Friday, December 2, 2016

नरेंद्र मोदींचा मार्क्सवादयाच आठवड्यात एका इंग्रजी वाहिनीचा कार्यकारी संपादक थेट वाराणशीला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तो मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथल्या लोकांचे हाल व त्यांच्या प्रतिक्रीया दाखवणे त्याला अगत्याचे वाटले होते. तिथल्या दुकानदारापासून सामान्य रोजंदारी करणार्‍यापर्यंत आणि सामान्य गृहिणीपर्यंत, अनेकांच्या त्याने नोटाबंदीवर मुलाखती घेतल्या. लोकांनी खवळून मोदींना निवडण्य़ाचीच चुक केली अशी संतप्त प्रतिक्रीया द्यावी, ही त्याची अपेक्षा असावी. पण मोठ्या प्रमाणात त्याची निराशा झाली. कारण आपल्या गैरसोयीबद्दल लोक बोलत होते. पण नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे कोणीही मान्य करत नव्हता. त्याच्याही पुढे जाऊन अनेकांनी त्यातून होणारा त्रास सहन करण्यात आपले भले असल्याचा निर्वाळा त्याला दिला. त्यामध्येच गंगेत नौका चालवून गुजराण करणारा एकजण होता. रोज अडीच तीन हजार रुपये कमावणारा हा माणूस जे काही बोलला, ते थक्क करणारे वक्तव्य होते. त्याचा धंदा किमान ६०-७० टक्के घटला होता. कारण लोकांच्या हाती चलन नसल्याने पर्यटक वा ग्राहक कमी येत आहेत आणि त्याचा त्याच्या कमाईवर विपरीत परिणाम झालेला होता. आपल्या नुकसानाविषयी त्याला दु:ख होते. पण त्यापेक्षा त्याचा चमत्कारीक आनंद मात्र सदरहू संपादकाच्या लक्षात येऊ शकला नाही. खरे सांगायचे, तर तो कार्यक्रम बघताना, मलाही त्या नौकावाल्याचा आनंद कशात आहे, त्याचा उलगडा होत नव्हता. कारण त्याचे उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाले, तर त्याने राग व्यक्त करायला हवा होता. काळेपैसेवाल्यांच्या पापाची फ़ळे आम्ही कशाला भोगावी, असेच विचारायला हवे होते. उद्या काही भले होणार म्हणून आज आमच्या तोंडचा घास कशाला काढून घेता, असा प्रतिसवाल पंतप्रधानाला विचारला तर गैरलागू झाले नसते. पण तो खुश कशासाठी होता?

या संपादकाला त्याने आपले नुकसान होत असताना झालेला आनंद कुठला ते स्पष्टपणे सांगितले. पण माझ्यासह त्या संपादकाला त्याचा आशय समजू शकला नाही,. आपले नुकसान आहे आणि गरीबाचे कधी नुकसान होत नसते? सामान्य गरीबाला नेहमीच हालात दिवस कंठावे लागतात. त्यात आणखी चार दिवसांची भर पडली म्हणून त्याचे आयुष्य उध्वस्त होत नाही. पण याच एका निर्णयाने मुजोर श्रीमंत व काळापैसावाल्यांना गरीबांच्या रांगेत आणून बसवले, असे त्याला वाटत होते. नेमके शब्द सांगायचे तर तो नौकावाला म्हणाला, ‘हम तो वैसेही भिकारी है, लेकीन प्रधानमंत्रीने जो मस्तीवाले पैसेवाले है, उनको भी हमारे जैसा भिकारी बना दिया. इसकी बडी खुशी है.’ दुसर्‍याच्या दुखण्यात आनंद शोधण्याला विकृती समजणारा मीही, त्या उत्तराने चकीत झालो होतो. आपले काय होणार याची त्याला फ़िकीर नव्हती. पण माज आलेल्या श्रीमंतांनाही काही दिवस पळापळ करायची वेळ आली, म्हणून तो खुश होता. शिवाय आपले उत्पन्न आज कमी असेल, उद्या पुन्हा पैसा खेळू लागल्यावर कमाई होऊ लागेलच. कदाचित वाढेल, अशी त्याला आशा होती. पण दुसरी बाजू अधिक मोलाची होती. बॅन्केतले आपलेच पैसे काढता येत नाहीत, ही लोकांची अडचण आहे. पण ते पैसे बुडणार नाहीत, याची सामान्य माणसाला खात्री आहे. मात्र ज्यांच्यापाशी कष्टाची कमाई नाही, चोरीचा पैसा आह; तो एका रात्रीत बुडीत झाला आहे. त्यांची ही काळी कमाई रातोरात बुडाली आहे. त्यांच्या त्या खोट्या कमाईला पंतप्रधान मातीमोल करीत असल्याचा आनंद त्याच्यासारख्यांना झालेला आहे. त्यासाठी जो त्रास होईल तो उपसण्याची त्याला पर्वा नाही. साध्या राजकीय परिभाषेतला अर्थ मलाही तेव्हा उमजला नाही आणि जसा हा विषय डोक्यात धुमसत राहिला, तसा त्याचा उलगडा होत गेला. तो नौकावाला गरीब चक्क मार्क्सवाद सांगत नव्हता काय?

कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान वा उक्ती सतत सांगणार्‍या अनेक शहाण्यांना नोटाबंदीतला तो मार्क्सवाद उमजला नाही, तो वाराणशीच्या त्या नौकावाल्या कष्टकर्‍याला कसा समजू शकला, याचे मला आजही नवल वाटते आहे. त्याच्यासारख्या कोट्यवधी गरीबांना नोटाबंदीने हैराण करून सोडलेले आहे. पण त्यांची किमान असलेली कमाई कष्टाची आहे आणि त्यातला प्रत्येक पैसा त्यांना मोजून मिळणार आहे. त्यातला एकही पैसा बुडणार नाही. भले आज बॅन्केत बंदिस्त होणारा तो पैसा, त्याला वापरता येत नाही वा हातही लावता येत नाही. पण तो सुखरूप आहे. तो पैसा सरकार जप्त करणार नाही. पण ज्यांचा पैसा काळा म्हणजे बेहिशोबी वा चोरीचा आहे, त्यांनी तो पैसा त्या एका रात्रीत, एका निर्णयाने गमावला आहे. त्याचा अर्थ असा, की गरीबाला त्याच्या कमाईतून काहीही गमावण्याची वेळ आलेली नाही. पण ज्या काळ्यापैशाच्या गुलामीत गेली कित्येक वर्षे हा सामान्य माणूस घुसमटला आहे; त्यापासून या एका निर्णयाने त्याला मुक्त केले आहे. हेच दोनशे वर्षापुर्वी काल्रमार्क्स या विचारवंताने सांगितलेले नाही काय? ‘जगातल्या कष्टकर्‍यांनो एकत्र व्हा! तुमच्यापाशी गुलामीचे साखळदंड वगळता गमावण्यासारखे काहीच नाही.’ हे कुणाचे ऐतिहसिक विधान आहे? नोटाबंदीने कुणाला काय गमावण्याची वेळ आणली आहे? सामान्य गरीबाच्या पाचपन्नास हजारावर कुठलीही गदा आलेली नाही. त्यातला एकही पैसा गमावला जाणार नाही. पण काळ्यापैशाच्या बळावर तमाम समाजाला वेठीस धरणार्‍या मुजोर श्रीमंतांचे धाबे दणाणले आहे. कारण त्यांचा असा सगळा पैसाच गमावण्याची वेळ नोटाबंदीने आणलेली आहे. हे कार्ल मार्क्सचे शब्द खरे होताना, तो नौकावाला किंवा बॅन्केच्या दारात ताटकळत उभा असलेला सामान्य गरीब समजू शकला आहे. पण कार्ल मार्क्सच्या पोथीचे आयुष्यभर पठण करणार्‍यांना त्याचा उलगडा अजून झालेला नाही.

किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले आणि त्यांनी कुठल्या अभ्यासवर्गात कधी मार्क्स ऐकला नाही. बहुधा कधीच मार्क्सच्या तत्वज्ञानाचा अभ्यासही केलेला नसेल. पण एका फ़टक्यात त्यांनी मार्क्सच्या शब्दांना पुरक ठरेल असा एक निर्णय घेऊन त्यातून देशातल्या कोट्यवधी लोकांना त्याच महान तत्ववेत्त्याच्या ऐतिहासिक विधानाची प्रचिती घडवली आहे. त्यातून हाती काहीही अजून लागलेले नसताना, सामान्य गरीबाला त्याच विधानातला आशय उमजला आहे. पण आमच्यासारख्या तत्वज्ञान व विचारसरणीचा अभ्यास करणार्‍यांना, त्याच कृतीतला मार्क्स बघताही आलेला नाही. माझीच गोष्ट कशाला? मी निव्वळ पत्रकार आहे. ज्यांनी आपली हयात मार्क्सची वचने सांगण्यात खर्ची घातली, अशा साम्यवादी मार्क्सवादी कम्युनिस्टांनाही नोटाबंदीतला मार्क्स अजून गवसलेला नाही. त्यातून साकार होणारे मार्क्सचे वचन हुडकता आलेले नाही. पण त्या सामान्य नौकावाल्याला किंवा देशभरातल्या कोट्यवधी गरीबांना अनुभवातून मारर्क्सच्या त्या ऐतिहासिक वचनाची प्रचिती आलेली आहे. कारण त्यांनी काहीही गमावलेले नाही, गमावण्यासारखे त्यांच्यापाशी कधीच काही नव्हते. पण ही अशी कृती आहे, की त्यांची कमाई सुरक्षित आहे. गरीबाने काय गमावले? त्याच्या जगण्यावर जी काळ्यापैशाची व खोट्या श्रीमंतीची गुलामी लादली गेली होती, त्या बेड्यांमधून गरीबाची मुक्तता झालेली आहे. मात्र दुर्दैव असे, की आयुष्यभर मार्क्स घोकलेल्यांना त्याचा आशय अजून उमजलेला नाही. उलट ज्यांना मार्क्स ठाऊकही नाही, अशा सामान्य गरीबाला अनुभवातून मार्क्स उमजला आहे. ज्याने मार्क्सची भक्ती केली नाही, त्या मोदींनी तो मार्क्स शब्दश: खरा करून दाखवला आहे.

8 comments:

 1. Sorry sir.no mark.Thare are somany karl marks in Indai,

  ReplyDelete
 2. सुंदर भाऊ मस्तच

  ReplyDelete
 3. Bhau aaj gava kade shrimat mitrana boltana hach vichar manat ala.
  ha tar samywad.....
  far ch chhan vivechan....


  Aniket Devde
  Hyderabad

  ReplyDelete
 4. There is one discrepancy here, the example you are giving is of a person earning 2,500 to 3000 rs daily, thats almost 75000 to 90000 rs monthly salary. He cannot be a poor person.

  ReplyDelete
  Replies
  1. वरील लेखात मला कसे दिसले नाहीत हे आकडे?

   Delete
  2. शब्दात लिहिले आहे, कदाचित भाऊंना 2 ते 3 हजार आठवड्याला म्हणायचे असेल, कारण दिवसाला 2 ते 3 हजार कमावणारा नक्कीच गरीब नाही , बाकी लेख मस्त

   Delete
 5. पोथी पढि पढि जग मुआ
  पंडित भया न कोई।
  ढाई अक्षर प्रेमका
  पढे सो पंडित होय।

  संत कबीर

  ReplyDelete
 6. भाऊ तुम्ही पहात असलेली परिस्थिती आणि मी पहात असलेली यात बरंच अंतर आहे .नोटाबंदी योग्यच असली तरी आमच्यासारख्यांची फरफट कुठवर होणार कोण जाणे .

  ReplyDelete