Saturday, December 31, 2016

आना-जाना लगाही रहता है

(४० वर्षापुर्वीचे चेहरे ओळख पाहू?)

nitish paswan lalu के लिए चित्र परिणाम

चोविस तास उलटण्यापुर्वीच पित्याने पुत्राला परत आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. एकप्रकारे त्याला समाजवादी परंपरा म्हणता येईल. कारण समाजवादी पक्षात फ़ाटाफ़ुट हा कायमचा शिरस्ता राहिलेला आहे. १९७७ सालात समाजवादी पक्ष नव्या जनता पक्षात विलीन झाला आणि त्याने आपले स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणले होते. पुढल्या काळात निदान पंधरा वर्षे देशात समाजवादी पक्षा अस्तित्वात नव्हता. कारण त्याचेच जनता पक्षात रुपांतर झाले होते आणि तोच फ़ाटाफ़ुटीचा आजार नंतर जनता पक्षाला लागला. जनता पक्ष स्थापन झाला, त्यातील मुळच्या समाजवादी गटातही अनेक दुफ़ळ्या होत्या. त्यातल्या राजनारायण गटाने चौधरी चरणसिंग यांच्याशी आणिबाणीपुर्व संगत केलेली होती. त्यांनी एकत्र येऊन भारतीय लोकदल नावाचा पक्ष स्थापन केला होता. पुढे तोही आणिबाणीनंतर जनता पक्षात सहभागी झालेला होता. तर मुळचा वेगळा राहिलेला दंडवते, लिमये, फ़र्नांडीस यांचा समाजवादी पक्षही जनता पक्षात सहभागी झाला. त्यामुळेच समाजवादी पक्ष १९७७ मध्ये अंतर्धान पावला होता. पण १९७९ सुमारास जनता पक्षातील मुळच्या जनसंघियांनी रा. स्व. संघाशी संबंध तोडावेत असा हट्ट राजनारायण यांनी सुरू केला आणि त्या जनता पक्षात बेबनाव सुरू झाला. त्यामुळेच फ़ुट पडली आणि समाजवाद्यांचा एक गट चरणसिंग राजनारायण यांच्यासमवेत बाजूला झाला. त्यातून सेक्युलर जनता पक्ष निर्माण झाला. तर दंडवते आदी मवाळ समाजवादी जनता पक्षातच कायम राहिले. पुढे विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या उदय झाल्यावर, हे सगळे गट एकवटले आणि त्यातून जनता दल नावाचा नवा समाजवादी अवतार अस्तित्वात आला होता. तर जनता पक्षातून वेगळा झालेल्या मुळच्या जनसंघियांच्या गटाने भाजपा नावाचा नवा पक्ष सुरू केला. पण समाजवादी पक्ष मात्र संपला होता.

जनता दलही फ़ार काळ टिकले नाही. त्याचेही तुकडे पडत गेले. बिहारचे लालूप्रसाद यादव यांनी वेगळी राष्ट्रीय जनता दलाची चुल मांडली, तर मुलायमनी समाजवादी जनता दल नावाचा वेगळा प्रकार सुरू केला. त्याचेच रुपांतर त्यांनी पुढल्या काळात समाजवादी पक्षात केले. दरम्यान राहिलेल्या जनता दलातही अनेक तुकडे पडत गेले. आज त्याचे देवेगौडा, शरद यादव, लालू वा पासवान असे अनेक भाग आहेत. खेरीज चौताला व अजितसिंग अशीही चुलत भावंडे आहेतच. पण त्यांनी समाजवादी असे नाव घेतलेले नव्हते. मुलायमनी जनता परिवार सोडताना नवी चुल मांडली, त्याला समाजवादी असे नाव दिले. अर्थात त्यात मुळच्या समाजवादी पक्षाचा विचार राहिला नाही की कार्यप्रणाली शिल्लक उरलेली नव्हती. एका एका नेत्याच्या भोवती घोटाळणारा घोळका अशीच या मुळच्या समाजवादी पक्षाच्या तुकड्यांची अवस्था झाली आहे. त्यात मोठ्या राज्यातले असल्याने मुलायमचे बळ मोठे होते. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदींनी मोठे यश मिळवल्यानंतर, या तमाम जुन्या समाजवादी नेत्यांना व गटांना एकत्र येण्याची इच्छा पुन्हा झाली होती. म्हणूनच त्यांच्या बैठकाही झाल्या आणि त्यांनी सर्वात अधिक ताकद व प्रभाव असलेल्या मुलायमना थोरपणा देऊन, नव्या राष्ट्रव्यापी पक्षाची स्थापना करण्याचा घाट घातला. तमाम नेत्यांनी एका बैठकीत नव्या पक्षाची घोषणा करण्याचे सर्वाधिकार मुलायमना दिलेले होते. पण मुलायमनी त्यांचा पुरता भ्रमनिरास केला. कारण बिहारच्या निवडणूका दाराशी आल्या असतानाही, मुलायम त्याविषयी चकार शब्द बोलायला राजी नव्हते. गतवर्षी त्या निवडणूकांना आपापल्या बळावर सामोरे जाण्याची वेळ लालू नितीश यांच्यावर आली. त्यांनी कॉग्रेसशी हातमिळवणी करून यशही संपादले. पण त्यानंतर मुळच्या समाजवादी गटांनी एकत्र येण्याची प्रक्रीया पुरती निकालात निघाली.

मध्यंतरी उत्तरप्रदेशच्या निवडणुका जवळ आल्यावर तसा प्रयास मुलायमनी सुरू केला होता. पण त्याचे कारण त्यांना मुलाने दिलेले आव्हान भेडसावत होते. समाजवादी पक्ष स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी एक सोहळा योजला होता. त्यात सर्व जुन्या सवंगड्यांना अगत्याने आमंत्रण दिलेले होते. पण एकत्र होण्याच्या कल्पनेलाच अर्थ राहिला नाही, या मताशी ठाम राहून नितीशनी त्याकडे पाठ फ़िरवली. पुन्हा हे तुकडे तसेच एकमेकांना पाण्यात बघत राहिले. गेल्या जुलै महिन्यापासून पक्षात भाऊबंदकी माजलेली होती. अनेक पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न शिवपाल यादव करीत होते. एका किरकोळ पक्षाला तर समाजवादी पक्षात विलीन करून घेण्याचा निर्णय झालेला होता. पण अखिलेश यांनी तो हाणून पाडला आणि तिथून हा बेबनाव वाढत गेला. अखिलेश भले समाजवादी पक्षातला नवखा चेहरा असेल. शिवपालही मुळच्या समाजवादी संस्काराने घडलेला नेता नसेल. पण दोघांमध्ये परस्परांशी पटवून न घेण्याची समाजवादी प्रवृत्ती ठासून भरलेली आहे. म्हणुनच असेल, त्यांनी ऐन निवडणूकांच्या वर्षातच धुमाकुळ घालायला आरंभ केला. गेल्या सप्टेंबर महिन्यात हे भांडण शिगेला जाऊन पोहोचले होते. तेव्हा अखिलेशाला पाठींबा देणारा म्हणून दुसरा भाऊ रामगोपाल यादव, याला मुलायमनी पक्षातून हाकलून लावले होते. पण डिसेंबर महिन्याच्या आरंभी ते निलंबन रद्द करून त्याला पुन्हा पक्षात आणले गेले होते. राज्यसभेतील त्याचे नेतेपदही कायम राखलेले होते. मग निवडणूकीचा आखाडा सुरू झाला. त्यात शिवपाल व अखिलेश यांच्या उमेदवारांच्या याद्या समोर आल्या आणि स्थिती हाताबाहेर गेली. दोन्हीतले उमेदवार घेत मुलायमनी समतोल राखण्याची कसरत केली. पण ती उपयोगी ठरली नाही. मग शनिवारी पुत्रासह रामगोपालना मुलायम्नी पक्षातून हाकलून लावले. आता समाजवादी पक्ष फ़ुटला हे जणू पक्के झाले.

पण रविवार उजाडला आणि दुपार होईपर्यंत सुत्रे कुठून हलवली गेली ठाऊक नाही. दुपारीच दोघांचेही निलंबन रद्द झाल्याची बातमी आली. दरम्यान सकाळपासून आमदारांचा ओढा अखिलेशकडे असल्याचे स्पष्ट झाले होते आणि सगळेच हातून निसटताना बघून मुलायमनी माघार घेतलेली असावी. अखिलेशनी पित्याला जबरदस्त शह दिला. त्याने पक्षातून फ़ुटण्यापेक्षा आपलीच हाकालपट्टी करणे मुलायमना भाग पाडले. थोडक्यात बळी घेतला गेल्याची सहानुभूती पुत्राने सहजगत्या मिळवली. शिवाय सत्ता त्याच्याच हाती असल्याने आमदार कार्यकर्तेही त्याच्याच बाजूला झुकले. हे पित्याला दाखवलेले प्रात्यक्षिक पुरेसे होते आणि मुलायमना शरणागती पत्करावी लागली. पण अशा हाणामारीत जनमानसात पक्ष एक विनोद होऊन गेला. कशासाठी काल इतक्या टोकाला गेलात आणि कोणत्या कारणास्तव पुन्हा एकत्र आलात; त्याचे खुलासे कोणी द्यायचे? काय घडते आहे, तेही पक्षाच्या प्रवक्त्यांना वाहिन्यांवर सांगता येत नव्हते. पित्याला बरोबर म्हणायचे तर पुत्र डुख ठेवणार आणि पुत्राची बाजू घ्यायची, तर उद्या पिता राग धरणार. सामान्य कार्यकर्त्याची त्यात तारांबळ उडालेली होती. मग जो पक्षाचा कार्यकर्ताही नाही, पण सहनुभूतीदार असतो; त्या मतदाराने काय अर्थ काढायचा? पण त्याची पर्वा कुठल्याही अस्सल समाजवाद्याला नसते. लोकशाहीत मतांना म्हणजे जनमानसातील प्रतिमेला महत्व असते, याचे भान मुळातच समाजवादी मंडळींनी कधी ठेवले नाही. एकविसाव्या शतकातील आणि तिसर्‍या चौथ्या पिढीतील समाजवादी तो वारसा मात्र झकास चालवित आहेत. याचीच ग्वाही पिता व पुत्राने दिली म्हणायची. अर्थात रामगोपाल व अखिलेश यांचे निलंबन मागे घेतल्याने हा विषय संपलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचारापर्यंत त्याचे पदसाद उमटतच रहाणार आहेत. कारण पक्ष समाजवादी असेल तर ‘आना-जाना’ लगाही रहता है ना?

2 comments:

  1. They are looking literally Goonda...

    ReplyDelete
  2. दंडवते, लिमये, फ़र्नांडीस
    यातील फर्नांडीस यांचे नाव नाव सध्या लोकांना माहित असेल...दंडवते म्हणजे मधु दंडवते, जे केंद्रीय मंत्री असताना देखील स्वतःचे कपडे स्वतः धूत असत हे कोणालाही ठाऊक नाही, कोणाचा विश्वास बसणार नाही.
    लिमये कोण?.... मधु लिमये... जे सर्व सुखाचा संसार सोडून बिहार मध्ये आदिवासींच्या प्रगती करता गेले ते... आज लोकांना सोनिया .. आणि रोबार्ट वडरा हीच नवे माहित आहेत. ...

    ReplyDelete