Monday, July 3, 2017

सुंभ जळले तरी....

sonia rahul  arrogance के लिए चित्र परिणाम

सध्या राष्ट्रपती निवडणूक जवळ येत चालली आहे आणि त्या निमीत्ताने विरोधी गोटात धमाल उडालेली आहे. जिथे पराभवाचीच हमी देता येते, तिथेही विरोधकांना अजून एकजुट दाखवता आलेली नाही. मग हेच लोक विजय संपादन करण्यासाठी कितीशी एकजुट करू शकतील, अशी शंका सामान्य लोकांच्या मनात आल्यास नवल नाही. भाजपाने बिहारचे राज्यपाल असलेल्या रामनाथ कोविंद यांना उमेदवार केले आणि तात्काळ त्यांचे अभिनंदन करायला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राजभवन येथे दाखल झाले. त्यांनी तो बिहारचा सन्मान ठरवला, तेव्हाच त्यांचा कोविंद यांना असलेला पाठींबा स्पष्ट झाला होता. त्यात नवलाईची कुठलीही गोष्ट नव्हती, किंवा त्यांच्या विद्यमान राजकीय सहकार्‍यांनी तो निर्णय मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. मागल्या खेपेस नितीश एनडीएमध्ये होते आणि तरीही त्यांनी कॉग्रेसप्रणित प्रणबदा मुखर्जी यांचे समर्थन केले होते. त्यामुळे एनडीएचा प्रणेता भाजपाने नितीशवर दुगाण्या झाडलेल्या नव्हत्या. आघाडीतला एक लहान पक्ष असला तरी त्याचे स्वतंत्र अस्तीत्व मान्य करून, भाजपाने त्यावर प्रतिकुल प्रतिक्रीयाही दिलेली नव्हती. हाच कॉग्रेस आणि भाजपातला मूलभूत फ़रक लक्षात घेतला पाहिजे. कॉग्रेस नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी व राहुल गांधी यांना लोकशाही समजत नाही वा आघाडीचा धर्मही उमजत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आघाडीतला आपण प्रमुख पक्ष असलो, तरी तिच्यात सहभागी झालेल्या प्रत्येक लहानमोठ्या पक्षाला व त्यातल्या नेत्यांना विविध विषयात स्वतंत्र मते असू शकतात. वेगळे निर्णय घेण्याची मुभा त्यांना असायला हवी. आघाडीचे राजकारण त्याच लवचिकतेवर चालू शकते. पण आयुष्यभर राजेशाही थाटात जगलेल्या व त्यावर जनमताचा शिक्का मारून घेतलेल्यांना, सुंभ जळले तरी पीळ सोडता आलेला नाही. म्हणून त्यांची अशी दुर्दशा होऊन गेलेली आहे.

भाजपाने राष्ट्रपतीपदी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशा मतांची आधी बेगमी केली आणि नंतरच उमेदवाराची शोधाशोध सुरू केली होती. तेव्हा सोनियांकडे राष्ट्रपती संयुक्त उमेदवारासाठी हालचाली सुरू करण्याचा आग्रह धरणारा पहिला नेता नितीशकुमारच होते. पण त्याकडे पाठ फ़िरवून सोनिया आपले़च राजकारण खेळत राहिल्या. आपल्या सहकारी पक्षांचे मत विचारात घेण्यापेक्षा त्या विरोधकांनी पिढीजात कॉग्रेसजनाप्रमाणे आपल्या मागे रांगत फ़िरावे; अशीच सोनियांची उपजत अपेक्षा असावी. तीच राहुल गांधींची कथा आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत काही लोकांनी मध्यस्थी करून समाजवादी पक्षाशी शेवटच्या क्षणी जागावाटपाचा प्रस्ताव आणलेला होता. त्याची घोषणा अखिलेश व राहुल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत करायचे ठरलेले होते. पण अखिलेशच्या पत्रकार परिषदेकडे राहुलनी पाठ फ़िरवली. त्यामुळे चिडून मुलामयपुत्राने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची एकतर्फ़ी यादी जाहिर करून टाकली. मग कॉग्रेसची तारांबळ उडाली होती. सोनियांनी अखिलेशचे पाय धरायला अहमद पटेलना लखनौला पिटाळले, तर रात्रभर प्रियंका गांधी अखिलेशला मोबाईलवरून संदेश पाठवत राहिल्या. त्याची काय गरज होती? राहुलनी मुजोरी दाखवली नसती, तरी ते जागावाटप पत्रकार परिषदेतच होऊन गेले असते. पण आपल्या पक्षाचे देशभर दिवाळे वाजलेले आहे आणि संसद वा विधानसभेत आपल्या खात्यात चेक देण्याइतकी सुद्धा पत उरलेली नाही, याचेही भान या मायलेकरांना राहिलेले नाही. अन्यथा राहुलनी अखिलेशला वा सोनियांनी नितीश यांना, असे वागवले नसते. त्यामुळे काय झाले आहे? उत्तरप्रदेशात हरायच्या लढाईत अधिक मोठी हार पदरात पडली. आता राष्ट्रपती पदाचीही निवडणूक पराभवाचीच हमी देणारी आहे. पण त्यातून बिहारमधल्या भक्कम महाआघाडीला तडे देण्यापलिकडे काहीही साध्य होऊ शकलेले नाही.

विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार असावा आणि तो कॉग्रेसचा नसावा, असा पहिल्या बैठकीत निर्णय झालेला होता. त्यानंतर सोनियांनी कुठल्याही हालचाली केल्या नाही, की उमेदवारांच्या नावाची चाचपणीही केली नाही. मग भाजपाने उमेदवार निश्चीत केल्यावर धावपळ सुरू झाली. तेव्हा अन्य कुठल्याही पक्षाला विश्वासात न घेताच थेट मीराकुमार यांच्या नावाची घोषणा सोनियांनी करून टाकली. नितीश व त्यांच्या पक्षाने तत्पुर्वीच कोविंद यांना पाठींबा घोषित केला होता. आता कॉग्रेस व सोनियांची अपेक्षा अशी होती, की आपला शब्द व पक्षात घेतलेला निर्णय फ़िरवून नितीशनी मीराकुमार यांना पाठींबा द्यावा. तसा आग्रह धरण्यासाठी कॉग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद पाटण्याला पोहोचले आणि त्यांना नितीशनी नकार दिल्यावर त्यांनी शेलक्या भाषेत बिहारच्या मुख्यमंत्र्याची निंदा केली. थोडक्यात आधी़्च बिनसले आहे, त्याच आगीत तेल ओतण्याचा पराक्रम ज्येष्ठ नेता म्हणवणार्‍या आझाद यांनी केला. बिहारच्या सत्तारूढ आघाडीत कॉग्रेस सर्वात लहान पक्ष आहे, तरी ही मस्ती आहे. त्यातही आघाडीत आल्यामुळे सर्वाधिक लाभ कॉग्रेसला मिळाला, तर सर्वात मोठे नुकसान नितीशकुमार यांनी सोसलेले आहे. त्यांचे मागील विधानसभेत ११६ आमदार असताना जदयुने अवघ्या १०० जागांवर समाधान मानले आणि कॉग्रेसचे केवळ ४ आमदार असतानाही त्या पक्षाला ४० जागा दिलेल्या होत्या. त्यातून २७ निवडून आले. कॉग्रेस स्वबळावर किती निवडून आणू शकली असती? २७ आमदार ही लालूंची मेहरबानी व नितीशचा त्याग आहे. पण आमदार पाठीशी आल्यावर सोनिया व कॉग्रेस त्याच नितीशना दमदाटी करीत असेल, तर त्या नेत्याने मान खाली घालून त्यांचे ऐकावे काय? देशातली गोष्ट सोडा, बिहारमध्ये कॉग्रेसला स्वबळावर दहा आमदार निवडून आणणे शक्य नाही आणि उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाशी हात मिळवून ७ आमदारापर्यंत मजल मारता आली. तरी इतकी मस्ती?

आपल्या पडत्या काळातही इंदिराजींचा दरारा मोठा होता. त्यांनी स्वपक्षात व मित्र पक्षात इतकी हुकूमत गाजवण्याचा प्रयास केलेला कधी दिसला नाही. सोनिया गांधी वा राहुल-प्रियंका कसली मस्ती दाखवत असतात? खालसा झालेल्या राजे संस्थानिकांच्या जुन्या जमान्यातील कथाकहाण्यांचे हे कुटुंब नेहमी स्मरण करुन देत असते. अन्यथा आज बिहारमध्ये सुखरूप चाललेल्या महाआघाडीच्या राजकारणात असा व्यत्यय आणला गेला नसता. नितीशकुमार यांची कोंडी करण्याचे जे काही डावपेच आज खेळले गेले आहेत, त्यातून कॉग्रेसने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहेच. पण २०१९ सालातील लोकसभा निवडणूकीत एकजुट होऊ बघणार्‍या विरोधी आघाडीवर चक्क दरड कोसळून टाकली आहे. मोदी व भाजपाच्या वाढत्या प्रभावाला व विस्ताराला पर्यायी राजकारण उभे करण्यासाठी आपण कसे नाकर्ते आहोत; याची ग्वाही राहुल यांनी यापुर्वीच दिलेली होती. पण बिहारच्या घटनाक्रमाकडे बघता, सोनियांनी आपणही राहुलची ‘राजकीय जननी’च असल्याची साक्ष दिलेली आहे. यश मिळवता आले नाही म्हणून बिघडत नाही. पण जे आपण मिळवलेले नाही वा पुर्वजांची पुण्याई आहे; त्यावरही खुशहालीने जगता येत असते. त्यासाठी फ़ारशी अक्ललही लागत नाही. समयोचित वागले तरी निभावून जात असते. पण नेहरू खानदानातील हे वारस शतायुषी कॉग्रेसला पुरते नामशेष करूनच थांबतील, अशी आता खात्री होत चालली आहे. तसे नसते तर पराभवाची खात्री असलेल्या मीराकुमार यांना पाठींबा देण्यावरून सोनियांनी एका महत्वाच्या नेत्याला विरोधात जाण्याची वेळ कशाला आणली असती? आता राहुल मायदेशी परतले आहेत. ते बहुधा नितीशना एनडीए आघाडीत नेवून सोडण्यापर्यंत मजल मारण्याची शक्यता म्हणूनच वाटते. नितीशची त्यासाठी तयारी नसली, तरी हे खालसा संस्थानिक वारस त्यांना विरोधात फ़ार काळ थांबू देतील असे वाटत नाही.

3 comments:

  1. ते बहुधा नितीशना एनडीए आघाडीत नेवून सोडण्यापर्यंत मजल मारण्याची शक्यता म्हणूनच वाटते. ---

    सुरुवात झाली आहे. हे पहा http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-have-no-aspiration-to-be-pm-candidate-in-2019-says-nitish/articleshow/59422094.cms

    ReplyDelete
  2. नितीश सोडा शिवसेनेतर दोनदा NDAच्या विरोधी जाउन मतदान केले होते तेव्हा भाजपचा अहंकार वैगेरे दुखावला गेला नाही वा nda पन तुटली नाही.इथे नितीशने एकदा मतदान केले तर काय बिघडते? आणि हसु तर जेव्हा येते मीराकुमार म्हनतात तत्वाची लढाइ आहे कसले तत्व? भाजपचे? कारन त्यांनी दलित उमेदवार दिला म्हनुन यांनी दिला हि फरफट झाली तत्व नव्हे.अस वाटत अतिंमहत्वकांक्षी शहा आणि हरवलेली काॅंगरेस यात 2019 च्या लोकसभेचे काय चित्र असेल? 14 पेक्षा 19 मध्ये भारताची राजकीय व्यवस्था उलटपालट होइल

    ReplyDelete
  3. bhau aapan Israel aani Hindusthan ya vishayi Lekh lihava karan Modi aani Netanyahu yanchi jhaleli aitihasik bhet yaat nakkich kahitari asnar aani tech amhala janun ghaychay

    ReplyDelete