Saturday, December 10, 2016

झोपी गेलेला जागा झाला?

sharad pawar cartoon के लिए चित्र परिणाम

एक महिन्यापुर्वी अकस्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे हजाराच्या नोटा रद्द करून देशाला धक्का दिलेला होता. अशावेळी त्यांना चुकीचे ठरवायला टपलेल्या तमाम राजकीय पक्ष व नेत्यांनी अराजक माजवल्याची झोड उठवली होती. अशा संधी शोधतच जगणार्‍या अरविंद केजरीवाल किंवा राहुल गांधी, त्यावर तात्काळ तुटून पडले होते आणि त्यांनी विविध आरोप मोदी सरकारवर केलेले होते. इतरही विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली होती. पण या सगळ्या गदारोळापासून शरद पवार व त्यांचा राष्ट्रवादी पक्ष कटाक्षाने दूर राहिला होता. उलट पवारांसारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्याने धाडसी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांची पाठ थोपटली होती. नोटाबंदीचे स्वागत केलेले होते. म्हणूनच महिनाभर अन्य पक्षांनी रान उठवले असतानाही पवार आणि त्यांचे अनुयायी त्या गोंधळापासून दूर होते. प्रत्येक बॅन्केच्या बाहेर लागलेल्या मोठमोठ्या रांगा आणि कितीही वेळ घालवून जाणवणारी नोटांची टंचाई; याविषयी पवारांनी भाष्य केलेले नव्हते. नाही म्हणायला त्यांचा एकमेव आक्षेप होता तो अशा नोटाबंदीच्या व नोटाबदलीच्या कामातून सहकारी व जिल्हा बॅन्कांना वगळले म्हणून! त्याविषयी बोलतानाही साहेब जपून शब्द बोलले होते. काही सहकारी बॅन्कांनी पुर्वी गैरप्रकार केलेही असतील. त्यासाठी सर्वच सहकारी वा जिल्हा बॅन्कांना शिक्षा देणे योग्य नाही; असे पवार म्हणालेले होते. म्हणजेच नोटाबंदी वा त्यामुळे निर्माण झालेली चलनटंचाई याविषयी त्यांची अन्य काही तक्रार नव्हती. पण गेल्या रविवारी अकस्मात त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि एक चांगल्या निर्णयाची अपुरी अंमलबजावणी, अशी टिका करून पवारही मैदानात आले. त्यामुळे अन्य कोणी नाही तरी विरोधी पक्ष मात्र थक्क झाले असतील. कारण महिनाभर सर्वत्र गदारोळ चालू असूनही पवार त्यापासून पुर्णतया अलिप्त होते. मग रविवारी त्यांना कोणता साक्षात्कार घडला?

रविवारी साहेब आपल्या कर्मभूमीत आलेले होते. तिथे त्यांनी राष्ट्रीयकृत बॅन्केच्या शाखेत जाऊन नोटाबंदीची पहाणी केली. तिथल्या व्यवस्थापकांशी चर्चा करून कामकाजाची पहाणी केली आणि नंतर गांजलेल्या खातेदार नागरिकांशी थोडाकाळ संवाद साधला. त्यामुळे त्यांना नोटाबंदीने सामान्य जनतेची व ग्रामिण लोकांची दाणादाण उडाली असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. प्रामुख्याने ग्रामीण भागातील ९२ टक्के आर्थिक व्यवहार रोखीने म्हणजे चलनी नोटातून होतात, हेही साहेबांना प्रथमच अवगत झाले. ग्रामिण भागात पुरेशा नोटा नाहीत आणि म्हणूऩच मोठ्या प्रमाणात लोकांचे व्यवहार ठप्प झाले असल्याचेही अनुमान त्यांनी काढले. याला रिझर्व्ह बॅन्क व तिचा गलथान कारभार जबाबदार असल्याचाही निष्कर्ष त्यांनी काढला. पण त्यात नवे असे काय होते? जो शोध लावण्यासाठी पवारांना आपल्या कर्मभूमीत जाऊन एका राष्ट्रीयीकृत बॅन्केच्या शाखेला भेट द्यावी लागली, तो शोध व निष्कर्ष राहुल गांधी यांनी कुठेही न जाता, तीन आठवड्यापुर्वीच काढलेला होता. बॅन्केबाहेर ताटकळत थांबलेल्या रांगेतील लोकांशी बोलून, आपला निष्कर्ष राहुल बाबांनी तिथल्या तिथे वाहिन्यांच्या कॅमेरावर घोषितही केला होता. अशा चलनटंचाईमुळे अनेक कुटूंबाना आधी ठरलेले विवाह समारंभ उरकण्यात अडचणी झाल्या आहेत. शेतकर्‍यांना ऐन मोसमात बी-बियाणे व खते औषधे मिळताना मारामार होत आहे. ज्यांचा माल शेतात तयार झाला आहे, त्यांना बाजारात आणून विकणेही अशक्य झाल्याने दिवाळे वाजण्याचे संकट आलेले आहे. हे राहुलसह अनेकांनी दोनतीन आठवड्यापुर्वीच ओरडून सांगितलेले नाही काय? त्यावरून संसदेचे कामकाज वारंवार ठप्प करून टाकलेले नाही काय? मग तेच पडताळुन बघण्यासाठी साहेब आपल्या कर्मभूमीत बारामतीला आलेले होते काय? की त्यांना साक्षात्काराशिवाय ह्या साध्या गोष्टी कळेनाशा झाल्या आहेत?

बारामतीच्या बॅन्कशाखेला भेट देऊन जी माहिती घेतली व खातेदारांशी बोलून जे मतप्रदर्शन पवारांनी गेल्या रविवारी माध्यमांशी बोलताना केले; ते तीन आठवडे जुने आहे. कारण नोटाबंदीच्या घोषणेनंतर त्यातली प्रत्येक गोष्ट वाहिन्यांनी सतत आक्रोश करून सांगितलेली अशीच आहे. प्रामुख्याने जिल्हा बॅन्का व सहकारी बॅन्कांना या अंमलबजावणीतून वगळल्याने, ग्रामिण भागातील जनतेची तारांबळ उडाली हे सत्य आहे आणि सहकार क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या साहेबांना ते पहिल्याच दिवशी कळले होते. म्हणून त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेलीच होती. तरीही त्यांनी नोटाबंदीचे स्वागत केलेले होते. तेव्हा त्यांना या ग्रामिण जनतेची फ़िकीर नव्हती, की तिची तारांबळ दिसू शकली नव्हती? आपल्याला ग्रामीण भारताचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यात हयात खर्च केलेल्या पवारांना, या घोषणेचा अर्थ व ग्रामिण भागाची होऊ शकणारी तारांबळ ८ नोव्हेंबरलाच उमजायला हवी होती. किंबहूना उमजलेलीच होती. पण त्यांची तळमळ सामान्य ग्रामीण जनतेविषयी असण्यापेक्षाही, तिथे सोकावलेल्या सहकारमहर्षींसाठी होती. कारण अशा ग्रामीण भागातील मोठ्या आर्थिक अफ़रातफ़री सहकारी बॅन्कातूनच होत असतात आणि त्यांनाच नोटाबंदी व नोटाबदलीच्या एकूण व्यवहारापासून दूर ठेवण्यात आलेले होते. तसे केले नसते, तर मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा तिथेच खुलेआम जमा झाल्या असत्या.पर्यायाने एकूणच काळापैसा शोधण्याच्या मोहिमेला हरताळ फ़ासला गेला असता. तेच रोखायचे होते म्हणून जिल्हा बॅन्का व सहकारी बॅन्कांना बाजूला ठेवले गेले होते. त्याबद्दल पवारांनी तात्काळ नाराजी व्यक्त केली. पण त्यामुळे ग्रामीण जनतेची तारांबळ होईल, याविषयी अवाक्षर उच्चारलेले नव्हते. त्याबद्दल पवार आता बोलत आहेत. पण यापेक्षा भयंकर अशी ग्रामीण जनतेची तारांबळ सहकारी व जिल्हा बॅन्का बुडाल्यावर उडालेली होती. तेव्हा पवार काय बोलले होते का?

महाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्हा बॅन्कांनी लक्षावधी खातेदार ठेवीदारांच्या पैशाचा धुर केला आहे. त्यातले लाखो लोक अजून आपली कष्टाची रक्कम परत मिळण्यासाठी बॅन्कांच्या पायर्‍या झिजवत आहेत. तेही ग्रामिण जनता वा नागरिकच आहेत. ते लुबाडले गेले, त्याविषयी पवारसाहेब कधी दोन शब्द बोलले आहेत काय? लाखो ग्रामिण जनतेच्या कोट्यवधी रुपयांची राजरोस लूट झाली आणि राज्य सहकारी बॅन्केवर संचालक मंडळ हाकलून प्रशासक बसवला गेला; तेव्हा कोणाचे हाल झाले होते? त्यासाठी कुठल्या शाखेमध्ये जाऊन साहेबांनी व्यवस्थापकाची भेट घेऊन दुरावस्था बघितली होती काय? तिथे खेटे घालणार्‍या आशाळभूत ग्रामिण शेतकर्‍याच्या हालअपेष्टाची विचारपूस केलेली होती काय? त्या सर्व काळात साहेबांना कधी लुटला गेलेला शेतकरी आठवला नाही. इथे न बुडालेल्या पण उशिरा मिळणार्‍या हमखास पैशाची चिंता साहेबांना सतावते आहे. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? पैसे बुडवण्याविषयी पवार निश्चींत आहेत. पण जे पैसे चलनटंचाईमुळे उशिरा मिळत आहेत, त्यासाठी साहेबांचा जीव टांगणीला लागला आहे. ज्यांची ख्याती ठेवीदारांचे पैसे बुडवण्य़ाचीच आहे, त्या सहकारी जिल्हा बॅन्कांना बाजूला ठेवल्याबद्दल साहेबांना खंत आहे, परंतु अशा बुडवेगिरी करणार्‍यांना कटाक्षाने बाजूला ठेवल्याने होणार्‍या गफ़लतीपासून ग्रामिण अफ़रातफ़रींना पायबंद घातला जाणार; याचा त्यांना आनंद होऊ शकला नाही. हा अजब प्रकार नाही काय? गावगन्ना पैशाची मुजोरी करणार्‍यांची चिंता आणि खेड्यापाड्यातल्या बुडालेल्या सामान्य जनतेविषयी अनास्था; ही पवारांची ओळखच त्यांना महाराष्ट्राच्या निवडणूकातून पराभूत करून गेली. ते समजून घेण्यासाठी कुठल्या बॅन्केत जाण्याची गरज नाही. बुडीत बॅन्केच्या दारात आशाळभूतपणे ठेवी मिळण्याच्या आशेने जमणार्‍या गरीबाच्या केविलवाण्या नजरेत ते दिसू शकते. पण साहेबांना तिकडे बघायला सवड कुठे आहे? झोपी गेलेला ‘जाणता राजा’ जागा कधी व्हायचा?

3 comments:

  1. 100 चूहे खाके कटवाके चली हजको

    ReplyDelete
  2. भाऊ देशभरात कोट्यावधी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा सापडत आहेत त्या विषयी लिहा एखादा ब्लाँग

    ReplyDelete
  3. ' जाणता राजा '...पुढच्या वर्षी ' उपराष्ट्रपति ' होणार अशीच चिन्ह दिसतायत...!!

    ReplyDelete