Friday, December 9, 2016

चिन्नम्मा काय करील?

sasikala natarajan के लिए चित्र परिणाम

आपल्या देशातील अनेक मुख्यमंत्र्यांचा अधिकार पदावर असताना मृत्यू झालेला आहे. पंडित नेहरू व लालबहादूर शास्त्री यांचा पंतप्रधानपदी असतानाच मृत्यू झालेला होता. पण त्यांच्या जागी तडकाफ़डकी नवा मुख्यमंत्री वा पंतप्रधान नेमला गेलेला नव्हता. तांत्रिक अडचण नको म्हणून तशी माहिती मिळताच राष्ट्रपती व राज्यपालांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून सर्वात ज्येष्ठ अशा मंत्र्याला त्या पदावर नेमल्याचे प्रकार घडले होते. नेहरू व शास्त्री यांच्या निधनानंतर गुलझारीलाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आलेली होती. नंतर सत्ताधारी पक्षाच्या संसदेतील सदस्यांनी बैठक घेऊन, बहुमताने निवड केलेल्या नेत्याला नवा पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आलेली होती. अपवाद होता, इंदिराजींच्या हत्येनंतरचा! तेव्हा राजीव गांधींना थेट राष्ट्रपती भवनात बोलावून ग्यानी झैलसिंग यांनी पंतप्रधानकीची शपथ उरकून घेतली होती. पण त्यांना हंगामी पंतप्रधान ठरवले गेले नाही, किंवा नंतर नव्या नेत्याच्या निवडीसाठी संसदसदस्यांची बैठक वगैरे घेण्यात आलेली नव्हती. कदाचित कोणी नवा दावेदार पुढे येऊ नये, म्हणून हे राजकारण खेळले गेलेले असावे. नेमकी तशीच काहीशी स्थिती तामिळनाडूत झालेली असल्याने अम्माच्या उपरांत अण्णा द्रमुकमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका घेतली जात आहे. कारण त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यापुर्वीच पन्नीरसेल्व्हम यांच्या नावावर आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आणि मृत्यू जाहिर केल्यावर तासाभरात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उरकण्यात आला आहे. असे यापुर्वी कुठल्या राज्याच्या बाबतीत झालेले नाही. तामिळनाडूचेच अण्णादुराई गेल्यावर त्यांच्या जागी नेंदूसेझियन यांना हंगामी मुख्यमंत्री नेमण्यात आले होते. तर रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर तसेही काही करण्यात आले नव्हते. मग आताच ही घाईगर्दी कशाला?

संपुर्ण तामिळनाडू अम्माच्या निधनाने दु:खात बुडालेला असताना, त्यांच्याच पक्षातील नेत्यांसह अन्य सर्व राजकीय पक्षातले राजकारणी आपापल्या भवितव्याच्या दिशेने त्या मृत्यूची समिकरणे मांडत होते. त्यातूनच ही घाईगर्दी आलेली असावी. जयललिता लोकांपासून मैलोगणती दूर असायच्या, तशीच त्यांची लोकशाही पद्धतीनुसार चर्चेने सामुहिक निर्णय घेण्यावर श्रद्धा नव्हती. अनेकांचे त्या ऐकून घेत. पण त्यांचे बहुतेक निर्णय परस्पर घेतलेले असायचे आणि आपल्या विश्वासू सहकार्‍यामार्फ़त ते इतरांना पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी उभारलेली होती. सहाजिकच अशा व्यवस्थेमध्ये असे निरोप देणारे-घेणारे वजनदार शक्तीमान होऊन जात असतात. शशिकला नटराजन नावाच्या अम्माच्या सखी, त्यातूनच वजनदार झालेली व्यक्ती आहेत. जीवाभावाची मैत्रीण वा चिन्नम्मा म्हणजे धाकटी बहिण; अशी त्यांची अण्णाद्रमुकमध्ये ओळख होती. तीन दशकात या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी सुखदु:खात एकत्र राहिल्या. पण मध्यंतरी एका शंकास्पद कृतीमुळे खुप दुरावल्या होत्या. शशिकला यांच्यासह त्यांच्या संपुर्ण कुटुंबालाच आपल्या घरातून दोन वर्षापुर्वी हाकलून दिलेले होते. पक्षातूनही या नटराजन कुटुंबाची हाकालपट्टी झालेली होती. कारण शशिकला यांनी डॉक्टरला हाताशी धरून अम्मावर विषप्रयोग केल्याचे म्हटले जाते. त्याची कुठे उघड चर्चा झालेली नव्हती. पण नंतर शशिकला यांनी अम्माशी थेट संपर्क साधून माफ़ी मागितली आणि त्यांना अम्माने पुन्हा घरात घेतलेले होते. मात्र बाकीच्या कुटुंबियांना अम्माच्या जवळपास स्थान नव्हते. पण अम्माचा मृत्यू झाला आणि हे शशिकला कुटुंबिय त्या पार्थिवाच्या भोवताली जमलेले बघून, अनेक राजकारण्यांच्या पोटात गोळा उठला आहे. ही चिन्नम्मा पक्षासह सत्तेची सुत्रे आपल्या मुठीत घेणार काय, अशा चिंतेने तामिळी राजकारण घुसमटले आहे.

चिन्नम्मा म्हणजे घाकटी बहिण! रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर पक्षात व जनतेत आपले राजकीय स्थान एकाकीपणे उभे करता असताना, शशिकला यांची जयललिताशी गाठ पडली. त्यानंतर त्या दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी होऊन गेल्या. हळुहळू ही चिन्नम्मा व तिचे कुटुंब म्हणजेच जयललिताचे कुटुंबिय होऊन गेले. त्या जवळीकीमुळे अम्माच्या अनेक व्यवहारात शशिकला वा तिच्या कुटुंबाचा हिस्सा आपोआपच निर्माण होत गेला. पण त्याच्याही पलिकडे राजकारण, पक्ष व अम्मा सरकारात असताना, प्रशासनातही शशिकला यांचा प्रभाव दिसून येण्याइतका वाढत गेला. आताही अम्मा उपचारार्थ रुग्णालयात गेल्या असताना, त्यांच्या वतीने सर्व निर्णय ही चिन्नम्माच घेत होती. विविध खटले झाले, तेव्हाही चिन्नम्मा थोरलीसह तुरूंगात गेलेली होती. त्यापैकी काही खटले आता अम्माच हयात नसल्याने संपुष्टात येतील. पण एकत्रित आरोप असलेले खटले संपणार नाहीत आणि चिन्नम्माला त्यांना तोंड द्यावेच लागेल. ती अडचण, अधिक पक्षात एकदम हादरे नकोत, म्हणून या महत्वाकांक्षी चिन्नम्माने पन्नीरसेल्व्हम यांच्या मुख्यमंत्री होण्याचा डाव सावधपणे खेळला असावा. कारण हा नेता शशिकलाच्याच जातीचा असून, स्वयंभू अजिबात नाही. म्हणजेच अम्माप्रमाणेच चिन्नम्माच्याही मुठीत राहू शकतो. त्यापेक्षा दुसरा कोणी सत्तेपर्यंत पोहोचू नये, म्हणूनच त्याच्याच नावावर चिन्नम्माने घाईगर्दीने शिक्कामोर्तब घडवून आणलेले असावे. पण दुसरीकडे पक्षाचे सरचिटणिसपद तितकेच शक्तीशाली असून, चिन्नम्मा त्यावर कब्जा करून पक्ष मुठीत ठेवण्याच्या कामाला लागली आहे. खरे तर उपचारार्थ अम्मा रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच सगळी सुत्रे आपल्या मुठीत आणायची खेळी चिन्नम्माने सुरू केली होती. पार्थिवाचा भोवती आपले कुटुंब उभे करून तोच संकेत या महिलेले जगाला व तामिळनाडूला दिला आहे.

नटराजन कुटुंबाला घरातून व पक्षातून अम्माने काही वर्षापुर्वी हाकलून लावले होते व त्यांना नंतरही जवळपास फ़िरकू दिले नव्हते. त्यातून ही माणसे आपल्याला नापसंत असून, ती विश्वासाची वाटत नाहीत, हाच सिग्नल अम्माने आपल्या पाठीराख्यांना सतत दिलेला होता. पण अम्माचे डोळे मिटताच, चिन्नम्माने विनाविलंब त्यांनाच जयललिताच्या पार्थिवाभोवती आणून, आता पक्ष व सरकार आपल्याच मूठीत असल्याचा संकेत दिला आहे. असा त्याचा अर्थ लावला जात आहे. पक्षातील अनेक नेते असे होते, की ज्यांना अम्मापर्यंत जाण्यासाठी चिन्नम्माच्या मध्यस्थीची गरज नव्हती. ते आता या धाकटीसमोर नांगी टाकून तिलाही मुजरा करणार, की बंडाचा पवित्रा घेणार, असा प्रश्न आहे. कारण आजही पक्षाकडे पुरेसे बहूमत असून साडेचार वर्षाचा सत्तेचा कालावधी शिल्लक आहे. नजिकच्या काळात कुठल्या निवडणूका व्हायच्या नसून, त्यात पक्षाला विजयी करण्याचे कुठलेही राजकीय आव्हान चिन्नम्मासमोर नाही. मात्र अशा स्थितीत राजकीय डोलारा सावरण्यासाठी घटनात्मक प्रशासन पाठीशी असणे अगत्याचे आहे. कॅमेरे चालू असताना पार्थिवाचे दर्शन घ्यायला आलेल्या पंतप्रधान मोदींनी, चिन्नम्माच्या डोक्यावर हात ठेवला आणि रडव्या पन्नीरसेल्व्हम यांना छातीशी कवटाळले; हा म्हणूनच मोठा संकेत वाटतो. कुठल्याही घटनात्मक पेचात केंद्र चिन्नम्मासोबत असल्याची ती खूण असून, बदल्यात केंद्राच्या प्रत्येक निर्णयात पक्षाने मोदी सरकारला पाठींबा देण्याचा सौदाही झालेला असावा. भविष्यात तितक्या मोठ्या व्यक्तीमत्वाचा कोणी द्रविडीयन नेता पुढे आला नाही, तर चिन्नम्मा कुण्या राष्ट्रीय पक्षातही अण्णाद्रमुकचे विसर्जन करीत, आपले उखळ पांढरे करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात पक्षातले अंतर्कलह संभाळून तिने भावी काळात दोन वर्षे पक्षाचा भार यशस्वीपणे संभाळला तर!

1 comment: