Sunday, July 2, 2017

लोकशाहीची मोठी देणगी



जगात लोकशाही असलेले अनेक देश आहेत. या आधुनिक राजकीय प्रणालीने सामान्य माणसाला काय दिले? तर प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने स्वातंत्र्य दिले, असा दावा नित्यनेमाने केला जातो. पण खरेच ही लोकशाहीने दिलेली देणगी आहे काय? स्वातंत्र्य म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ कॉग्रेस पक्षात नेहरू खानदान वा सोनिया राहुल यांना वगळून कोणाही विरुद्ध काहीही बोलण्याचे अथांग स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतरही पक्षात कमीअधिक असेच स्वातंत्र्य आहे. देशात कुणालाही देशाच्या विरोधात बोलायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपण लोकशाही देश आहोत, असे छाती फ़ुगवून सांगितले जाते. पाकिस्तानात बाकीचे स्वातंत्र्य असले तरी इस्लामची धर्मचिकित्सा करण्याची मुभा नाही. तेही लोक अभिमानाने लोकशाहीचे कौतुक सांगत असतात. कारण प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या भिन्न असते. नुसती स्वातंत्र्याचीच नाही तर न्यायाची, अन्यायाची वा विविध शब्दांची व्याख्या व्यक्ती वा समूहानुसार बदलत असते. म्हणूनच लोकशाहीचीही व्याख्या बदलू शकते आणि त्यानुसार सुखदु:खाची व्याख्याही बदलू शकते. मग लोकशाहीने माणसाला काय दिले, या प्रश्नाचे एकच सर्वमान्य उत्तर कसे असू शकेल? कसे मिळू शकेल? पण किमान समान गोष्टी शोधल्या, तर एक गोष्ट सर्वांना मान्य व्हायला हरकत नाही, की लोकशाहीने नालायक व नाकर्ते सरकार लोकांच्या बोकांडी बसवलेले आहे. प्रत्येकवेळी निवडणूका होतात आणि नागरिक मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडून अधिकाधिक नालायक सरकार निवडून देतात. जगाच्या पाठीवर आज जितके म्हणून लोकशाही देश आहेत, तिथली माध्यमे ,वर्तमानपत्रे व त्यातून मतप्रदर्शन करणार्‍या विचारवंत प्रतिभावंतांना वाचले-ऐकले म्हणजे ठाम विश्वास बसतो, की लोकशाहीमुळे जनतेला केवळ नाकर्ते सरकार मिळत असते.

सद्दाम हुसेन आज हयात नाही. पण जेव्हा त्याच्या पोलादी टाचेखाली इराक भरडला जात होता, तेव्हा तिथे किती छान कारभार चालू होता? कोणाची म्हणून कुठलीही तक्रार नव्हती. कुणाच्याही घरातल्या तरूण मुलीला उचलून सद्दामचे सुपुत्र उद्धार करण्यासाठी घेऊन जात. चुकून कोणी सद्दामच्या सत्तेविरोधात मतप्रदर्शन केले, तर त्याला उद्या उगवणारा सूर्यही बघता येत नसे. पण म्हणून त्या काळात इराकच्या कुणा बुद्धीमंत प्रतिभावंताने प्रचलीत राज्यकर्त्याला नाकर्ता ठरवण्याची हिंमत केली होती काय? तसाच इतिहास आपल्याला सोवियत कालखंडातील राज्यकर्त्यांचाही तपासून बघता येईल. कोणी म्हणून कोणी प्रतिभावंत त्या सरकारविषयी अवाक्षर बोलत नव्हता. सर्वकाही झकास चाललेले होते आणि इथले डावे प्रतिभावंत सोवियत संस्कृती केंद्रात बसून तिथल्या स्वर्गिय सत्तेविषयी सविस्तर लिखाण करीत होते. आजही उत्तर कोरियात किती छान लोककल्याणकारी सत्ताधीश कारभार करीत आहेत? तिथल्या कोणा प्रतिभावंतांना त्यांनी तक्रार करायला जागाच ठेवलेली नाही. जागा म्हणजे स्वातंत्र्य हो! असे कोणी या हुकूमशहांच्या विरोधात वा सत्तारूढ व्यवस्थेच्या विरोधात बोलला, मग त्याला जगण्याचे स्वातंत्र्य शिल्लक उरत नाही. सहाजिकच जगायचे स्वातंत्र्य हवे असेल तर प्रतिभावंत म्हणून टिकाटिप्पणी वा विश्लेषण करण्याची बुद्धी विसरून जावी लागत असते. सहाजिकच दिसेले वा अनुभवास येणारे सर्वकाही आपोआप झकास होऊन जाते. तसे स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयास करणार्‍या लेनिनकालीन ट्रॉटस्कीला देशातून परागंदा व्हावे लागले होते आणि तरीही त्याला परदेशात जाऊन सोवियत क्रांतीकारकांनी मोक्ष दिलेला होता. कारण ट्रॉटस्कीने आश्रय घेतला त्या देशात टिकेची मुभा होती तशीच हत्येचीही मुभा होती. ही खरी लोकशाहीची किमया आहे. ज्यामध्ये प्रतिभावंत बुद्धीमंतांची स्वातंत्र्याची हौस भागवली जात असते.

तसे बघितले तर कुठल्याही देशात वा समाजात मुठभरच विचारवंत असतात. बाकीच्या सामान्य जनतेला कुठल्याही स्वातंत्र्याची कसलीही फ़िकीर नसते, की त्याविना त्या बहुसंख्य जनतेचे काहीही अडत नसते. म्हणूनच बहुसंख्य जनतेला हुकूमशहा स्टालीन वा दडपशहा सद्दाम किंवा लोकशाही यात किंचीतही फ़रक पडत नसतो. पण जेव्हा त्या सामान्य नागरिकाच्या वाट्याला थेट येऊन भिडणारा अत्याचार येतो, तेव्हा त्याला स्वातंत्र्याची महत्ता उमजत असते. तेव्हा मग विचारवंत स्वातंत्र्य कशाला म्हणतात, त्याची गरज पटू लागते. पण सामान्य माणसाची स्वातंत्र्याची अपेक्षा खुपच मर्यादित असते. आपल्या कौटुंबिक वा व्यक्तीगत गरजांपुरती मर्यादित असते. प्रतिभावंताची गोष्ट भिन्न असते. त्यांना जगातल्या कुठल्याही बाबतीत मतप्रदर्शनाची खाज असते. कारण असो किंवा नसो, सत्ताधिशाला अपमानित करण्याची हौस असते. किंबहूना सत्ताधीशाच्या सत्तेला आपण घाबरत नाही, हे दाखवण्याची अनिवार इच्छा अशा लोकांना बुद्धीमंत असल्याची मान्यता वाटत असते. त्यामुळेच कुठल्याही निमीत्त वा कारणाने असे प्रतिभावंत, सत्ताधीशावर टिकेची झोड उठवत असतात. त्यातून जनतेने किती नाकर्ते व नालायक सरकार आपल्या बोकांडी आणून बसवले आहे, त्याचा घोषा लावत असतात. जोपर्यंत सामान्य नागरिकाला त्यात तथ्य वाटत नाही, किंवा सत्ताधीशाच्या उपदव्यापाचे चटके नागरिकांना बसत नाहीत, तोपर्यंत बुद्धीमंत कितीही बोंबलले म्हणून लोक सत्तेत बदल घडवून आणत नाहीत. कारण सामान्य नागरिकाच्या अपेक्षा खुप सामान्य व किरकोळ असतात. असा नागरिक वा मतदार चवताळणार नाही व आपल्या विरोधात प्रतिभावंतांच्या कल्पनांच्या आहारी जाणार नाही, याची काळजी घेऊ शकणारा कुठलाही सत्ताधीश निश्चींत मनाने राज्य करायला मोकळा असतो. तिथली लोकशाही यशस्वी असते.

लोकशाहीत ज्याला दिर्घकाळ सत्ता उपभोगायची असते, त्याने म्हणूनच लक्षात ठेवले पाहिजे, की त्याला बुद्धीमंत वा प्रतिभावान लोकांसाठी सरकार चालवायचे नसून किमान अपेक्षा बाळगणार्‍या सामान्य नागरिकांना सुसह्य वाटेल, असा कारभार करायचा आहे. हजारो वर्षे जगात विविध सत्ताधीश आले आणि शेकडो पद्धतीच्या राजकीय प्रणाली लोकांनी अनुभवल्या आहेत. त्यात ज्यांनी अधिकाधिक जनतेला सुसह्य जीवन मिळण्याची काळजी घेतली, त्यांनाच दिर्घकाळ राज्य करता आलेले आहे आणि त्यात जेव्हा व्यत्यय आला, तेव्हाच लोकांनी सत्तांतर घडवून आणलेले आहे. तो सत्ताधीश एकाच घराण्यातील वा खानदानातील आहे किंवा नाही, याची लोकांनी कधी पर्वा केलेली नाही. सरकारचा आपल्या जगण्यात व व्यवहारात असह्य हस्तक्षेप होऊ नये आणि संकटप्रसंगी शासनकर्त्याने इश्वराप्रमाणे मदतीला यावे, इतकीच या सामान्य नागरिकाची अपेक्षा असते. तेवढ्यापुरता त्याला सरकार वा सत्ताधीश हवा असतो. मग तो लष्करशहा आहे की हुकूमशहा आहे. लोकशाहीने निवडून आलेला आहे की एकपक्षीय हुकूमतीची सत्ता आहे, याविषयी सामान्य नागरिक बेपर्वा असतो. तो भारतातला असो किंवा अमेरिकेतला असो. ज्यांना याचे भान राखता येते, असे राज्यकर्ते लोकशाहीत दिर्घकाळ राज्य करू शकतात. जे आपल्यावर टिका करणार्‍यांकडे दुर्लक्ष करून त्यांना त्यासाठी भरपूर स्वातंत्र्य देतात. विचारवंतांच्या शिव्याशाप हसतखेळत झेलून सामान्य नागरिकाचे जीवन असह्य होणार नाही याची फ़िकीर करतात, त्यांना अजिंक्यपद मिळत असते. प्रतिभावंतांनी त्यांना नालायक ठरवण्यासारखे दुसरे अभय असू शकत नाही. कारण अशा टिकेतून जो किरकोळ रागलोभ सामान्य जनतेमध्ये असतो, त्यातली हवा निघून जाते आणि सत्ता अबाधीत रहाते. म्हणूनच वाटते, जगातल्या कुठल्याही लोकशाहीने दिलेली सर्वात महत्वाची देणगी म्हणजे नाकर्ते नालायक सरकार होय.

3 comments:

  1. अप्रतिम अग्रलेख. संग्राह्य. नंतर अनेक वर्षे ज्यावर चर्चा होऊ शकेल असा ऐतिहासिक अग्रलेख. आभार, भाऊ !

    ReplyDelete
  2. Sir i want to take printouts and distribute.

    ReplyDelete