Wednesday, December 7, 2016

कसं बोललात ममतादिदी?

mamta protests के लिए चित्र परिणाम

गेला महिनाभर बंगालसह अन्य राज्यात धुमाकुळ घालून माघारी परतलेल्या मुख्यमंत्री ममता बानर्जी, यांचे डोके आता हळुहळू ठिकाणावर येत आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटाबंदी घोषित केल्यावर सर्वाधिक खवळलेले जे दोनचार नेते होते, त्यात ममतादिदींचा अग्रक्रम लागतो. त्यांच्यानंतर दिल्लीचे उथळ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा क्रम येतो. या दोघांनी जणू आभाळच कोसळले असल्याचा कांगावा सुरू केला होता. केजरीवाल यांच्या मुक्ताफ़ळांची सवय आता सर्वांना लागली आहे. त्यामुळे नवा आरोप कुठला इतकेच लोक बघतात. बाकी त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाहीत. म्हणूनच खुद्द दिल्लीतही केजरीवाल यांना नोटाबंदीच्या विरोधात कुठले आंदोलन करता आले नाही. त्यांच्या हक्काच्या जंतरमंतर याही जागी जमू शकेल, अशी दोनचार हजाराची गर्दी जमणार नाही याची त्यांना पुरती खात्री होती, म्हणूनच पाहूणचाराला आलेल्या ममतांना घेऊन केजरीवाल कुठल्याशा मंडईत जाऊन घोषणा देऊ लागले. पण कोणीही त्यांची दादफ़िर्याद घेतली नाही. दिल्लीत विरोधक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातील, अशा आशेवर तिथे थेट जाऊन धडकलेल्या ममतांना धक्का बसला. कारण राष्ट्रपती भवनाला धडक देण्याच्या त्यांच्या गर्जनेपासून केजरीवाल यांनीही पळ काढला. शिवसेनेचे खासदार त्यात सहभागी झाल्याने दिदीची अब्रु थोडी झाकली गेली. मग दिदी लालूंच्या भरवशावर पाटण्याला पोहोचल्या. तर नितीशनी त्यांच्याकडे पाठ फ़िरवली आणि दिदीच्या रागाला पारावार राहिला नाही. त्यांनी नोटाबंदीचे समर्थन करणार्‍या नितीशना गद्दार घोषित करून टाकले. मग काय, संसदेत तरी नोटाबंदीच्या विरोधात बोलणार्‍या नितीशच्या खासदारांना दिदीच्या विरोधात हत्यार उपसावेच लागले. या गडबडीत भाजपा वगळता कोणी ममताच्या सारदा-नारदा घोटाळ्यांविषयी बोलायचे टाळले होते, तो राग नितीशच्या पक्षाला आळवावा लागला.

नितीशना गद्दार ठरवणार्‍या ममता स्वत: किती शुचिर्भूत आहेत? त्यांच्याच पक्षाचे अनेक नेते चिटफ़ंडाच्या अनेक घोटाळ्यात गजाआड जाऊन पडलेले आहेत आणि ममताच्या राजकीय मोहिमांसाठी कुठला पैसा वापरला गेला, त्याची लक्तरे जगासमोर आलेली आहेत. पण त्यावर बोलले तर भाजपाला राजकीय लाभ होईल, म्हणून प्रत्येक विरोधी पक्षाने त्याविषयी बोलायचे सतत टाळलेले आहे. ही त्यांनी ममतावर केलेली कृपादृष्टी होती. पण त्यालाच आपल्या चारित्र्य पावित्र्याचे प्रमाणपत्र ठरवून दिदीने नितीशवर तोफ़ डागली आणि जनता दल युनायटेड पक्षाच्या संयमाचा अंत झाला. त्यांना भाजपाच्या सुरात सूर मिसळून ममताच्या घोटाळ्याचा उल्लेख करावा लागला. स्वत:च अनेक घोटाळे व अफ़रातफ़रीमध्ये गुंतलेल्या पक्षाच्या नेत्याने नितीशवर आरोप करण्याची गरज नाही; असे नितीश समर्थकांना ठणकावून सांगण्याची वेळ आली. थोडक्यात वेळीप्रसंगी आपल्या मदतीला येणार्‍या विरोधी पक्षांना लाथ मारून, दिदीने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. सगळी मुलूखगिरी करून आता दिदी माघारी बंगालमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यातून काही हाती लागले नाही, तेव्हा त्यांनी बंगालमध्ये लष्कराचा सराव चालू असताना आपल्यावर राजकीय हल्ला असा आरोप करून विरोधी पक्षांना आणखीनच गोत्यात आणले. कारण तो कांगावा होता हे लौकरच सिद्ध झाले आणि आता नोटाबंदीसह अन्य विषयात ममता व त्यांचा पक्ष पुर्णत: एकाकी पडला आहे. किंबहूना ममताच्या आक्रस्ताळेपणामुळे त्यांच्यापासून अन्य पक्ष दुरावले आहेत. तेव्हा कुठे या दिदीला जाग आली आणि आपण कसे लोकाभिमुख आंदोलनकर्ते आहोत, त्याची आठवण करून देण्याची नामुष्की आली. बंगालमधील डाव्यांचे साम्राज्य उध्वस्त करताना आपण कसे टिकेचे धनी झालो आणि तरीही चिकाटीने लढलो, त्या आठवणी आता सांगण्याची गरज काय?

ज्योती बसू यांच्या कारकिर्दीत मरगळलेली कॉग्रेस झुंज देत नाही, म्हणून वेगळी चुल मांडून ममतांनी नवे नेतृत्व बंगालला दिले. हे कोणी नाकारू शकत नाही. तेव्हा कधी भाजपा तर कधी कॉग्रेसशी हातमिळवणी करीत, डाव्यांच्या विरोधातली महाआघाडी (महाज्योत) जमवण्याच्या दिदीने केलेल्या कसरती जग विसरलेले नाही. आज तो इतिहास ममताच विसरल्य़ा आहेत. किती कुबड्या घेऊन त्यांना उभे रहावे लागले आणि आपल्या पायावर ठाम उभे राहिल्यावर, त्यांनी त्याच कुबड्यांना कशा लाथा मारल्या; त्याचा विसर त्यांनाच पडला आहे. आज स्वबळवर बंगालची सत्ता हाती आल्यावर दिदीने चालवलेली मुजोरी आणि तेव्हाची झुंजार दिदी, यात मोठा फ़रक आहे. आज दिदीला सत्तेचा व बहूमताचा माज आला आहे. तेव्हा बंड होते आणि आज मस्तवालपणा आहे. किंबहूना तेव्हा तसाच माज डाव्यांना आला होता आणि तोच माज उतरवण्यासाठी बंगाली मतदाराने ममताला साथ दिलेली होती. म्हणूनच तो संघर्ष वा सिंगुरचा लढा वगैरे गोष्टी सांगण्याची गरज नाही. आज कालीचक येथे जमावाने पोलिस ठाणे जाळले वा कुठल्याही गाव गल्लीत ममताचे समर्थक गुंड धिंगाणा घालतात, तेव्हा पोलिस मान खाली घालून निष्क्रीय रहातात. तेव्हा लोकांना डाव्यांच्याच सत्ते़ची आठवण होऊ लागली आहे. कारण यापेक्षा डाव्यांचा कारभार वेगळा नव्हता. आज आपल्या विरोधात कोणी बोलले वा मतभिन्नता दाखवली, मग ममता जसा त्याला गद्दार ठरवतात, तशीच काहीशी स्थिती डाव्यांच्याही जमान्यात होती. त्याची पुनरावृत्ती बघण्यासाठी लोकांनी ममताला भरभरून मते दिलेली नव्हती. तर अशा मुजोरीला संपवण्यासाठीच लोक ममताच्या मागे आलेले होते. आज तसेच मुठभर लोक भाजपाच्या मागे बंगालमध्ये उभे राहू लागले आहेत. सिंगूरची आठवण देताना ममता, तीच गोष्ट विसरल्या आहेत. टिका आरोप आपल्या अंगवळणी पडलेत हे ममता कोणाला सांगत आहेत?

तसे असेल तर टिका व आरोपांचा दांडगा अनुभव आज देशातील एकाच नेत्याच्या गाठीशी आहे. ममतांनी जो विरोध व टिकेचा भडीमार बघितला नाही, तितका अनुभव तब्बल बारा वर्षे सोसून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आहेत. ममतांना आपल्या इवल्या राज्यात होणारी टिका किंवा क्वचित होणारी राष्ट्रीय माध्यमातील टिका असह्य झाली आहे. पण मोदींनी देशव्यापी कुठल्याही माध्यमातून सातत्याने होणारी बदनामी व अपप्रचार; निर्वेधपणे बारा वर्षे सोसलेला आहे. त्याला कुठलेही प्रत्युत्तरही देण्यासाठी मोदी पुढे आले नाहीत, की त्यांनी टिकाकारांवर तोंडसुख घेण्याची आगळीक केली नाही. विरोधकांना मनसोक्त टिका करायची मोकळीक देऊन त्याचाच वापर मोदींनी राजकारणातली मोठी झेप घेण्यासाठी केला. त्यांनी आरोपाची सफ़ाई कधी दिली नाही, तर कृतीतून देशभरच्या जनतेला आपल्या पाठीशी उभे करण्याचा मार्ग चोखाळून आरोप खोटे पाडले. आरोपकर्त्यांची विश्वासार्हताच त्यातून संपवून टाकली. देशाच्या तमाम शक्तीशाली प्रचारयंत्रणा व माध्यमे अहोरात्र ज्याला संपवायला राबल्या, त्यांच्यावर मात करून जो पंतप्रधान झाला, त्याला बदनाम करायला मैदानात येताना ममतांनी कोणता विचार केला होता? तेव्हा त्यांना बदनामी व आरोपांनी कुणाला राजकीय जीवनातून उठवता येत नाही; हे कसे उमजले नाही? जर दहा वर्षात नुसते आरोप ममतांना संपवू शकले नसतील, तर दहा दिवस नोटाबंदीवर काहूर माजवून आपण नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतो, असे ममतांना कुठल्या आधारावर वाटलेले आहे? अशा वक्तव्यातून त्यांनी आपली सफ़ाई देण्यापेक्षाही आपल्याच बेताल मुर्खपणाची साक्ष दिलेली नाही काय? ज्या गोष्टी राजकारणातून त्यांना संपवू शकल्या नाहीत, त्याच गोष्टी मोदींना संपवण्यास उपयोगी ठरतील, असे ममताच समजून बसल्या. हा त्यांचा शहाणपणा आहे की तद्दन मुर्खपणा आहे?

1 comment: