Sunday, December 4, 2016

खुळा आशावाद

एकदा क्रिकेटसंबंधी एका टिव्ही चर्चेत सचिन तेंडूलकरच्या श्रद्धेचा विषय चर्चिला गेल्याचे आठवते. तो म्हणे नेहमी आपल्या डाव्या किंवा उजव्या पायातला मोजा आधी चढवत असे आणि त्याच पायातला बुट आधी घालत असे. जेव्हा असे व्हायचे नाही, तेव्हाच तो लौकर आऊट व्हायचा वगैरे. त्या चर्चेत आधीच्या पिढीतला लिटल मास्टर सुनील गावस्कर सहभागी झालेला होता. त्याने अशा योगायोगाचे केलेले विवेचन बोधप्रद होते. पण इतरांना किती पटले कोणजाणे! कुणालाही काही संवयी अंगवळणी पडलेल्या असतात. त्याप्रमाणेच तो माणुस नित्यनेमाने वागत असतो. पण एखाद्या दिवशी त्यापेक्षा वेगळा वागून गेला असेल, तर ती गोष्ट त्याला मनातल्या मतात बोचत असते. आज असे कसे झाले? आपण वेगळे कशाला वागलो, याचे उत्तर तो माणूस मनाशी शोधत रहातो. सहाजिकच त्याचे इतर गोष्टीतले लक्ष विचलीत होऊन जाते. हातातल्या कामावरही त्याचे लक्ष रहात नाही. फ़लंदाजी करताना समोरून येणारा चेंडू आणि आसपास उभे असलेले क्षेत्ररक्षक याकडे बारकाईने लक्ष असावे लागते. तेच कमी झाले मग काही चुक होते. सचिनचेही तसेच होत असेल, असा सुनीलचा खुलासा होता. तो महान फ़लंदाज म्हणून त्याचे तसे होत असेल असेही नाही. कुणाच्याही बाबतीत तसे होऊ शकते. म्हणून त्याला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. सामान्य माणसांची गोष्ट वेगळी असते. ठराविक काही घडले मग अमूक एक गोष्ट घडताना त्याने बघितली वा अनुभवली असेल; तर तोच नियम समजून माणसे वागू लागतात. त्याला श्रद्धा म्हणतात. पण त्याच्या आहारी जो माणुस जातो तो अंधश्रद्ध असतो. कारण अशा योगायोगाच्या गोष्टी घडताना काही ठाम निकष असावे लागतात. त्या निकषांच्या अभावी तसे घडणे दुरापास्त असते. पण सोयीचे वा पुरक निकष काढून जेव्हा तशा अपेक्षा बाळगल्या जातात, तेव्हा तो आंधळेपणा असतो.

क्रिकेटचाच जुना अनुभव सांगायला हवा. तेव्हा एकदोन स्पिनर्स व दोनतीन ऑलराऊंडर्स भारतीय संघात असायचे. त्यातले करसन घावरी, कपिल देव, मदनलाल वा रॉजर बिन्नी अनेकदा चांगली फ़लंदाजी करून धावसंख्येला आकार द्यायचेही. कोणीकोणी एकदोनदा ७०-८० धावाही ठोकलेल्या होत्या. पण खरा फ़लंदाजीचा डोलारा पहिल्या पाचसहा नामवंत फ़लंदाजांवर असायचा. त्यांनीच धावसंख्या उभारावी ही अपेक्षा असायची. पण अनेकदा भारतीय फ़लंदाजी वेगवान गोलंदाजीसमोर कोलमडून जायची. ८०-१०० धावातच पहिले बिनीचे शिलेदार बाद व्हायचे आणि निदान अडिचशे धावा फ़लकावर दिसाव्यात, म्हणून भारतीय शौकीनांचा जीव टांगणीला लागायचा. पण त्या दिडदोनशे धावा करणार कोण, याचे उत्तर नसायचे. पण खुळी आशा त्यावेळी मदतीला यायची. मग बिन्नीने एकदा शतक ठोकलेय. बिशन बेदीने ८० धावा काढल्यात, असे युक्तीवाद करून सामना वाचवण्याचा तर्क मांडला जायचा. क्वचितच तसे कधी घडायचे. पण खुळा आशावाद कधी भारतीय क्रिकेटशौकीनांना सोडुन गेला नाही. असे युक्तीवाद तेव्हा सतत चालायचे. ज्या दिग्गजांनी धावा करायच्या तेच दगा देऊन बाद झाले असतील; तर बिन्नी, कपिल वा मदनलाल किती किल्ला लढवू शकतात? कधीतरी त्यांनी केलेही असेल, पण त्यांच्याकडून तितकी हुकमी अपेक्षाच करता येत नाही, हे वास्तव असते. पण पराभव मान्य करायचा नसला, मग असा खुळा आशावाद जन्माला येत असतो आणि त्याच्या बळावर युक्तीवाद सुरू होत असतात. त्याला कुठला निकष नसतो की दाखलाही नसतो. इम्रान खानने तेव्हा त्याविषयी केलेली एक टिप्पणी आठवते. भारताकडे चांगले भेदक गोलंदाज नाहीत, म्हणून समोरचा संघ चांगली धावसंख्या उभारतो आणि समोरच्या संघात गतिमान गोलंदाज असल्याने, भारताची धावसंख्या अपुरी पडते.

हे इम्रानचे म्हणणे शंभर टक्के खरे असायचे. पण भारतीय संघाच्या पराभवाचे सत्य स्विकारण्याची मनस्थिती नसल्याने, ते सत्य बघायलाही खरा क्रिकेटरसिक तयार नसायचा. आजच्या राजकारणाकडे बघितले मग त्याचीच ग्वाही मिळते. सगळे राजकारण त्याच अंधश्रद्धेभोवती घुटमळते आहे. त्यात मग इंदिरा गांधींना आणिबाणीच्या कालखंडानंतर मतदाराने कसे हरवले; इथपासून जनतालाट उलटून इंदिराजी कशा परतल्या, तिथपर्यंत सगळे युक्तीवाद ऐकायला मिळत असतात. पण तशा घटना घडताना आसपासची राजकीय स्थिती व राजकीय संघटना नेते यांच्याशी तुलना होऊ शकेल, असे काही नाही. त्याचा विचारही करायला मोदी विरोधक तयार नसतात. इंदिराजींनी जनतालाट झुगारून यश मिळवले हे सत्य होते, तितकेच त्यांचे आणिबाणीनंतरचे अपयश खरे होते. पण त्यात त्यांना उभे राहिलेले आव्हान संघटित होते आणि नव्याने सत्तेपर्यंत येतानाचे इंदिराजींचे प्रयास कष्टप्रद होते, याचा विसर पडून चालत नाही. योगायोग हा एक भाग असतो. पण त्या योगायोगाची परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयास नजरेआड करून नुसत्या अपेक्षा बाळगणे, ही अंधश्रद्धा असते. विरोधकांच्या एकजुटीची शक्ती ओळखण्यात इंदिराजींनी केलेली कसुर त्यांना भोवली होती आणि नंतर इंदिराजी संपल्याच्या भ्रमात वागणार्‍या विरोधकांना त्यांचे अपुरे आकलन भोवलेले होते. यापैकी काहीच नसेल, तर मोदींवर मात करणे केवळ अशक्य आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून मोदी अधिकाधिक जनतेला व मतदाराला विश्वासात घेण्याचा प्रयास करीत आहेत. उद्या वेळ आल्यास भाजपालाही दूर ठेवून सत्ता मिळवण्याचे प्रयोजन करीत आहेत. त्यांना कालबाह्य मार्गाने व डावपेचांनी रोखता येणार नाहीच. म्हणूनच पुर्वी असे अमूक घडले, म्हणून तसे काहीतरी घडण्याची आशाळभूत प्रतिक्षा करून मोदींवर मात करता येणार नाही.

गेल्या चौदा वर्षात ज्या मार्गाने नरेंद्र मोदी यांना रोखण्याचा नव्हे; तर संपवण्याची मोहिम राबवली गेली, ते उपाय निकामी ठरलेत ही वस्तुस्थिती आहे. किंबहूना ठराविक प्रसंगी आपले विरोधक काय करू शकतात आणि कोणती स्थिती निर्माण करू शकतात, त्याचे काही निश्चीत आडाखे मोदींनी बनवून ठेवलेले आहेत. त्यानुसारच त्यांचे विरोधक वागणार असतील, तर त्यात मोदी जिंकणार हे उघड आहे. उलट मोदींनी अपेक्षा बाळगलेली नाही, असे काही विरोधक करू वा वागू लागले, तर मोदींच्या एकूण राजकारणाचा विचका होऊ शकेल. पण गेल्या अडीच वर्षात तसे एकदाही घडताना दिसलेले नाही. गुजरातचा मुख्यमंत्री असतानापासून आपल्या विरोधात कुठली हत्यारे आयुधे वापरली जाऊ शकतात; त्याची यादीच मोदींनी करून ठेवलेली आहे. त्यापेक्षा कुठलेही नवे हत्यार वा रणनिती विरोधकांनी अडीच वर्षात शोधलेली नसेल, तर मग मोदींना हरवणार कसे? काही अनपेक्षित घडवून मोदींना चक्रावून सोडले, तरच मोदींना शह देता येईल. मोदींना हवे तसा खेळ करून हा सामना जिंकता येणार नाही. कारण मोदींनी मोठ्या चतुराईने विरोधकांच्या अंधश्रद्धा आपल्या राजकारणाचे मोहरे बनवलेले आहेत. उदाहरणार्थ संसद अधिवेशन उधाळले जाणार व जावे, यासाठीच मोदींनी आठवडाभर आधी नोटाबंदी केली असेल, तर अधिवेशन सुरळीत चालवून मोदी सरकारची अधिक तारांबळ उडवता आली असती. कारण तितकी सज्जता मोदींनी नक्कीच केलेली नव्हती. पण विरोधक तितका शहाणपणा दाखवणार नाहीत, ह्याच आत्मविश्वासाने मोदींनी पटकथा रचलेली होती आणि तसेच सर्व काही घडते आहे. सचिन नेहमीसारखाच वागत असेल तर विचलीत होत नाही आणि म्हणूनच त्याला बाद करणे अवघड होते ना? मग मोदींना विचलीत न करता त्यांना बाद करणार कसे? गुरूवारी म्हणूनच तर राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यावरही मोदी शांतपणे तिथेच बसून विरोधी सदस्यांशी हसतखेळत गप्पा मारत होते ना?

1 comment: