Thursday, December 1, 2016

राहुलच्या खात्यात घरफ़ोडी

rahul tweeter के लिए चित्र परिणाम

राहुल गांधी हे तरूण पिढीचे नेते मानले जातात. निदान कॉग्रेसच्या निष्ठावंतांचा तसा दावा आहे. पण एकविसाव्या शतकातला भारतीय तरूण ज्या आधुनिक युगाला गवसणी घालतो आहे, त्याची साधी तोंडओळखही करून घेण्य़ाची राहुलना कधी गरज वाटली नाही. २००८ सालात अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या बराक ओबामा यांनी आपल्या महत्वाकांक्षी प्रचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा व साधनांचा मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कुशलतेने वापर केला होता. त्याच दरम्यान भारतामध्ये आपली राजकीय छाप निर्माण करणार्‍या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्या माध्यमांचा वापर सुरू केला होता. त्यातूनच मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले. पण त्यांच्यानंतरच्या पिढीतले व तुलनेने तरूण असलेल्या राहुल गांधींना, कधी त्या तंत्राकडे वळण्याची इच्छाही झाली नाही. सोशल माध्यमातून मोदींचे प्रस्थ वाढतच गेल्यावर राहुल गांधींनी या माध्यमांची दखल घेतली. लोकसभेत कॉग्रेसला पुरती पराभूत केल्यावर राहुलनी या माध्यमाचा आश्रय घेतला. पण त्याचा उपयोग करण्याची चतुराई वा कला मात्र त्यांना आत्मसात करता आली नाही. म्हणूनच त्यांच्याहून दुय्यम मानल्या जाणार्‍यांच्या ट्वीटर विधानांची जितकी दखल घेतली गेली, तितकेच राहुलचे ट्वीटर खाते दुर्लक्षित राहिले. आज प्रथमच राहुलच्या ट्वीटरची दखल घेतली गेली आहे आणि त्याचे कारण त्यात कोणीतरी बेकायदा घुसखोरी केलेली आहे. प्रत्येक सोशल माध्यमाच्या खात्याचा स्वत:चा पासवर्ड असतो. ती किल्ली लावल्याखेरीज खाते उघडत नाही, की त्यात हेराफ़ेरी करता येत नाही. पण तिथेही ‘घरफ़ोडी’ करणारे डाकू तयार झाले असून, अनेकांची सोशल माध्यमातील खाती फ़ोडली जातात. त्यातून धमाल उडवून दिली जात असते. तसेच कोणीतरी राहुलचे खाते फ़ोडले आणि त्याची बातमी झाली. ही राहुलच्या आधुनिकतेची शोकांतिका आहे.

मोदीच नव्हेतर नवनिर्वाचित अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यापासून सुब्रमण्यम स्वामी इत्यादींपर्यंत, लोकांनी ट्वीटरवर काय मतप्रदर्शन केले आहे, त्याच्या बातम्या होत असतात. पण राहुल गांधी ट्वीटरवर काय म्हणतात, त्याची जवळपास कधीच मोठी बातमी झाली नाही. गाजावाजा होतोय तो खात्यात घरफ़ोडी झाल्याचा. ह्यात काही नवे नाही. अमेरिकन सुरक्षा विभागाच्या अनेक खात्यामध्ये फ़ोडाफ़ोडी होऊन गोपनीय माहिती उघड केली गेली आहे. कॉग्रेसचे मंत्री असताना शशी थरूर यांच्या ट्वीटर खात्यातही अशीच हेराफ़ेरी झाल्याची तक्रार त्यांनी केलेली होती. ती बाब अधिक महत्वाची होती. कारण थरूर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते आणि त्यांच्यावर पाक हेरखात्यामार्फ़त जाळे फ़ेकण्याचा प्रयास एका महिला पत्रकाराकडून झाल्याची तक्रार पत्नीनेच केलेली होती. सुनंदा पुष्करच्या दाव्यानुसार मेहर तर्रार नावाची पाक पत्रकार महिला, थरूर यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे नाटक करीत होती. त्यासाठी या थरूर पत्नीने पतीच्या ट्वीटर खात्यातील काही संदेशांचा हवाला दिलेला होता. आपण लौकरच त्याविषयी खळबळजनक खुलासा करू असेही पुष्कर यांनी उघडपणे सांगितले होते आणि त्यानंतर सुनंदाची संशयास्पदरित्या हत्या झालेली होती. त्यात ट्वीटर खात्याची घरफ़ोडी, हा एक महत्वाचा दुवा होता. कारण मेहर तर्रार संबंधातील ट्वीटरवरचे संदेश आपले नाहीत, कोणी घरफ़ोडी करून तसे संदेश आपल्या ट्वीटर खात्यावर टाकल्याचा दावा थरूर यांनी तेव्हा केलेला होता. पण इतक्या मोठ्या प्रकरणाचा संबंध असतानाही कॉग्रेसच्या नेतृत्वाने वा प्रवक्त्याने कधी थरूर खात्याच्या घरफ़ोडीला राजकीय कारस्थान ठरवण्यापर्यंत मजल मारलेली नव्ह्ती. आज तेच एकामागून एक कॉग्रेसवाले, राहुलच्या खात्यातील घरफ़ोडीला राजकीय कारस्थान ठरवण्यासाठी आपल्या अकलेची बाजी लावत आहेत.

पहिली गोष्ट अशी, की राहुलच्या खात्यात हेराफ़ेरी करावी असे काहीही महत्वाचे नाही. त्याची दखलच कोणी घेत नसेल, तर त्यात घोटाळा करून काहीही साध्य केले जाऊ शकत नाही. पण विनाविलंब त्यामागे राजकीय कारस्थान असल्याचा कॉग्रेसकडून झालेला आरोप शंकास्पद आहे. असा आरोप करण्यासाठीच कॉग्रेसच्या वतीनेच कोणी हे हेराफ़ेरी केलेली असावी काय? म्हणजे सर्वात निरूपयोगी खात्यामध्ये घरफ़ोडी करायची आणि आपल्या विरोधकावर बालंट आणायचे, अशी काही योजना त्यात असावी काय? तसा संशय घेण्यालाही सबळ कारण आहे. बुधवारी तशी गफ़लत झाल्याची पहिली बातमी आली. असे काही झाल्यावर सर्वप्रथम पोलिसांना तक्रार देऊन तपास सुरू करायचा असतो. त्यात अधिक गफ़लत करण्याची संधी घरफ़ोडी करणार्‍याला नाकारायची असते. पण कॉग्रेस वा राहुलच्या माध्यमातून पोलिसांकडे कोणीही धाव घेतली नाही. त्यापेक्षा मोठ्या माध्यमातून याची खळबळजनक बातमी कशी होईल, त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. खात्यात फ़ोडाफ़ोडी झाल्याचा पुरेसा गाजावाजा होताच, मग त्यामागे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप सुरू झाला. पण पोलिसांच्या तपासासाठी धाव घेण्यात आळशीपणा दाखवला गेला. याचा अर्थ आरोपासाठीच असे काही मुद्दाम करवून घेण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी केव्हातरी असे घडल्याच्या बातम्या सुरू झाल्या आणि गुरूवारी दुपारच्या सुमारास तशी तक्रार पोलिसांना देण्यात आली. म्हणजे तपासाला विलंब व्हावा, ही मुळात कॉग्रेसनेच काळजी घेतली. त्यातच दुष्ट हेतू दिसतो. अर्थात तितकाच एकमेव हेतू दिसत नाही. यानिमीत्ताने डिजीटल व्यवहारावर प्रश्नचिन्ह लावण्यापर्यंतही कॉग्रेसने मजल मारलेली आहे. राहुलच्या ट्वीटर खात्याच्या फ़ोडाफ़ोडीपेक्षा डिजीटल सुरक्षा अशक्य असल्याचा मुद्दा पुढे आणण्यासाठी हे नाटक रंगवले गेले आहे काय?

गुरूवारी दुपारनंतर तपास सुरू झाला आणि प्राथमिक बातमी आली, त्यात राहुलच्या खात्यामध्ये फ़ोडाफ़ोडीची शक्यता कमीच असल्याचा प्रारंभिक अंदाज समोर आला. बहुधा राहुलच्या कार्यालयात वा कॉग्रेसच्याच माहिती तंत्रज्ञान विभागातील कुणीतरी ही उचापत केलेली असू शकते, असा तपासातला अंदाज अतिशय गंभीर बाब आहे. जर यातले पुरावे धागेदोरे कॉग्रेसच्याच गोटापर्यंत जाऊन पोहोचणारे असतील, तर या शतायुषी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरेच जगाच्या वेशीवर टांगली जातील. कारण हे कारस्थान अन्य कुणाचे नसून मोदी सरकारला व भाजपाला बदनाम करण्यासाठी कॉग्रेसच्याच कोणीतरी केलेले कारस्थान सिद्ध होऊ शकेल. याचे कारण सायबर गुन्हे करणार्‍यांच्या पाऊलखुणा लपवता वा झाकता येण्याइतक्या सोप्या नसतात. त्यात कुठून त्या खात्यात घुसखोरी केली, त्या संगणकापासून त्याला इंटरनेट सेवा कोण पुरवतो, इतक्या सर्वांच्या पाऊलखुणा ठळकपणे नोंदल्या जात असतात. याही प्रकरणात खरेच कोणी राहुलचा निकटवर्ति वा कॉग्रेसमधला कोणी गुंतला असेल, तर त्याला तोंड लपवणे अशक्य आहे. कारण हे धागेदोरे त्याने वापरलेल्या संगणकापर्यंत जाऊन भिडणारे आहेत. तो गायब करण्यात आला तरी त्याच संगणकामार्फ़त जुने कुठे संपर्क साधले गेले, त्यातून त्याचा माग काढला जाऊ शकतो. म्हणूनच हे कारस्थान कुणाचे त्यावर प्रकाश पडण्याची गरज आहे. भाजपा वा मोदी सरकारचे ते पाप असले तर तेही चव्हाट्यावर यायला हरकत नाही. पण जो नेता आपल्याच पक्षाला खड्ड्यात घालण्यासाठी अखंड राबतो आहे, त्याला सहानुभूतीचा धनी करण्याची चुक भाजपा वा मोदी सरकार करण्याची शक्यता दुर्मिळ आहे. गेल्या काही महिन्यातील राहुलची वक्तव्ये आणि त्याच्यामागून फ़रफ़टलेली कॉग्रेस बघितली, तर यातून तोच पक्ष व राहुल गोत्यात येण्य़ाची शक्यता अधिक आहे.

1 comment:

  1. Bhau sir - There is one reference in the above article which needs correction. Shashi tharoor's BlackBerry messages were posted by Sunanda Pushkar. And she was to revel more about those messages. The article mentions 'twitter messages' of Shashi tharoor, this is incorrect reference.Regards -Jitendra Vaidya

    ReplyDelete