Tuesday, December 27, 2016

युनियन बॅन्केतील ‘माया’


दिल्लीतल्या युनियन बॅन्केच्या खात्यामध्ये मायावती यांच्या पक्षाने तब्बल १०७ कोटी रुपयांच्या जुन्या बाद नोटा भरल्याने तिकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. इतकी मोठी रोख रक्कम भरली गेल्यास, तिकडे कोणाचेही लक्ष जाणारच. हे खाते त्या पक्षाने आजकाल नव्याने उघडलेले नाही. जुनेच खाते आहे आणि त्यात यापुर्वी अशीच मोठी रक्कम भरली गेली असती, तर त्याकडे कोणाचे खास लक्ष गेले नसते. उदाहरणार्थ अंबानी टाटा किंवा अन्य कुठल्याही मोठमोठ्या कंपन्यांच्याही खात्यात अशा मोठ्या रकमा भरल्या जातच असतात. त्याविषयी अजून कुठली बातमी झळकलेली नाही. मग मायावतींच्या पक्षाकडेच डोळे वटरून बघण्याचे कारण काय असावे? तर त्याचे उत्तर त्या खात्याचा इतिहास देऊ शकतो. मोठ्या कंपन्या जेव्हा बॅन्केतून व्यवहार करतात, त्यांची उलढाल अनेक महिने व वर्षांची तशाच मोठ्या रकमेतून होत असते. सहाजिकच तिथे कोणी काही कोटी रुपये ८ नोव्हेंबर नंतर जुन्या बाद झालेल्या नोटा म्हणून भरणा केली, तर फ़ारसा गाजावाजा होत नाही. अशा खात्यासाठी ती नित्याची बाब असते. त्यामुळेच मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या खात्यात अशीच रक्कम नित्यनेमाने भरली वा काढली जात असेल, तर त्याकडे कोणी डोकावून बघण्याची गरज उरत नाही. पण तसे झालेले नाही. यापुर्वीच्या महिन्यात वा त्याच्याही पलिकडे तशी कुठलीही मोठी उलाढाल त्या खात्यात झालेली नव्हती. पण नोटाबंदी लागू झाली आणि नंतर लागोपाठ प्रतिदिन मोठ्या रकमांचा भरणा जुन्या नोटांमध्ये करण्यात आला. त्यामुळेच आयकर खात्याने त्याकडे डोळे वटरून बघितले आहे. त्याचा खुलासा मायावतींनी केला, मग काम संपते. जर ही रक्कम शंकास्पद नसेल, तर चिडण्याचे काही कारण नाही. कायदेशीर बाब असेल तर गडबडून जाण्याची गरज नाही. पण मायावती चिडल्या आहेत. त्याचे कारण काय असावे?

mayawati garland with notes के लिए चित्र परिणाम

(पाच कोटी रुपयांच्या नोटांचा हार परिधान करताना)

राजकीय पक्षांना त्यांच्याकडे जमा होणारी रक्कम वा देणग्या, यासाठी आयकरात सुट दिलेली आहे. म्हणूनच मोठमोठ्या रकमा त्यांना जमा करता येत असतात. जर मायावतींच्या पक्षाला अशाच मोठ्या रकमांची देणगी पुर्वापार मिळत असेल आणि त्याचाही भरणा बॅन्क खात्यात झालेला असेल, तर चिंतेचे कारण उरत नाही. परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही. नोटाबंदीमुळे आधीपासून हाताशी असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम मातीमोल झाली असती. म्हणूनच ती नव्या नोटांमध्ये बदलून घेता यावी यासाठी बॅन्क खात्यात भरलेली आहे. इतकीच खरी गोष्ट आहे. हेच मग अन्य पक्षांचेही असू शकते. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की एका दिवसात वा एका आठवड्यात कोणी इतक्या मोठ्या रकमांच्या देणग्या मायावतींना दिलेल्या नाहीत. त्या खुप आधी दिलेल्या असू शकतात आणि त्यांचा भरणा बॅन्केत केला जात नसावा. असे जे व्यवहार असतात, त्यांनाच बेहिशोबी पैसा म्हणतात. म्हणजे असा पैसा हा कुठल्याही कागदोपत्री व्यवहारात दिसत नाही. तो निवडणूक साहित्यावर होणारा खर्च असो वा राजकीय प्रचारावर होणारा खर्च असो. सहाजिकच त्या व्यवहारात राजकीय पक्षांना सूट असली, तरी ते साहित्य वा सेवा पुरवणार्‍यांना मोबदला दिला जातो, ते संबंधितांसाठी उत्पन्न असते. त्यांनी मायावती वा अन्य कुठल्या पक्षाकडून आलेल्या पैशाच्या उत्पन्नावर आयकर देण्यातून सवलत नसते. खरी गडबड तिथेच आहे. मायावतींनी ती रक्कम म्हणूनच हाती येताच बॅन्केत भरलेली नाही आणि आता नोट रद्द झाल्यावर ती रक्कम वाचवण्यासाठीच त्याचा भरणा बॅन्केत केलेला आहे. हेच बाकीचेही लोक करतात, त्याला काळापैसा म्हटले जाते. आज कुठल्याही सामान्य माणसाने आपल्या खात्यात जाऊन काही लाख कोटी रुपये भरले, तर त्यालाही त्याचा जाब विचारला जाणार आहे. मग मायावतींना त्यात सूट कशी देता येईल?

आपल्याला ही रक्कम कधी व कुणाकडून मिळाली, ते मायावतींनी जाहिर करावे. पण गडबड झाल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकार व भाजपावर आरोप केले. मात्र रक्कम कुठून व कधी आली, त्याविषयी चकार शब्द बोललेला नाही. ही लबाडी आहे. खुलासा त्याच गोष्टीचा आवश्यक आहे. साधारण वीस हजारपेक्षा कमी देणगी असेल, तर त्याचा खुलासा राजकीय पक्षांकडे मागितला जात नाही. मायावतींचे म्हणणे सोपे आहे. पक्षाने देणगीसाठी कुपने छापली वा पावत्या फ़ाडून रक्कम गोळा केलेली आहे. तर अशा पावत्या व कुपनांचा हिशोब त्यांना दाखवता येईल. पण तेही होणार नाही. भाजपासह कुठलाही पक्ष असे बोलत असतो, पण प्रत्यक्षात अशी रक्कम मोठ्या व्यवहार वा व्यापारातून वळवलेली असते. मग ती कुपने वा पावत्या फ़ाडल्याच्या नावाखाली हिशोबात दाखवली जात असते. मायावती तिथेच गोत्यात आलेल्या आहेत. किंबहूना नोटाबंदीचा तोच तर मोठा सापळा आहे. कारण सरकारने अशाच मोठ्या माशांना गळाला लावण्यासाठी इतका मोठा उपदव्याप केलेला आहे. ज्या व्यवहाराला बेहिशोबी म्हणतात, त्यालाच आळा घालण्यासाठी सामान्य जनतेलाही त्रास सोसण्याची पाळी मोदींनी आणलेली आहे. कोण काळापैसावाले बॅन्केच्या दारात रांगेत उभे आहेत, ते दाखवा; असा प्रश्न विचारण्यात मायावतीही आघाडीवर होत्या. पण त्याचे उत्तर त्यांचेच खाते देत नाही काय? त्यांच्याच पक्षाने कुठल्याही रांगेत उभे न रहाता, इतकी मोठी रक्कम खात्यात जमा केलेली आहे. शिवाय त्यांनी बदल्यात नव्या नोटा घेण्याची घाई अजिबात केलेली नाही. उलट गरीबाला दोनचार नोटा नुसत्या खात्यात भरून भागत नाही. त्या कपाटात वा खात्यात पडून त्याची चुल पेटत नसते. म्हणूनच त्याला रांगेत उभे रहावे लागले. जे कोट्यवधी रुपयांच्या नोटा दडपून ठेवतात, त्यांच्यासाठी सामान्य माणसाला रांगेत ताटकळावे लागले आहे.

मायावती किंवा त्यांच्यासारखे कोट्यवधीचे व्यवहार फ़क्त रोखीत व नोटांमध्ये करणार्‍यांनी प्रत्येक मोठा व्यवहार बॅन्केमार्फ़त केला असता, तर अशा लपवलेल्या वा झाकून दडपून ठेवलेलल्या नोटा बाहेर काढण्यासाठी बॅन्केतच भरण्याची सक्ती करावी लागली नसती. ती सक्ती करावी लागली नसती, तर सामान्य लोकांनाही घरात संसारासाठी खर्चाव्या लागणार्‍या दोनचार मोठ्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत येऊन उभे रहावे लागले नसते. आरोपी सरकार नसून कोट्यवधी रुपयांच्या नोटा गुदामात भरून छुपे व्यवहार करणारे आरोपी आहेत. ज्यांना बिळातून बाहेर काढण्यासाठी सरकारला सामान्य जनतेला ओलिस ठेवल्यासारखी नोटाबंदी करावी लागली. मायावतींनी किंवा त्याच्यासारख्यांनी वेळच्या वेळी अशा मोठ्या रकमा बॅन्केत भरल्या काढल्या असत्या,; तर नोटाबंदी लावण्याची वेळ कशाला आली असती? आज गरीबच बॅन्केच्या दारात उभा नाही. काळापैसेवालाही झक्कत बॅन्केत आलेला आहे. त्याची साक्ष खुद्द मायावतींनीच १०७ कोटी रुपयांच्या नोटा जमा करून दिलेली नाही काय? पण गंमत बघा, त्याच मायावती सरकारला विचारतात, कोण काळापैसावाला रांगेत उभा आहे, ते दाखवा! देशाच्या कानाकोपर्‍यात विविध बॅन्कांच्या शाखांवर कंपन्यांवर धाडी पडत आहे. तितक्या मोठ्या संख्येने कधी धाडी पडल्या होत्या काय? गुजरातचा कोणी भजियावाला दोनशे कोटी रुपयांच्या नोटा बदलून घेतो, त्याचे लक्ष्मीदर्शन भारतीयांना अन्य कुठल्या मार्गाने झाले असते? आज बॅन्कांमध्ये जी ‘माया’ जमा होते आहे, त्यातली काळी माया कोणती आणि कष्टाची कमाई कुठली; त्याचा खुलासा लौकरच होईल. थोडासा खुलासा युनियन बॅन्केच्या एका खात्यातून झाला, तर मायावती इतक्या विचलीत झाल्या आहेत. जेव्हा गेल्या पन्नास दिवसातील बॅन्कभरणा तपासून सविस्तर खुलासा होईल, तेव्हा कोणाकोणाचा ‘माया’बाजार चव्हाट्यावर येईल?

1 comment:

  1. हाहाहा, अशेच बडे बडे मासे गळाला लागणार आहेत येत्या काही दिवसात...मस्त लेख भाऊ...

    ReplyDelete