Sunday, July 23, 2017

पायाशी काय जळतंय?



एक राजा होता आणि त्याच्या समोर कोणाला सत्य बोलण्याची हिंम्त नव्हती. कारण सत्य बोलणार्‍याला राजा शिक्षा करायचा. सहाजिकच राजाला आवडेल तेच बोलणारे त्याच्या अवतीभवती होते. एकेदिवशी सत्य समोर आले आणि राज्यावर संकट आले, अशी एक भाकडकथा आहे. कुठल्याही भाकडकथेमध्ये काही संदेश लपलेला असतो. म्हणूनच याही भाकडकथेमध्ये काही इशारा नक्कीच आहे. राहुल गांधी यांनी ही कथा बंगलोर येथे आपल्या श्रोत्यांना ऐकवून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले, अशा बातम्या आलेल्या आहेत. पण त्या भाकडकथेतील इशारा वा संदेश माध्यमांना किती समजला वा कथाकथन करणार्‍या राहुलना किती उमजलेला आहे, याची शंका येते. कारण त्या कथेचे सार त्यापैकी एकाला जरी समजले असते, तरी त्यांचे खुप कल्याण झाले असते. सत्य कोण लपवतो आहे, तेच मागल्या दहापंधरा वर्षात लोकांनी प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतले आहे. म्हणून तर मागल्या तीन वर्षत देशाचे राजकारण व राजकीय वातावरण आमुलाग्र बदलून गेले आहे. बाकीच्यांचे सोडून द्या; राहुल यांच्या सभोवती जमा होणार्‍यांनी कधी त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला असता, तरी कॉग्रेससह अन्य पुरोगामी पक्षांची इतकी दुर्दशा झाली नसती. कॉग्रेसचे इतके बुरे दिन आले नसते. ह्या कथेचे कथन राहुल गांधी करीत असताना, टिव्हीच्या पडद्यावर अर्ध्या बाजूला गुजरातामधील राजकीय घटनाक्रम दाखवला जात होता. त्यात गुजरातमधील कॉग्रेसचे दिग्गज नेते शंकरसिंग वाघेला कॉग्रेस आणि राहुल यांचे धिंडवडे काढत होते. वाघेला जे सत्य सांगायला काही महिने धडपडत आहेत, ते ऐकण्याची हिंमत राहुलनी कधी दाखवली आहे काय? असती, तर त्यांना त्यांनीच कथन केलेल्या भाकडकथेचा सारांश उमजला आहे, ही गोष्ट मान्य करावी लागली असती. पण राहुल असोत किंवा मोदीत्रस्त पुरोगामी असोत, त्यांना सत्य सांगून उपयोग नाही. ते त्यांना पचणारे नाही.

राहुलना कायम देशाची चिंता सतावत असते. पण आज तरी त्यांच्यावर कोणी देशाची जबाबदारी टाकलेली नाही. हजारो लाखो कॉग्रेस कार्यकर्ते व पाठीराख्यांनी पक्षाचे नेतृत्व करण्याची कामगिरी राहुलवर सोपवलेली आहे. ती जबाबदारी या नेत्याला किती जागरूकपणे पार पाडता आलेली आहे? मागल्या काही वर्षात कॉग्रेसची जी दुर्दशा चाललेली आहे, त्याला राहुल व त्याच्या मातोश्रीच जबाबदार आहेत. हे सत्य आहे. पण ते बोलण्याची त्या पक्षात कोणाची बिशाद आहे काय? २०१३ च्या मध्यास कॉग्रेसचे एक अभ्यासू नेते जयराम रमेश यांनी एक गंभीर सत्य आडोशाने बोलण्याची हिंमत केलेली होती. तेव्हा राहुलची भाषणे रमेशच लिहून देतात अशी वदंता होती. तर अशा रमेश यांनी मनातली एक वेदना बोलून दाखवली होती. लोकसभेच्या निवडणूका २०१४ सालात होऊ घातल्या आहेत आणि राहुल गांधी २०१९ सालच्या मतदानासाठी पक्षाची उभारणी करीत आहेत. असे ते विधान काय सांगणारे होते? आमच्या नेत्याला २०१४ सालात मतदान आहे याचेही भान उरलेले नाही. म्हणूनच कॉग्रेसजन अस्वस्थ आहेत, असेच रमेश यांना म्हणायचे होते. ज्या पद्धतीने राहुल पक्षाचे नेतृत्व करीत आहेत वा पक्षाला ज्या दिशेने घेऊन जात आहेत, त्यात पक्षाचा पराभव अपरिहार्य आहे; असाच त्यातला सारांश होता. पण तो सारांश रमेश ठामपणे राहुलना सांगायला धजावले नव्हते. तेच सत्य उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी राहुलसह सोनियांना सांगायला रिटा बहुगुणा जोशी धडपडत होत्या. पण त्यांना श्रेष्ठींपर्यंत आपला आवाज पोहोचवणेही अशक्य झाले. पण दिशाभूल करणारे खोटे आकडे राहुलपर्यंत बिनदिक्कत पोहोचत होते. खोटारड्यांना राहुलसमोर बोलायची अजिबात भिती वाटत नाही. पण सत्य सांगण्याचे धाडस कोणातही नव्हते वा सत्य कथनाला कॉग्रेसमध्ये कधीचाच प्रतिबंध घातला गेला आहे. म्हणून तर ही अवस्था झालेली आहे.

बंगलोर येथे असली भाकडकथा इतरांना ऐकवण्यापेक्षा राहुलनी आपल्या नेतृत्वाखाली पक्षाची तीन वर्षात झालेली अवस्था व ती कथा यांची सांगड घातली असती, तर या संमेलनातही कोणी खरे बोलायला आलेला नाही, याचे त्यांना आकलन झाले असते. अशी संमेलने वा मेळावे मागल्या तीनचार वर्षात राहुलनी खुप गाजवलेले आहेत. पण त्यात बोलले गेलेले काय सत्य ठरले आहे? प्रत्येकवेळी खोट्याचा पाऊस पाडला गेला आणि पुरोगामी प्रांतातले सर्वच्या सर्व तलाव, नद्या वा ओढेनाले कोरडे ठणठणित पडलेले आहेत. त्या कोरड्या तलाव नाल्यांकडे जरी डोळसपणे बघितले, तर राहुलच्या लक्षात आले असते, की आपल्याला सत्यापासून वंचित ठेवले जाते आहे. सत्य बोलण्याची हिंमत आपल्या कुठल्याही सहकारी नेते व पक्षांमध्ये राहिलेली नाही. त्याचे दुष्परिणाम प्रत्येक निवडणूकीत भोगावे लागत आहेत. लोकसभा गमावली आणि एकामागून एक विधानसभा आपण गमावत चाललो आहोत. याचा अर्थच त्या भाकडकथेतील नग्न राजा आपणच आहोत, इतका तरी बोध झाला असता. परिणामी राहुलना बंगलोरचा तो मेळावा सोडून गुजरातला धाव घ्यायची इच्छा झाली असती आणि कदाचित शंकरसिंग वाघेला यांना विधानसभेचे मतदान होईपर्यंत तरी कॉग्रेस पक्षात रोखून धरणे शक्य झाले असते. महाराष्ट्र वा अन्य काही राज्यातली राष्ट्रपती निवडणुकीतली मते फ़ुटली नसती. लालू-नितीश भांडणात आपण अकारण नाक खुपसू नये, इतकी तरी अक्कल या नेत्याला आली असती. पण त्यासाठी पोपटपंची सारखी ती कथा सांगुन उपयोग नसतो. त्यातले तथ्य व सत्य समजूने घेणे अगत्याचे असते. राहुलना जगातले सर्व सत्य आधीच गवसलेले आहे. त्यामुळे त्यांना शिकण्यासारखे काही उरलेले नाही. मग ते राजकारण असो किंवा भाकडकथा असो. त्यांनी शतायुषी पक्षाला गल्लीतल्या विटीदांडू वा लगोरीचा खेळ करून टाकला आहे.

मोदी सरकारचे जे वर्णन आपण करीत आहोत, तशी हुकूमशाही इंदिराजी नामक आपल्या आजीनेच या देशात चार दशकापुर्वी आणलेली होती आणि सत्याची गळचेपी करण्याचे सर्व मार्ग बिनधास्तपणे वापरले होते. हे सुद्धा या गांधीपुत्राला नसावे, यापेक्षा कॉग्रेसचे आणखी कुठले दुर्दैव असू शकते? आपले प्रत्येक विधान वा वक्तव्य यातून आपण भारतीय राजकारणाला हास्यास्पद करीत आहोत व पक्षाची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीस मिळवत आहोत, याचीही शुद्ध या माणसाला राहिलेली नाही. बाकी कॉग्रेसवाल्यांची सत्य बोलण्याची हिंमत बाजूला ठेवा. ज्या संमेलन वा मेळाव्यात राहुल यांनी अशा भाकडकथेची मुक्ताफ़ळे उधळली, तिथे सगळेच कॉग्रेसवाले व्यासपीठावर बसलेले नव्हते. सहाजिकच त्यात जे कोणी शहाणे वा विद्वान उपस्थित होते, त्यापैकी तरी एकाने सत्य बोलण्याचे धाडस करून दाखवायला हवे होते ना? पण त्यापैकी एकही हरीचा लाल उभा राहिला नाही, की त्याने राहुलना खडे बोल ऐकवण्याची हिंमत दाखवली नाही. हा अर्धवटराव जी काही बाष्कळ बडबड त्या मंचावरून करत होता, त्याला माना डोलावण्यात ज्यांनी धन्यता मानली. तेच राहुलच्या कथाकथनातील शहाणे बुद्धीमान नव्हते काय? ज्याच्या आजीने लोकशाहीचे हुकूमशाहीत सहज परिवर्तन करून दाखवले व प्रतिवादाची १९ महिने घटनात्मक गळचेपी केली, त्याच आजीच्या नातवाची मुक्ताफ़ळे जे निमूट ऐकत बसतात, त्यांच्याकडून कुठली लोकशाही वाचवली जाऊ शकते? त्यांच्याकडून कुठल्या सत्यकथनाची अपेक्षा बाळगता येते? ज्याला आपल्या पायाशी वाघेला नामक जाळ पेटला आहे, त्याचीही धग पोहोचू शकत नाही, त्याला काश्मिर कसा व कोणामुळे पेटलाय, त्याचे ज्ञान कसे असावे? उद्या भारतीय राजकारणाचा एकविसाव्या शतकाचा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा मात्र या कथेतल्या राजपुत्रानेच स्वानुभव कथन केल्याची नोंद नक्कीच होईल.

2 comments:

  1. 2014 पुर्वी पुरोगामी पत्रकार पेपरमधुन टिम राहुल बद्दल खुप लिहायचे,तेव्हा वाटत होत खरच आता मनमोहन नंतर टिम राहुल देश चालवनार इतकी स्तुती असायची.मोदीजी तयारी करतायत यावर कधी वाचल नाही पन प्रत्यक्षात ती टीम मोदींसमोर अक्षरशः फुसका बार ठरलीय.

    ReplyDelete
  2. खरंतर या माणसाला बालभारती च्या चवथीच्या क्रमिक पुस्तकांचा ब्रँड अंबसडर म्हणून नेमायची याची लायकी आहे काय. भाषणात तो पुढे काय विचित्र बोलणार आहे याबद्दल सोबतच्या जेष्ठांच्या पोटात गोळा उठत असेल, पण करणार काय? हुजरेगिरीने धाडस नावाची चीज त्या पक्षात राहिली नाही.

    ReplyDelete