Wednesday, December 7, 2016

तामिळनाडू पोरका झाला?

ops sasikala के लिए चित्र परिणाम

जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण केलेली आहे. अर्थात ही आलंकारीक भाषा नाही, तर वस्तुस्थिती आहे. कारण नेहमीच अशा कुणा मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर असे शब्द योजले जातात. पण तमिळनाडूच्या राजकारणाची विद्यमान स्थिती तशी नाजूक आहे. नव्वदीत पोहोचलेले एम. करूनानिधी येत्या वर्षी आपल्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची पन्नाशी साजरी करतील आणि त्यांच्यानंतर मुळच्या द्रमुक पक्षात आता कोणी तितका प्रभावी नेता शिल्ल्क राहिलेला नाही. नंतरच्या पिढीतला कोणी नेता त्यांनीच उभा राहू दिलेला नाही. कारण मध्यंतरीच्या पन्नास वर्षात त्यांनी द्रमुक ही घराण्याचीच मालमत्ता करून टाकली. परिणामी त्यांच्या तीन बायका आणि त्यांच्या मुलांमध्ये ह्या पक्षावर प्रभूत्व मिळवण्यासाठी सातत्याने दोन दशके संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे मुळच्या द्रमुकची पुर्ण विल्हेवाट लागलेली आहे. तर त्यापासून बाजूला होऊन स्वतंत्र पक्ष झालेल्या अण्णा द्रमुकचे विसर्जन संस्थापक एमजीआर यांच्याच निधनानंतर होऊ शकले असते. पण त्यांची पडद्यावरील नायिका व राजकीय वारस म्हणून पुढे सरसावलेल्या जयललितांनी; त्या पक्षाला नव्याने संजिवनी देत उभे केलेले होते. मात्र त्यांनीही आपल्या पक्षात कुठले पुढल्या पिढीचे नवे नेतृत्व उभे राहू दिले नाही. सहाजिकच त्यांच्यामागे अण्णाद्रमुकही पोरका पक्ष झालेला आहे. आता त्यातले अनेक हक्कदार व वारस पक्षाचे लचके तोडायला व सत्तेचे घास घ्यायला मोकाट होतील. अशा स्थितीचा लाभ अर्थातच विरोधकांना मिळत असतो. पण तामिळनाडूत कुठलाही राज्यव्यापी विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. क्षीण होत चाललेला द्रमुक आणि अम्माच्या प्रतिमेवर भक्ती करणार्‍या मतदाराच्या कृपेने चाललेला अण्णाद्रमुक, यांच्यात तामिळनाडूचे राजकारण विभागले गेले होते. आता दोघांकडे कोणी खमक्या नेता उरलेला नाही.

करूणानिधी यांनी घरातील कलह संपवताना स्टालीन या पुत्राला आपला वारस नेमलेले आहे. पण त्याला पक्ष संघटनेवर हुकूमत प्रस्थापित करणे जमले असले, तरी जनमानसावर आपली छाप पाडणे शक्य झालेले नाही. त्याच्याखेरीज पक्षातल्या अन्य कुणा नेत्याला स्वयंभूपणे पक्षाला पुढे घेऊन जाण्याची महत्वाकांक्षाही नाही. त्यामुळे स्टालीन काय करणार, यावर द्रमुकचे भवितव्य अवलंबून आहे. जयललिता स्पर्धेत नाहीत, याचा लाभ घेण्याची कुवत अजून तरी या नेत्याला दाखवता आलेली नाही. वर्षभरापुर्वी झालेल्या निवडणूकीत एकट्याच्या बळावर लढून अम्मांनी पुन्हा सत्ता कायम राखली होती. एमजीआर यांच्यानंतर लागोपाठ दोनदा विधानसभा जिंकून दाखवण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. त्यापुर्वी आलटून पालटून सत्तांतर होत राहिले. खरे तर तीच स्टालीनची कसोटी होती. त्याला अन्य पक्षांना सोबत घेऊन संयुक्त आघाडी उभी करता आली नाही, की सत्तेत बदनाम झालेल्या अम्मांना धुळ चारता आलेली नव्हती. म्हणूनच आजच्या स्थितीत त्याच्याकडून अण्णाद्रमुकला किती आव्हान मिळू शकेल, याची शंका आहे. खुद्द सत्ताधारी पक्षात बहुमत असल्याने अम्मांनीच पुर्वी नेमलेल्या वारसाकडे म्हणजे पन्नीरसेल्व्हम यांच्याकडे मुख्यमंत्री हे पद गेले आहे. पण तेच पक्षाला तारून नेतील अशी अपेक्षा करता येत नाही. आपले डोके वापरायचे नाही आणि कळसुत्री बाहुलीसारखे वागायचे; ही सेल्व्हम यांची खरी गुणवत्ता होती. सहाजिकच आज ते मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले, तरी सरकार वा पक्षाला अम्माप्रमाणे यशस्वी मार्गाने घेऊन जातील, अशी अपेक्षा सध्या तरी करता येत नाही. कारण यापुर्वी दोनदा अम्मा तुरूंगात असताना त्यांचीच वर्णी मुख्यमंत्री म्हणून लागलेली होती. पण प्रत्येक निर्णयासाठी ते तुरूंगाच्या वार्‍या करून अम्माची संमती घेतच कारभार करत होते. त्या छायेतून बाहेर पडून, ते काय मजल मारतात ते बघण्याची गरज आहे.

ही झाली तामिळनाडूचे राजकारण व्यापून राहिलेल्या दोन प्रमुख द्रविडी पक्षांची कहाणी! त्याखेरीज अर्धा डझन स्थानिक पक्ष व संघटना आहेत. त्यांनीही आपले नशिब आजमावलेले आहे. पण राज्यव्यापी अस्तित्व असलेला कुठलाही पक्ष त्यात नाही. अर्धशतकापुर्वी प्रथमच सत्ता गमावलेल्या कॉग्रेसने एमजीआरच्या मृत्यूनंतर त्या राज्यात स्वबळावर उभे रहाण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोनपैकी एका द्रविडी पक्षाच्या कुबड्या घेण्यापलिकडे कॉग्रेसची मजल गेलेली नाही. तसा कोणीही कर्तबगार लोकप्रिय नेताही कॉग्रेस तिथे उभा करू शकलेली नाही. अलिकडल्या काळात चिदंबरम, मणिशंकर अय्यर वा जयंती नटराजन हे नामवंत तामिळी कॉग्रेसनेते आपण ऐकलेले आहेत. पण तेही दिल्लीच्या कृपेने नेता म्हणून मिरवले. त्यांनी स्वबळावर आमदार नगरसेवक म्हणूनही निवडून येण्याची क्षमता कधी दाखवलेली नाही. थोडक्यात कॉग्रेसचे अस्तित्व असले तरी हिशोबात घेण्यासारखे काहीही नाही. भाजपा हा दुसरा राष्ट्रीय पक्ष तिथे पाय रोवून उभा रहाण्यासाठी दिर्घकाळ धडपडतो आहे. पण त्याचीही अवस्था कॉग्रेसपेक्षा भिन्न नाही. कोणीही नाव घेण्यासारखा भाजपा नेता तामिळनाडूत नाही. हे सर्व बारकाईने बघितले, तर आजच्या क्षणाला त्या मोठ्या राज्यात कोणीही राज्यव्यापी छाप असलेला नेता नाही. तसा एकमेव नेता करूणानिधी असला, तरी गलितगात्र अवस्थेत राज्याचा भार सोसण्याची क्षमताही गमावून बसलेला आहे. अशा अनेक अर्थाने अम्माच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकीय जीवनात मोठी भयानक पोकळी निर्माण झालेली आहे. ती भरून काढायची तर रजनीकांत याच्यासारख्या भव्यदिव्य व्यक्तीमत्वाचीच गरज आहे. कारण तामिळनाडू हा तशा प्रेषिताच्या कृपेनेच चालतो, ही काहीशी तिथली मानसिकता आहे. त्यावर तिथला समाज विश्वास ठेवून मतदान करीत असतो.

रामस्वामी पेरीयार व अण्णादुराई यांच्यासारख्या बुद्धीप्रामाण्यवादी नेत्यांच्या मुशीतून निर्माण झालेल्या द्रविडी चळवळीची ही खरी शोकांतिका आहे. त्याला अर्थातच तेच नेते जबाबदारही आहेत. अण्णादुराई यांनी चित्रपटाचे प्रभावी माध्यम ओळखून त्याचा पक्षाचा विस्तार व प्रसार यासाठी वापर केलेला होता. त्यासाठी उत्तम पटकथा लिहून लोकांच्या माथी रॉबिनहुड अशा पद्धतीचे पात्र मारले. त्यात प्रामुख्याने भूमिका करणार्‍या रामचंद्रन यांना म्हणूनच राज्याची सत्ता बळकावणे सोपे झाले आणि त्यांच्याही मागे जयललितांना त्यांची गादी चालवता आली. पडद्यावरची अफ़ाट प्रतिमा ही तामिळनाडूच्या राजकारणातील व सार्वजनिक मानसावर जादू करणारी गोष्ट आहे. १९९६ सालात जयललिता अशाच कळसावर असताना, त्यांना करुणानिधी व कॉग्रेसचा फ़ुटीर गट हरवू शकला. त्यालाही तेच कारण होते. जयललितांच्या मनमानीमुळे संतापलेल्या रजनीकांत या सुपरस्टारने अम्माच्या विरोधात आवाज उठवला होता. तो अम्माला पराभूत करायला कारणीभूत झाला होता. पण तेवढ्या प्रसंगानंतर रजनीकांत कधी राजकारणात डोकावला नाही. त्याला त्यात ओढण्याचा अनेक नेते व पक्षांनी प्रयत्नही करून झाला आहे. पण राजकीय बाबतीत कुठलीही भूमिका वा नुसता संकेतही करण्यापासून रजनीकांत दुर राहिलेला आहे. याक्षणी त्याने राजकारणात उडी घेतली तर त्याला आवरणे, दोन्ही द्रविडी पक्षांना अशक्य आहे. पण रजनी तसे काही करण्याची सध्या तरी शक्यता नाही. मग तामिळी राजकारणाच्या पडद्यावर लोकांनी बघायचे काय? हा यक्षप्रश्न बनून जातो. कारण जनमानसावर असे मोठे गारूड असलेला दुसरा कोणी नेता वा अभिनेता सध्या तरी तामिळनाडूत नाही. अर्थात नजिक कुठल्या निवडणूका नसल्याने तशी वेळ लगेच येणार नाही. पण अंतर्गत सत्तेच्या साठमारीने अण्णाद्रमुकला पछाडले, तर तामिळनाडू राजकारणात पोरकाच होऊन जाईल ना?

2 comments:

 1. रजनीकांत प्रचंड लोकप्रिय असला तरी राजकारणात तो वाटतो तितका शक्तीशाली आहे का? १९९६ मध्ये 'जयललितांना परत निवडून दिले तर देवही तामिळनाडूच्या जनतेला माफ करणार नाही' असे रजनीकांत म्हणाला होता.त्यानंतर अण्णा द्रमुकचा धुव्वा उडाला त्यामुळे असे चित्र उभे राहिले की रजनीकांत त्याला कारणीभूत होता.असे म्हणता येईल का की १९९६ मध्ये राज्यात प्रत्यक्षात परिस्थिती अशी होती की जयललितांचा मोठा पराभव होणे अपेक्षितच होते. त्याचवेळी रजनीकांतने त्या बाजूचेच मत व्यक्त केले म्हणून रजनीकांतमुळे जयललितांचा धुव्वा उडाला असे चित्र उभे राहिले.

  पुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी पी.एम.के च्या सगळ्या उमेदवारांना पाडा (कारण पी.एम.के चा नद्याजोडणी प्रकल्पाला विरोध होता) असे जाहिर आव्हान रजनीकांतने केले होते.तसेच नद्याजोडणी प्रकल्प एन.डी.एच्या जाहिरनाम्यातही होता.त्यामुळे एका अर्थी रजनीकांतने एन.डी.ए ला समर्थनही दिले होते.प्रत्यक्षात झाले काय? तर ३९ पैकी ३९ जागांवर द्रमुक-काँग्रेस-पी.एम.के-मद्रमुक युती निवडून आली आणि भाजप-अण्णा द्रमुक युतीचा जोरदार पराभव झाला.

  २०१४ मध्येही रजनीकांत आणि भाजपचे सख्य लपून राहिले नव्हते.तरीही देशभरात मोदीलाट असतानाही तामिळनाडूमध्ये मात्र भाजपने एकच-- कन्याकुमारीची जागा जिंकली आणि मित्रपक्ष पी.एम.के ने वेल्लोरची जागा जिंकली. कोईम्बतूर,निलगिरी, तिरूचिरापल्ली यासारख्या भाजपने १९९८-९९ मध्ये जिंकलेल्या जागा जिंकण्यातही पक्ष अयशस्वी ठरला.

  तेव्हा सांगायचा मुद्दा हा की रजनीकांत कितीही लोकप्रिय असला तरी राजकीय दृष्ट्या तो तितका शक्तीशाली आहे का?

  ReplyDelete
 2. रजनीकांतने काही म्हणणे आणि रजनीकांत स्वतः राजकारणात उतरणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. तामिळ जनतेला चित्रपटातील नायक खऱ्या आयुष्यातील नायक वाटतो. जर रजनीकांत राजकारणात आला तर तो बहुमताने जिंकू शकतो असे आजवरच्या इतिहासावरून वाटते.

  ReplyDelete