Saturday, December 17, 2016

मेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है?

kejriwal cartoon के लिए चित्र परिणाम

प्रत्येकाचे काही गल्लीबोळ किंवा गाववस्ती ही बालेकिल्ला असतो. तिथे त्याला अतिशय सुरक्षित वाटत असते. मग असे लोक आपल्या सुरक्षित बोळातून कुणालाही धमक्या इशारे देत असतात. राजकारणात वा दादागिरीत असे चालतेच. त्यामुळेच मग टोळीयुद्धही होत असतात. आपल्या भागात दुसर्‍याने घुसखोरी केलेली अनेकांना पसंत नसते आणि आपल्या अधिराज्यातली घुसखोरी हाणून पाडायला ते आवेशाने बाहेर पडत असतात. केजरीवाल व राहुल गांधी यांच्यात सध्या बहुधा तशीच लढाई जुंपलेली असावी. अन्यथा कॉग्रेसच्या या ‘दिग्वीजयी’ उपाध्यक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिलेली असताना, केजरीवाल यांनी तलवार उपसून बाहेर येण्याचे काही कारण नव्हते. नोटाबंदीनंतरचे हिवाळी अधिवेशन वाया गेले आहे. त्यात विरोधक व सत्ताधारी एकमेकांवर संसद चालू देत नसल्याचा आरोप करीत आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण होत असल्याने खरेखोटे काय ते सामान्य मतदार बघतोच आहे. त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. पण नोटाबंदीनंतर सर्वात पहिला आवाज उठवला, तो आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी! देशातला आजवरचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे त्यांनीच सांगितले होते आणि नंतर त्याला फ़ारसा प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा देशात ‘बगावत’ होण्याचा इशाराही त्यांनीच दिला होता. मात्र त्यासाठी त्यांनी कुठला पुरावा कधीच समोर आणला नाही. केजरीवाल यांच्यासाठी बेछूट बिनबुडाचे आरोप करून खळबळ माजवणे, हे राखीव क्षेत्र आहे. म्हणूनच त्यांचा आरोप वा वक्तव्ये आजकाल माध्यमे वगळता कोणी गंभीरपणे घेत नाही. पण गेले दोन आठवडे त्यांनी थोडी शांतता पाळली आणि ती पोकळी भरून काढायला राहुल गांधी पुढे सरसावले. त्यामुळे केजरीवाल भलतेच विचलीत झालेले दिसतात. अन्यथा भाजपाचा प्रवक्ता असल्याप्रमाणे त्यांनी भाष्य केलेच नसते.

आपण संसदेत बोललो तर भूकंप होईल. आपल्यापाशी मोदींच्या भयंकर भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत आणि ते ऐकून मोदी पळ काढतील. म्हणूनच आपल्याला लोकसभेत बोलू दिले जात नाही, अशी भाषा राहुलनी वापरली आहे. मंगळवार बुधवारी राहुलनी असे विधान केले आणि भाजपाने त्याला नेहमीप्रमाणे उत्तर दिले. पण राहुलना खरे आव्हान दिले ते केजरीवाल यांनी! राहुलपाशी खरेच मोदी विरोधातले काही पुरावे किंवा कागदपत्रे असतील, तर त्यांनी जाहिरपणे त्यांची घोषणा करावी. त्यासाठी संसदेत बोलून गौप्यस्फ़ोट करण्याची गरज नाही. असे केजरीवाल यांनी सांगितले आहे. त्यांचेच गौप्यस्फ़ोट विशारद सहकारी आशिष खेतान यांनीही तसेच विधान केलेले आहे. कारण ही दोन माणसे आजवर बिनबुडाचे आरोप करून खळबळ माजवण्यानेच प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहेत. राहुलच्या विधानाने वा इशार्‍याने नरेंद्र मोदी जराही विचलीत झालेले नसताना, केजरीवाल यांनी इतके घाईगर्दीने प्रतिआव्हान देण्याचे कारण काय? राहुलनी केजरीवाल वा त्यांच्या पक्षाला कुठली धमकी दिलेली नाही वा पुरावेही त्यांच्या विरोधातले असल्याचा दावा केलेला नाही. मग केजरीवाल प्रतिआव्हान कशाला देत आहेत? खेतान केजरीवाल यांची भाषा बघितली तर उगाच फ़ुसक्या सोडू नकोस, काही असेल तर पत्रकार परिषदेत जाहिर करून दाखव; असाच त्याचा अर्थ होतो. त्यातून केजरीवाल भाजपापेक्षाही विचलीत झाल्याचे स्पष्ट जाणवते. त्यांनी खरेतर राहुलच्या अशा विधानांना टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यायला हवा. कारण उठसूट केजरीवाल मोदींना आव्हान देत असतात वा मोदींवरच आरोप करीत असतात. आपल्या सोबतीला राहुल आल्याचा त्यांना आनंद व्हायला नको काय? मग राहुलना प्रोत्साहन देण्याऐवजी केजरीवाल आव्हान दिल्यासारखे का बोलत आहेत? त्यांना आपली जागा राहुल घेण्याच्या भितीने पछाडले आहे काय?

गेल्या चार वर्षात राजकारणात आल्यापासून केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने सतत कुणावर तरी बेछूट आरोप करून माध्यमांना खळबळजनक बातम्या पुरवलेल्या आहेत. त्यापैकी कुठलाही आरोप आजवर पुराव्यानिशी सिद्ध झालेला नाही. पण तात्पुरती खळबळ मात्र त्याने माजलेली आहे. मग त्याच निमीत्ताने केजरीवाल सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहेत. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून नोटाबंदी किंवा त्याच्याही पुर्वी सर्जिकल स्ट्राईकच्या संबंधात त्यांना मिळालेली प्रसिद्धीचॊ प्रत्येक संधी; त्यांच्यापेक्षा बेताल बोलून राहुल गांधींनी हिरावून घेण्याचा सपाटा लावला आहे. आधी केजरीवाल यांनी खरेच सर्जिकल स्ट्राईक झाला काय, अशी शंका उपस्थित करून गाजवले. मग खुन की दलाली असा दणदणित आरोप करून राहुलनी केजरीवालना माध्यमांच्या पटलावरून पुसून टाकले. तेव्हापासून अधिकाधिक बेतालपणे बोलण्याची दोघांमधली स्पर्धा शिगेला पोहोचलेली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्या वादात शिरायला राहुलनी उशिर केला. कारण त्यात ममतांनी उडी घेतली होती. पण मग ते पुढे सरसावले आणि आधी केजरीवाल बाजूला झाले व नंतर ममताही मागे पडल्या. ती पोकळी एकहाती भरून काढताना गेले दोन आठवडे राहुल गांधी कमालीचे आघाडीवर राहिले आहेत. सातत्याने विचित्र बेताल व पोरकट विधाने करून, त्यांनी प्रत्येक कॅमेरा आपल्याच सभोवती घोटाळत ठेवला आहे. त्यामुळे केजरीवाल बेचैन झाले तर नवल नाही. कारण हा बेताल आरोपाचा प्रांत राहुलचा नसून केजरीवाल यांचा जन्मदत्त अधिकार आहे. माध्यमांना अशा बेछूट आरोपांच्या चर्चा करण्याची सवयच मुळात केजरीवालनी लावली. आता त्यात तेच मागे पडले असून, राहुलने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपल्या हातून या बालेकिल्ला निसटतो की काय, म्हणून केजरीवाल अस्वस्थ झालेले आहेत. अन्यथा त्यांनी भाजपा प्रवक्त्याप्रमाणे राहुलना आव्हान कशाला दिले असते?

अर्थात एका बेताल बेछूट आरोपाने बेचैन होण्याचे काही कारण नाही. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर राहुल लागोपाठ अशीच विधाने व आरोप करीत सुटलेले आहेत. त्यांना ती कला अवगत झाली तर केजरीवाल यांना आपला कारभार गुंडाळावा लागेल ना? भिती त्याची आहे. कारण चार वर्षात केजरीवाल यांनी कुठलाही पोरकटपणा करावा आणि त्यांच्या समर्थनासाठी त्यांचे दोनचार हजार सवंगडी धाव घेऊन धुमाकुळ घालायला पुढे यायचे. तसे कधी कॉग्रेस वा अन्य पक्षाच्या बाबतीत झाले नव्हते. राहुलही शक्य तितक्या जबाबदार विधानांचा उच्चार करीत आणि त्यांचे कॉग्रेसमधील सवंगडी त्यापासून सावध अंतर ठेवून असायचे. हल्ली राहुलच्या कुठल्याही भंपक विधानाला ब्रह्मवाक्य ठरवून अवघी कॉग्रेस संसदेपासून बाहेर रस्त्यावर धुमाकुळ घालू लागली आहे. आपली उरलीसुरली सर्व शक्ती आता कॉग्रेसने राहुलच्या बेतालपणा व मुर्खपणाचे ढोल पिटण्यासाठी जुंपली आहे. तितकी माणसे वा तितके नामवंत केजरीवाल आपल्या तमाशात आणू शकत नाहीत. त्यामुळेच प्रसिद्धी झोतातून केजरी मागे पडू लागले आहेत. अशावेळी राहुलना थेट भिडण्याखेरीज त्यांच्यासमोर कुठलाही मार्ग नाही. आरोप खोटे वा निरर्थक असल्याचे दाखवण्यातून राहुल गांधींच्या विश्वासार्हतेला तडा देण्याची केजरीवालना गरज वाटू लागलेली आहे. म्हणूनच भले मोदींचे वा भाजपाचे समर्थन वाटले तरी बेहत्तर; केजरीवालनी राहुलपाशी पुरावे आहेत, तर जाहिर करण्याचे आव्हान दिलेले आहे. किंबहूना तशा प्रतिआव्हानातून राहुलपाशी मोदी विरोधातला कसलाही क्षुल्लक पुरावा नाही, असे सिद्ध करायलाच केजरीवाल कंबर कसून पुढे आलेले आहेत. कशी गंमत आहे ना? एक भामटा दुसर्‍या भामट्याला खोटा पाडण्यासाठी मैदानात आला आहे. गल्लीबोळातले पाकिटमारही आपल्या प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला पकडून देण्यासाठी ‘सत्कार्य’ करीतच असतात ना?

No comments:

Post a Comment