त्याची सुटका झाली. कारण त्याच्या विरोधात कुठलाही भक्कम पुरावा नव्हता. नंतरही दोनदा त्याला अटक झाली. पण त्याला ओळखणारा कोणी नसल्याने तो सुटला. मात्र झरकावीच्या गटात काम करताना त्याचे नेतृत्व गुण उजळ व्हायला लागले आणि अमेरिकेच्या एका हल्ल्यात झरकावी मारला गेल्यानंतर इब्राहीम जिहादी लढवय्यात आघाडीवर आला. त्याने हळुहळू आपल्या सहकार्‍यांचे नेतृत्व हाती घेतले आणि एकाचवेळी शिया मुस्लिम आणि व अमेरिकन कब्जातील इराक यांना मुक्त करण्याची भूमिका तो हिरीरीने मांडू लागला. त्याच्या भोवती मोठा गोतावळा तयार झाला तरी इब्राहीमने कुठल्याही प्रसिद्धी माध्यमांच्या प्रकाशात येण्याचे कटाक्षाने टाळले. मग एकदम २०१४ साली बगदादी नावाने त्याचा गाजावाजा सुरू झाला.

इब्राहीम ते अबु बकर अल बगदादी अशा रुपांतराच्या कालखंडात त्याने आपल्याला इतके अज्ञातवासात नेलेले होते, की त्याच्या निकटवर्तिय मूठभर लोक सोडल्यास त्याला व्यक्तीगत ओळखणारे कोणी मिळू शकलेले नाही. त्याचे जासूद आदेश पोहोचते करायचे आणि कोणालाही भरती करायचे. सहाजिकच बगदादी नावाने कोणीतरी एकच व्यक्ती कार्यरत होती, की अनेकजणांचा एक घोळका बगदादी हा चेहरा लावून इसिसचा कारभार चालवित होते, त्याची शंका आहे. कारण आदेश कोण देत होते आणि निर्णय घेण्याचे अधिकार खरेच कोणाकडे होते, त्याचा विश्वासू पुरावा कुठे उपलब्ध नाही. मोसुलच्या अल नुरी मशिदीच्या सज्जावरून ज्या व्यक्तीने इस्लामिक खिलाफ़तची घोषणा केली, त्याला लोक बगदादी म्हणून ओळखतात. ते चित्रण आणि काही ऑडीओ भाषणे इतके वगळता असा कोणी माणूस खरोखरच असल्याचा अन्य काही पुरावा नाही. म्हणूनच विविध हल्ल्यात बगदादी मारला गेल्याच्या घोषणा झाल्या, बातम्या झळकल्या. पण कुठल्याही गोटातून वा त्यावर शिकामोर्तब होऊ शकलेले नाही. अमूक जागी बगदादीने दडी मारलीय, तमूक जागी तो सुरक्षित कवचात बसलेला आहे, अशा अफ़वांच्या आधारे क्षेपणास्त्रांचे व रॉकेटचे हल्ले अनेक झाले आहेत. पण त्यात खरोखर बगदादी मारला गेल्याचे कोणी ठामपणे सांगू शकलेला नाही. कारण अगदी मृतदेह तपासला तरी ओळख पटवायला हाताशी काहीही माहिती उपलब्ध नाही. कारण मुंबई पुण्यातल्या कुठल्याही सामान्य घरातला वर्तमानपत्राचा वाचक आणि इराक सिरीयात युध्दाचे नेतृत्व करणारे सेनानी, यांची बगदादी विषयी असलेली माहिती सारखीच अपुरी व निरर्थक आहे. म्हणूनच मग प्रश्न पडतो, की झरकावीच्या गटात सहभागी झालेला तो इब्राहीम नावाचा तरूणच पुढे बगदादी नावाने जगाला दहशत घालण्यात इतका यशस्वी झाला काय? की ही नुसतीच एक दंतकथा आहे?

अलिकडेच इराकी सेना आणि अमेरिकन फ़ौजांनी इराकच्या विविध भागावर मोहिमा काढून इसिसच्या कब्जातून मोठा प्रदेश मोकळा केलेला आहे. त्यातच मोसुलचा समावेश असून तिथेच झालेल्या मोठ्या युद्धात अल नुरी ही ऐतिहासिक मशिद जमिनदोस्त झालेली आहे. बगदादीने तिथेच आश्रय घेतलेला असल्यामुळे तोही त्या भीषण हल्ल्यात मारला गेला असावा असा अंदाज आहे. अंदाज एवढ्यासाठी म्हणायचे, की त्याच्या तथाकथित इसिस संघटनेतर्फ़े कोणी त्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. अर्थात दुजोरा देण्यासाठी खरेच मोसुल वा अन्य प्रदेशात इसिसचे नेतृत्व कोण करत होता, त्याचाही तपशील कोणापाशी नाही. जगाच्या विविध देशातले मुस्लिम तरूण इसिसच्या खिलाफ़तीमध्ये सहभागी होण्यासाठी इराकला पोहोचत होते आणि त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून भरती केले जात होते असे म्हणतात. पण प्रत्यक्षात त्यापैकी कोणालाही वास्तविक इसिसचे पदाधिकारी वा अधिकारीही ठाऊक नसल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. मग खरा बगदादी कोण होता आणि खरेच अशी कोणी एक व्यक्ती अस्तित्वात होती किंवा नाही, याचीच शंका आहे. की मोसुल हातातून गमावण्याची पाळी आल्यावर तोही ओसामाप्रमाणे तिथून निसटला होता व त्याने अन्यत्र कुठे आश्रय घेतला असेल? वेशभूषा बदलून त्याने अन्यत्र कुठे सुरक्षित पळ काढला असेल काय? की मोसुल व अल नुरी लढाईत आपल्या लढवय्यांच्या खांद्याला खांदा लावून लढतान बगदादी मारला गेला असेल? आजची स्थिती व माहिती बघितली तर हे रहस्य दिर्घकाळ उलगडण्याची शक्यता नाही. कोणी त्याच्या मृत्यूची ग्वाही देईल वा कोणी अजून तो कुठेतरी दडी मारून बसल्याचाही दावा करायला मोकळा असेल. कारण जगाला बगदादी हे नाव ठाऊक झाल्यापासूनही ती एक दंतकथा बनून गेली आहे. तिला आगा नाही की पिछाही नाही.

2 comments:

  1. Aakhatat kam karnare aaplekadil shantipriy samajache lok mhantat ki bagdadi ha jue aahe, amerika ani israyel ne islam la badnam karnyasathi isis navachi sangtna ubhaeli.

    ReplyDelete
  2. बगदादी असण्या नसण्याने फरकच पडत नाही आपल्या श्रद्धा सत्य आणि अन्याना अस्तित्वाचा देखील हक्क नाही अशा वेडाचाराने पछाडलेली शिकवण आणि ती पिढी दर पिढी इसम दर इसम पाझरण्याची निर्माण झालेली व्यवस्था हाच खरा जगभर पसरलेला बगदादी ओसामा झाकीर नाईक औरंगजेब टिपू खिलजी तुघलक जेझुईट सेंट क्ष सेंट य इ इ आहे ... हा समूळ नष्ट व्हायला ... करायला हवा... शांतता आणि सहअस्तित्व त्याशिवाय पृथ्वीवर नांदणार नाही

    ReplyDelete