Thursday, June 29, 2017

आभारी आहोत, हाशमीजी

shabnam hashmi teesta के लिए चित्र परिणाम

स्वत:ला समाजसेवी किंवा समाज हितकर्ते म्हणवून घेणारी एक जमात सध्या देशोधडीला लागलेली आहे. मागल्या दहापंधरा वर्षात त्यांची दुकाने फ़ार तेजीत चालली होती. त्यापैकीच शबनम हाशमी या एक आहेत. त्यांच्याइतक्याच ख्यातनाम तीस्ता सेटलवाड आजकाल कुठे गायब झाल्यात, त्याचा पत्ता नाही. अशा लोकांच्या टोळ्या देशभर पसरलेल्या आहेत आणि ते अधूनमधून आपल्या जुन्या नाटकाचे नव्या संचामध्ये प्रयोग सादर करीत असतात. गुजरातच्या दंगलीने त्यांना मोठीच संधी दिली होती. पण त्याचा अशा लोकांनी इतका अतिरेक केला, की लोकांनी त्यांच्या समवेत त्यांच्या राजकीय प्रायोजकांनाही राजकारणातून हद्दपार करून टाकलेले आहे. पण सवयीचे गुलाम कधी सुधारत नाहीत. त्यामुळेच आता शबनम हाशमी यांनी त्यांचा कुठलासा पुरस्कार परत देण्याचे नाटक नव्याने आरंभले आहे. त्यांच्यामागून इतर कोण कोण पुरस्कार परत करतात, ते बघायचे. दिड वर्षापुर्वी अशीच एक स्पर्धा जो्रात सुरू झालेली होती. दिल्लीनजिक दादरी येथे एका मुस्लिम गृहस्थाला गोमांस खातो अशा संशयावरून जमावाने घरात घुसून ठार मारण्याची दुर्दैवी घटना तेव्हा घडलेली होती. अशा घटना वेळोवेळी अनेक प्रांतात घडत असतात. तेव्हा यापैकी कोणा समाजसेवकाला उमाळा आलेला नव्हता. आताही अधूनमधून केरळात विविध जागी संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्येचा सपाटा चालला आहे. पण त्याची दखल घेऊन एक निषेधाचे पत्रक काढण्याची इच्छाही या हाशमी बाईना झालेली नव्हती. त्यांना कुठे कोण मुस्लिम मारला जातो याची प्रतिक्षा होती आणि हरयाणातील जुनैद नामक मुस्लिम तरूणाची भोसकून हत्या झाल्यावर उमाळा आला. तात्काळ त्यांनी आपला पुरस्कार परत करण्याची डरकाळी फ़ोडून टाकली. पण हा पुरस्कार त्यांना मिळालाच कशाला होता, त्याची कोणी चर्चा करत नाही.

गुजरात दंगलीत त्यांनी म्हणे फ़ार अप्रतिम काम केले व दंगलपिडीतांना न्याय देण्यासाठी अफ़ाट कार्य केले; म्हणून अल्पसंख्य आयोगाने त्यांना हा पुरस्कार दिला होता. तो पुरस्कार २००८ सालात मिळाला आणि तेव्हा देशाची सत्ता युपीएपाशी होती. ज्या युपीए सरकारने इशरत जहान ह्या तोयबा पुरस्कृत तरूणीच्या हत्येसाठी गुजरात पोलिसांना आरोपी बनवण्याचे कारस्थान शिजवले, त्यानेच हाशमी यांना पुरस्कार दिलेला होता. यातच सर्व काही आले. इशरत ही पाकिस्तानची हस्तक होती. तरीही तिला निर्दोष ठरवून तिचा इतिहास शोधणार्‍या राजेंद्रकुमार नावाच्या गुप्तचार अधिकार्‍याला गुन्हेगार ठरवण्यासाठी युपीए सरकार अहोरात्र कष्ट घेत होते. शिवाय गुजरात सरकार व पोलिसांना गुन्हेगार ठरवण्यासाठी हाशमी व सेटलवाड अखंड राबत होते. त्यामुळे यांना कसला व कशाला पुरस्कार मिळाला होता, ते लक्षात येऊ शकते. उलट त्याच काळात हिंदू दहशतवाद नावाचा एक भ्रम अगत्याने पसरवला जात होता. त्याही कामी असे समाजसेवी लोक सरकारला हातभार लावत होते. त्यांना पुरस्कार कशासाठी मिळालेला असू शकतो? आता त्याला आठ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पण अजून कुठलाही हिंदू दहशतवादाचा पुरावा यापैकी कोणी समोर आणू शकलेला नाही. पण त्यासाठी मालेगावचा बॉम्बस्फ़ोट व त्यात गोवलेले लोक यांचा सातत्याने वापर झाला. हा हिंदूफ़ोबिया ज्यांनी आजवर पोसला, त्यात हाशमी आघाडीवर राहिलेल्या आहेत आणि त्याच फ़ोबियातून इसिस सारख्या दहशतवादी संघटना जगभर हिंसा करीत आहेत. त्यांनी इस्लामोफ़ोबिया असा आरोप करून आपला पुरस्कार परत केला असेल, तर त्यांच्याकडून मोठेच पवित्र कार्य झाले असे म्हणायला हवे. कारण जोवर अशी दिशाभूल करणारी व समाजात गैरसमज पसरवणारी मंडळी देशात उजळमाथ्याने वावरत असतात, तोवर देशातील लोकसंख्येला सुरक्षित जगता येणार नाही.

काश्मिरात अनेक पोलिस व सुरक्षा रक्षक मुस्लिमांचीच अलिकडे लागोपाठ हत्या झालेली आहे. कालपरवा मशिदीच्या आवारात शेकडोच्या जमावाने महंमद अयुब नामक पोलिसाची ठेचून हत्या केली, तेव्हा हाशमी यांना कळवळा वाटल्याचा कुठला पुरावा आहे काय? अयुबही मुस्लिम होता आणि जुनैदही मुस्लिमच आहे, पण हाशमीबाई अस्वस्थ तेव्हा होतात, जेव्हा बिगर मुस्लिमाकडून मुस्लिम मारला जातो. मुस्लिमच मुस्लिमाकडून मारला गेला, तेव्हा हाशमीबाई ईद साजरी करत पक्वान्ने झोडत होत्या काय? तेव्हा त्यांच्याकडून चकार शब्द का उच्चारला गेला नाही? काश्मिरात वा केरळात अनेक हिंदूचे मुडदे पाडले गेले आहेत. ज्यांच्या हाती हत्यारे आहेत, अशा सैनिकांची हत्या झालेली आहे. तेव्हा यापैकी कोणाला जंतरमंतर येथे जाऊन आक्रोश करावा अशी बुद्धी होत नसेल, तर बुद्धी तरी कशाला म्हणायचे? मुस्लिम मारला गेला म्हणून ओवायसीने चिडावे किंवा बगदादीने बदल्याचा इशारा द्यावा, त्यापेक्षा हाशमी यांची भूमिका किती वेगळी आहे? त्यांच्यासारख्या तथाकथित सुबुद्ध म्हणवून घेण्यार्‍यांना कधी अन्य कुठल्या हत्याकांडाने उमाळा आलेला आहे काय? कालिचक या बंगालच्या तालुक्यात जमावाने पोलिस ठाणेच पेटवून दिले आणि अनेक हत्या केल्या. त्यात मारले जाणारे बहुतांश हिंदू होते. ज्यांची दुकाने व घरे जळून खाक झाली, तेही हिंदू होते. पण मालदा जिल्ह्यातील त्या पिडीतांसाठी ढाळायला यांच्यापाशी दोन तरी अश्रू होते काय? नसतील, तर त्यांचा आक्रोश निव्वळ नाटक असते आणि त्यांची बुद्धी विकृत असते, असेच मानायला हवे. किंबहूना असल्याच विकृतीला कंटाळून लोकांनी नरेंद्र मोदी यांना देशाची सत्ता सोपवलेली आहे. ज्या कारणाने देशातील बहुतांश मतदाराला मोदींची ओळख झाली, ती ओळख करून देण्यात शबनम हाशमी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासारख्यांनी गुजरात दंगलीतील तथाकथित पिडीतांच्या न्यायासाठी काही केलेच नसते, तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते. या दांभिकतेला कंटाळूनच लोकांनी मोदींना कौल दिलेला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात देशामध्ये शेकड्यांनी दंगली झालेल्या आहेत आणि त्या गुजरातपेक्षाही भयंकर होत्या. अगदी गुजरातमध्येही भाजपाचे सरकार येण्यापुर्वी सातत्याने दंगली होत राहिल्या आहेत. मोदींच्या कारकिर्दीत झाली ती शेवटची दंगल होय. त्यानंतर मागल्या चौदा वर्षात तिथे एकही दंगल होऊ शकली नाही. सहाजिकच अशा समाजसेवी लोकांचा, मढ्यावरचे लोणी खाण्याचा धंदा अगदी बुडीत गेलेला आहे. त्यामुळे त्यांना काय करावे हेच सुचनासे झालेले आहे. अशा पुरस्कार वापसीने बिहार विधानसभेचे निकाल बदलले, अशी त्यांची समजूत असल्याने, पुन्हा नव्या दमाने त्यांनी जुन्या नाटकाचा प्रयोग आरंभला असेल तर बिघडत नाही. कारण अशा भंपक पुरस्कारवापसी वा निदर्शनांना आता सामान्य जनता किंमत देत नाही. त्यातला धंदा लोकांनी ओळखला आहे. ज्यांना काश्मिरात वा बंगाल केरळात मारल्या जाणार्‍या निरपरधांसाठी दोन अश्रू ढाळता येत नाहीत, त्यांच्या माणुसकीवर कोण विश्वास ठेवणार? पण एक गोष्ट साफ़ आहे. त्यांच्या अशा प्रयत्नांमुळेच मोदींना यश मिळालेले आहे आणि जितकी अशी नाटके अधिक होतील, तितका मोदींचा लाभच होणार आहे. कारण आता मुस्लिम वस्ती व भागातही या नाटकाचा लोकांना कंटाळा आलेला आहे. हे लोक आपल्या मृत्यू व यातनांवर गिधाडासारखे मेजवानी झोडतात, हे आता मुस्लिमांच्याही लक्षात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी नवनवी वा जुनीपुराणी नाटके रंगवण्याने काहीही बिघडणार नाही. त्यांचीच उरलीसुरली पत बाजारात शिल्लक उरणार नाही. कितीही वेगवेगळे मुखवटे त्यांनी पांघरले, तरी त्यांचा चेहरा लोक ओळखू लागले आहेत. म्हणूनच त्याला कोणी फ़सायचे दिवस राहिलेले नाहीत. मोदी सत्तेत असल्याने कोणाचे मुडदे पडत नसतात आणि पुरोगामी सरकार असल्याने मुस्लिम वा हिंदू सुरक्षित होत नसतात, हे आता अडाण्यांनाही उमजलेले आहे.

6 comments:


 1. देशात जे काही खुन हत्या किंवा दंगली होतात त्या मोदिनी करवल्या नाहीत
  किंवा करणाऱ्यानां अभय दीलेले नाही
  ह्या बुध्दीवंताना हे कळत नाही का??
  कळत नसेत तर हे बुद्धीवंत आहेत कि बुध्दुवंत???

  ReplyDelete
 2. Block all Illegal finances of these fringe elements.

  ReplyDelete
 3. सफदार हाश्मी हिचाच नवरा होता वाटते हे त्याची बायको म्हणून समाजसेविका म्हणायचे तिला अर्थाह हे डावे लालकरी आहेत असजी ढोंगे हा स्थायी स्वभाव आहे कम्युनिस्टांचा

  ReplyDelete