सातारा येथे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला व बेबनाव संपवण्यासाठी गेलेले शरद पवार पत्रकारांना भेटले. तिथे रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नेहमीच्या पत्रकार परिषदेचा जामानिमा न करता त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. नंतर तो कार्यक्रम उरकून निघताना मात्र गडबड झाली. ज्या दालनात पवार होते, त्याचे बाहेरचे दारच उघडेना. बाहेरून काहीजण दार उघडायला झुंजत होते आणि आतूनही प्रयत्न चालले होते. खुद्द शरद पवार यांनीही प्रयास केला, पण उपयोग झाला नाही. अखेरीस दार तोडूनच बाहेरचा मार्ग खुला करावा लागला. या घटनेचे माध्यमात खुप कौतुक झाले. बातम्याही खुप रंगल्या. पण त्याच पत्रकार संवादात पवारांनी एक महत्वाची प्रतिक्रीया दिली, ती साफ़ दुर्लक्षित राहिली. योगायोग असा, की पवारांची सातारा भेट होण्याच्या आदल्याच दिवशी राहुलनी कर्नाटकात पत्रकारांशी बोलताना आपण २०१९ साली पंतप्रधान व्हायला तयार असल्याचे सांगून टाकले. त्यावर माध्यमात खुप गदारोळ झालेला होता. सातार्यातही पत्रकारांनी पवारांना त्याविषयी छेडले. तेही स्वाभाविक होते. कारण राहुल पंतप्रधान व्हायचे असतील, तर त्यात पवारांचा सहभाग अपरिहार्य आहे. कारण आज कॉग्रेस स्वबळावर पंतप्रधान निवडू शकत नाही, की सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. इतर लहानमोठ्या पुरोगामी व प्रादेशिक पक्षांची मोट बांधल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचणे शक्य नाही. म्हणूनच या बाबतीत पवारांची प्रतिक्रीया निर्णायक महत्वाची आहे. खरेतर त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रीया मुरब्बी राजकीय अभ्यासकासारखी आहे. पण दुर्दैव असे, की माध्यामातील कुणाही शहाण्याला त्याची योग्य दखल घेऊन त्यावर चर्चा करण्याची बुद्धी सुचली नाही. तो विषय छेडला जाताच पवार मनापासून हसले आणि म्हणाले, बाजारात तुरी म्हणतात, त्यातला प्रकार आहे.
अलिकडल्या काळात अशा मराठी उक्ती फ़ार कमी ऐकू येतात. पण राहुलच्या पंतप्रधान होण्याविषयीची इतकी नेमकी व दुखण्यावर बोट ठेवणारी प्रतिक्रीया वा टिप्पणी अन्य कोणी केली नाही. राहुल यांना इतर पक्ष मान्यता देतील काय? त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाणारे बहूमत मिळेल काय? कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकसभेत निवडून येईल काय? अशी खुप चर्चा झाली. पण जमिनीवरची वास्तविकता काय आहे? त्याचा मागमूस अशा चर्चांमध्ये नव्हता. कुठल्याही कल्पना वा योजना आखताना किंवा तसा विचार करताना हाताशी काय साधने आहेत, त्याचे भान राखावे लागते. चुलीसाठी चार दगड जवळ नसताना उंच मनोरे बांधण्याचे स्वप्न हास्यास्पद असते. आज कॉग्रेस स्वबळावर लोकसभा जिंकू शकत नाही, कारण तिच्यापाशी कुठल्याही राज्यात स्वबळावर बहूमत जिंकण्याचीही क्षमता शिल्लक उरलेली नाही. अशावेळी मित्र सहकारी गोळा करावे लागतात आणि त्यांनाही विश्वासात घ्यावे लागते. राहुल गांधी मागल्या चार वर्षात त्या दिशेने एकही पाऊल टाकू शकलेले नाहीत. म्हणूनच २०१९ साली पंतप्रधान होण्याची भाषा हास्यास्पद आहे, असेच पवारांना म्हणायचे आहे. ज्यांच्या बळावर किंवा पाठींब्यावर राहुल पंतप्रधान होण्यापर्यंत मजल मारतील, त्यांनाच ही कल्पना हास्यास्पद वाटते आहे, असे पवारांना या उत्तरातून सुचवायचे आहे. पण त्यासाठी त्यांनी वापरलेल्या मराठी म्हणीचा आशय त्यापेक्षाही महत्वाचा आहे. बाजारात तुरी म्हणजे, कशाची कशाशी सांगड नाही आणि गमजा फ़ुकाच्या चालल्या आहेत. किंबहूना अशी विधाने करणार्या राहुलना संसदीय लोकशाही किंवा तिची कार्यपद्धतीही ठाऊक नाही, असेच पवारांना सुचवायचे आहे. तेही योग्य आहे. किंबहूना राहुलच्या घोषणेचे यापेक्षा उत्तम आकलन अन्य कोणालाच झालेले नाही. पक्षाचे अध्यक्षपद वारश्याने मिळते तसे पंतप्रधानपद नाही, हे राहुलला ठाऊकच नाही काय?
दहा वर्षे देशाची सत्ता राबवणार्या कॉग्रेस पक्षापाशी कुठलेही बहूमत नव्हते आणि भाजपा विरोधामुळे जे काही पक्ष सहकारी म्हणून सोबत राहिले, त्यामुळे कॉग्रेस पक्षाचा पंतप्रधान होऊ शकला. आज त्या युपीएची लोकसभेतील शक्ती किती आहे? लोकसभा वा विविध राज्यात युपीएचे संख्याबळ काय आहे? त्यांच्याकडून लोकसभेत किती सदस्य निवडून आणले जाऊ शकतात? ५४३ सदस्यांच्या सभागृहात २७२ इतके खासदार ज्याच्या पाठीशी उभे रहातील, त्यालाच पंतप्रधान पदावर दावा करता येतो. ह्या मूलभूत गोष्टी राहुलना ठाऊकच नाहीत काय? असतील तर असा दावा करण्यापुर्वी त्यांनी कुठला हिशोब मांडलेला आहे? इतर पक्षांच्या मदतीने तितका पल्ला गाठणेही शक्य आहे. पण त्यासाठी कॉग्रेसला किमान सव्वाशे दिडशे जागा तरी आपल्या म्हणून जिंकता आल्या पाहिजेत. आज इतक्या जागा जिंकण्याच्या स्थितीत कॉग्रेस पक्ष आहे काय? कुठल्या राज्यातून कॉग्रेस २०-२५ खासदार निवडून आणू शकेल? तशी किमान सहासात राज्ये तरी असायला हवीत. आज किती राज्यात कॉग्रेस स्थानिक विधानसभेत बहूमत मिळवून राज्य करते आहे? कर्नाटकसहीत चार राज्यात कॉग्रेसच्या हाती सत्ता असून तिथून लोकसभेत जाणार्या सदस्यांची एकूण संख्या ४५ पेक्षा अधिक नाही. मग २७२ चा पल्ला कुठल्या बळावर व कुठून गाठला जाणार आहे? पवारांनी या प्रश्नावर केलेले मुक्त हास्य त्याचे उत्तर आहे. बाजारात तुरी याचा अर्थ तुरी बाजारात असल्याचीही हमी नाही, तशी निव्वळ समजूत वा भ्रम आहे. तेवढ्या आधारावर कोणी पंतप्रधान व्हायच्या गोष्टी करीत असेल, तर त्याला शहाणा मानता येणार नाही, इतकाच त्या प्रतिक्रीयेचा अर्थ होतो. ज्या मित्रपक्षांचा पाठींबा कॉग्रेसने गृहीत धरलेला आहे, त्यात राष्ट्रवादीचा समावेश असून त्याचेच सर्वेसर्वा शरद पवार राहुलची अशी खिल्ली उडवणार असतील, तर वास्तव किती भयंकर आहे ना?
पण अशा शेलक्या शब्दात पवारांनी कोणाला जोडे मारलेत, हे बहुधा पत्रकारांच्याही लक्षात आलेले नसावे. म्हणूनच त्यांच्या त्या विधानाची गंभीर दखल घेतली गेलेली नसावी. हे विधान पवारांनी राहुल वा त्यांच्या कॉग्रेसमधील भाटांसाठी उच्चारले असावे, असाच बहुतांशी समज होतो. पण बारकाईने बघितले तर कॉग्रेस नेत्यांपेक्षाही या घोषणेने अनेक पत्रकार संपादकांना उकळ्या फ़ुटल्या आहेत. जणू राहुल जबाबदारी घ्यायला राजी नाहीत, म्हणून मोदी-शहा जिंकत चालले आहेत अशी अनेक राजकीय पत्रकारांची गोड समजूत आहे. त्यामुळेच राहुलनी पंतप्रधान होईन म्हणतातच त्यांना गुदगुल्या झाल्या. पण पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक बहूमत वा संख्याबळाचा कुठे पत्ता नाही. म्हणून उगाच हवेत मनोरे बांधण्यात अर्थ नाही, असे पवारांनी या माध्यमातील शहाण्यांना जोडे मारले आहेत. पंतप्रधानपद राहुल यांच्या प्रतिक्षेत बसलेले नाही, तर अतिशय कष्ट उपसून बहूमत मिळवण्याची त्यात अट आहे. त्याचे भान सोडून नुसत्या घोषणेने सुखावण्याची गरज नाही, हे वेगळ्या सुचक शब्दात पवारांनी पत्रकारांना सुनावले आहे. ते साहेबांचे अनुभवाचे बोल आहेत. मागले पाव शतक पवार स्वत:च पंतप्रधानकीच्या शर्यतीत होते आणि जुळवाजुळव झाली नाही, म्हणून मागे पडले. अलिकडेच त्यांनी संख्याबळ महत्वाचे किती ते सांगताना म्हटले होते, दहाबारा खासदारांच्या पक्षाने पंतप्रधानकीची स्वप्ने बघायची नसतात. तेच अनुभवाचे बोल त्यांनी उधळलेल्या संपादक पत्रकारांना सुनावलेले आहेत. पन्नास पाऊणशे खासदारांची मजल मारताना थकणार्या पक्षाने हे स्वप्न बघणे हास्यास्पद आहे, असाच पवार यांच्या विधानाचा अर्थ आहे. तो राहुलच्या बुद्धीला उमजणारा विषय नाही. पण पत्रकारितेचे बुद्धीवादी काम करणार्यांची अक्कल कुठे पेंड खायला गेलीय? असाच प्रतिप्रश्न पवारांनी हसतखेळत विचारलेला आहे. पण पवार हातावर तुरी देऊन निसटले तरी पत्रकार मात्र हॉलमध्ये तुरी शोधत बसले होते.
भाऊ एकूणच सध्याच्या पत्रकार ह्या वर्गाबद्दल त्यांची कीव करावी अशीच परिस्थिति आहे.समोर दिसणार्याक परिस्थितीवर,नेत्यांच्या उत्तरातून योग्य अर्थ काढायला तेव्हडी परिपक्व बुद्धी पाहिजे.ती कुठून आणायची ? त्यातून मराठी वाहिनीवर आपले तारे तोडणारी स्वयंभू “अंकर” मंडळी तर कहर करतात. त्यांना काहीच समजत नाही.अनेक वेळा नेते मंडळी त्यांची प्रछन्न चेष्टा करतात. असो- कालाय तस्मै नमः हेच खरे
ReplyDeleteपवार साहेबांच्या भाषेत सांगायचे झाले तर पत्रकार म्हणजे"रिकामा कोणीतरी कुठेतरी तुंबड्या लावी"अशी गत झाली आहे.
ReplyDelete