Wednesday, May 9, 2018

सोनियाजी का धावल्या?

Image result for sonia in vijapur

सोनिया गांधी अकस्मात आपली निवृत्ती विसरून कर्नाटकच्या प्रचारात कशाला उतरल्या आहेत? जन्मदाती आई भारतीय असो किंवा इटालीयन असो, तिची ‘माया-ममता’ सारखीच असते आणि पोराला कोसळताना ती बघू शकत नाही. म्हणून तर प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी कर्नाटकच्या विधानसभा प्रचारात उडी घेतली आहे. दोन वर्षापुर्वी उत्तरप्रदेश स्वबळावर जिंकण्याचा मनसुबा त्यांच्या लाडक्याने बांधला होता आणि त्यासाठी प्रशांत किशोर नावाच्या शकुनी मामाला हाताशी धरलेले होते. तेव्हा त्या मोहिमेतील ‘खाटपे चर्चा’ या उपक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी माऊली वारणाशीला पोहोचली होती. पण अतीव उन्हाळ्यामुळे प्रचार गुंडाळून त्यांना स्थानिक इस्पितळात दाखल करावे लागले होते. त्यानंतर सोनियाजी प्रचारातून बाजूला झाल्या आणि त्यांनी एकामागून एक विधानसभा प्रचाराच्या मोहिमा सुपुत्रावर सोपवल्या होत्या. राहुलनीही आपली सर्व शक्ती पणाला लावून एक एक राज्य व सत्तापद गमावण्याचा पराक्रम करून दाखवला आणि आता कर्नाटक सोडल्यास गमावण्यासारखे काही उरलेले नाही. तेव्हा माता चिंतातूर झाल्यास नवल नाही, कर्नाटकही हातचा गेला तर गमावण्यासारखे काही शिल्लक उरणार नाही, अशी भिती त्यांना वाटली असावी. कारण कर्नाटकच्या मतदानाला चार दिवस आणि प्रचाराला दोन दिवस बाकी असताना खुद्द सोनिया मैदानात आल्या आहेत. यामागचे योगायोगही लक्षात घेण्यासारखे आहेत. २०१९ आपल्या लाडक्याला पेलवणार नसल्याची माऊलीला खात्री पटलेली असावी. त्यामुळेच प्रकृतीची काळजी बाजूला ठेवून त्यांनी कर्नाटकला धाव घेतली आहे. चार महिन्यापुर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रे पुत्राकडे सोपवताना सोनिया काय म्हणाल्या होत्या आठवते? आता माझ्या निवृत्तीची वेळ आली आहे. मग कर्नाटकात त्या कशासाठी येऊन पोहोचल्या आहेत?

गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणून थेट शिंगावर घेण्यापासून सोनियांची खरी कारकिर्द सुरू झालेली होती. तिथपासून मागल्या पंधरा वर्षात त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही आणि देशाची सत्ता पुन्हा कॉग्रेसच्या हाती आणताना लहानसहान डझनभर राज्यातही पुन्हा पक्षाला सत्तेत आणून बसवले होते. पण २०१४ मध्ये पक्षाची सुत्रे हळूहळू राहुल गांधींकडे सोपवत गेलेल्या सोनियांनी, आपले अंग पक्षकार्यातून काढून घेण्याचा सपाटा लावला होता. मात्र या चार वर्षात राहुलनी पक्षाचा व एकूण राजकारणाचा अपेक्षेपेक्षा विचका करून टाकला. ते जगाला ओरडून सांगणे शक्य नसले तरी परिणामातून सुटका नसते. म्हणून तर जिथे तोल जातो तिथे धाव घेऊन सावरण्याची पळापळ सोनियांना करावी लागत असते. आताही कर्नाटकात त्यांनी अजिबात लक्ष घातले नव्हते. गुजरात हिमाचलकडे तर साफ़ पाठ फ़िरवली होती. पण बहुधा कर्नाटकातून लोकमताचे जे अंदाज सोनियांना पक्षाच्या सुत्रांकडून आलेले आहेतअ. ते शुभसुचक नसल्यानेच त्यांनी आपली निवृत्ती गुंडाळून शेवटच्या टप्प्यात कर्नाटकला धाव घेतली. त्याचा साफ़ अर्थ असा आहे, की कॉग्रेसला पुन्हा सत्ता वा बहूमत मिळण्याची शक्यता संपल्याची त्यांनाही खात्री पटलेली आहे. त्यातून निदान भाजपाला बहूमत मिळू नये इतकीच त्यांची अपेक्षा असावी. ते काम राहुलच्या आवाक्यातले नसल्यानेच दस्तुरखुद्द मातोश्री मैदानात आल्या आहेत. कारण कर्नाटक हे नाव घेण्यासारखे शेवटचे मध्यम राज्य कॉग्रेसच्या हाती उरलेले आहे आणि तिथेही भाजपाने बाजी मारली, तर डिसेंबर महिन्यात होणार्‍या तीन राज्यातल्या विधानसभा जिंकण्याच्या अपेक्षेला सुरूंग लावला जाईल आणि पुढल्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेत तर कॉग्रेस पक्ष लढतीमध्येही शिल्लक उरणार नाही. सोनियांना त्याच भयाने मैदानात यायला भाग पडलेले आहे.

२०१४ आणि २०१९ या पाच वर्षात एक मोठा राजकीय फ़रक पडलेला आहे. तेव्हा नरेंद्र मोदी सत्तेला आव्हान देणारा उमेदवार होता आणि कॉग्रेस सत्तेतला राष्ट्रीय पक्ष होता. आता चार वर्षांनी भाजपा त्यापेक्षा मोठा राष्ट्रीय पक्ष झाला असून नरेंद्र मोदी देशव्यापी नेता झाले आहेत. जागतिक ओळख त्यांना मिळालेली आहे आणि त्यांची प्रतिमा व्यक्तीपेक्षाही भव्यदिव्य होऊन गेली आहे. दुसरीकडे कॉग्रेस सत्ताभ्रष्ट झाली आहे आणि दोनचार राज्यातही तिचे राज्य उरलेले नाही. ममता. चंद्रशेखर राव वा नविन पटनाईक यां प्रादेशिक पक्ष व नेत्यांपेक्षा स्पर्धात्मक राजकारणात कॉग्रेसची किंमत अधिक उरलेली नाही. हे भाजपाने म्हटले तर गोष्ट वेगळी होती. पण ममता वा इतर अनेक प्रादेशिक नेतेही कॉग्रेसला योग्य जागा दाखवू लागलेले आहेत. कालपरवाच ममतांनी जाहिरपणे कॉग्रेसला तिची पायरी दाखवली. मोदी विरोधी आघाडीत सहभागी व्हायचे असेल, तर इतर पक्षांप्रमाणेच कॉग्रेसला आमच्यासोबत यावे लागेल. राष्ट्रीय पक्ष म्हणून थोरल्या भावाच्या रुबाबात आघाडीत येऊन चालणार नाही. हे ममतांचे बोल बोलके आहेत आणि ते सोनियांच्या कारकिर्दीत ममता कधी बोलू धजल्या नव्हत्या. पण आज त्या जाहिरपणे बोलत आहेत आणि त्याचे एकमेव कारण राहुल हेच आहे. इतर विरोधी पक्ष व प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची लवचिकता राहुलना एकदाही दाखवता आलेली नाही. तीच कॉग्रेससाठी २०१९ सालची खरी समस्या आहे. एका बाजूला सोनिया युपीएचे पुनरूज्जीवन करून मोदी विरोधाचे नेतृत्व कॉग्रेसच्या हाती राखायला धडपडत आहेत आणि दुसरीकडे राहुलच्या वागण्यामुळे एकामागून एक प्रादेशिक पक्ष दुरावत चालले आहेत. त्यात आणखी कर्नाटकात उत्तरप्रदेशप्रमाणे कॉग्रेस नामोहरम झाली, तर २०१९ मध्ये लढायला काहीच शिल्लक उरणार नाही. म्हणून सोनिया कर्नाटकला धावल्या आहेत.

उत्तरप्रदेश स्वबळावर जिंकण्यासाठी आधीपासून रणनिती आखली आणि तिचा राहुलने बोर्‍या वाजवला होता. मग अखेरच्या काळात समाजवादी पक्षाशी आघाडी केल्यावर कॉग्रेससहीत त्याही मित्रपक्षाचा बोजवारा उडाला. आता तर त्या मोठ्या राज्यात नाव घेण्याइतकेही कॉग्रेस आमदार निवडून आलेले नाहीत. त्याची पुनरावृत्ती कर्नाटकात झाली तर? म्हणजे निकालाच्या दिवशी नुसती सत्ता व बहूमत जाण्याच्याही पलिकडे कॉग्रेस तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकली गेली तर? ही शक्यता कोणी विचारातही घेतली नाही, म्हणून अशक्य नाही. मागल्या विधानसभेत सत्तेतला भाजपा एका आकड्याने सेक्युलर जनता दलाच्या मागे पडलेला होता. मग आताही भाजपाला बहूमत मिळून त्यात जनता दलाने दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळवल्या, तर काय होईल? तसे काही झाले तर बाकीचे पुरोगामी व प्रादेशिक पक्ष कॉग्रेसची दादागिरी खपवून घेण्याची बिलकुल शक्यता नाही. नेमक्या अशा मुहूर्तावर राहुलनी आपणच विरोधकांचा पंतप्रधान असल्याच्या थाटात केलेली घोषणा, आगीत तेल ओतणारी आहे. त्यावर शरद पवार यांच्यापासून येऊ लागलेल्या प्रतिक्रीया बोलक्या आहेत. त्यामुळेच पोराच्या ‘दिवे लावणी’ने व्याकुळ झालेली माऊली कर्नाटकाला धावली आहे. सोनियांचे कर्नाटकात धावणे कॉग्रेस सत्ता गमावत असल्याचे लक्षण आहे. पण याक्षणी सत्ता वाचवण्यापेक्षा राष्ट्रीय पक्ष म्हणून मोदी विरोधातील नेतृत्व टिकवण्याची कसरत अधिक जाणवते. कर्नाटकात सत्ता मिळाली नाही. तरी निदान विरोधी पक्ष म्हणून दुसरा क्रमांक टिकवण्याची धावपळ करण्यासाठीच सोनिया मैदानात आलेल्या असाव्यात. अन्यथा त्यांनी गुजरातप्रमाणेच इथेही लक्ष घातले नसते. सोनियांच्या या धावपळीचे रहस्य निकालाच्या दिवशी उलगडू शकेल. मात्र आज राहुलच्या घोषणेचे कौतुक करणार्‍यांचे चेहरे त्या दिवशी पुरते आंबट झालेले असतील.

6 comments:

  1. Why always target Congress.They doing wrong things leave them.

    ReplyDelete
  2. भाऊ एक मात्र नक्की की काहीतरी विचित्र होऊ घातले आहे असे वाटते. मायावतीनी देवेगौडना कर्नाटकात पाठिंबा दिला आहे. इथे सुद्धा विरोधक एकी दाखवू शकले नाही. शिवाय इतर बातम्या येत आहेत त्या फार चांगल्या नाहीत. उदा. बोगस votar कार्ड, बीजेपी मधील काही लोकांचे उलट सुलट विधाने, जागतिक पाटावर भारताबद्दल चांगल्या बातम्या. काय समजायचे?
    सामान्य माणूस मात्र अजून नोट बंदीवर नाराज असल्याचे काही भाडोत्री चॅनल मुद्दाम दाखवून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मधेच जातीय रंग यात आहेच. असे वाटते की या सर्व लोकांना चांगले काम नकोच आहे. मोदी द्वेष सगळीकडे पसरवणे सुरू आहे. सोनिया गांधी मोदींना भ्रष्टाचार उखडून टाकण्यात अपयश आले आहे. पण हे विधान करताना आपण 10 वर्षे राज्य करत होतो व आपण करू शकलो नाही हे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. फक्त मोदी अपयशी आहेत हे सर्व लोकांना ओरडून सांगायचे आहे. केम्ब्रिज अनलिटकाचे हे सर्व कारस्थान आहे असे वाटते.
    एकबाजूला 2019 हे वर्ष सर्वाना अक्कल शिकवून जाईल असे वाटते. तो पर्यंत वाट बघू.

    ReplyDelete
  3. छान विश्लेषण...
    बोललेलं व न बोललेलं यांचे निरीक्षण व विश्लेषण आपण आपल्या अनुभवातून​ त्यांची छान मांडणी करतात...

    ReplyDelete
  4. भाऊ
    मातेला पुत्रांची काळजी असतेच . पोरगं वेड आसेल, लंगड , लुळा पांगळा बावळट कसं ही आसेल तरी आई काळजी करतेच . इथे तर अत्यंत हुशार कर्तबगार आहे मग आईनी काय करावं बिच्चारी आई

    ReplyDelete
  5. अतिशय छान पद्धती ने साध्या वाटणाऱ्या घटने चा गर्भित अर्थ सांगितला

    ReplyDelete
  6. निकाल काहीही लागला तरी राहुलचा नैतिक विजय असेल.

    ReplyDelete