Thursday, December 29, 2016

अम्माच्या मृत्यूचे रहस्य नरेंद्र मोदी उलगडणार?

Image result for modi jayalalithaa

गुरूवारी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे दोन नाट्यमय घटना घडल्या. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या पक्षाने, म्हणजे अण्णा द्रमुकने आपल्या पक्षाच्या हंगामी सरचिटणिस म्हणून शशिकला नटराजन यांची एकमुखाने निवड केली. तसा प्रस्तावच संमत केला आणि तशी माहिती मुख्यमंत्री पन्नीरसेल्व्हम यांनी मग या चिन्नमाला निवासस्थानी जाऊन दिली. तिने ते पद स्विकारल्याचे जाहिर केले. हे नाट्य पुर्ण होत असतानाच, चेन्नई हायकोर्टात दुसरेच नाट्य रंगलेले होते. त्याच अण्णाद्रमुकच्या एका कार्यकर्त्याने याचिका करून, जया अम्माच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी आयोग नेमावा अशी मागणी केली होती. त्याची सुनावणी खंडपीठासमोर होत असताना, न्यायमुर्ती वैद्यनाथन यांनीही आपल्या मनातल्या शंका व्यक्त केल्या. अम्माच्या उपचार व मृत्यूविषयी इतकी गोपनीयता कशाला राखली गेली, असा प्रश्न केला. मग त्या खंडपीठाने याविषयी आपापल्या भूमिका मांडण्यासाठी केद्र व राज्य सरकारला नोटिसा बजावल्या. अशा बाबतीत सरकारांना नोटिसा काढणे स्वाभाविकच असते. पण त्या दोघांच्या सोबतच खंडपीठाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपली बाजू मांडण्यासाठी नोटिस बजावली आहे. ही मोठी चमत्कारीक बाब आहे. कारण राज्याचा मुख्यमंत्री असूनही पन्नीरसेल्व्हम यांना तशी नोटिस निघालेली नाही. मग केंद्र सरकारचे प्रमुख असलेल्या नरेंद्र मोदींना व्यक्तीगत नोटिस कशाला? जयलालिता यांच्यावरील उपचार वा संशयास्पद मृत्यूशी मोदींना संबंध काय? ही बाब कोणालाही चमत्कारीक वाटेल. पण आज जितक्या शंका या संबंधात काढल्या जात आहेत, तशा पहिल्या शंका मोदींनीच काढल्या व त्याही थेट जयललितांशी बोलताना काढल्या होत्या, असे म्हणतात. बहूधा त्याच बातम्यांचा खुलासा करण्यासाठी त्यांनाही नोटिस बजावण्यात आलेली असेल काय?

एकेकाळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि जयललिताही तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्यात चांगले मैत्रीसंबंध असल्याने नेहमीच बोलले गेले आहे. पण एक गोष्ट अशी होती, की त्यामुळे हे संबंध अधिक विश्वासाचे झाले असे मानले जाते. २०११ साली जयललिता पुन्हा बहूमत मिळवून मुख्यमंत्री झाल्या, त्यानंतरची गोष्ट आहे. मोदींनी आपल्यावर हो्णार्‍या दंगलीच्या आरोपांचा पिच्छा सोडवण्यासाठी विकासाचा ध्यास घेतला. त्यात देशातल्या व जगातल्या अनेक उद्योगपती कंपन्यांना नवनव्या विकासाच्या संधी गुजरामध्ये उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या सुविधांमुळे अनेक राज्यातील उद्योजक गुजरातमध्ये आपल्या कंपन्या कारखाने घेऊन येऊ लागले. त्यात तामिळनाडूचेही काही लोक होते. अशापैकी एकाने जी कथा मोदींना सांगितली, ती त्यांनी तशीच्या तशी जया अम्माच्या कानी घातली. आज चिन्नम्मा म्हणून ज्यांची अण्णाद्रमुकच्या सर्वोच्चपदी नेमणूक झाली आहे; त्या शशिकला नटराजन यांनी अम्माच्या अपरोक्ष राजसत्तेवर आपली हुकूमत प्रस्थापित केली होती. परस्पर कंपन्या व उद्योगांकडून सक्तवसुली चालवली होती. त्यासाठी अम्माच्या घरापासून मंत्रालय व पक्षातही आपलेच हस्तक पेरलेले होते. मोदींच्या सांगण्यावरून अम्माने शशिकला अशी खंडणीखोरी करते आहे किंवा कसे; याचा गुपचुप शोध घेतला आणि त्याचे पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले. तर त्यातून भयंकर कटकारस्थानाचे धागेदोरे हाती लागले. अम्माला मदत करता करता त्यांच्या विश्वास संपादन करणार्‍या शशिकला यांनी पक्ष, सरकार व आमदार यांच्यापासून अम्माच्या घरातील प्रत्येक जागी आपला विश्वासू हस्तक आणून बसवला होता. मग अम्माच्या अपरोक्ष आपलीच मनमानी चालवली होती. त्याचाच जाच होऊन अनेक उद्योग व कंपन्या तामिळनाडू सोडुन अन्य राज्यात चालल्या होत्या.

शशिकला यांचे मूळ गाव मन्नारगुडी असून त्याच नावाने राज्यात शशिकला यांच्या कौटुंबिक टोळीला ओळखले जाते. अशा मन्नारगुडी माफ़ियाचे अम्माच्या नावावर खरे राज्य चालू होते. त्याचा अम्माला थांगपत्ता नव्हता. पण मोदींकडून सुचना मिळाल्यावर अम्माने बारीकसारीक गोष्टीत गुपचुप चौकशा करून माहिती काढली. तेव्हा अम्मा स्वत:च शशिकलाच्या सापळ्यात असल्याचे लक्षात आले. अशा स्थितीत एका गुजराती नर्सच्या तपासातून अम्मावर संथ प्रभाव पाडणार्‍या विषारी रसायनांचा प्रयोगही चालू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अम्मांनी क्रमाक्रमाने शशिकलांचे विश्वासू आपल्या भवतालातून बाजूला केले आणि एकेदिवशी तडकाफ़डकी शशिकला कुटुंबाला आपल्या महालातून हाकलून लावले. त्यांच्या प्रत्येक हस्तकाची महत्वाच्या पदावरून हाकालपट्टी केली. कारण जयाअम्माला विषप्रयोगाने संपवल्यानंतर मुख्यमंत्रीपदी बसण्याची योजनाच चिन्नम्माने तयार केलेली होती. त्यासाठी कर्नाटकची राजधानी बंगलुरू येथील एक हॉटेलात शिजलेल्या कारस्थानाच्या संभाषणाची टेपच अम्माच्या हाती लागली होती. त्यामुळेच शशिकलाच्या कुटुंबाला हाकलून लावल्यानंतर, त्यांच्यापैकी एकाएकाच्या भानगडी शोधून त्यावर पोलिसी व कायदेशिर कारवाईचा बडगा उगारला गेला. काही महिने शशिकला देशोधडीला लागल्यासारखे झालेले होते. पण त्यांच्या संगतीची अम्माला इतकी सवय लागलेली होती, की पुन्हा माफ़ी मागताच अम्माने चिन्नम्माला महालात घेतले. मात्र अन्य कुणा कुटुंबियांना तिथे प्रवेश मिळाला नाही. आताही नव्याने सत्ता मिळाल्यावर अवघ्या काही महिन्यात जयललिता अकस्मात गंभीर आजारी झाल्या. त्यांना उपचारार्थ दाखल केल्यापासून कुणालाही भेटू देण्यात आले नाही आणि पुढले प्रत्येक निर्णय शशिकलाच घेत होत्या. त्यांच्या विश्वासातला नसेल, अशा कुणालाही अम्माच्या जवळपास फ़िरकू देण्यात आलेले नव्हते.

शशिकला यांच्याविषयी मोदींनी दिलेल्या माहितीची बातमी खरी किंवा खोटी, याचा कधी खुलासा झाला नाही. पण त्यानंतर अल्पावधीतच शशिकला यांची जयललितांनी हाकालपट्टी केलेली होती. त्यानंतर याविषयीच्या गावगप्पा गुजरातच्या राजकीय वर्तुळात व चेन्नईच्या राजकारणात दबल्या आवाजात बोलल्या जायच्या. पण उघडपणे कोणी त्याला दुजोरा दिला नव्हता. मुख्यप्रवाहातील माध्यमातही तशी माहिती कुठे झळकली नाही. पण वादग्रस्त मानल्या जाणार्‍या ‘तहलका’ या नियतकालिकाने पाच वर्षापुर्वी त्याविषयी प्रदिर्घ वार्तापत्र प्रसिद्ध केले होते. त्यातही हा तपशील सापडतो. त्यामुळेच अम्माने शशिकला यांना परत जवळ केले, तरी अम्मावर अपार निष्ठा असलेल्या अण्णाद्रमुकच्या सामान्य कार्यकर्त्याला चिन्नम्मा कधीच आवडल्या नाहीत, की विश्वासार्ह वाटल्या नाहीत. आताही अम्माच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाच्या भोवताली शशिकला यांचेच कुटुंबिय पाच वर्षांनी अकस्मात दिसले आणि त्यामुळे खुप अफ़वा उठल्या होत्या. त्यामुळे दुसर्‍याच दिवशी शशिकला यांनी आपल्या तमाम कुटुंब व नातलगांना अम्माच्या महालापासून दूर रहाण्याचे आदेश जारी केले होते. ही पार्श्वभूमी बघता मोदींकडून त्याच जुन्या कारस्थानावर काही प्रकाश टाकण्यासाठी हायकोर्टाने व्यक्तीगत नोटिस काढली आहे काय, अशी शंका येते. कारण तेव्हाही एका गुजराती नर्सच्याच चाणाक्षपणाने अम्मावर विषप्रयोग होत असल्याचे उघड झालेले होते आणि आताही त्यांच्या प्रकृती, उपचार व मृत्यूविषयी कमालीची गोपनीयता राखली गेलेली आहे. साडेपाच वर्षे ज्या अफ़वा किंवा गावगप्पा होत्या, त्याचा उलगडा होऊ शकेल काय? खरेच तेव्हाच्या संथगती विषप्रयोगाची बातमी खरी असेल, तर दफ़न केलेल्या मृतदेहामध्ये अशा विषाचे अंश आताही सापडू शकतील. त्यासाठीच मृतदेह उकरून काढण्याचा इशारा खंडपीठाने दिलेला असेल काय?

No comments:

Post a Comment