Tuesday, December 6, 2016

एकाकी राजकन्या

Image result for jayalalitha

सगळे ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असताना एकाकी पडलेली राजकन्या, आपल्याला केवळ मनोरंजक कथा कादंबर्‍यातच भेटत असते. पण वास्तवात असे काही असू शकेल, यावर आपला सह्सा विश्वास बसत नाही. अन्यथा अशी एक कथा आपण तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितामध्ये सहज बघू शकलो असतो. राज्यातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून ज्यांचा सतत उल्लेख गेली दोनतीन दशके होत राहिला; त्याच जयललितांना कोण जवळचा वा जीवाभावाचा होता? या प्रश्नाचे उत्तर कोणापाशी नाही. गेल्या दोडदोन महिन्यात त्यांच्या आजारपणाची बातमी देशभर गाजत होती. पण अशा हळव्या क्षणी कोणीही रक्ताचा वा जीवाभावाचा त्यांच्या जवळपास उपस्थित नव्हता. नाही म्हणायला दीपा नावाची एक भाची, आपल्या आत्याला भेटायला व तिच्या प्रकृतीची चौकशी करायला आलेली होती. पण तिलाही अपोलो रुग्णालयाच्या दारातून पोलिसांनी पिटाळून लावलेली होती. बाकी हजारो अम्मा भक्त जसे आपल्या लाडक्या नेत्याच्या आजाराविषयी माहिती घ्यायला उत्सुक होऊन रस्त्यावर ताटकळत उभे होते, त्याच घोळक्यात आत्याविषयी काही कळेल म्हणून दीपा घुटमळत होती. ही दीपा तरी कोणी अम्माची दुरची नातलग नव्हती. सख्खा भाऊ जयकुमारची मुलगी आणि तिचा जन्मही आजही अम्माचे वास्तव्य असलेल्या बंगल्यातच झालेला. पण तिलाही याअखेरच्या क्षणी अम्माच्या जवळपास फ़िरकता आले नाही. जिच्या शब्दावर तामिळनाडू डोलतो असे म्हटले जात होते, ती द्रविडी समाजाची सम्राज्ञी एकाकी होती. शुद्ध हरपल्यानंतर तिला अधिकच एकाकी व्हावे लागले. कधी तिच्या इच्छाआकांक्षा वा अपेक्षांची चर्चाच झाली नाही. राजकीय यशापयशाच्या गर्दीत ही स्वप्नाळू राजकन्या कुठल्या कुठे हरवून गेली. वास्तव जगात ती नेमकी कोण, हे तिचे तिलाही कळले नाही.

कर्नाटकात म्हैसुर जवळच्या एका गावात जन्मलेली एका ख्यातनाम वकीलाची ही गोंडस कन्या, आयुष्यात वकील व डॉक्टर होऊन नाव कमावण्याची स्वप्ने बघत होती. पण नियतीने तिला अशा झंजावातामध्ये आणुन सोडले, की अभिनय, चित्रपट आणि राजकारणाच्या साठमारीत ती कुठल्या आखाड्यात येऊन पोहोचली, ते तिचेही तिला कधी उमजले नाही. कोवळ्या वयात पित्याचे छत्र हरपले आणि दोन मुलांना घेऊन तिची विधवा आई संसाराचा गाडा ओढण्यासाठी चित्रपटाच्या जगाकडे ओढली गेली. किरकोळ भूमिका करताना कायम तिच्यासोबत कोवळी मुलगी असायची. आपल्या शालेय जीवनात प्रथम क्रमांक पटकावून उच्चशिक्षणाचे स्वप्न ती कन्या बघत होती. पण एका प्रसंगाने तिच्या आयुष्याला भलतेच वळण देऊन टाकले. एका चित्रणाच्या प्रसंगी बालकलाकार असलेली मुलगी आजारी असल्याने आली नाही. तर तिथेच बसलेल्या जयललिताला दिग्दर्शकाने कॅमेरापुढे उभी केली. तिने विनासायास केलेला अभिनय बघून सुखावलेल्या त्य दिग्दर्शकाने त्याच भूमिकेचा विस्तार करून या मुलीला गाण्यासह नाचही करायला लावले. तिथून या मुलीच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. घरची गरज व पैशाची चणचण, यामुळे त्या मोहातून बाहेर पडणे शक्य नव्हते आणि आपले खरे नाव गुंडाळून पंधराव्या वर्षी ‘जयललिता’ या नावाने ही नवी नायिका दाक्षिणात्य चित्रपटात सादर झाली. तेलगू, कन्नड व तामिळी चित्रपटातून लहनसहान भूमिका करताना जयललिता बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पण जोवर ती आईच्या छत्रछायेखाली होती, तोवर स्वप्नाळूच राहिली. मात्र आईचे निधन झाले आणि जयललिता एकाकी होऊन गेली. चित्रपटाचा भुलभुलैया आणि जीवनातले एकाकीपण, अशा झुल्यावर झुलताना ती कुटुंब आप्तेष्ट व प्रेमाची नाती यापासून दुर दुर होत गेली. कुटुंबाशी तिच्या नात्याचे धागे तुटत गेले.

चित्रपटातला तिचा लोकप्रिय नायक एमजीआर याच्याशी जवळीक झालेली होती. पण बाकी जीवन एकाकी होते. विवाहिताच्या मैत्रीने जगण्यातली पोकळी भरून येत नाही. निराशाही भेडसावत जाते. अशाच काहीशा स्थितीतून तारूण्य पार करतानाची वर्षे जयललितांनी काढली. पण पुढल्या काळात एमजीआर यांनीच राजकारणात पाय रोवला आणि मदतीसाठी जयललितांना पक्षात अगत्याने आणले. महत्वाचे पद दिले. राज्यसभेत सदस्य म्हणून दाखल झालेल्या जयललिताचे पहिले भाषण इंदिराजींचेही लक्ष वेधून गेले होते. चित्रपटाचे जग मागे पडले होते आणि राजकारणाच्या जीवघेण्या खेळात ही राजकन्या आलेली होती. सगळे ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असताना राजकारण सुरू झाले. ते जीव मेटाकुटीला आणणारे आणि माणूसकीला पारखे असलेल्या स्पर्धेचे होते. प्रेम-द्वेष शत्रू-मित्र अशा शब्दांना तिथे अर्थ नव्हता आणि त्यात टिकून रहाण्याच्या नव्या आव्हानाने या राजकन्येची निरागसता पुरती खरवडून काढली. पुरोगामीत्वाची पताका खांद्यावर घेऊन चालणार्‍या त्या द्रविडी राजकारणात तर महिलेला स्थानच नव्हते. पण एमजीआर यांच्या भक्कम पाठींब्यामुळे अण्णाद्रमुकमध्ये जयललितांना सन्मान मिळाला आणि पाय रोवून उभे रहाण्याची संधी मिळाली. मात्र आपल्या राजकीय आश्रयदात्याचा आकस्मिक मृत्यू जयललितांचा कडेलोट करणारा ठरला. स्वपक्षातून त्यांना हुसकून लावण्यात आलेले होते आणि प्रतिस्पर्धी द्रमुक पक्षाने तर थेट हल्ले करण्यापर्यंत, या राजकन्येला हैराण केलेले होते. त्यांना घाबरून पळ काढणे किंवा त्यांच्याशी दोन हात करून राजकारणावर मांड ठोकणे; इतकेच दोन पर्याय त्या राजकन्येसमोर होते. तिने दुसरा पर्याय निवडला आणि जगाला एक महिला किती कठोर व पोलादी निर्धाराने राजकीय नेतृत्व करते; त्याचा साक्षात्कार घडवण्याचा पवित्रा घेतला. जग त्या राजकन्येला नुकत्याच निवर्तलेल्या तामिळनाडूच्या अम्मा म्हणून ओळखते.

हे सगळे यश वा त्यातले चढउतार, त्याच निर्विकार चेहर्‍याने अनुभवलेल्या जयललिता, यांचे एकाकीपण त्यांना सहा दशकाहून अधिक काळ सोडून गेले नाही. आयुष्यात सामोरे आलेल्या प्रत्येक समस्या प्रश्नांना हिंमतीने तोंड देताना, या महिलेने मिळवले काय? या प्रश्नाचे उत्तर बहुधा कोणालाच कधी सापडणार नाही. कारण तिला काय मिळवायचे होते, तेच कुणाला आजवर कळलेले नाही. एका राज्याची सत्ता किंवा देशातील शक्तीमान महिला होऊन दाखवण्याची तिची महत्वाकांक्षा होती काय? पुरूषी अहंकारावरच अजून वाटचाल करणार्‍या दक्षिण भारताला, महिलेचा ‘पुरूषार्थ’ दाखवण्याची अनिवार इच्छा अम्माला इतक्या टोकाला घेऊन गेली होती काय? आपल्याच सख्ख्या भावाची कन्या व आपली भाचीही अंतिम क्षणी भेटायला ताटकळत असताना, ज्या पोलादी महिलेला काहीही करता आले नाही. तिला ह्या खडतर आयुष्यात काय मिळवायचे होते? पैसा, चैनीचे आयुष्य? अमर्याद सत्ता? लोकांवर हुकूमत गाजवण्याची लालसा? पुरूषांच्या अहंकाराला पायदळी तुडवण्याची इर्षा? कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. सहासात वर्षाच्या त्या बालिकेने बघितलेली कुठली स्वप्ने पुर्ण झाली? कुठली स्वप्ने पुर्ण करायची इच्छा राहून गेली? गेल्या कित्येक वर्षात कोणीही जवळचा रक्ताचा नातेसंबंधातला कोणी आसपास राहिला नव्हता. कोण कुठे आहेत, त्याचाही थांगपत्ता नव्हता. कोवळ्या वयातले ते सगळे स्वप्नाळू विश्वच पुढल्या वाटचालीत कुठल्या कुठे हरवून गेले आणि आपणच निर्माण केलेल्या नंदनवनातली ही एकाकी राजकन्या भयाण एकाकी जीवन कंठत राहिली. कोणी विश्वासातला नाही की कोणी जीवाभावाचा नाही. मनातले काही मोकळेपणाने व्यक्त करावे असा कोणी नाही; अशा जीवनाला माणसाचे जगणे म्हणता येईल काय? त्यासमोर अमर्याद ऐश्वर्य व सत्तेचे किती मोल असते? अम्मा खरी वास्तवात कोण होती? एकाकी उदासिन राजकन्या?

https://www.youtube.com/watch?v=78dkFyW-xQ4

1 comment:

  1. भाऊ ही गोष्ट वाचताना चित्रपट बघत असल्यासारखे वाटले सुंदर शब्द

    ReplyDelete