Wednesday, December 28, 2016

पुढल्यास ठेच, मागचा?

raj uddhav के लिए चित्र परिणाम

२००९ सालात चौदाव्या लोकसभेची निवडणूक झाली होती आणि त्यात शिवसेना भाजपाला मुंबई परिसरात जबरदस्त मार खावा लागला होता. त्यात कॉग्रेसचा मोठा विजय झाला होता. तरीही त्याचे खरे श्रेय त्या पक्षाला अजिबात नव्हते. खरा मानकरी एकही लोकसभेची जागा जिंकू शकला नव्हता. मात्र आपण त्या निकालाचे खरे मानकरी आहोत हे सांगायला तोच पराभूत पक्षाचा नेता हिरीरीने पुढे आला होता. एकही खासदार निवडून आला नसताना, निकालानंतरची पहिली पत्रकार परिषद तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. आज त्यांनाही त्याचे स्मरण उरलेले नसेल. कारण आज त्यांचा पक्ष राजकीय खिजगणतीत राहिलेला नाही. तेव्हा लोकसभा निकालाचा अर्थ स्पष्ट करताना, आपण काय केले ते अतिशय खोचक भाषेत राज ठाकरे यांनी सांगितले होते. अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या अंथोनी गोन्सालविस भूमिकेचा डायलॉग राजने पत्रकारांना ऐकवला आणि समोरचे पत्रकारही खिदळले होते. ‘तुमने हमको बहूत मारा. हमने तुमको एकही मारा. लेकीन सॉलिड मारा, है के नही?’ असे राजचे शब्द होते. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद वा खुशी लपून राहिलेली नव्हती. कारण मनसेने जी मते फ़ोडली, त्याचा फ़टका शिवसेना व भाजपा युतीला बसला होता आणि त्यातले खोचक शब्द शिवसेनेला बोचावेत, म्हणूनच राजनी उच्चारलेले होते. आपल्या यशापेक्षा दुसर्‍याच्या अपयश वा दु:खामध्ये जेव्हा आनंद शोधला जातो, तेव्हा असेच होते. पण ते बोचरे शब्द ऐकून शिवसेनेचे तेव्हाचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रीया दिली नव्हती. कारण ती उत्तर देण्याची वेळ नव्हती. त्यापेक्षा जी स्थिती आली आहे, ती परतवून लावण्याला अर्थ व प्राधान्य होते. ती स्थिती पुढल्या अडीच वर्षांनी मुंबई पालिकेच्या निकालानंतर आमुलाग्र बदलून गेली होती. उद्धवनी तेव्हा तोंड उघडले होते. त्याला चोख उत्तर म्हणतात.

पण विषय चोख उत्तर वा उद्धव ठाकरे असाही नाही. सवाल आहे तो राज ठाकरे यांच्या नंतरच्या वाटचालीचा! मतदाराने उद्धव किंवा सेनेच्या विरोधात तेव्हा राज ठाकरे व मनसेला साथ दिलेली होती. त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करणारा मतदार मनसेचा गुलाम वा हुकूमाचा ताबेदार नव्हता. तो फ़क्त सेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांचा सहानुभूतीदार होता. पण ते समजून घेण्याचा काडीमात्र विचार राज ठाकरे यांच्या मनाला शिवला नाही. लौकरच आलेल्या राज्य विधानसभेच्या मतदानातही तीच सहानुभूती कायम राहिली आणि तिथेही युतीला व प्रामुख्याने शिवसेनेला मोठा फ़टका बसला होता. मुंबईत तर सेनेपेक्षा एक आमदार जादा निवडून आणण्यातही राजना यश मिळाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला राजनी शह दिला, असेच मानले जात होते. पण नंतर दोन वर्षात महापालिका निवडणूकीत उद्धवनी हेटाळणी, बोचरी भाषा वा टिंगलीसह सर्व गोष्टींची सव्याज परतफ़ेड केली होती. पण दरम्यानच्या दोन अडीच वर्षात, उद्धव ठाकरे यांनी कमालीचा संयम दाखवला होता. उलट राज ठाकरे त्या यशाने इतके हुरळून गेले होते, की बाळासाहेबांच्या थाटात वागण्या बोलण्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. सतत सेनेला डिवचणारी भाषा व वक्तव्ये करून, राज नित्यनेमाने माध्यमांच्या गळ्यातले ताईत बनून गेलेले होते. उलट उद्धव हा अपेशी वारस, अशीच प्रतिमा निर्माण झालेली होती. तरीही डिवचणार्‍या भाषेला उत्तर देण्याची घाई उद्धवनी कधीच केली नाही. सार्वजनिक पाताळीवर त्यांनी मौनव्रत घेतल्यासारखी अशा टिकेकडे साफ़ पाठ फ़िरवलेली होती. दुसरीकडे राज मात्र देशातील कुठल्याही लहानसहान घटनेविषयी मतप्रदर्शनाची संधी सोडत नव्हते. आज तेच राज ठाकरे किती शांत झाले आहेत ना? कारण त्यांच्यामागच्या सहानुभूती व राजकीय शक्तीचा प्रभाव अस्तंगत झाला आहे.

सतत बोलत राहिले आणि दुसर्‍याच्या अपयशाला आपले यश समजण्याचा आततायीपणा केला; मग यापेक्षा दुसरे काही होत नाही. आपले स्पर्धक वा शत्रू त्यांच्या कृतीने व चुकांमुळे अपयशी ठरणारच असतात. त्यांच्या त्या चुकांमुळे निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याची संधी शोधत रहाणे आणि तीच पोकळी व्यापाण्यासाठी आपली सज्जता करण्याची गरज असते. २००९ ते २०१२ या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे नेमकी तीच गोष्ट अतिशय शांत राहून करीत होते आणि कृतीतून यशातून उत्तर देण्याची जमवाजमव करीत होते. त्याची पहिली प्रचिती मुंबई महापालिकेच्या यशातून त्यांनी लोकांना घडवली. नंतर त्या यशाचे वर्णन करताना, त्यांना मनसे किंवा राज ठाकरे यांच्याविषयी अवाक्षरही बोलावे लागलेले नव्हते. कारण मुंबई पालिकेच्या त्या निकालांनीच राजला किंवा टिकाकारांना उत्तर दिले होते. तिथून मग उद्धवचा जमाना सुरू झाला आणि राज ठाकरे यांची घसरगुंडी सुरू झालेली होती. नंतरच्या आपल्या प्रत्येक वक्तव्यातून किंवा अतिशयोक्त विधानातून राज ठाकरे आपला सहानुभूतीदार गमावत गेले. कारण नुसते बोलणे वा अखंड बोलत रहाणे, उपयोगाचे नसते. बाळासाहेब यांची आवडती उक्ती होती. सौ सुनार की एक लोहारकी! याचा अर्थ आपल्या विरोधकांनी हवी तितकी बडबड करावी. आपण केवळ घणाचा एक घाव घालून विषय संपवतो. त्यांचीच तंतोतंत नक्कल करणार्‍या राजना साहेबांचा तो संयम वा प्रसंगावधान ओळखण्याचे भान राखता आले नाही. उद्धवनी तेव्हा तरी ते भान राखले होते आणि वेळ आली, तेव्हा घणाचा घाव कृतीने घालून विवाद संपवला होता. राजच्या चुकांनी त्यांना राजकारणात निष्प्रभ केले. त्यांना लागलेली ठेच इतरांना शहाणी करणारी ठरली काय? मराठीत पुढल्यास ठेच म्हणतात. त्याचा अर्थ मागून येणारा सावध होऊन तीच चुक करत नाही. आज तसा काही अनुभव येतो आहे काय?

२००९ चे मोठे पराभव पचवून संयम दाखवत आपली शक्ती जमवणारे उद्धव ठाकरे; आज आपलाच तो गुण विसरून गेले आहेत काय, अशी कधीकधी शंका येते. कारण युती तुटल्यानंतर त्यांनी त्याच आपल्या संयमाची फ़ारशी साक्ष दिलेली नाही. कृतीने घणाचा घाव घालण्याची आपलीच काही वर्षापुर्वीची रणनिती, हा माणूस विसरून गेला काय अशी हल्ली शंका येते. राज यांनी २००९ नंतर सातत्याने प्रत्येक गोष्टी बोलून काय मिळवले आणि किती गमावले; त्याची यादी इथे सादर करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे त्या काळात जाहिर वाच्यता न करता उद्धवनी काय साधले; तेही तपशीलाने कथन करण्याची गरज नाही. लोकसभेपुर्वी बीकेसी येथे हिरेव्यापार्‍यांनी नरेंद्र मोदींचा सत्कार केलेला होता. तिथे सिंहासनासारख्या खुर्चीवर मोदी आणि साध्या कोचावर उद्धवना बसवले गेले, म्हणून माध्यमातून कितीतरी डिवचणार्‍या बातम्या झळकवल्या होत्या. त्याला साधा प्रतिसादही देण्याइतकी दखल उद्धवनी घेतली नव्हती. तेच उदधव आज नित्यनेमाने जी वक्तव्ये करीत आहेत, ती मनसे अध्यक्षांच्या तेव्हाच्या वक्तव्यांचे स्मरण करून देणारी आहेत. पण त्याचवेळी राज ठाकरेंना कुठे व कसली ठेच लागली, त्याचेही विस्मरण होत असल्याची साक्ष देणारी आहेत. आज त्यांच्या अशा वक्तव्यांनी भोवतालचे अनुयायी सुखावतही असतील. पण तसेच राजचेही अनुयायी गुदगुल्या झाल्यासारखे तेव्हा हसत नव्हते काय? तो आनंद तात्कालीन असतो. आज कोणाला राजचा तो डायलॉग आठवत नाही, किंवा राजच्या शब्दातली ती जरब राहिलेली नाही. ती कशाला संपली, ते ओळखणारा सावध झाला असे म्हणता येते. पण जेव्हा राज बोलत होते, तेव्हा त्यांना कोणी संयम राखण्याचा दिलेला सल्ला आवडला असता काय? तेव्हा टाळ्या पिटणारे आवडतात आणि नंतर परिणाम भोगायची वेळ आल्यावर, तेच सर्वात आधी फ़रारी होत असतात.

1 comment: