Tuesday, December 13, 2016

पक्षबुडवे लाडूसम्राट

Image result for delhi BJP laddu

मंगळवारी नोटाबंदीला पाच आठवडे पुर्ण झाले आणि त्याविषयी उलटसुलट प्रतिक्रीया उमटत आहेत. आता ह्या नोटाबंदी व नोटाबदलीची मुदत आणखी दोन आठवडेच उरलेली असून, वर्षाच्या अखेरीस जुन्या नोटा स्विकारणे बॅन्काही बंद होईल. एकूणच आरंभी जितका उत्साह लोकांमध्ये होता तितका आता उरलेला नाही आणि रोकड हातातून संपत असल्याने लोकांमधली बेचैनी वाढत चाललेली आहे. त्यामुळेच आपल्या पक्षीय भूमिकेचे समर्थन करणार्‍या भाजपावाल्यांना ती बेचैनी जाणवू लागली आहे. पण त्यापैकी कोणाला पक्ष धोरणाच्या विरोधात मतप्रदर्शन करणे शक्य नाही. त्याचवेळी सामान्य कार्यकर्ता वा स्थानिक नेता सतत लोकांमध्ये वावरत असतो. त्याला पक्षाच्या भूमिका लोकांमध्ये घेऊन जाण्याचीही जबाबदारी पार पाडावी लागत असते. सहाजिकच लोकांचा रोषही त्याच्याच अंगावर येऊन आदळत असतो. म्हणूनच पाच आठवडे उलटूनही पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याचे चटके पक्ष प्रवक्ते व नेत्यांना बसत नसले, तरी स्थानिक नेत्यांना सतावत असतात. त्याची प्रतिक्रीया म्हणून आता दिल्ली भाजपाने लोकांना लाडू वाटण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. दुसर्‍या आठवड्यात मुंबईच्या भाजपा नेत्यांनी रांगेत ताटकळणार्‍या लोकांना पाणी वा काही खाऊ वाटण्याचा प्रयत्न केला होता. अशा गोष्टी जे कार्यकर्ते हाती घेतात, त्यांना मुळात सरकारचे वा पक्षाचे धोरण कळलेले नसावे, किंवा लोकांची समस्याच समजलेली नसण्याची शक्यता आहे. तसे नसते तर त्यांनी अशा उथळ पोरकट गोष्टी केल्या नसत्या. लाडू आनंदाच्या प्रसंगी वाटतात. जेव्हा चिडचीड चालू असते, तेव्हा कोणी लाडू वाटत नाहीत. तर त्रासलेल्या माणसाला दिलासा देण्यासारखे काही करीत असतात. दिल्ली भाजपाच्या नव्या अध्यक्षांना त्याचा थांगपत्ता नसावा, अन्यथा त्यांनी असला थिल्लरपणा आरंभला नसता.

आज देशातल्या सर्वच शहरांमध्ये बहुतांश लोकांना आटलेल्या रोकड पैशाने सतावलेले आहे. कुठल्या बॅन्केत जावे आणि कुठून रोजचे व्यवहार उरकावेत, अशा समस्येने लोक कावलेले आहेत. त्यांचे तोंड गोड करण्याने त्यांचा राग कमी होणार नाही वा त्यांना आनंद होणार नाही. त्यांना आनंद व्हायची ही वेळही नाही. त्यांच्या अडचणीत दिलासा देण्यासारखे काही करण्याची गरज आहे आणि तेच भाजपाच्या सरकार व पक्षाला लाभदायक ठरू शकेल. लोकांना रोकड मिळत नाही, कारण अनेक बॅन्कांमध्ये नव्या नोटांचा तुटवडा आहे आणि एटीएम आटलेली आहेत. अशावेळी लोक वणवण फ़िरत आहेत. कुठल्या जागी पैसे खात्यातून निघू शकतात, त्याचा शोध घेण्यात वेळ घालवावा लागतो आहे. तेव्हा आपल्या परिसरातील कुठल्या एटीएममध्ये पैसे मिळत आहेत, किंवा कुठल्या बॅन्केत जाऊन पैसे काढले जाऊ शकतील; याची नेमकी माहिती देता आली तरी लोक खुश होतील. कारण त्यातून त्यांची तारांबळ कमी होऊ शकेल. कारण बॅन्केच्या बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि कुठून तरी हाती रोकड लागावी म्हणून धडपड चालू आहे. अशावेळी त्याचा त्रास कमी होण्याला हातभार लावणे, हे मोठे काम आहे. तेवढ्यानेही त्याच्या चेहर्‍यावर स्मित येऊ शकते. गोडधोड खाण्याच्या मनस्थितीत सामान्य माणूस आज नाही. कुठल्याही संघटित पातळीवर हे काम करता आले, किंवा तशी माहिती गोळा करून प्रत्येक विभागात लोकांना तशी माहिती देण्याची पक्षीय यंत्रणा उभारली, तरी पक्षाला जनसंपर्क वाढवण्याचा लाभ होऊ शकतो. कारण तारांबळ उडाली, तेव्हा तक्रार करणारे सर्वच पक्ष व संघटना आहेत. पण मदतीला येऊन त्रास कमी करणारा कोणी भेटला, तर लोकांना हवा असतो. असे काम भाजपाने संघटना हाती आहे म्हणून केले, तर पक्षाची प्रतिमा जनमानसात उजळ होऊ शकते. पण त्यासाठी कार्यकर्ता असावे लागते. लाडू वाटणारे हलवाई होऊन उपयोग नसतो.

लोकांना घरची चुल पेटवायला आणि त्या चुलीवरच्या पातेल्यात काही शिजवण्यासाठी पैशाची गरज आहे. त्याच टंचाईने लोकांना भंडावून सोडले आहे. अशावेळी तुमच्याकडे लाडू वाटण्याइतके पैसे कुठून आले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचे उत्तर काय आहे? आपल्या पक्षाच्या सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे आणि त्याच्या अंमलबजावणीत शासकीय यंत्रणा तोकडी पडत असेल, तर त्याला पुरक काही करण्याची बुद्धी ज्यांच्यापाशी नसते, त्यांना कार्यकर्ता कशाला म्हणायचे असा प्रश्न आहे. भाजपा हा संघाच्या मुशीतून आलेला पक्ष असल्याचे म्हटले जाते. त्या संघाची उभारणी व विस्तारच मुळात आपत्तीच्या काळामध्ये लोकांच्या मदतीला धावून जाण्यातून झालेला आहे. अशा स्वयंसेवक मानसिकतेचा दुष्काळ आज भाजपामध्ये पडल्याची ही लक्षणे आहेत. अन्यथा रांगेत त्रासलेल्यांना लाडूवाटप करण्याची कल्पनाच पुढे आली नसती, की त्याची बातमी होऊ शकली नसती. मागल्या काही वर्षात भाजपाचा झपाट्याने विस्तार झाला आणि दहा कोटी वगैरे सदस्य नोंदवले गेल्याचा डंका पिटला जात असतो. पण ह्या सदस्यांपैकी किती लोक आज सामान्य माणसाच्या मदतीला पुढे आलेले आहेत. जे कोणी पदाधिकारी म्हणून मिरवत असतात, त्यापैकी कोणकोण त्रासलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी कर्तव्य म्हणून समोर येऊ शकले आहेत? जे आहेत, त्यांना लाडूवाटपाची कल्पना सुचली. कारण त्यामध्ये कार्यकर्त्याचाच अभाव आहे. कुणा हलवायाला कंत्राट देऊन लाखोच्या संख्येने लाडू बनवून घेणे आणि त्यांचे वाटप करणे; याला पक्षकार्य म्हणायचे असेल तर अशा पक्षाची समाजाला गरज नसते. यातूनच कॉग्रेस बुडाली. भाजपा त्याच मार्गाने चालला, असेच ह्या बातमीमुळे वाटू लागले आहे. कारण प्रसंग लोकांचे तोंड गोड करण्याचा नाही, इतकेही भान संबंधितांना राहिलेले नाही.

आपल्या पक्षनिष्ठा वा मोदीभक्ती नेते कार्यकर्ते अशा रितीने प्रकट करू लागतात, तेव्हा त्यांची कॉग्रेस होऊ लागली असेच समजावे लागते. त्यांचा जनतेशी संपर्क कमी होऊन नेत्यांच्या जवळीकीचे डोहाळे त्यांना लागलेले असतात. उत्तराखंडात त्सुनामी आली, तेव्हा राहुल सोनियांच्या हस्ते जीवनोपयोगी साहित्य औषधे इत्यादीचे शंभरावर ट्रक भरून पाठवले गेले होते. त्या दोघांनी झेंडे हलवून त्या ताफ़्याला निरोप दिल्याचे चित्रण वाहिन्यांवर झळकले होते. पण वाटेवर त्या ट्रकचा ताफ़ा अडकला आणि ड्रायव्हरना खायला वा इंधन भरायलाही पैसे नसल्याने, त्यांनी आतले साहित्य विकून उपजिवीका केल्याचे नंतर उघडकीस आलेले होते. तीन सव्वातीन वर्षापुर्वीचीच गोष्ट आहे. हा सगळा तमाशा करणार्‍यांचा, उत्तराखंडात बुडालेल्या फ़सलेल्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न अजिबात नव्हता. त्यापेक्षा राहुल सोनियांसमोर झळकण्याचाच उद्योग होता. त्यामुळे आयोजकांना भरपूर प्रसिद्धी मिळाली व नेत्यांनी त्यांची पाठही थोपटली. पण प्रत्यक्षात वर्षभराने कॉग्रेस उत्तराखंडासह दिल्लीत भूईसपाट झालेली होती. कारण खरोखर ग्रासलेल्यांना लाडू खायचे नसतात. त्यांना त्रासलेल्या प्रसंगी दिलासा हवा असतो. शक्य तितकी मदत हवी असते. आनंदोत्सव साजरा करायचा नसतो. याचे भान राखतो, त्याला कार्यकर्ता म्हणतात आणि तशा कार्यकर्त्यांच्या कर्तव्यदक्षतेवर उभा रहातो, त्याला पक्ष म्हणतात. कोट्यवधीची सदस्यनोंदणी करताना भाजपा तेच विसरून गेला आहे. त्यामुळेच चित्रपट अभिनेता मनोज तिवारी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष होतात आणि भंडावून गेलेल्या लोकांना लाडू वाटणारे लाडूसम्राट होण्यातून पक्ष चालवू बघतात. अशा लोकांच्या भरवंशावर मोदी मोठमोठे निर्णय घेणार असतील, तर पक्ष व देशाची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही. कॉग्रेस व राहुलचे नेतृत्व हा साक्षात पुरावा त्यासाठी समोर उभा आहे.

2 comments:

  1. वस्तुस्थिती निदर्शक लेख. "सुधारा बाबांनो स्वतःला."

    ReplyDelete
  2. भाऊ नोट बंदी जाहीर झाल्या नंतर ३ दिवसांनीच मी मा.पंतप्रधान, अर्थमंत्री, मा.मुख्यमंत्री व भाजपा अध्यक्ष श्री अमित शहा यांना ट्विटर द्वारे असे सूचित केले होते की पक्षाच्या सर्व लोकप्रतीनिधिनी सामान्य लोकांना याचे महत्व पटवून दिले, लोकांना मदत केली तर लोकांचा रोष कमी होऊ शकेल व पुढील काळात पक्षाला याचा फायदाच होईल. परंतू अद्याप तरी या आघाडीवर शांतता असून हळू हळू लोकांचा उद्रेक होण्यास सुरुवात होत आहे.

    ReplyDelete