Sunday, December 25, 2016

आधी लगीन कोंढाण्याचे

shivaji memorial के लिए चित्र परिणाम

नरवीर म्हणून मराठ्यांच्या इतिहासात ओळखला जाणारा तानाजी मालुसरे याचे हे वाक्य आहे. बालपणापासून प्रत्येक मराठी मुलाला कुठल्या तरी इतिहासाच्या पुस्तक वा धड्यात ते वाचनात आलेले असते. त्याचा अर्थ किती लोकांना समजलेला असतो याचीच अनेकदा शंका येते. कारण अशी वाक्ये पुस्तकात धड्यात कशासाठी आली, तेही त्यांना ठाऊक नसते. संदर्भाचा प्रश्न किंवा गाळलेले शब्द भरण्याचा प्रश्न, म्हणून तशी वाक्ये धड्यात पेरलेली असतात. पण अशा वाक्यातून ही माणसे काही नवा बोध समाजाला देत असतात. ते शाळेतल्या मास्तरांना तरी उमजलेले असते काय? कौतुकाने जाहिर भाषणात वा व्याख्यानातही त्याचा सढळ वापर होत असतो. कारण आपल्या सोयीचे असेल तेव्हा अशी वाक्ये-उक्ती अगत्याच्या असतात. बाकीच्या वेळी त्याकडे साफ़ पाठ फ़िरवली जात असते. किंबहूना त्याचा आशय कोणाला समजून घेण्याची गरज वाटत नाही. प्रसंग काय होता? शिवरायांचा निकटचा सहकारी तानाजीने आपला पुत्र रायबाचे लगीन काढलेले असते आणि त्याचेच आमंत्रण देण्यासाठी तो गडावर गेलेला असतो. अशावेळी महाराज अस्वस्थ असल्याचे त्याला जाणवते आणि प्रश्न विचारून तो अस्वस्थतेचे कारण समजून घेतो. मग जेव्हा कारण समजते, तेव्हा त्याचा प्राधान्यक्रम बदलतो. लगीन बाजूला ठेवून कोंढाणा किल्ला काबीज करण्याची मोहिम आपल्यावर सोपवण्याचा अट्टाहास तानाजी मालुसरे महाराजांकडे करतो. पण त्याक्षणी मुलाचे लग्न काढलेले असल्याने मोहिम नंतरही राबवता येईल, असे महाराज समजावू बघतात, पण तेही नाकारून तानाजी आपला हट्ट धरून बसतो. तेव्हा तो म्हणतो, आधी लगीन कोंढण्याचे! म्हणजे स्वराज्याची गरज पहिली, मग आपल्या खाजगी जीवनातील इतर नित्याच्या बाबी. तो प्राधान्यक्रम सांगतो. म्हणूनच त्याच्या हट्टाला होकार मिळतो. पुढला इतिहास सर्वश्रूत आहे.

इतिहासातून काय शिकायचे असते, त्याचे दाखले अशा किरकोळ वाक्यातून उक्तीतून मिळत असतात. तानाजी एक सरदार लढवय्या असतो आणि त्याच्याच पुत्राचे लग्न म्हणजे घरातला मोठा सोहळा असतो. पण खाजगी आयुष्यातला प्राधान्यक्रम स्वराज्य स्थापनेत आडवा आल्यावर, तो स्वराज्याला प्राधान्य देतो. बदल्यात त्याच्या घरातल्या कुटुंबातल्या किती लोकांचा हिरमोड झालेला असेल, त्याची आपण कल्पना करू शकतो. लग्न आधी उरकून कोंढाणा किल्ला नंतरही जिंकता आलाच असता. किल्ला कुठे पळून जाणार नव्हता, की दोनचार महिन्यानंतर जिंकल्याने मोठा फ़रक पडला नसता. पण स्वराज्याच्या स्थापनेत प्राधान्य कुटुंब वा व्यक्तीला नसते, तर व्यापक ध्येयाला असते. कुटुंबाच्या अडचणींना बाजूला सारून अशी सामान्य माणसे मोठ्या संख्येने त्यागाला सिद्ध होतात, त्यातून स्वराज्यच नव्हेतर साम्राज्य उभे रहात असते. त्याचे शेकड्यांनी लाभ समाजाला व पुढल्या पिढ्यांना मिळत असतात. त्याच लाभांचा पाया घालण्यासाठी आजच्या पिढ्यांना बलिदान द्यावे लागत असते. योगायोगाने त्या मोहिमेत तानाजी कामी आला आणि पुत्राच्या लग्नसोहळ्याला तोच वंचित राहिला. पण त्याचे ते वाक्य आणि त्याचे कर्तृत्व, त्यामुळेच अजरामर होऊन गेले. त्याने आपल्या कृतीतून व उक्तीतून हजारो मराठ्यांना मावळ्यांना चालना दिली, प्रेरणा दिली. कोंढाणा हा स्वराज्यातल्या कित्येक गडांपैकी एक किल्ला आहे. पण त्याचा इतिहास अनेक किल्ल्यांपेक्षा अजरामर होऊन गेला. त्याला तानाजीने दाखवलेले प्रसंगावधान कारणीभूत झाले आहे. तो तानाजी वा त्याचे तात्कालीन सवंगडी, स्वराज्यातून काय मिळवू शकले? त्यांनी आपल्या समर्पणातून चारशे वर्षे टिकून राहिलेली प्रेरणा अजरामर केली. त्याला आज जग शिवाजी म्हणून ओळखते. अरबी समुद्रात जे स्मारक उभे रहायचे आहे, तेही एका व्यक्तीचे नाही, एका प्रेरणेचे आहे.

एका किल्ल्यासाठी, कोंढाण्यासाठी तानाजीचा बळी देणे कितपत योग्य होते, असा सवाल आजही शहाणे विचारू शकतात. तेव्हाही असे प्रश्न विचारले गेले नसतील असे नाही. पण त्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत बसून इतिहास वा भविष्य घडवता येत नाही. भविष्य घडवू बघणार्‍याला वर्तमानातल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत बसून चालत नाही. कारण प्रश्न विचारणारे कधी काही घडवत नाहीत. शंकासुरांचे समाधान करत बसल्यास भविष्यही अंधारते आणि वर्तमानही इतिहासजमा होऊन जाते. तो अट्टाहास तानाजीचा होता आणि व्यक्तीगत नव्हता. आपण एक महान स्वातंत्र्याची व स्वराज्याची प्रेरणा उभारत आहोत, याचे नेमके भान त्याला होते. म्हणून त्याने डोळसपणे बलिदानाला कवटाळले होते आणि त्याला रोखण्याचे बळ महाराजही जमा करू शकले नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन त्याला रोखणार्‍या महाराजांनाही त्याने प्राधान्यक्रम मैत्री वा प्रेमापोटी विसरू दिला नाही. तर त्याचेच स्मरण करून दिले. चारशे वर्षानंतर आपण तानाजीला विसरू शकत नाही, कारण तो महान योद्धा होता, इतकेच नाही. त्याला व्यक्तीगत व सामाजिक जीवनातले प्राधान्यक्रम ठरवता आलेले होते. आपापल्या पोटपाण्याच्या व कुटुंबाच्या घरगुती समस्यांत गुरफ़टून पडला असता, तर त्याला शिवाजी नावाच्या अपुर्व इतिहासाला घडवण्याची संधीच साधता आली नसती. त्याक्षणी जो निर्णय घेऊन तानाजी कोंढाणा सर करायला सरसावला, तितक्या उंचीचे स्मारक शिवरायांचे कोणी करू शकत नाही. तानाजीला त्या बलिदानाच्या बदल्यात काय मिळाले? आज बारा कोटी महाराष्ट्रीयन जनतेला ३६०० कोटी रुपये म्हणजे दरडोई तिनशे रुपये इतकेच अर्थदान करावे लागणार आहे. साधा तलाठी वा कुणी अंमलदार तितकी रक्कम लाच म्हणूनही उकळत असतो. तेवढी रक्कम देशाच्या प्रेरणास्थानासाठी मोठी असू शकते काय?

खिशात पैसा नाही आणि घरात चुल पेटवायला दमडा नसलेले लोक, मोठमोठे गणपती कशाला आणतात? कुठल्या तरी सामन्यात भारत जिंकला, तर फ़टाके कशाला उडवतात? हे ज्यांना समजलेले नाही, त्यांना भव्य शिवस्मारकाचे प्रयोजन समजू शकत नाही. त्याच्या उंचीचा अर्थ लागू शकत नाही. इतक्या पैशात किती मुलांचे शिक्षण वा कुपोषण दूर झाले असते, असले प्रश्न निरर्थक असतात. कारण जे काही पैसे अशा शिक्षण कुपोषणावर खर्च होतात, त्यातून अजूनही मुलांचे कुपोषण थांबू शकलेले नाही, की शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचू शकलेले नाही. ह्या नेहमीच्या गोष्टी आहेत. घराघरातले लग्न नेहमीची गोष्ट असते. कोंढाण्याच्या लग्नाचे मुहूर्त नेहमी निघत नसतात. त्यातले हेतू कालातित असतात. शेकडो वर्षे आणि कित्येक पिढ्या गरीबीत घालवलेल्या लोकांना शून्यातून साम्राज्य उभारणारा कुणी एक राजा प्रेरणा देत असतो. अनुदानावर जगण्याच्या लाचारीतून मुक्त होऊन स्वयंभू व स्वावलंबी होण्याची प्रेरणा, ही कुठल्याही तात्कालीन लाभापेक्षा मोठी असते. दिर्घकालीन असते. जगण्याची धडपड आयुष्यभर चालू असते. पण सोहळा सणात होणारा खर्च नेहमीच्या खर्चाशी तुलना करण्याचा नसतो. शिवस्मारक हा मराठी अस्मिता व राष्ट्रीय प्रेरणा यांचा सोहळा आहे. त्याचा खर्च नित्याच्या बाबींशी जोडून चालत नाही. तशी तुलनाही होऊ शकत नाही. ताजमहालाच्या खर्चात जनतेचे किती कल्याण साधले गेले असते, असा विचारही ज्यांच्या मनाला शिवलेला नाही; त्यांनी शिवस्मारकावर टिकाटिप्पणी करावी यासारखा मुर्खपणा नसतो. मग त्यातला बौद्धिक युक्तीवाद समजून घेण्याची तरी काय गरज आहे? बुद्धी आहे म्हणून बुद्धीभेद करणार्‍यांच्या प्रश्नांना तानाजी चारशे वर्षापुर्वीच उत्तर देऊन गेला आहे. पण त्यांना अजून ते उत्तर समजलेले नाही. मग आपण त्यांना काय समजावणार आहोत?

2 comments:

  1. प्रश्न विचारणारे कधी काही घडवत नाहीत....
    प्रेरणा मोठी

    ReplyDelete
  2. भाऊसर तुम्ही या लेखातुन स्वराज्याचे संस्थापक आणि त्यांच्या सहकारयांचे अप्रतिम व प्रेरणादायी केलेले वर्णन मनाला खुप भावले

    ReplyDelete