Friday, December 30, 2016

न्यायासाठी कच्चा माल

note ban के लिए चित्र परिणाम

रोजच्या रोज टिव्ही वाहिन्यांवर ‘देश उत्तर मागतो आहे’ किंवा ‘हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे’, अशी भाषा आपण ऐकत असतो. त्यातला सामान्य माणूस कोण, त्याचे उत्तर अशी भाषा बोलणार्‍याकडेही नसते. कारण तशी बोलण्याची पद्धत आहे, म्हणून ते शब्द बोलले जात असतात. पण सामान्य माणूस असा कधीही उगाच उठून तक्रारी करत नाही. तसे असते तर गेल्या पन्नास दिवसात देशात मोठी क्रांती होऊन गेली असती वा अराजक माजले असते. पण त्यातले काहीही झाले नाही. मग ही जाणती माणसे अशी भाषा कशाला बोलतात? काही वर्षापुर्वीच गोष्ट आहे. भारतात नव्याने खाजगी टिव्ही वाहिन्यांचा जमाना सुरू झाला होता आणि स्टार टिव्ही ही एकच वृत्तवाहिनी होती. त्यात इंग्रजी व हिंदी अशा दोन भाषेतून बातम्या प्रक्षेपित केल्या जायच्या. आज एनडीटिव्ही नावाचे नेटवर्क आहे, त्यांनीच ते काम चालविले होते. प्रत्यक्षात त्या स्टार नेटवर्कचा म्होरक्या (शीना बोराच्या हत्याकांडात फ़सलेला) पीटर मुखर्जी होता आणि पाच वर्षाच्या कराराने प्रणय रॉयच्या कंपनीला बातम्या व कंटेन्ट पुरवण्याचे काम सोपवलेले होते. त्यातल्या एका चर्चेमध्ये जाहिरातीच्या क्षेत्रातला गुरू मानला जाणारा अलेक्स पदमसी याला बोलावलेले होते. प्रणय रॉय ती चर्चा संचलीत करत होता. त्यात कुठल्या तरी विषयावर बोलताना प्रणयने पदमसीला म्हटले, ‘तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे. इंडियाला हे जाणून घ्यायचे आहे’. मग त्याच्या प्रश्नाला आधीपासून बगल देणारा पदमसी उसळून म्हणाला, ‘कुठला इंडिया? कोण इंडिया? कोणाला या प्रश्नाचे उत्तर हवे आहे? कोणालाही नको आहे, त्याचे उत्तर! मी रस्त्यावर फ़िरतो आणि सगळीकडे वावरतो. पण मला कोणी आजवर हा प्रश्न विचारला नाही. तूच विचारतो आहेस. थोडक्यात ह्या प्रश्नाचे उत्तर इंडियाला नको आहे, तर तुला हवे आहे’. ते ऐकून प्रणय रॉयची बोबडी वळली होती.

कारण स्पष्ट असते. टिव्हीवर बातम्या देणारा वा संचलन करणारा आपणच इंडिया किंवा भारतीय असल्याच्या थाटात आवेशात बोलत असतो. सामान्य जनतेने तसे सर्वाधिकार आपल्यालाच सोपवले आहेत, असा त्याचा अविर्भाव असतो. पण प्रत्यक्षात तशी काही शंका वा भावनाही सामान्य भारतीयाच्या मनात नसते. अगोदरच आपल्या नित्यनेमाच्या गांजलेल्या आयुष्यात लोक इतक्या समस्यांशी झुंजत असतात, की कुठल्या एका प्रश्नाचे उत्तर कोणाकडे मागण्याचीही त्यांना सवड नसते. पण त्यांच्यावतीने आपणच भांडत व झुंजत असल्याचा आवेश राजकीय पक्ष वा तथाकथित प्रतिष्ठीत वर्ग दाखवत असतो. वास्तवात त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न व नाराजी सुद्धा सामान्य माणसाची अजिबात नसते. ज्या काही तक्रारी वा आक्षेप असतात, ती याच लोकांची पोटदुखी असते. आपली पोटदुखी वा आक्षेप सर्वव्यापी दाखवण्याच्या अट्टाहासातून मग देशाला त्या प्रश्नांची उत्तरे हवीत, अशी भाषा बोलली जात असते. हेच जगाच्या इतिहासात कायम होत आलेले आहे. सामान्य माणसला कधीही कुठे तक्रार नसते. पण त्याच्या शक्तीशिवाय उठाव किंवा बदल होत नाहीत. म्हणूनच समाजातील मुठभर सुखवस्तु लोक आपल्या तक्रारीच सामान्यांच्या माथी मारून टिका करीत असतात. त्याला प्रतिसाद मिळावा, म्हणून मग सामान्यांच्या दुखण्य़ाचे भांडवल केले जात असते. पण वास्तवात अशाच मुठभरांचे हितसंबंध अन्यायकारक व्यवस्था व जीवनपद्धतीत सामावलेले असतात. पण त्याची सुत्रे आपल्या हाती नाहीत ,ही अशा मुठभरांची खरी पोटदुखी असते. म्हणूनच असलेल्या सत्ताधीशाला वा प्रशासकाला बदलण्याची उर्मी सामान्य लोकांमध्ये जागवण्याचे प्रयास होत असतात. मग त्यातून बदल झालाच, तर नव्याने सत्ता वा अधिकार हाती घेणाराही आधीच्याच व्यवस्थेत किरकोळ बदल करून, तोच अंमल चालू ठेवतो. तेव्हा त्याच्याविषयी असुया असलेल्यांचा जनतेच्या वतीने बोलण्याचा डाव सुरू होत असतो.

बारकाईने आपण अभ्यास निरीक्षण केले, तर ज्यांना नोटाबंदीचा खराखुरा त्रास सहन करावा लागला आहे, त्यापेक्षा भलत्यांचीच त्याविषयीची तक्रार आपल्याला बघायला या पन्नास दिवसात मिळालेली आहे. राहुल गांधी आयुष्यात कुठल्या बॅन्केत खाते काढायला गेलेले नसतील, की एटीएममध्ये गेले नाहीत. पण यावेळी प्रथमच त्यांनी तिथे ताटकळणार्‍यांच्या रांगेत येऊन आपणच त्राते असल्याचे दाखवण्याचा उद्योग केला. जिथे कुठे खुट्ट वाजले, तिथे राहुल गांधी वा अन्य विरोधी पक्षाच्या लोकांनी धाव घेतलेली दिसेल. पुर्वी तिथे भाजपाचे लोक धाव घ्यायचे. व्यवस्थेतल्या त्रुटी व त्यातून सतावणार्‍या अडचणींचा पाढा, तेव्हा भाजपावाले वाचत असत. नंदीग्राम सिंगूर येथे मार्क्सवादी पक्षाच्या सत्ताकाळात हिंसाचार माजला, तर तिथे धाव घेऊन ममता बानर्जींनी ठाण मांडले होते. पण आज कोलकात्याच्या नजिक हावडा जिल्ह्यात धुलागड नावाच्या वस्तीत हिंदूंची शेकडो घरे जाळली गेली व शेकडो रहिवासी परागंदा झाले आहेत. तिथे भेट देण्याला मुख्यमंत्री झालेल्या ममताच प्रतिबंध लावून बसल्या आहेत. त्यांचा आक्षेप खराच आहे. तिथे जाऊन भाजपावाले भावना भडकावतील. पण मग सिंगूर नंदीग्राममध्ये ममता तरी कुठली शांतता प्रस्थापित करायला गेल्या होत्या? निर्भयाच्या वेळी दारात हजारोच्या संख्येने तरूण मुलेमुली जमा झाल्या, तेव्हा राहुलना तरी कुठे घराबाहेर पडायची बुद्धी झालेली होती? तेव्हा जमलेला जमाव न्यायासाठी आलेला नव्हता का? हे असेच चालते. ज्यांना काडीमात्र काही भोगावे लागत नाही, तेच सामान्य माणसाला भोगाव्या लागणार्‍या यातनांचा बाजार भरवित असतात. आपणच जनतेच्या पिडीतांच्या वतीने न्याय मागत असल्याचा आक्रोश करीत असतात. जेव्हा सुखवस्तु लोक इतक्या मोठ्या संख्येने गरीबी व गरिबाच्या न्यायासाठी ओरडू लागतात, तेव्हा गरीबही थक्क होऊन जातो.

सुखवस्तु लोकांच्या जीवनात गरीबीचा कळवळा वाढू लागला की समजावे, त्यांच्या बाजारात गरीबी नावाच्या कच्च्या मालाचा व्यापार तेजीत चालला आहे. आपल्याकडेच हा उद्योग चालतो असेही मानायचे कारण नाही. जगातल्या दुर्दैवी, दरिद्री, आजारी रोगट लोकांना स्वस्तातले उपचार मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे क्लिन्टन जोडपे अखंड अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या कामातला वेळ वाया जाऊ नये, म्हणून त्यांना विमानातून जगभर फ़िरावे लागते आणि कुठलीही कष्टाची कमाई नसताना ते मालकीचे जेट विमान बाळगू शकतात. त्यांचे काम गरीबांना औषधे मिळावीत असे असून, ते चालण्यासाठी जगात आजारी रोगट व गरीब असायला हवेत. त्यालाच धंद्यातला कच्चा माल म्हणतात. जगातली रोगराई व गरीबी संपली, तर अशा स्वयंसेवी त्यागी लोकांच्या जगण्याला काही हेतूच शिल्लक रहाणार नाही. गरीबांनी गरीब आणि पिडीतांनी पिडीत रहाण्यातच अशा त्यागी उदारमतवादी लोकांच्या जगण्याचे उद्दीष्ट सामावलेले नाही काय? गुजरातच्या दंगलीत मुस्लिम भरडले गेले नसते, तर तीस्ता सेटलवाड करोडोची माया कुठून गोळा करू शकली असती? देशातले प्रश्न सुटले असते तर माध्यमांनी वृत्तवाहिन्यांनी कॅमेरे कुठे फ़िरवले असते? कोणासाठी न्याय मागणे त्यांना शक्य होते? राहुल गांधी म्हणतात काळापैसा मॉरीशसहून खेळवला जातो आणि त्या आरोपाला वारेमाप प्रसिद्धी देणार्‍या बहुतांश माध्यम समुहांची मोठी गुंतवणु्क मॉरीशसच्याच कंपन्यांनी केलेली असते. थोडक्यात गरीबी ही सुखवस्तु समाजसेवकांच्या आयुष्यातील गरज असते. खेळापासून गरीब मुलांसाठी अहोरात्र झटणार्‍या नीता अंबानींनी नवर्‍याच्या कमाईतून पैसे खर्च करतात. त्यापेक्षा पतीला त्याच्या विविध उद्योगात नफ़्याचे प्रमाण कमी करायला भाग पाडले, तर देशातली गरीबी रोखण्यासाठी किती मोठी मदत होऊ शकेल ना? पण तसे झाले तर गरीबीच संपेल आणि गरीबांच्या वाली असणार्‍यांना कामधंदाच शिल्लक उरणार नाही ना?

3 comments: