Saturday, July 1, 2017

बीफ़ फ़ेस्टीवल का थंडावले?

girish karnad at beef party के लिए चित्र परिणाम

गेल्या वर्षी केव्हा तरी काही राज्यांनी गोहत्येला बंदी घालण्याचे आदेश दिले आणि विविध राज्यात अकस्मात गोमांस खाण्याच्या मेजवान्य़ांचे पेव फ़ुटले होते. कर्नाटकात कुठल्या तरी एका समारंभात आपल्या धर्मनिरपेक्षतेचे प्रदर्शन मांडायला प्रख्यात नाटककार गिरीश कर्नाडही अशा मेजवानीला अगत्याने हजर राहिले आणि त्याचा खुप गाजावाजा झालेला होता. प्रत्यक्षात कुठल्या राज्यात आणि कुठल्या भागात गोमांस खाण्यावर प्रतिबंध आलेला नव्हता. पण बेकायदा कत्तलखाने बंद करण्याचे आदेश कोर्टाच्या निर्णयानुसार लागू करण्यात आलेले होते. पण त्याचे भांडवल करून भाजपा हिंदूत्ववादी व त्याचे सरकारही मुस्लिम विरोधी, असा देखावा निर्माण करण्याची इतकी घाई तथाकथित पुरोगाम्यांना झाली होती. त्यांनी वडाची साल पिंपळाला लावून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयास जोमाने सुरू केला. त्याच्या परिणामी अशा गोमांस मेजवान्यांचे पेव फ़ुटलेले होते. त्याविषयी कुठला प्रतिबंध नसल्याने कुठेही अशा मेजवान्या वा गोमांस भक्षणाच्या विरोधात पोलिस वा कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही. व्हायचे काही कारणही नव्हते. पण त्यातून एक विकृत संदेश मात्र देवेभोळ्या व धर्मनिष्ठ लोकांच्या मनात जाऊन पोहोचला, की देशात गोमांस खाण्याला वा बाळगण्याला बंदी आलेली आहे. पण सरकार वा पोलिस मात्र काहीही करायला तयार नाहीत. परिणामी आपल्या धर्मश्रद्धा धोक्यात आलेल्या आहेत आणि आपणच काहीतरी हालचाल करायला हवी आहे. मग तिथून गोमांस व कत्तलीसाठी जाणार्‍या पाळीव पशूंच्या विरोधात जमाव काम करू लागले होते. पण गंमत बघा, तितकी आग लावल्यावर तमाम गोमांस मेजवान्या थंडावल्या आहेत. मग त्यामागचा दुष्ट हेतू साफ़ होऊन जातो. अशा मेजवान्या योजून जनमानसात बेबनाव निर्माण करण्यापलिकडे त्याचा अन्य काहीही हेतू नव्हता.

अशा गोमांस मेजवान्या योजणार्‍यांनी तेव्हा काय आव आणला होता? ज्याला जे हवे, ते तो खाईल. सरकार कोण त्याच्यावर कायद्याने सक्ती करणार? आम्ही असली सक्ती जुमानत नाही. म्हणूनच गोमांस खाणार्‍या मुस्लिमांच्या समर्थनाला आम्ही पुढे सरसावलेले आहोत. यापेक्षा गिरीश कर्नाड वा अन्य पुरोगाम्यांचा दुसरा कुठला दावा होता काय? पण तसा दावा करण्याची किंवा त्यासाठी रस्त्यावर येण्याची मुळतच गरज नव्हती. कारण सरकारने अशी कुठली बंदी घातलेली नव्हती, की त्यासाठी सक्तीही केलेली नव्हती. पण तो तमाशा करण्यात आला व त्यातून बहुसंख्य हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी शंका निर्माण करण्याचा डाव यशस्वीरित्या पार पाडला गेला होता. पण अशा रितीने रस्त्यावर उतरलेले तमाम लढवय्ये गोमांस मेजवानीकार आज कुठे आहेत? जेव्हापासून गोमांस खाण्याच्या संशयावरून हत्या होत आहेत किंवा गोरक्षक म्हणून काही जमाव कुणालाही अडवून मारू लागले आहेत, तेव्हा हे मेजवानीकार कुठे गायब झालेले आहेत? त्यांच्या चिथावणीतून बिचारे सामान्य मुस्लिम मात्र जमावाचे बळी होऊ लागले आहेत. संतापाची गोष्ट अशी, की तीच तर कर्नाड वा तत्सम लोकांनी खरी अपेक्षा होती. हिंदू व मुस्लिम यांच्यात गोमांस भक्षणातून तेढ निर्माण करायचाच तर त्यामागचा हेतू होता. आता तो यशस्वी झाल्यावर त्यापैकी कोणाला मैदानात यायची हिंमत झालेली नाही. खरा लढवय्या प्रसंग ओढवतो, तेव्हा संघर्षाला सामोरा जात असतो. पण हे तमाम गोमांस मेजवानीचे लढवय्ये, आज आपापल्या सुरक्षित बिळात दडी मारून बसले आहेत आणि त्यांच्याच नाटकाची दुष्परिणाम सामान्य मुस्लिमाला भोगावे लागत आहेत. तेव्हा मात्र बीफ़ फ़ेस्टीवल भरवणे सोडून हे लढवय्ये जंतरमंतर वा अन्यत्र मेणबत्या लावण्याची नाटके रंगवू लागले आहेत. मुळातच दांभिक असलेल्या लोकांना यापेक्षा अन्य काही सुचणार तरी कसे?

देशात मांसाहार करणार्‍यांची लोकसंख्या निम्मी तरी आहे आणि त्यातली लक्षणिय संख्या गोमांस खाणारी आहे. आज अशी मोठी लोकसंख्या त्यांच्या आवडीचा पदार्थ मिळतच नसेल, तर गप्प सहन करील काय? सव्वाशे कोटींच्या देशात २० कोटी तरी लोकसंख्या गोमांस खाणारी आहे आणि इतकी मोठी संख्या निमूटपणे गोमांसबंदी सहन करू शकत नाही. तशी बंदी घातली गेल्यास मोठ्या प्रमाणात उठाव झाला असता आणि तसा कुठलाही मागमूस अजून तरी देशाच्या कुठल्याही प्रांतामध्ये दिसला नाही. पण दरम्यान बहुतांश प्रांतामध्ये गोमांस वा जनावरांची कत्तल यावरून हत्याकांडांच्या घटना वाढत चालल्या आहेत. हे गोरक्षक खरे की नुसतेच गुंड, हा विषयही बाजूला ठेवू. अशा घटना घडतात, तिथे मोठ्या संख्येने जमाव हल्ले करतो. तो अवघा जमाव काश्मिरसारखा व्यावसायिक दंगलखोर नाही. कोणी पैसे मोजून कुणाची हत्या करण्यासाठी त्याला कामाला जुंपलेले नाही. जे काही चित्रण बातम्यातून दाखवले जाते, त्यात सामान्य माणसेच हिंसक झालेली दिसतात. त्यांच्यात धर्मश्रद्धेसाठी हिंसक होण्याचे हे बीज कोणी रुजवले? यात आरोपी वा मारेकरी म्हणून ज्यांना पकडले जात आहे, ते सराईत गुन्हेगार असल्याचे कुठे दिसत नाही. म्हणजेच काहीतरी अन्य कारणाने ते हिंसेला प्रवृत्त झालेले आहेत. त्यांच्या भावनांना डिवचून त्यांना अशा हिंसक प्रतिक्रीयेसाठी प्रवृत्त करण्यात आलेले आहे. ती चिथावणी म्हणून त्या गोमांस मेजवानीकडे बघता येईल. ज्यांनी मागल्या वर्षी अशा मेजवान्यांचे आयोजन करून लोकांच्या मनात संशयाचे बीज पेरले, त्यांनीच या जमावाकडून हत्याकांड घडवण्य़ाची व्यवस्था उभारलेली आहे. असे मेजवानी आयोजक व तथाकथित हिंसा करणारे गोरक्षक, हे परस्पर पुरक आहेत. एकाने डिवचायचे आणि दुसर्‍याने हिंसा करायची, असा परस्पर पुरक मामला या स्थितीला कारणीभूत झाला आहे.

कोणाला हे कल्पनारंजन वाटेल. पण थोडी वस्तुस्थिती उलगडून बघा. देशात कुठेही अशी हिंसा होत नव्हती की गोमांस खाणे वा प्रतिबंध म्हणून गडबड नव्हती, तेव्हा जे लोक प्रतिकाराचा संघर्ष करायला पुढे सरसावले होते, ते आज कशाला थंडावले आहेत? त्यांनी तर आणखी खवळून वा आवेशात अशा मेजवान्या योजण्यासाठी पुढे यायला हवे होते. हिंमत असेल तर आमच्यावर हल्ले करा किंवा आम्हाला रोखून दाखवा, असे प्रतिआव्हान कर्नाड इत्यादिंनी गोरक्षकांना देण्याची हीच तर वेळ आहे ना? पण तशी वेळ आल्यावर असे लोक कुठल्या कुठे गायब आहेत. कारण हे़च त्यांना घडवायचे होते. तथाकथित गोरक्षक वा सामान्य हिंदूच्या मनात विषपेरणी करायची होती. ती पुरेपुर झाली आहे आणि मस्तपैकी हिंसाचार बोकाळला आहे. आता यापैकी कोणी जंतरमंतर येथे गोमांस मेजवानी योजून कशाला पुढे आला नाही? त्याची गरजच नाही. कारण आता आग पेटलेली आहे आणि हिंदू जमावांच्या मनात तेढ भरवून झालेली आहे. आता त्यात कुठे व किती मुस्लिम मारले जातात, त्यावर लक्ष ठेवायचे आणि त्या मृतदेहाचे भांडवल आपल्या राजकारणासाठी करायचे, हाच तर खरा हेतू होता ना? त्यामुळे अकस्मात देशाच्या कानाकोपर्‍यात फ़ुटलेले गोमांस भक्षण मेजवानीचे प्रस्थ बंद होऊन गेले आहे. त्याऐवजी मुस्लिमांच्या मृतदेहाचे भांडवल शोधले जात आहे. अर्थात यातही नवे काहीच नाही. गुजरातच्या दंगलीनंतर मुस्लिमांच्या मृत्यूचे भांडवल झालेच होते ना? पण त्याच दंगलीत जवळपास तितकेच हिंदूही बळी पडले त्याची कुठे वाच्यता केली जात होती का? अंत्यविधीच्या सामानाचेच दुकान चालवणार्‍यांना मृत्यूच्या तांडवात आपल्या व्यापाराची तेजी शोधावीच लागते ना? शक्य झाल्यास अधिकाधिक माणसे कशी मरतील, त्याचीही पुर्वयोजना करावीच लागेल ना? मग गतवर्षीचे गोमांसभक्षक आता नरभक्षक झाले असतील तर नवल कुठले?

5 comments:

 1. अचूक विश्लेषण भाऊ ! माझी एक विनंती आहे कि आपण आगामी मोदींच्या इस्रायल च्या दौर्याविषयी लिहावे . कारण इस्रायल भारतासाठी महत्वाचा आहे. मुस्लिम नाराज होतील या भीतीने गेल्या ७० वर्षात एकही पंतप्रधानांची हिम्मत झाली नाही त्या देशात जाण्याची. त्याचे कारण आणि मोदींनी दौरा पूर्ण केला तर त्याचे फायदे काय होतील ? याविषयी सविस्तर लिखाण केले तर आमच्या माहितीत भर पडेल. धन्यवाद

  ReplyDelete
 2. धर्मनिरपेक्षता म्हणतात ती हीच का?

  ReplyDelete
 3. खरय भाउ आपल्या देशात आज पुरोगामी बुदधिवादी म्हनवले जाणारेच असे समाजविरोधी कामे करताना दिसतात.आणि त्यांची बुदधि ते अशा प्रकारे वापरतात की कायदा काही करू शकत नाही व त्यांचे काम होउन जाते हे भयानक आहे आणि पुर्वनियोजित पण

  ReplyDelete
 4. भाऊ,आतंकवाद्यांना धर्म नसतो पण गोरक्षक मात्र हिंदू असतात.
  गिरीश कर्नाड, श्रीराम लागू, नसीरुद्दीन शाह अशी मंडली या ढोंगी लोकांचा चेहरा आहेत. कुमार केतकर, गिरीश कुबेर, निखिल वागले हे ठेवलेले पत्रकार आपला भाडोत्री बाणा घेऊन सज्ज असतात. हिंदू असणं हा न्यूनगंड वाटायला लावणारी ही अवलाद आहे.तुम्ही नेहमी अशा ढोंगी लोकांना फटकार लावता पण त्यांनाही शेवटी धन्याला उत्तरं द्यावी लागत असतील ना?

  ReplyDelete