Thursday, December 1, 2016

प्रगतीला घाबरलेले पुरोगामी

cashless economy के लिए चित्र परिणाम

त्याला आता बत्तीस वर्षे होऊन गेली. १९८४ च्या अखेरीस देशातल्या लोकसभा निवडणूका पार पडल्या होत्या आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसला अफ़ाट बहूमत मिळालेले होते. विरोधक म्हणावेत असे बहुतांश राष्ट्रीय पक्ष जवळपास भूईसपाट होऊन गेलेले होते. ती राजीवलाट मानली गेली. पण वास्तवात पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी केलेली हत्या, देशाला हदरवून गेलेली होती. अशा मोठ्या लाटेवर स्वार झालेल्या राजीव गांधींनी त्या पहिल्या वर्षातच एकविसाव्या शतकात देश कुठे व कसा असला पाहिजे, अशी भाषा सुरू केलेली होती. तेव्हा माझ्यासह तमाम पत्रकार, संपादक व अभ्यासक मानल्या जाणार्‍या वर्गाने राजीव गांधी यांची टवाळी करण्यातच धन्यता मानलेली होती. कारण त्यांनी संपुर्ण देशाला नव्या तंत्रज्ञानाने जोडण्याची कल्पना मांडलेली होती. एकीकडे त्यांनी संगणकीकरणाला बळ दिले होते आणि दुसरीकडे प्रत्येक खेड्यात संपर्काचे साधन म्हणून टेलिफ़ोन पोहोचला पाहिजे, असे प्रयत्न सुरू केलेले होते. ज्या देशात लोकांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही, त्या भुकेल्या लोकांना फ़ोनवर बोलून भुक भागवता येईल काय? हा प्रश्न डाव्यांपासून उजव्यांपर्यंत प्रत्येक शहाणा विचारत होता. दुसरीकडे संगणकामुळे आहेत त्यांच्याच नोकर्‍या जातील आणि नव्या नोकर्‍या निर्माण होणार नाहीत, अशी तक्रार होती. आज काय स्थिती आहे? जग कुठल्या कुठे जाऊन पोहोचले आहे, आता गावात टेलिफ़ोनची गरजही उरलेली नाही. कारण त्याच्यापुढली संपर्कसाधने खेडोपाडी पोहोचली आहेत. अगदी संगणकही खेड्यातल्या शाळेत बघायला मिळत आहेत. पण म्हणून लोकांची भूक भागली असे झालेले नाही, की रोजगार वाढून नोकर्‍यांची संख्या पुरेशी झालेली नाही. अनेक समस्या अशा आहेत, की त्यातून सुटका होऊ शकलेली नाही. पण जगाच्या स्पर्धेत भारत मागेही पडलेला नाही. दूरचे बघू शकणार्‍यांना असेच आरंभी हिणवले जात असते.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या पाठोपाठ कॅशलेस व्यवहाराची अर्थव्यवस्थेची कल्पना मांडल्यावर त्यांची टवाळी होताना बघितली; मग या जुन्या आठवणी जाग्या होतात. पण त्यातली दुर्दैवाची गोष्ट अशी, की ही टवाळी करणार्‍यात राजीव गांधींचा वारसा सांगणार्‍यांचाच पुढाकार असतो. आपल्या पित्याने भारताला विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात खेचून आणण्याची प्रक्रिया सुरू केली; हे राहुलना आठवत नाही. राजीवच्या पत्नी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोनियांना पतीची तीच दूरदृष्टी ओळखता आलेली नाही. मग केवळ कॉग्रेस पक्षात आहेत अशा नेत्यांची काय कथा सांगावी? राजीव गांधींच्या त्या प्रयासांना कडाडून विरोध करण्यात तेव्हाचे भाजपावाले पुढे होते आणि आज त्याच राजीव गांधींच्या सुधारणांना चालना देत पुढली पावले उचलणार्‍या नरेंद़्र मोदींना विरोध करण्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. इतिहास कसा कुस बदलतो, त्याची ही उदाहरणे असतात. अनेकदा लोकांच्या भल्याचे काय ते सामान्य माणसालाही लगेच कळत नसते, पण त्याच्याच भल्यासाठी अनेक गोष्टी सक्तीने त्याच्याच गळी माराव्या लागत असतात. आजची नोटाबंदी वा कॅशलेस अर्थव्यवस्थाही तशीच एक सक्ती आहे. पण अशा गोष्टी सहजासहजी सामान्य माणुस स्विकारत नसतो. कारण मोठे मूलभूत बदल त्रासदायक असतात. ज्याची सवय लागलेली असते, ते सोपे असल्याने त्याहूनही अधिक उपयुक्त अशा नव्या गोष्टी स्विकारणे माणसाला नेहमीच अवघड गेलेले आहे. दिडशे वर्षापुर्वी भारतातील पहिली रेलगाडी मुंबई-ठाणे अशी धावली, तेव्हा त्याला भूत समजून मुंबईकरांनी त्यापासून पळ काढला होता. आज त्याच रेलगाडीला लटकून आपला जीव मुंबईकर धोक्यात घालत असतो ना? ही काळाची किमया आहे. कारण आता अधिक गाड्या सोडा अशी मागणी वाढत असते.

मानवी समाजाची हीच शोकांतिका आहे. त्याला नवे स्विकारताना वेळ लागतो आणि जोपर्यंत त्या गोष्टी अंगवळणी पडतात, तोपर्यंत विज्ञान वा संशोधनाने पुढले पाऊल टाकलेले असते. नवे काहीतरी उपयुक्त शोधून काढलेले असते. ज्यामुळे आपल्याला सोयीचे वाटणारे जुने साधन कालबाह्य होण्याच्या स्थितीत आलेले असते. पण म्हणून लगेच कोणी ते नवे साधन स्विकारत नाही. त्याच्या विरोधात खळखळ होत असते. अशावेळी समाजातील पुढारलेल्या वर्गाने त्यात पुढाकार घेऊन, समाजाच्या गळी नव्या गोष्टी मारण्यात हातभार लावायचा असतो. अशा कामात पुढे येणार्‍यांना प्रगत वा पुरोगामी म्हणतात. कारण असे लोक पुढला जमाना बघू शकत असतात, त्याची कल्पना करू शकत असतात. त्याच्या उलट जुन्याला चिकटून बसत नव्याच्या विरोधात दंड थोपटणार्‍यांना रुढीवादी, मागासलेला व प्रतिगामी समजले जात असते. पण आजच्या भारताची अशी दुर्दैवी स्थिती आहे, की नव्या कल्पनांना झिडकारून जुन्या कालबाह्य गोष्टींना चिकटून बसणार्‍यांना पुरोगामी वा प्रगतीशील संबोधण्याची फ़ॅशन झालेली आहे. म्हणूनच प्रतिगामी विचारांचा म्हटला जाणारा पंतप्रधान, नवनव्या प्रगतीशील कल्पना मांडतो आहे आणि त्यांना अंमलात आणायला धडपडतो आहे. उलट पुरोगामी म्हणवणारेच त्याविषयी जनमानसात भुताटकी असल्याचे भ्रम पसरवण्यात आघाडीवर दिसत आहेत. चमत्कारीक गोष्ट अशी, की यावेळी सामान्य माणुस व जनता मात्र नव्या कल्पनांना कवटाळण्याला घाबरलेली नाही. नव्या युगाचा व विचारांचा स्व्कार करायला अनभिज्ञ जनताही पुढे येते आहे. परंतु पुरोगामी म्हणवणारे मात्र नव्या युगाला घाबरून दिवाभितासारखे काळोखात दडी मारून बसायला धडपडत आहेत. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? पण जगाचा इतिहास त्याचीच साक्ष देत आला आहे. काही धाडसी लोकांनीच जग बदलून दाखवले आहे.

रस्त्यावरचा भेळवाला, भाजीवाला पेटीएम यासारख्या सुविधा मिळवून कॅशलेस व्हायची जागरुकता दाखवू लागला आहे. पण खेड्यात कुठे पेटीएम आहे? डिजीटल सुरक्षा किती सुरक्षित आहे? असे सवाल विचारले जात आहेत. खुद्द ज्या व्यवसायात आपण रोजगार करतो आहोत, तेच तंत्रज्ञानाची विश्वासार्हता असताना वाहिन्यांवरचे पत्रकार वा अभ्यासक रस्त्यावरच्या वा बॅन्केच्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांना, कॅशलेस व्यवहाराविषयी खुळे प्रश्न विचारतात, त्याचे नवल वाटते. कुठे भेळवाल्याने भाजीवाल्याने अशा सुविधा अवगत केल्याचे याच वाहिन्याच दाखवतात. तेव्हा तशा सुविधा सामान्य भारतीय नागरिक सहज वापरू शकतो, याचा पुरावाच देत नसतात काय? म्हणूऩच मग अशा सुविधा खेडोपाडी वापरल्या जाणे किंवा अवगत करणे; अशक्य नसल्याचा तोच पुरावा असतो ना? ज्या प्रकारची अनेक उपकरणे वा सुविधा खेड्यापाड्यातले लोक आज वापरत आहेत, त्यापेक्षा कॅशलेस व्यवहाराचे तंत्रज्ञान फ़ारसे कठीण व गुंतागुंतीचे नाही. हे डोळ्यांना दिसते आहे. मग शंका कसल्या काढल्या जात असतात? त्यांचा वापर करणारे रिक्षावाले किंवा फ़ेरीवाले कोणी महान तंत्रज्ञ नाहीत. हेही समोर दिसत असताना, या पत्रकार जाणत्यांना कसे उमजत नाही? तर सत्य बघण्याची इच्छा वा शक्ती त्यांनी गमावलेली असू शकते. कदाचित त्यांना समोर दिसते ते बघायचेच नसते. किंवा जे दिसते ते दिसत नसल्याचा बहाणा करायचा असू शकतो. त्यातून ही विचित्र स्थिती आलेली आहे. सामान्य लोकांचे नोटाबंदीने हाल झाले वा कॅशलेस व्यवहाराने लोकांचे अनन्वित हाल होतील. असा आक्षेप त्यातून आला असावा. नव्या युगाशी व काळाशी जुळवून घेण्याचे ज्ञान घेण्यात नवी अभ्यासक पिढी तोकडी पडत असावी. म्हणून कमी शिकलेले लोक लौकर बदल स्विकारत आहेत आणि जाणकार व हुशार लोकांनी नव्या युगाचा धसका घेतलेला असावा.

6 comments:

  1. एकदम कडक भाऊ मस्तच.

    ReplyDelete
  2. Paytm वापरायला सोपे आहे. पण त्यासाठी प्रेत्येकाकडे(android)मोबाइलला आणि paytm पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणजे ह्या क्षेत्रात आता रोजगार उपलब्ध होणार तर

      Delete
  3. UPI app वापरा internet ची पण गरज नाही

    ReplyDelete
  4. http://www.businessinsider.com/amazon-go-grocery-store-future-photos-video-2016-12/#amazon-go-sells-prepared-foods-and-other-grocery-staples-1

    ReplyDelete
  5. aapratim .. i got inspired by reading this and immediately step in to have some app to be a part of cashless economy .. simply great ..

    ReplyDelete