Tuesday, December 6, 2016

राष्ट्रभावना आणि राष्ट्रगीत

Image result for national anthem in paris

प्रत्येक चित्रपटगृहात आणि प्रत्येक चित्रपटाच्या खेळाला राष्ट्रगीत वाजवणे सक्तीचे असल्याचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. अशा कृती वा सक्तीतून लोकसंख्येमध्ये राष्ट्रप्रेम वा राष्ट्रवाद जागवला जाऊ शकतो काय? हा प्रश्न आजचा नाही. गेली कित्येक वर्षे कुठल्या ना कुठल्या निमीत्ताने हा विषय पटलावर येत राहिला आहे. त्याच्या बाजूचे व विरोधातलेही युक्तीवाद खुप झालेले आहेत. पण एका निर्णयाने वाद सुरू झाला तरी त्याच्या इतर संदर्भाचा विचार होत नाही. ज्या न्यायालयाने असा निर्णय दिला, त्यानेच कोर्टातही राष्ट्रगीताची सक्ती व्हावी, हा आग्रह फ़ेटाळून लावण्यात आला आहे. त्याला अतिरेक मानावे लागेल, किंवा तिथपर्यंत हा विषय ताणू नये, असेही कोर्टाने म्हटलेले आहे. खरे तर असले विषय कायदा व कोर्टाच्या कक्षेत घेऊन जाण्याची गरज नसते. पण ते होतच असते, कारण कुठली तरी एक बाजू त्यासाठी आग्रही असते. ‘भला उसकी कमीज मेरी कमीजसे सफ़ेद कैसे?’ या जाहिरातीची मग आठवण होते. आपण अधिक सोवळे वा पवित्र असल्या कल्पनांनी माणसाला पछाडले, मग यासारखे आग्रह सुरू होतात आणि त्याचे विरोधकही त्याच भावनेतून कडवा विरोध करायला पुढे सरसावलेले असतात. त्यातला कोणीही पराकोटीचा देशभक्त नसतो की हमखास राष्ट्रद्रोही नसतो. आपापले अहंकार सिद्ध करण्याची ती पराकोटी असते. त्यातून असे वाद उफ़ाळतात आणि न्यायालयापर्यंत जात असतात. अलिकडे तर राष्ट्र ही ठराविक गटांची मक्तेदारी होऊ लागलेली आहे. कोणाला देशाच्या कुठल्या कोपर्‍यात बलात्कार झाला तर राष्ट्राची अब्रु गेल्यासारखे भासू लागते. पण अशीच माणसे तितक्याचा आग्रहाने देश टूकडे होण्याची भाषा बोलली गेल्यावर समर्थनालाही उभे होत असतात. यातून मग राष्ट्र म्हणजे नेमके काय, असाही प्रश्न सामान्य माणसाला पडत असतो.
सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात राष्ट्र म्हणजे काय, ते प्रत्येकजण ठरवू लागला किंवा दुसर्‍यावर लादू लागला, मग अराजक व्हायचेच. वास्तवात लोकसंख्येमध्ये अशी एक संयुक्त भावना जागी होते, तेच राष्ट्र असते. ती भावना अमूर्त असते आणि त्याचा देशाच्या भूगोलाशीही संबंध नसतो. उन्नीकृष्णन नावाचा एक कमांडो मुंबईत कसाब टोळीला रोखताना शहीद होतो, त्याच्याविषयी जी आपुलकीची भावना असते, ती तशीच्या तशी मुंबई पोलिसांतले तुकाराम ओंबाळे शहीद झाल्यावरही असते. त्या उन्नीकृष्णनचा पिता आपल्या पुत्राच्या हौतात्म्याने भारावून जातो, तेव्हा पुत्राचे बलिदान मराठी प्रांताच्या सुरक्षेसाठी होऊनही त्याला वाटलेला अभिमान राष्ट्र असते. ती भावना त्याच्याइतकीच मग काश्मिरात बलिदान करणार्‍या कुणा मराठी जवानाच्या कुटुंबात आढळते. ती संयुक्त भावना राष्ट्र असते. त्या जवानांनी आपले घरसंसार गाववस्ती सोडून बलिदान दिलेले असते. त्यातून ते ज्या भावनेला चालना देतात, ते राष्ट्र असते. अशा हुतात्म्यांविषयी जी आपुलकी कोट्यावधी भारतीयांच्या मनात जागते, त्याला राष्ट्रप्रेम वा राष्ट्रवाद म्हणता येईल. तो एक तिरंगा झेंडा वा त्याच्या फ़डकावण्यात उच्चारले जाणारे राष्ट्रगीत; त्या क्षणी अतिशय मोलाचे असते. कारण ते शब्द वा ती लय प्रत्येक नागरिकाला आपल्या सुरक्षेची हमी देत असते. समाजाशी जोडून घेत असते. राष्ट्रगीत कधी अमूक जागी वा अमूक वेळी म्हटल्याने त्याची महत्ता वाढत नाही वा त्यातून राष्ट्रभावना उदयास येत नाही. कसोटीच्या प्रसंगी जे बोल व सूर आठवतात, ते राष्ट्रगीत असते. एखादा क्षण असा येतो की तेवढेच शब्द बोल आठवतात. त्याची कोणी सक्ती केलेली नसते, की आग्रह धरलेला नसतो. आपोआप ते शब्द तुमच्या ओठातून बाहेर पडू लागतात आणि त्याचा सामुहिक सूर गगनाला जाऊन भिडत असतो. ते राष्ट्रगीत असते.
एक वर्षापुर्वी एके संध्याकाळी फ़्रान्सची राजधानी पॅरीस येथे घातपाती हल्ला झालेला होता. अनेक जागी एकाच वेळी स्फ़ोट होऊन कित्येकांचा बळी पडला होता. एका स्टेडियममध्ये फ़ुटबॉलचा सामना सुरू होता, तिथेही अशीच घटना घडली आणि सामना सोडून प्रेक्षकांना बाहेर पडावे लागलेले होते. कदाचित त्या घाईगर्दीत अनेक लोक चिरडूनही मारले गेले असते. पण अशावेळी आपण एक समाज व एक राष्ट्र आहोत, ही धारणाच लोकांना वाचवू शकली होती. आपण फ़्रेंच आहोत आणि आपण एका देशाचे नागरिक आहोत. आपणच आपल्या जीवावर उठून एकमेकांचा बळी घेता कामा नये, इतकी शिस्त याक्षणी दाखवली पाहिजे, हे त्यांना तिथे कोणी ओरडून सांगितले नव्हते. स्टेडियममधून बाहेर पडणार्‍या जमावातील कोणा एकाने खड्या आवाजात फ़्रान्सचे राष्ट्रगीत गायला सुरूवात केली आणि बघता बघता संपुर्ण जमावच राष्ट्रगीत गावू लागला. काही क्षणात त्या स्टेडियमला भेदून जाणारा राष्ट्रगीताचा आवाज सर्व आसमंतात दुमदुमू लागला. कुठल्याही पळापळीशिवाय हजारो लोक सुरक्षित तिथून बाहेर पडू शकले. ती कसोटीची वेळ होती आणि फ़्रेंच नागरिकांनी राष्ट्रगीत केव्हा अपरिहार्य असते व त्याची महत्ता किती असते; त्याची त्यातूनच साक्ष दिलेली आहे. पोलिस वा सरकार गडबडले असताना, ज्या शब्दांनी व सूरांनी त्या अफ़ाट जमावाला सुरक्षित होण्याची प्रेरणा दिली, त्याला राष्ट्रगीत म्हणतात. ती जागा वा ती वेळ राष्ट्रगीत गाण्याचीही नव्हती. अशा प्रसंगी राष्ट्रगीत म्हणावे, असेही त्यांना कोणी शिकवलेले नव्हते. पण त्या कसोटीच्या प्रसंगी ते शब्द राष्ट्रभावना होऊन मदतीला धावून आले. ही असते राष्ट्रगीताची महत्ता! त्यासाठी कोणी शांत स्थीर उभा नव्हता, की कोणी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ निश्चल थांबलेला नव्हता. जमाव सरकत होता आणि राष्ट्रगीत एकसुराने दुमदुमत होते.
कुठल्या कायद्याने वा आदेशाने, व्याख्येने राष्ट्रगीताची ही महत्ता कोणाला सांगितलेली नाही. कोणाला त्यासाठी सक्ती करावी लागलेली नाही. तो जनतेचा उत्स्फ़ुर्त उदगार होता. अंतर्मनातून आपोआप बाहेर पडलेला होता. त्यांना कोणी राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त म्हणून पदव्या पदके दिली नाहीत. किंबहूना त्यानंतर त्या एकसुरात गायल्या गेलेल्या सामुहिक राष्ट्रगीताची कुठे फ़ारशी चर्चाही झालेली नव्हती. समाज, राष्ट्र या संकल्पना अशा संकटप्रसंगी आधार देत असतात. म्हणुन माणसाला राष्ट्र गरजेचे वाटत असते. त्या राष्ट्राची प्रतिके निर्माण होत असतात. प्रतिकांच्या आधारे राष्ट्र ही संकल्पना तिथल्या लोकसंख्येत रुजवली जोपासली जात असते. फ़्रान्समध्ये असे कुठले राष्टगीत नसते आणि ते जमावातल्या प्रत्येकाला ठाऊकच नसते, तर त्या आपत्तीप्रसंगी ते शब्द कोणाला आठवले नसते. ते शब्द सामुहिक होऊन दुमदुमले नसते. इतक्या अफ़ाट जमावाला एकत्रित दुसरे काही बांधून ठेवू शकले नसते, की एकसारखा विचार करून एकजीव होऊन लोक सुरक्षित बाहेर पडू शकले नसते. त्यांना धीर देण्याचे व आततायी वर्तन करण्यापासून रोखण्याचे निर्णायक काम त्यातून झाले. अशा महान शब्दरचनेला, प्रेरणेला राष्ट्रगीत म्हणतात. त्याचे भान ज्यांना नाही, अशा लोकांना आपल्या खेळातला सोंगटी म्हणून राष्ट्रगीत वापरायचे असते. ते एका गीताबद्दल वा शब्दरचनेविषयी बोलत असतात. कायद्याने त्या रचनेला राष्ट्रगीताचा दर्जा दिलेला असतो. पण असे वाद रंगतात, तेव्हा त्यातले राष्ट्र कधीच लयाला गेलेले असते आणि नुसत्या गीतासाठी हमरातुमरी सुरू झालेली असते. आज चाललेला वाद किंवा त्यातले युक्तीवाद, त्यापेक्षा वेगळे नाहीत. मग त्यातले आग्रही असोत किंवा विरोधक असोत. त्यांना राष्ट्राशी, राष्ट्रभक्तीशी वा राष्ट्रभावनेशी काडीमात्र कर्तव्य नसते. त्यांच्यापासून राष्ट्र ही संकल्पना मैलोगणती दुर असते.

3 comments:

 1. सुरेश देऊसकरDecember 7, 2016 at 6:59 AM

  ऱाष्ट्रगीत, राष्ट्रप्रेम वगैरे प्रत्येकाच्या ठायी असायलाच हवे.
  आजच्या संदर्भात मात्र त्याला विरोध होतो.
  कारणांचा विचार आपण केलाच पाहिजे.प्रत्येक गोष्ट राष्ट्रभावनेशी जोडली जाते.
  प्रत्येक राष्ट्राची सांस्कृतीक बांधणी वेगळी असते.

  ReplyDelete
 2. हमारा इंन्सानी जीव के तौर पर जन्म होना और मानवी मूल्यों के साथ जीते हुए सामािजक परिवार को साथ लेकर िवकास करना इससे ज्यादा महत्त्वपूर्ण कुच्छ भी नही।

  पर अलग अलग राष्ट्र िनर्माण कर सभी को भावनात्मक बनाकर राष्ट्रवाद िनर्माण िकया गया।
  भावनात्मक बनने की वजह से हमारी इंसानी जीव के तौर पर नैितक मूल्यों के साथ जीने की सोच भी खत्म होती जा रही, क्योंिक इंन्सान राष्ट्र, धर्म के नाम पर भावनात्मक होकर इन मूल्यों के साथ जीना भुलता जा रहा है। इंसान को हर हाल में यह ध्यान में रखना चाहिए कि वो इंसान पहले है।
  वो इंन्सानी जीव होने के सत्य को भुला कर सफलता तो पा सकता है मगर वो सफलता अस्थायी ही होगी।
  इसलिए राष्ट्रवाद से डरना नही है बल्कि इसका इस्तेमाल होने से बचना है । इंन्सानी जीव होने के सत्य तथा मानवी मूल्यो के खो रहे िवचारों को आगे बढाना है

  ReplyDelete