Sunday, July 16, 2017

नितीश काय करणार?बिहारचा पेचप्रसंग भलताच रंगतदार होत चालला आहे. यात नितीशकुमार यांची खेळी समजून घेण्याची गरज आहे. हा नेता दिसतो, तितका साधासरळ राजकारणी नाही. तो आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कुठलेही टोकाचे निर्णय घेणारा आहे आणि प्रसंगी दुसर्‍या टोकाला जायलाही कमी करीत नाही. १९९६ सालात लालुंशी दोन हात करताना त्यांची बिहारची शक्ती तोकडी पडली. तेव्हा त्यांनी खुलेआम भाजपाशी हातमिळवणी करण्यास मागेपुढे बघितले नव्हते. तेव्हा शरद यादव, रामविलास पासवान असे नेते नितीशपेक्षा मोठे मानले जात होते. पण जॉर्ज फ़र्नांडीस यांच्या गोटात राहून नितीशनी भाजपाची साथ पकडली होती. आपल्या पुरोगामीत्वाला डाग लावला जात असतानाही त्यांनी भाजपा सोबत जाण्याचे धाडस केले होते. त्यामुळेच त्यांना लालू व पासवान यांच्याशी टक्कर घेत आपला राजकीय चेहरा निर्माण करता आला. पुरोगामीत्वाच्या नावाखाली लालूंच्या भ्रष्टाचाराला पोसण्यापेक्षा नितीशनी वेगळी चुल मांडली व एकाकी भासेल अशी लालूंशी टक्कर सुरू केली. त्यात पुढली दहा वर्षे गेली, पण नितीशनी भाजपाच्या मदतीने बिहारमध्ये आपले स्थान निर्माण केले आणि आपला पक्षही उभा करून घेतला. २००५ मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आणि त्यांनी लालूंचे अराजक मोडून काढण्यात आली प्रतिमा उभी करून घेतली. एनडीए आघाडीत त्यांना महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. पण गुजरातची दंगल चालू असतानाही एनडीएत कायम असलेले नितीश २०१४ च्या लोकसभेत मोदींनी पंतप्रधान पदावर दावा केला. तेव्हा उलटले आणि त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तेव्हा मोदी जिंकतील अशी त्यांची अपेक्षा नव्हती. पण तसे झाले आणि नितीशना आपलेच अस्तित्व टिकवण्याची नामुष्की आली. घेतलेला पवित्रा सोडून त्यांना चालणार नव्हते. म्हणूनच प्रसंगाचॊ लवचिकता ओळखून नितीश दुसर्‍या टोकाला पोहोचले होते.

अठरा वर्षापुर्वी लालूंचा भ्रष्ट कारभार संपवण्यासाठी पुरोगामीत्वाला सोडणारे नितीश, पुन्हा पुरोगामीत्वाच्या आहारी गेले होते. तर त्याची किंमत मोजणेही भाग होते. ती मोठी किंमत होती. त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवण्यासाठी लालूंना शरण जाण्याची नामुष्की आली. लोकसभेचा दारूण पराभव पचवल्यावर असलेली सत्ता टिकवणे अगत्याचे होते. एकट्याने मोदीलाटेचा मुकाबला शक्य नव्हता. तर नितीशनी लालूंशी हातमिळवणी केली. त्यावर खुप टिकाही झाली. पण समिकरण लाभदायक होते. कॉग्रेस, लालू व नितीश मिळून मोदीलाट रोखली जाऊ शकत होती. ती अर्थातच लालूंची गरज होती, तर नितीशची लाचारी होती. म्हणूनच लालूंनी नितीशना खेळवले होते. विधानसभेत लालूंचे २४ आमदार होते तर नितीशचे ११२ आमदार होते. पण जागावाटप करताना नितीशनी शंभर जागांवर समाधान मानले. लालूंना शंभर जागा दिल्या, तर कॉग्रेसला ४० जागा दिल्या होत्या. मात्र बदल्यात नितीशना मुख्यमंत्री म्हणून पेश करण्याची अट घातली होती. त्यामुळे सत्ता टिकली. पण लालुंना अधिक फ़ायदा होऊन त्यांचा पक्ष सर्वाधिक मोठा ठरला. मोदीलाट रोखली गेली आणि नितीशची प्रतिमा उंचावली होती. मात्र लालूंशी संसार मांडणे सोपे असले, तरी तो संसार चालवणे सोपे नव्हते. त्याचे चटके सोसत नितीशनी मागले दिड वर्ष घालवलेले होते. पण बिहारनंतर मोदीलाट संपलेली नसल्याचे पुरावे सातत्याने समोर येऊ लागले आणि तिथेच नितीशनी माघार घ्यायचे ठरवले होते. त्यांना माघारी एनडीएत जाण्याचे वेध कधीच लागलेले होते. पण राजकारणात कुठल्याही स्वार्थाला तात्विक मुलामा द्यावा लागत असतो. म्हणूनच नितीश तशा वेळेची व संधीची प्रतिक्षा करीत होते. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक व इतर काही बाबतीत तशी संधी मिळताच नितीशनी आपले बदलते रंग दाखवायला सुरूवात केलेली होती.

मागल्या तीन वर्षातला मोदींचा कारभार व विविध निर्णय बघता विरोधी राजकारणाला भारतीय मतदानात आज भवितव्य राहिलेले नाही, याची खात्री नितीशना पटली होती. पण म्हणून रातोरात उठून पुन्हा एनडीएमध्ये जाण्याचा मार्ग सोपा नव्हता. विनाकारण महागठबंधन मोडण्याची त्यांची तयारी नव्ह्ती. म्हणूनच नितीश मागले सहाआठ महिने जणू मुहूर्त शोधत होते. कारण लालूंनी नितीशच्या अगतिकतेचा नको तितका लाभ उठवला होता. लालू ही समस्या होतीच. पण महागठबंधन चालवताना लालूंच्या कुटुंबालाही संभाळत बसण्याची कसरत नितीशना असह्य झालेली होती. म्हणून त्यांनी नोटाबंदी वा सर्जिकल स्ट्राईक; अशावेळी आपली वेगळी भूमिका विरोधी पक्षांना दाखवली होती. तिथून त्यांचे एनडीएत जाण्याचे संकेत साफ़ मिळू लागलेले होते. मात्र महागठबंधन मोडण्याचा शिक्का त्यांना आपल्या अंगावर लावून घ्यायचा नव्हता. म्हणून ते योग्य संधीची प्रतिक्षा करीत होते? की त्यांनी तशी परिस्थिती जाणिवपुर्वक निर्माण केलेली आहे? भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालूपुत्र व अन्य यादव कुटुबियांवर आरोप केले आणि त्याची चौकशी होत असतानाच विविध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यानंतर सुशील मोदी यांनी आपल्याला संबंधित पुरावे व कागदपत्रे सत्ताधारी गटातूनच मिळाल्याचाही खुलासा केलेला होता. आता त्यात तथ्य दिसते आहे. कारण त्याच आरोपावरून गुन्हे दाखल झाल्यावर नितीशनी लालूपुत्र तेजस्वी याच्या राजिनाम्याचा विषय प्रतिष्ठेचा बनवला आहे. राष्ट्रपती पदाचे मतदान संपल्यावर ठाम निर्णय होईल असे मानले जात आहे. म्हणजे त्यापुर्वी तेजस्वीला राजिनामा द्यावा लागेल किंवा नितीश त्याला बडतर्फ़ करतील, अशी चर्चा चालली आहे. पण नितीश त्याहीपेक्षा मोठी खेळी करू शकतात. तेजस्वीला बडतर्फ़ करण्यापेक्षा नितीशनी स्वत:च मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला तर काय होईल?

आपल्या सरकारमधील कोणालाही हाकलून लावण्याचा विशेषाधिकार मुख्यमंत्र्याला आहे. म्हणूनच नितीश तेजस्वी या लालूपुत्राला बडतर्फ़ करतील, अशी समजूत आहे. पण तसे केल्यास त्यांच्या कृतीला लालू आव्हान देतील. त्यांचे इतर मंत्री राजिनामा देऊन बहूमताचा प्रश्न उपस्थित होईल. विरोध व पाठींब्याची नवी गणिते जुळवावी लागतील. तसे नाटक मागल्या खेपेस एनडीएतून बाहेर पडल्यावर रंगलेले होते. पण असे करण्यापेक्षा नितीशनी आपल्याच पदाचा राजिनामा दिला, तर बिहारमधील आजचे महागठबंधन सरकारच संपुष्टात येईल. नव्याने मुख्यमंत्री व बहूमताचा नेता शोधावा लागेल. तसे झाल्यास एका फ़टक्यात लालू व कॉग्रेसचे सर्वच मंत्री सत्ताभ्रष्ट, होऊन जातील. मग पुन्हा भाजपाचा पाठींबा दाखवून नितीशना आपले मुख्यमंत्रीपद राखता येईल. नितीश यांचे शब्द समजून घेण्यासारखे आहेत. त्यांनी ‘एकतर तेजस्वी सरकारमध्ये राहिल किंवा नितीश राहिल’; अशी भाषा वापरलेली आहे. लालूंसह कॉग्रेसलाही सता गमवावी लागेल असा तो इशारा आहे. विषय नुसता तेजस्वीचा नाही तर लालू कुटुंबावरील आरोपांचा व दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आहे. अशा लोकांसमवेत आपण सत्तेत एकत्र राहू शकत नसल्याचा तो इशारा आहे. तो लालूंनाही उमजलेला आहे. म्हणूनच तेजस्वीच्या राजिनाम्याने काही साधणार नाही, हे लालू ओळखून आहेत. थोडक्यात लालू व नितीश दोघेही गठबंधन दुसर्‍यामुळे तुटले, असे भासवण्यासाठी उतावळे झालेले आहेत. पण एक गोष्ट साफ़ आहे. नितीश यांनी एनडीएत पुन्हा येण्याचा निर्णय घेतलेला असून त्यातून विरोधकांची एकजुट संपवण्याची मोठी खेळी ते मोदींसाठी खेळत आहेत. अशा खेळीतून पंतप्रधानांचा अत्यंत विश्वासू सहकारी बनण्याची कामगिरी पार पाडायला नितीश सज्ज झालेले आहेत. समजा यातले काही झाले नाही, तरी लालूंचे खच्चीकरण तर नक्कीच होणार आहे.

13 comments:

 1. जबरदस्त अभ्यास भाऊ

  ReplyDelete
 2. दहा दिवसांपूर्वी भाऊ👌👌👌सॉलीड, वाचताना नव्हतं वाटलं असं काही खरंच होईल म्हणून.

  ReplyDelete
 3. छान मांडणी आणि आज हे खर ही झाल

  ReplyDelete
 4. Hats off Bhau. Tumcha andaj agdi khara tharlay..

  ReplyDelete
 5. Attach nitish kumar hyanchya rajinamyachi batmi vaachli aani ha lekh dokyat vije sarkha chamkun gela. Wah bhai sir. Maan gaye. Hats off...

  ReplyDelete
 6. भाऊ खरे ठरले तुमचे!

  ReplyDelete
 7. व्वाह। अगदी बिनचूक आणि परखड आहे

  ReplyDelete
 8. भाऊ जे बोलले तेच झाले
  #Respect

  ReplyDelete
 9. ...आणि आपली भविष्यवाणी खरी ठरली भाऊ!!
  जबरदस्त!!
  ��

  ReplyDelete
 10. BHAU AAJ 27 TARIKH TUMCH KHAR THARAL

  ReplyDelete
 11. मस्त भाऊ ,आपण दूरदर्शी आहात !

  ReplyDelete
 12. भाऊ नीतीशकुमाराच्यां सल्लागार मंडळात आहेत काय ?

  ReplyDelete