Tuesday, July 4, 2017

दिदीचा आत्मविश्वास

mamt at secretariat के लिए चित्र परिणाम

युपीएच्या कॉग्रेसप्रणित राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीराकुमार यांनी गुजरातला जाऊन साबरमती आश्रमात महात्माजींच्या स्मारकापासून आपल्या प्रचाराला आरंभ केला आहे. पण आपल्या उमेदवारीविषयी बोलताना त्यांनी मतदारांना आपली सदसदविवेक बुद्धी वापरून मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे. कॉग्रेसच्या गोटात मुळातच कोणी अशा शब्दाचा वापर करणे अपवादात्मक आहे. कारण विवेकबुद्धीला तिथे स्थान असते, तर राहुल गांधी उपाध्यक्ष बनु शकले नसते. किंवा निदान कुणातरी कॉग्रेस नेत्याने असे पद या पक्षात कधी निर्माण झाले, असा सवाल केला असता. पण तो कोणी विचारला नाही, की विवेकबुद्धी आपल्यापाशी असल्याचा कधी पुरावा दिलेला नाही. अशा पक्षाच्या उमेदवार मतदाराला विवेकबुद्धी वापरण्याचे आवाहन करतात, ही बाब म्हणूनच कौतुकास्पद आहे. ती बुद्धी इतरांनी मतदानात वापरण्याची गोष्ट बाजूला ठेवा. खुद्द मीरकुमार यांनी तरी प्रसंग ओढवला तेव्हा तिचा वापर केला होता काय? १९९८ सालात मीराकुमार कॉग्रेस पक्षात होत्या आणि तात्कालीन कॉग्रेस कार्यकारिणीच्याही सदस्य होत्या. तेव्हा कॉग्रेसचे अध्यक्ष म्हणून सीताराम केसरी हे वृद्ध नेते काम करत होते. अशा व्यक्तीला पक्षाच्या मुख्यालयातून काय वागणूक मिळाली होती? त्याने सोनिया गांधी यांच्यासाठी अध्यक्षपद सोडावे असे दडपण आणले गेले आणि केसरींनी त्याला दाद दिली नाही, तेव्हा मारहाण करून त्यांना मुख्यालयातून चप्पल मारून पळवून लावण्यात आले होते. पक्षाध्यक्ष व वयोवृद्ध व्यक्तीला अशी वागणूक देणे कोणाच्या विवेकबुद्धीला पटणारे होते? बाकी कुणाच्या मनाला पटलेले असो वा नसो. मीराकुमार यांच्यापाशी तेव्हा विवेकबुद्धी नव्हती आणि आता अकस्मात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार झाल्यावर त्यांनी ती बुद्धी आत्मसात केलेली आहे काय? की ती विवेकबुद्धी इतरांसाठी असते व आपल्यासाठी नसते, अशी त्यांची समजूत आहे?

यापुर्वी कॉग्रेसमध्ये ह्या शब्दाचा वापर तब्बल ४८ वर्षापुर्वी झालेला होता. तेव्हाही राष्ट्रपतीपदाचीच निवडणूक होती आणि इंदिराजींनी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून संजीव रेड्डी यांचा अर्ज दाखल केला होता. पण पक्षाच्या तमाम आमदार खासदार लोकांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवार रेड्डींना मते द्यावीत, असा फ़तवा इंदिराजींनी काढलेला नव्हता. तर पक्षाच्या संसदीय शाखेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी तसा फ़तवा काढण्याचा आग्रह पक्षातर्फ़े धरण्यात आला होता. तर त्याला झुगारून इंदिराजींनी नेमकी हीच भाषा केलेली होती. प्रत्येकाने आपापल्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलेले होते. त्यांचा सरळ संकेत असा होता, की रेड्डी यांना झुगारून आपण उभ्या केलेल्या बंडखोर व्ही. व्ही. गिरी यांना मतदान करावे. थोडक्यात आताही पक्षाच्या शिस्तीला झुगारून अन्य कुणाला मतदान करण्याला विवेकबुद्धी मानावे, अशी कॉग्रेसची परंपरा आहे. मीराकुमार यांना आता त्याची आठवण आलेली असावी. कारण तेव्हा इंदिराजींच्या या विवेकबुद्धीचे पहिलेच पाठीराखे मीराजींचेच पिताजी जगजीवनराम होते. राजकारण हा नेहमी सोयीच्या तत्त्वज्ञानाचा विषय असतो. सहाजिकच आज मीराकुमारना विवेकबुद्धी आठवली, म्हणून दोषी मानायचे कारण नाही. पण त्यांचे हे आवाहन फ़क्त त्यांच्या गोटाबाहेरच्यांसाठी आहे, की त्यांच्याही गोटातल्या पक्ष व मतदारांसाठी लागू आहे? कारण त्याच्याच खंद्या समर्थक बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी अशा विवेकबुद्धीला भलत्याच घाबरल्या आहेत. त्यांच्या तृणमूल कॉग्रेस पक्षाने मीराकुमार यांना पाठींबा दिलेला आहे. पण त्या पक्षातील सर्व आमदार खासदार विवेकबुद्धीच्या आहारी गेले, तर मीराकुमार यांना मते देणार नाहीत, अशी ममतांना भिती वाटते आहे. तसे नसते तर त्यांनी तृणमूलच्या तमाम आमदार खासदारांना कोलकात्यातच मतदानाला हजर होण्याचा फ़तवा कशाला काढला असता?

देशात सर्वाधिक टोकाचा मोदीविरोध आपणच करतो असे दाखवण्याची स्पर्धा मागल्या वर्षभरात केजरीवाल व ममता यांच्यात चालली होती. पण पंजाबचा पराभव आणि दिल्लीतील भूकंप, यामुळे केजरीवाल पुरते जमिनदोस्त झाले आहेत. त्यांना मोदी व भाजपापेक्षा स्वपक्षातील बंडखोरांना हाताळतानाच नाकी दम आलेला आहे. म्हणून अलिकडल्या दोनतीन महिन्यात केजरीवाल सार्वजनिक जीवनातून अस्तंगत झालेले आहेत. सहाजिकच मोदी विरोधाची लढाई एकाकी ममता लढवित आहेत. कालपरवा त्यातून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही अंग काढून घेतलेले आहे. अशा स्थितीत मीराकुमार यांना जिंकवणे वा त्याहीपेक्षा भाजपाच्या रामनाथ कोविंद यांना पराभूत करणे; ही ममतांची व्यक्तीगत जबाबदारी झाली आहे. त्यात नवे काहीच नाही. मागल्या खेपेस प्रणबदांचे नाव ठरण्यापुर्वीच त्यांना पराभूत करण्यासाठी ममता लखनौला जाऊन मुलायमना भेटल्या होत्या आणि त्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव पुढे करीत प्रणबदांच्या नावालाही अपशकून केला होता. पण पुढे त्यांची विवेकबुद्धी जागृत झाली आणि त्यांनीही आपल्या पक्षाची शक्ती प्रणबदांच्याच मागे उभी केलेली होती. सहाजिकच आज ममतांचा उत्साह समजू शकतो. आपल्या पक्षावर आणि पर्यायाने बंगालवर त्यांची इतकी पक्की पकड आहे, की तिथल्या कुठल्याही घटनेत कोर्टाने हस्तक्षेप केल्याशिवाय पान हलत नाही. याला आत्मविश्वास म्हणतात. अशा ममतांना राष्ट्रपती निवडणूकीत स्वपक्षाचे आमदार खासदार दगाफ़टका करण्याच्या भितीने पछाडले आहे. तसे नसते तर त्यांनी सर्व तृणमूल लोकप्रतिनिधींनी कोलकात्यातच मतदान करावे, असा फ़तवा कशाला काढला असता? दिल्लीत वा इतरत्र मतदान करताना कोणी गफ़लत केली मग? त्यापेक्षा कोलकात्यात आपल्या हस्तकांकरवी नजर ठेवून मतदान घडवून आणायचा त्यांचा बेत आहे.

राष्ट्रपती पदाचे मतदार सर्व खासदार व आमदार असल्याने त्यासाठीचे मतदान देशातील सर्व विधानसभा व संसद भवनात होत असते. त्या दिवशी जिथे कोणी मतदार असेल, त्त्याला त्या वास्तुंमध्ये जाऊन ओळखपत्र दाखवून मतदान करायची मुभा आहे. सहाजिकच तृणमूलचा कोणी खासदार दिल्ली वा मुंबईत असला, म्हणून त्याचा मतदानाचा हक्क वाया जाऊ शकत नाही. तिथल्या विधानभवनात जाऊनही तो मतदान करू शकेल. पण तो विवेकबुद्धीला स्मरून पक्षाच्या आदेशाविरुद्ध गेला मग? ममतांच्या आदेशापेक्षाही त्याला आपली विवेकबुद्धी प्रभावी वाटली तर? तो भाजपाचे उमे़दवार कोविंद यांनाही मतदान करू शकतो. याच भयाने ममता व्याकुळ झालेल्या आहेत. मतदार फ़ोडले जाणे वा त्यांना आमिष दाखवले जाणेही शक्य असते. पण तशी कुठली भिती ममतांनी व्यक्त केलेली नाही. त्यांचे हे आदेश केव्हा जारी झाले, तेही तपासून बघता येतील. मीराकुमार यांनी विवेकबुद्धीला आवाहन करण्यापर्यंत ममतांना अशी भिती वाटलेली नव्हती. पण ज्यांना तृणमूलची मते द्यायची आहेत, त्याच मीराकुमार यांनी विवेकबुद्धीला आवाहन केले आणि ममतांचा धीर सुटला आहे. आपल्या पक्षात विवेकबुद्धीला स्थान मिळाले, तर मीराकुमारना कोणीही तृणमूल आमदार खासदार मत देणार नाही; असा बहुधा ममतांना आत्मविश्वास वाटत असावा. म्हणूनच त्यांनी विनाविलंब आपल्या खासदारांना कोलकात्यातच मतदान करावे, असा फ़तवा जारी केला आहे. पण अशा तारांबळीमुळे ममता आता आपल्याच बालेकिल्ल्यात किती असुरक्षित झाल्या आहेत, त्याचीच प्रचिती येते. त्यांचा आपल्या पक्षातील खासदार व आमदारांवर विश्वास राहिलेला नाही. कोणी आपले आदेश पाळण्यात दगाफ़टका करी,ल अशा भयाने त्यांना सतावलेले असावे. मग मीराकुमार यांच्या विवेकबुद्धीचे काय व्हायचे?

3 comments:

  1. त्रिपूराच्या ६ तृणमूल कॉंग्रेस आमदारांनी आधीच कोविंदना पाठींबा दिला आहे; मार्क्सवाद्यांच्या विरोधात.

    ReplyDelete
  2. ममतांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा आणखी पुरावा परवाच घडला.त्यांचे तारतम्य पन सुटले आहे हिंदु ना रथ काढण्याची परवानगी नाकारली कारन तिथे मुस्लिम जास्त आहेत हा काय प्रकार झाला? उद्या बंगाल मधले हिंदु भाजप ने काही प्रयत्न न करता त्यांच्याकडे गेल्यास नवल नाही.डाव्यांचा गड एक दशकातच उजव्याकडे जानार

    ReplyDelete
  3. त्रिपुरातील तृणमूलचे सर्व संघटन व सहा आमदार भाजपमधे गेल्यामुळेही बंगालबाबत ममताला असुरक्षित वाटत असणार

    ReplyDelete