Wednesday, December 7, 2016

नव्या नेतृत्वाची अपेक्षा

sambhaji brigade के लिए चित्र परिणाम

आजवर समाजिक वा अस्मितेची जपणूक करणारी संघटना असलेल्या संभाजी ब्रिगेडने आता राजकारणात पडायचा निर्णय घेतला आहे. नुसते राजकारण आणि निवडणूकीचे राजकारण यात मोठा फ़रक आहे. नक्षलवादी किंवा अन्य स्वयंसेवी संस्थांचे मुखवटे लावून जगणार्‍याही काही राजकीय संघटना आहेत. त्यांची समाजसेवा दिखावू आणि राजकीय अजेंडा प्रमुख असतो. त्या निवडणूकीच्या आखाड्यात उतरत नाहीत, म्हणून त्यांना सामाजिक वा स्वयंसेवी संघटना म्हटले जाते. पण प्रत्यक्षात अशा बहुतेक संघटना कुणाचे तरी आश्रित म्हणून वा उपशाखा म्हणून कार्यरत असतात. आजवर तसाच काहीसा आरोप संभाजी ब्रिगेडवर होत राहिला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसची छुपी फ़ळी, असेच त्यांच्याकडे बघितले जात होते. पण आता त्यांनी नावानिशी निवडणूकीच्या आखाड्यात उडी घ्यायचे ठरवले असल्याने, त्यांच्याकडे कोणी संशयाने बघू शकणार नाही. पण म्हणूनच या नव्या पक्षासमोर मोठे आव्हान उभे आहे. त्यांना आजवरच्या अपेशी पक्षांच्या पंगतीत जाऊन बसायचे आहे, की दिर्घकालीन राजकारण करायचे आहे, त्याचा आतापासून विचार करावा लागेल. कारण अन्य कुठल्या पक्षातून वा संस्कारातून आलेले तयार नेते, त्यात समाविष्ट झाल्यास ब्रिगेडला निवडणूक राजकारणात भवितव्य नसेल. मग तिला आघाडी व सत्ता यांच्या तालावर नाचावे लागेल. दुसरा मार्ग खडतर आहे, पण दिर्घकालीन राजकारणाचा आहे. ज्यामध्ये ब्रिगेडला आपले नवे भविष्यकालीन नेतृत्व उदयास आणावे लागेल. ज्यांना झटपट यश हवे आहे, अशा लोकांची सध्या कमतरता नाही. ते आपल्या साधनसामग्रीनिशी ब्रिगेडमध्ये दाखल होऊ शकतात. पण मग त्यांच्याच मागे फ़रफ़टावे लागेल. उलट नवे नेतृत्व उभे केल्यास यशाला थोडा काळ जाईल, पण महाराष्ट्राला नव्या पिढीचे नेतृत्व देणारा पक्ष उदयास येऊ शकेल.

ज्यांच्यापाशी कुठले राजकीय तत्वज्ञान वा कार्यक्रम नव्हता म्हणून हेटाळणी झाली; त्या शिवसेनेने पन्नास वर्षे पुर्ण केली आहेत आणि वैचारिक टेंभा मिरवणारे तेव्हाचे पक्ष कधीच लयास गेलेले आहेत. याचे एकमेव कारण त्या पक्षांनी नेतृत्व विकासाचा प्रयास केला नाही. बाजरात तयार मालासारखे उपलब्ध असलेले नेतृत्व उधार घेऊन पक्ष चालविले. उलट शिवसेनेने पहिल्यापासून नव्या नेतृत्वाला संधी देत नव्या पिढीचे नेतृत्व उभे केले. खुद्द बाळासाहेबही राजकारणातल्या कुठल्या संघटनेत वा पक्षात नव्हते. मनोहर जोशी, नवलकर इत्यादी सर्वच नेते राजकारणाबद्दल अनभिज्ञ होते. पण क्रमाक्रमाने सेनेचे नवे नेतृत्व उभे रहात गेले आणि पुढल्या कालखंडात सेनेतलेच अनेक तरूण नेते प्रस्थापित पक्षात जाऊन आपला प्रभाव पाडू शकलेले आहेत. ब्रिगेडला तो मार्ग उपलब्ध आहे. किंवा आधी फ़सलेल्या शिवराज्य पक्षाच्या वाट्याला आलेला अनुभव गाठीशी आहे. आपापल्या व्यक्तीगत महत्वाकांक्षेसाठी पक्षात वा संघटनेत येणारे नेतृत्व, गुणसंपन्न अनेकजण असू शकतात. पण असे लोक तुमच्या भूमिकेसाठी संघटनेत आलेले नसतात. त्यांच्या महत्वाकांक्षेला पुरक साधन म्हणून पक्षात येत असतात. त्यांच्यामुळे संघटना प्रबळ होण्यापेक्षा त्यांचेच नेतृत्व प्रबळ होऊ शकते आणि पुढेमागे त्यांनी बाजूला व्हायचे ठरवले, तर संघटनेची हानी होत असते. म्हणूनच नव्या पिढीचे नेतृत्व उभे करण्यात दिर्घकालीन राजकारणाची किल्ली लपलेली आहे. आणखी एक गोष्ट अशी, की नव्या पिढीचे नेतृत्व उभे रहाताना नव्या कल्पनाही राजकारणात आणल्या जातात. शिवसेना नव्या घोषणा आणि गल्लीबोळात संघटनेची शाखा स्थापण्याची कल्पना घेऊन आली. अलिकडल्या काळात आम आदमी पक्षाकडेही तसेच बघता येईल. त्यांनीही जवळपास नव्याच नेतृत्वाला संधी देत राजकारणाचे नवे पायंडे घालण्याचा पर्याय पुढे आणला आहे.

लोकपाल आंदोलन व अण्णा हजारेंच्या छायेतून बाहेर पडून, केजरीवाल हे नवे नेतृत्व उदयास आलेले आहे. त्यांचे विचार भूमिका हा मतभेदाचा विषय असू शकतो. पण त्यांनी अगदी नव्या गोष्टी भारतीय राजकारणात आणल्या आणि त्याला अगदी नवखे तरूण नेतृत्व कारण झालेले आहे. आजकाल राजकारणात पक्षासाठी एक आकर्षक चेहरा आवश्यक असतो. केजरीवाल हा आरंभी चेहरा होता असेही नाही. पण राजकारणात उतरायचे ठरवल्यानंतर त्यांच्या गोतावळ्याने केजरीवाल हा निर्विवाद नेता असल्याची साक्ष दिलेली आहे. त्यात आडवे येणार्‍यांना बाजूला करून आम आदमी पक्ष पुढे सरसावला आहे. संभाजी ब्रिगेडपाशी अजून तरी तसा कोणी चेहरा नाही. जो चेहरा मतदार व सर्वसामान्य जनतेला भुरळ घालू शकेल. ही निवडणूकीतली गरज असते. याक्षणी तरी कोणी एक प्रमुख वा एकमेव नेता ब्रिगेडला समोर करता आलेला नाही. याचा अर्थ असा कोणीही त्या संघटनेत उपलब्ध नाही, असेही मानण्याची गरज नाही. तसा चेहरा हळुहळू आकाराला येत असतो. लोकांकडून स्विकारला जात असतो. त्याच्यामध्ये मतदाराला भुरळ घालण्याची किमया असावी लागते आणि निदान जगासमोर तोच संघटनेचा निर्णायक नेता दिसणारे पक्षाचे वर्तन असावे लागते. ब्रिगेडला त्याही दिशेने प्रयास करावा लागणार आहे. तशी तयारी असेल तर निदान प्रारंभिक यश मिळून जात असते. सेनेतून बाजूला झाल्यावर आपला वेगळा पक्ष काढणार्‍या राज ठाकरे यांना लोकांनी दिलेला प्रतिसाद त्याचेच फ़लित होता. नंतरचे अपयशही त्याचेच कारण होते. पण एक निर्विवाद नेता आणि पुर्णपणे नव्या पिढीचे नेतृत्व; हीच नव्या पक्षाच्या भवितव्याची किल्ली असते. ब्रिगेडने त्य दिशेने कोणती तयारी केली आहे, ते लौकरच दिसेल. नुसता पक्ष नोंदवला वा अनेक जागी उमेदवार उभे केल्याने राजकीय पक्ष उभारला जात नसतो.

विविध आंदोलने, मेळावे किंवा कार्यक्रम यातून ब्रिगेडने आपली छाप समाजाच्या मोठा लोकसंख्येवर पाडलेली आहे. पण संघटनेच्या खात्यात कुठले राजकीय फ़ळ पडले, त्याची गणना करता येत नाही. प्रामुख्याने मराठा मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादामुळे ही संघटना निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्यास प्रवृत झालेली असू शकते. त्यात अनेक पक्षांचे आरंभशूर दाखल होऊ शकतात. किंबहूना मुद्दाम पाठवलेही जाऊ शकतात. अशा हस्तकांना पुढे करून मोक्याच्या क्षणी त्यांनी दगाफ़टका करण्याचेही डाव राजकारणात खेळले जात असतात. सध्या ज्या पक्षांच्या गोटात मंदीची लाट आलेली आहे, तिथल्या अनेकांना तात्पुरता आश्रय हवाच आहे. त्यांचाही ओढा ब्रिगेडकडे असू शकतो. त्यांच्यापासून सावध असावे लागेल. अन्यथा मुसाफ़िरखाना अशी संघटनेची अवस्था होऊ शकते. तात्काळ यश मिळवण्याच्या मोहात न पडता दिर्घकालीन राजकारणाचा पाया नजिकच्या निवडणूकात घालून; आपली छाप हा नवा पक्ष किती पाडू शकेल, त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल. आज मूठभरच लोक ब्रिगेडकडे अपेक्षेने बघत असतील. पण त्यांना पक्के आपले मतदार अनुयायी बनवणे आणि नवनव्या समाजघटकांना आकर्षित करून भविष्याची बेगमी करणे; अशारितीने पक्षाला आपला विस्तार वाढवावा लागत असतो. तिथे मग आम आदमी पक्षाला विधानसभेत मिळालेले यश आणि लोकसभेत बसलेला दणका, लक्षात घेण्यासारखा आहे. थोडे यश मोठ्या यशाच्या मोहात पाडणारे असते. पण त्याच्या मागे फ़रफ़टले तर भरकटत जाण्याचाही धोका असतो. म्हणूनच महत्वाकांक्षा पक्षाची असावी. त्यात व्यक्तीगत महत्वाकांक्षा बाळगणार्‍यांना शिरजोर न होऊ देण्याला महत्व असते. आपल्यासोबत पक्षाला यशाकडे घेऊन जाणार्‍यांचा गोतावळा उभा रहाण्यावर कुठल्याही पक्षाच्या भवितव्याचा पाया घातला जात असतो. जो नव्या पिढीच्या नेतृत्वातून घातला जात असतो.

1 comment:

  1. ब्रिगेड ही जगातील सर्वात जहाल दहशतवादी संघटना जमाते इस्लामीचे पिलू आहे हा घ्या पुरावा

    http://muslimbrigade.blogspot.in/p/blog-page_27.html?m=0

    ReplyDelete