Tuesday, December 27, 2016

नितीमत्तेचा मृत्यू

anna kejriwal के लिए चित्र परिणाम

लोकपाल आंदोलनात सहभागी नसलेले पण नंतर केजरीवाल यांनी सुरू केलेल्या आम आदमी पक्षात आरंभापासून सहभागी असलेले योगेंद्र यादव, यांनी वापरलेले शब्द मोलाचे आहेत. ह्या पक्षाने लोकांची मतदारांची व जनतेची दिशाभूल केली, असा आरोप नेहमी होत राहिला. पण त्यालाही केजरीवालसह त्यांचे सहकारी राजकीय उत्तर नेहमी देत राहिले. आपल्यावर आरोप झाला, मग त्याचे उत्तर वा खुलासा देण्यापेक्षा या लोकांनी सतत इतरांवर प्रत्यारोप करण्यात धन्यता मानली. राजकीय आखाड्यात कोणीही शुचिर्भूत नसल्याने तसे युक्तीवाद चटकन पटणारे असतात. पण इतर पक्ष आणि आम आदमी पक्ष यात एक मोठा मूलभूत फ़रक आहे. तो फ़रक म्हणजे अन्य पक्षांनी निर्माणा केलेला भ्रष्टाचाराचा उकिरडा उपसून काढण्यासाठीच या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळेच कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले लोक त्यात ओढले गेले होते. लोकपाल आंदोलनानंतर राजकारणात शिरताना, केजरीवाल यांना अण्णा हजारे यांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. कारण हे क्षेत्र म्हणजे चिखल आहे, त्यात जाऊन आपणच घाणीने माखले जाऊ; असे अण्णा म्हणाले होते. तर चिखल साफ़ करण्यासाठी त्यातच उतरावे लागेल, असा केजरीवालचा खुलासा होता. आज अण्णांचे शब्द खरे झाले आहेत आणि अन्य कुठल्याही पक्षाला भ्रष्ट होण्यास जितका अवधी लागला नाही, त्यापेक्षा खुपच अल्पावधीत आम आदमी पक्ष भ्रष्टाचार अनाचाराचा उकिरडा बनून गेला आहे. त्यातून हताश होऊन बाजुला झालेले यादव नेमके दुखणे सांगतात. पक्ष संघटना म्हणून जी यंत्रणा काम करते ती अजून शिल्लक आहे. पण त्यातला नैतिकता व शुचितेचा आत्मा कधीच मरून गेला आहे. कारण प्रस्थापित जुन्या पक्षांपेक्षाही आज केजरीवाल अधिक बनेल व भामटे राजकीय नेते म्हणून प्रस्थापित झाले आहेत. खुद्द अण्णा हजारे यांना पत्र लिहून ते सांगावे लागले आहे.

प्रत्येक राजकीय पक्षात कुठला व कसा भ्रष्टाचार चालतो, त्याचे तपशील देत केजरीवाल राजकीय क्षितीजावर उगवले होते. तेव्हा त्यांनी सांगितलेला वा बोललेला एकही शब्द आता त्यांना आठवत नाही. किंबहूना त्यापैकी कुठला शब्द वा आश्वासन कोणी स्मरण करून दिले, तर केजरीवाल यांना सहन होत नाही. प्रथमच निवडणूका लढवून सत्ता हस्तगत करतानाच त्या खोटेपणाचा मुहूर्त झालेला होता. बहूमत पाठीशी नसताना विरोधी पक्षात बसण्याची तयारी त्यांना दाखवता आली नाही. कॉग्रेसचा पाठींबा घेणार नाही, अशी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेण्यार्‍या या माणसाने आठवडाभरात तेच करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. नंतर आपल्याच एक एक शब्दाला वळसे घेत त्यांनी भामटेगिरी सुरू केली. दिल्लीकरांना वार्‍यावर सोडून पंतप्रधान होण्यापर्यंतच्या मोहाने भरकटणे झाले. तरीही दिल्लीकरांनी त्यांना दुसरी संधी दिली आणि त्याचाही बोजवारा उडवून झाला आहे. आपण नवे असल्याचे चुका करू शकतो. पण आपली नियत साफ़ आहे, असा केजरीवाल यांचा दावा असायचा. आज ती नियत कुठे गेली आहे? सहा मंत्र्यांपैकी तिघांना वर्षभरातच अनेक गुन्ह्यांसाठी हाकलावे लागले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणापासून खंडणीखोरीपर्यंत अनेक आरोप केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांवर झालेले आहेत. तरीही अण्णांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. पण आता अण्णांनाही किळस आलेली असावी. अन्यथा आपले मौन सोडून त्यांनी केजरीवालांना जाहिर पत्र लिहीले नसते. अण्णांनी कशासाठी केजरीवालांना पत्र लिहीले आहे? जुन्याच एका आश्वासनांचे स्मरण करून देण्यासाठीच अण्णांना हे पत्र लिहावे लागले आहे. ते आश्वासन म्हणजे पक्षाला मिळणार्‍या प्रत्येक देणगीचा तपशील जाहिरपण वेबसाईटवर टाकणे. गेल्या सहा महिन्यात आपल्या सर्व देणगीदारांची नावे केजरीवाल पक्षाने लपवल्याने अण्णांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

हाती आलेल्या वा जाहिर होणार्‍या माहितीचा आधार घेऊन आयकर खात्याने आम आदमी पक्षाला नोटीस पाठवली आणि त्यांचे वस्त्रहरण होऊन गेले. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तात्काळ आपल्या वेबसाईटवरची जुनीनवी सर्व देणगीदारांची नावे गायब करून टाकली. कुठल्याही अन्य पक्षाला शोभेल असे थातूरमातूर उत्तर आयकर खात्याला पाठवून पळ काढला आहे. दिल्लीपुरता मर्यादित असलेल्या या पक्षाला कोट्यवधी रुपये निनावी व्यक्तींकडून मिळालेले आहेत आणि त्यांची नावेही जाहिर करायला केजरीवाल यांना भिती वाटू लागली आहे. याला नियत साफ़ असणे म्हणतात. आजवर त्यांनी अन्य पक्षांवर जे आरोप केले, त्याच वाटेने केजरीवाल निघाले आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या भ्रष्टाचाराचे समर्थन करू लागले आहेत. या पक्षाचा पाया प्रामाणिकपणा असा होता. आज तोच पाया ढासळून गेला आहे. जेव्हा त्यांच्या विरोधातले पुरावे समोर आणले जातात, तेव्हा ही मंडळी बिळात तोंड लपवून बसतात. काही महिन्यांपुर्वी यांच्या एका आमदारावर महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला, तेव्हा त्याची पक्षातून हाकालपट्टी करून पळ काढला गेला होता. हा नुसता शोषणाचा विषय नव्हता. संबंधिताने त्या लैंगिक शोषणाचे चित्रणही केले होते. त्यामुळे सगळा बोभाटा झाला. पण तोही गडी कसला बिलंदर? केजरीवालही त्याच्यापुढे फ़िका पडावा, असा खुलासा त्या आमदाराने केलेला होता. आपण दलित आहोत आणि आपल्या घरात आंबेडकरांची प्रतिमा आहे; म्हणून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा त्याने प्रत्यारोप केला होता. याला अस्सल केजरीवाल राजनिती म्हणतात. आपण कुठलेही पाप करावे आणि त्याविषयी जाब विचारण्यालाच पापी ठरवण्याचा शहाजोगपणा, म्हणजे मुर्तिमंत केजरीवाल! आज देशातला सर्वात बदमाश वा भामटा पक्ष अशी म्हणूनच या पक्षाची ओळख झाली आहे.

किंबहूना त्यामुळेच अण्णा हजारे विचलीत झालेले असावेत. आपल्याला हा बदमाश दाद देणार नाही, हे त्यांनाही ठाऊक असेलच. कारण लोकपाल आंदोलनातही पैशाची मोठी अफ़रातफ़र केजरीवाल टोळीने केल्याचा गाजावाजा झालेला होताच. आयकर खात्यात ज्येष्ठ अधिकारी म्हणून प्रशिक्षित झालेल्या केजरीवाल यांना आर्थिक लफ़डी वा अफ़रातफ़री कशा कराव्यात आणि कायद्याने कशा झाकाव्यात; याचे खास प्रशिक्षणच मिळालेले आहे. त्यामुळेच कुठल्याही अन्य राजकीय बदमाशांपेक्षा केजरीवाल अट्टल बदमाशी करू शकतात. आपल्याला त्याचीच प्रचिती येत आहे. पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यावर त्याचे उदात्तीकरण करताना त्यांनी त्याचीच ग्वाही दिलेली होती. काही कोटी रुपये खाऊन भाजपा व कॉग्रेसच्या नेत्यांना वाटूनही आपण आपल्या पदावर मस्तपैकी राहू शकलो असतो, असे त्यांनी म्हटलेले होते. आपल्या कुवतीची त्यांनी तेव्हाच दिलेली ती ग्वाही होती. पैसे कुठे खाता येतात आणि कसे सर्वांचे तोंड बंद राखता येते, याची इतकी ‘जाण’ राजकारणात दिर्घकाळ मुरलेल्या अनेक नेत्यांनाही नसेल. प्रशासन सेवा सोडून केजरीवाल राजकारणात कशासाठी आले, त्याची ती खरी कबुली होती. आज आपण त्याचे अनुभव घेत आहोत. आणखी काही काळाने आपल्याला असेही दिसेल, की भले भले मुरब्बी राजकारणीही करू शकले नसतील, अशी पापे या महान पवित्र राजकीय नेत्याकडून घडल्याचे पुरावे समोर येतील. कारण इतका बनचुका भामटा राजकारणी आजवर भारतीयांना बघायला मिळालेला नव्हता. यापेक्षा कुठलाही भ्रष्ट राजकीय पक्ष परवडला, असेच म्हणायची पाळी केजरीवाल आणणार आहेत. अण्णांना आज जाग आली. सामान्य जनतेला थोडा उशिर लागेल. यादव यांना केजरीवाल यांच्या संगतीत राहुनच अनुभव आलेला आहे. दिल्लीकरांना मात्र आणखी तीन वर्षे तरी त्यातून सुटका नाही.

No comments:

Post a Comment