Friday, December 30, 2016

२०१६ वर्षाला निरोप

pathankot के लिए चित्र परिणाम

आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि त्याही दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. त्यांच्या भाषणांची टिंगल करणे ही आता एक फ़ॅशन झाली आहे. त्यालाही पर्याय नसतो. जी व्यक्ती अधिक प्रकाशात असते, त्याच्यावरच अधिक भाष्य होत असते. पण मुद्दा इतकाच, की वर्षाची अखेर बहुतांश पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांना आरामाची व मौजमजेची असते. पण वर्ष संपायला चारपाच वर्षे शिल्लक असताना पंतप्रधान नागरिकांसाठी संबोधन करतो, तेव्हा माध्यमांना त्याकडे डोळेझाक करता येत नाही. थोडक्यात मोदी यांनी माध्यमांच्या वर्ष अखेरीचा बोजवारा उडवून टाकला आहे. कारण ते मावळतीला भाषण करणार, म्हणजे  पत्रकारांना ते ऐकून पुढले तीनचार तास त्यावर भाष्य करावे लागणार आहे. परिणामी प्रत्यक्षात रात्रीचे बारा वाजून नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी करण्याचीही सवड मोदींनी पत्रकारांना ठेवलेली नाही. कारण कालच नोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत संपलेली आहे आणि आज त्याचा आढावा मोदी घेतील; ही एक अपेक्षा आहे. खेरीज त्या नोटाबंदीतून साधले काय आणि त्याचे लोकांना काय लाभ होतील, त्याचाही गोषवारा पंतप्रधान करण्याची शक्यता आहे. अधिक आणखी कसली नवी घोषणा किंवा योजना मोदी जाहिर करतील, याचा अंदाज करत ताटकळण्याला पर्याय नाही. अशी नोटबंदी वा एकूण मोदींची कार्यशैली बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, की सतत आपल्या टिकाकारांना आणि प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात ठेवणे, हा त्यांचा छंद आहे. किंबहूना तीच त्यांची रणनिती झालेली आहे. आपल्या चौदा वर्षाच्या प्रशासकीय काळात त्यांनी सतत टिकेचे घाव सोसले आहेत आणि आपल्या प्रत्येक विरोधकाला थक्क करीत, हा माणूस सलग टिकून राहिला आहे. त्यामुळेच वर्षाचा शेवट मोदी कोणत्या प्रकारे करतात, याची उत्सुकता वाढलेली आहे.

या वर्षाचा आरंभच अपशकुनाने झालेला होता. २०१५ च्या अखेरीस रशिया व अफ़गाण दौरा उरकून मायदेशी परत येत असताना, अकस्मात मोदींनी लाहोरला भेट दिलेली होती. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्या वाढदिवसाचे निमीत्त होते आणि मोदी अचानक तिथे जाऊन पोहोचले. आपल्या सदिच्छांची त्यांनी कृतीतुन साक्ष दिलेली होती. त्यानंतर आठवडाभरात २०१५ संपले आणि नववर्षाचा आरंभ झाला होता. त्याचा दुसरा दिवस उजाडला, तोच पठाणकोट येथील भारतीय हवाई तळावरच्या हल्ल्याने. पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या जिहादी संघटनेच्या हस्तकांनी पाक सेनेच्या मदतीने घुसखोरी करून, ह्या तळावर हल्ला चढवला होता आणि त्यात भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. सहाजिकच मोदींच्या लाहोर दौर्‍याशी पठाणकोट हल्ल्याचा संबंध जोडला गेला. तिथून सुरूवात झाली आणि मग मोदींवरील हल्ले व टिकेची धार सतत वाढतच गेलेली होती. पुढे काश्मिरात बुर्‍हान वाणी या जिहादीला चकमकीत मारले गेले आणि काश्मिर धुमसू लागला. अशा प्रत्येक घटनेचे पडसाद संसदेत उमटत गेले आणि राजकारण तापतच गेलेले होते. पुढे वर्षाच्या उत्तरार्धात पुन्हा उरी येथील लष्करी तळावर जिहादींनी हल्ला केला आणि काहूर माजले. त्याला चोख उत्तर देण्याचा इशारा मोदींनी दिला होता आणि मग पाक हद्दीत भारतीय कमांडोंनी जाऊन सर्जिकल स्ट्राईकही केला. त्याविषयीच्या शंकाही धुमाकुळ घातला. मध्यंतरी दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात जिहादी फ़ुटीर मानसिकतेचे उदारीकरण करताना देशप्रेम व देशभक्तीची नव्याने व्याख्या लिहीण्याचेही नाटक रंगलेले होते. अशारितीने वर्षभर मोदींना राजकीय कोंडीत पकडण्याचा खेळ चालू राहिला. तो गोंधळ कमी होता म्हणून की काय, मोदींनी नोव्हेंबरच्या आरंभी काळापैसा खोदून काढण्याचा चंग बांधून नोटाबंदी जारी केली.

गेले दोन महिने त्या नोटाबंदीने अवघा देश घुसळून निघाला आहे. चलनातील ८६ टक्के किंमतीच्या नोटा रद्द झाल्या, तर एकूणच आर्थिक उलाढाल थंडावणार यात शंकाच नाही. आरंभी बहुतेकांनी निर्णय चांगला असल्याची ग्वाही दिली. पण नोटा बदलून घेण्यासाठी गल्लीबोळातल्या बॅन्कांमध्ये झुंबड उडाली आणि लोकांच्या कुरबुरी ऐकू आल्यावर विरोधकांना त्यातली राजकीय संधी दिसू लागली. आठवडाभरात नोटाबंदीच्या विरोधतले स्वर घुमू लागले. कारण दोन मोठ्या किंमतीच्या नोटा बाद झाल्या होत्या आणि बदल्यात व्यवहार करण्यासाठी नवी दोन हजाराची नोट आली होती. त्याच्या खालोखाल एकदम शंभराचीच नोट होती आणि तुलनेने तितक्या शंभराच्या नोटा व्यवहारात नसल्याने सर्वांचेच हाल सुरू झाले. सहाजिकच त्यातून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा आटापिटा विरोधकांनी केला तर नवल नव्हते. मग कोणी आर्थिक आणिबाणीचा आरोप केला तर कोणी हुकूमशाही फ़ॅसिझमचा आरोप केला. पण जवळपास कोणीही ‘आर्थिक दहशतवाद’ असा आरोप चुकूनही केला नाही. ही बाब मोठी चमत्कारीक होती. कारण जे काही गेल्या पन्नास दिवसात घडले वा घडत होते, तो निव्वळ आर्थक दहशतवाद होता. आपलेच पैसे बॅन्केत आहेत आणि ते काढायला मुभा नव्हती. म्हणून कोट्यवधी लोकांचे हाल चालले होते. पण बाकी सर्व आरोप होताना दहशतवादाचा आरोप मात्र कोणी केला नाही. किंबहूना तशी आर्थिक दहशत माजवणे हाच मोदींना नोटाबंदीमागचा खरा हेतू असावा. जेणे करून लोकांना सक्तीने डिजिटल व्यवहाराकडे वळायला भाग पाडणे आणि बहुतांश नोटांमध्ये व्यवहार करणार्‍यांना बॅन्केच्या परिघात आणणे; हे त्यातले खरे उद्दीष्ट होते. काळापैसा किंवा खोट्या नोटा हा निव्वळ देखावा होता. पण कोणालाही त्याकडे उघड्या डोळ्यांनी बघायचेच नसल्याने, तो आरोप होऊ शकला नाही.

या निमीत्ताने बहुतांश चलन बॅन्केच्या माध्यमात व परिघात आले आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहारांना हिशोबाच्या परिघात आणून बेहिशोबी वा अनौपचारीक व्यवस्थेतून बाहेर काढले जाणार आहे. ९०-९५ टक्के नोटा परत आल्या तरी त्यातल्या बहुतांश नोटा कोणाच्या तरी खात्यात जमा झालेल्या आहेत. म्हणूनच त्याचा मालक कोण ते उघड होणार आहे. त्या नोटा परत घेताना आपले व्यवहार पांढरे व कायदेशीर असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. काही लाख लोक तरी अशा सापळ्यात आता फ़सलेले आहेत. त्यातून बाहेर पडायचे तर आपला चेहरा त्यांना दाखवावा लागणार आहे. तो एकदा दिसला, मग ते सर्व़च दाखलेबाज म्हणून ओळखले जातील. सहाजिकच त्यांना नव्याने काळापैसा जमवणे वा तसे व्यवहार करणे सोपे रहाणार नाही. हेच काम नुसते प्रशासन वा कायद्याच्या चौकटीत राहुन करायला गेल्यास आणखी सत्तर वर्षे उलटली असती. पण टिचभरही प्रगती होऊ शकली नसती. नोटा बंद करणे व बदल्यात पुरेशा नोटा उपलब्ध नसणे, या कोंडीमुळेच हे शक्य झालेले आहे. म्हणूनच त्याला दहशत म्हटले पाहिजे. त्या नोटा फ़ाडून जाळून टाका किंवा आपापल्या खात्यात आणून भरणा करा, हे कायद्याच्या सक्तीनेही साध्य झाले नसते. नोटाच रद्द केल्याने दहशत माजली म्हणून ते शक्य झाले. जुन्या नोटा जमा करण्य़ाची सक्ती होती आणि परत मिळण्याचा रस्ता बंद, ही प्रत्यक्षात दहशत होती. त्याचे दुरगामी लाभ पुढे दिसतीलच. पण आज त्याची थोडी चाहुल पंतप्रधानांच्या भाषणात मिळू शकेल. वर्षभर ज्या टिकेचे आसुड सहन केले, त्याला चोख उत्तर अखेरच्या दिवशी देऊन पंतप्रधान नव्या वर्षाचा आरंभ करणार; अशी शक्यता अधिक आहे. कारण यापुढे सामान्य माणसाला चलन उपलब्ध होईल आणि ज्यांच्यापाशी अफ़ाट रकमा आहेत, त्यांना सापळ्यातून बाहेर पडणे अशक्य असेल. नववर्षाची तशी काही भेट असेल काय?

3 comments:

  1. छानच भाऊ सुंदर

    ReplyDelete
  2. हे भाषण करून मोदींनी स्वतःचीच टिंगल करून घेतलीय

    ReplyDelete
  3. लोकांना सक्तीने डिजिटल व्यवहाराकडे वळायला भाग पाडणे आणि बहुतांश नोटांमध्ये व्यवहार करणार्‍यांना बॅन्केच्या परिघात आणणे; हे त्यातले खरे उद्दीष्ट होते. काळापैसा किंवा खोट्या नोटा हा निव्वळ देखावा होता.
    भाऊ!
    आपले निदान १००% खरे ठरले. मा. पंतप्रधान आजच्या भाषणात काळ्या धनाविषयी काही बोलले नाहीत.
    कालच सरकारी अॅप "भीम" देशाला देऊन झाले.
    बच्चा लोग ताली बजाव।

    ReplyDelete