सुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्यापासून आम्ही एक भूमिका ठामपणे मांडलेली होती, की राज्यपालांचा निर्णय कोणीही बदलू शकत नाही. त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. घटनेने मुख्यमंत्री निवडीचा अधिकार राज्यपालाला दिलेला आहे. पण मुख्यमंत्र्यापाशी असलेले बहूमत तपासणे वा सिद्ध करण्याचे काम राज्यपालाचे नाही. म्हणूनच त्यात कोर्ट कुठला हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र नव्या मुख्यमंत्र्याला बहूमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या अवधीत कोर्ट काटछाट करू शकते. झालेही तसेच. कोर्टाने १५ दिवसाची मुदत छाटून शनिवारीच म्हणजे तीन दिवसातच बहूमत सिद्ध करण्याचे बंधन येदीयुरप्पा यांना घातले. म्हणूनच शपथविधी रोखण्यासाठी वा राज्यपालाचा निर्णय बदलण्यासाठी कॉग्रेसने केलेला द्राविडी प्राणायाम शुद्ध मुर्खपणा होता. त्यासाठी मध्यरात्री जाऊन सुप्रिम कोर्टाला जागरण घडवणे हा शतमुर्खपणा होता. मुदत घटवण्यासाठी दुसर्या दिवशी सकाळीही कोर्टात जाता आले असते. मध्यरात्रीचा तमाशा करण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा कुठलाही वेगळा निर्णय आलेला नाही. मग कॉग्रेसला आपला विजय कुठून व कशामध्ये दिसतो आहे? मग हा सगळा आटापिटा कशासाठी, हा प्रश्न शिल्लक उरतो. कॉग्रेसची जाहिर भूमिका व बढाया खर्या असतील, तर त्यांना तितके घायकुतीला येण्याची गरज नव्हती. पण तशी तारांबळ कॉग्रेसची उडालेली आहे आणि त्याचे खरे कारण आपल्याच आमदारांवर कॉग्रेस जनता दलाचा विश्वास नसावा. त्यातले किती दगाबाज आहेत आणि किती शत्रूपक्षाला मिळालेले आहेत, त्याची भिती कॉग्रेसला भयभीत करत असावी. यातला खरा घातपाती कॉग्रेसमध्ये कोण आहे? येदींयुरप्पा बहूमत सिद्ध(रामय्या) करणार काय?
शनिवारी बहूमत सिद्ध करण्याची छातीठोक ग्वाही देताना भाजपा पलिकडे आपले ११ समर्थक आमदार असल्याचे सांगतो आहे. हे आमदार कॉग्रेसचे असावेत असे मानले जाते. त्या आमदारांना थेट भाजपाचा कोणी भेटल्याचे वृत्त नाही की अफ़वाही नाही. मग भाजपाचा आत्मविश्वास कुठून आलेला असू शकतो? कोणीतरी कॉग्रेस जनतादलाच्या गोटात असा बसलेला आहे, की जो तिथे बसून भाजपाच्या गरजेनुसार सुत्रे हलवित असावा. असा कोण असू शकतो? या निकालात सर्वाधिक महत्व गमावणारा माणूस आहे सिद्धरामय्या! त्यांनी आपले बहूमतच नव्हेतर सत्ताही गमावलेली आहे. कॉग्रेसची सत्ता नव्हेतर सिद्धरामय्यांचे मुख्यमंत्रीपद संपुष्टात आलेले आहे. पुन्हा निवडणूका झाल्या तरी त्यात सिद्धरामय्यांना कुठले इतके महत्वाचे पद मिळण्याची शक्यता संपलेली आहे. अशा स्थितीत पक्षासाठी त्यांनी निकालापुर्वीच मुख्यमंत्रॊपद सोडायची तयारी दर्शवली होती आणि दलित नेत्याला ते पद देण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. जे आपल्याला मिळणारच नाही, ते अन्य कोणालाही देण्याची तयारी त्यागाचा दाखला नसतो. थोडक्यात मतमोजणीपुर्वीच सिद्धरामय्यांनी सत्ता गमावलेली होती आणि जे आपल्याला मिळणारच नाही, ते अन्य कुणालाही मिळाले, म्हणून त्यांना फ़रक पडत नाही. पण जे गमावले आहे, ते आपल्या कट्टर शत्रूला मिळू नये, इतकी तर त्यांची अपेक्षा असेल ना? सिद्धरामय्यांचा कट्टर शत्रू येदीयुरप्पा असतील, तर त्यांची संधी हुकण्यासारखे समाधान दुसरे असू शकत नाही. पण येदींपेक्षा अधिक मोठा कोणी शत्रू असेल, तर त्याचे नुकसान महत्वाचे ठरते आणि तसा शत्रू येदींपेक्षा कुमारस्वामी आहे. कारण याच देवेगौडापुत्रामुळे सिद्धरामय्यांना २००५ सालात आपले उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागलेले होते. थोडक्यात येदींपेक्षा मोठा शत्रू कुमारस्वामी आहे आणि त्याचा विचका हा पराभूत सिद्धरामय्यांसाठी अपयशातला विजय ठरू शकतो.
सिद्धरामय्या मुळचे जनतादलाचे नेते. कॉग्रेसने सत्ता गमावली तेव्हा भाजपा सर्वात मोठा पक्ष होता आणि त्याला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी देवेगौडांनी कॉग्रेस पक्षाला पाठींबा देऊन कर्नाटकात संयुक्त सरकार स्थापन केलेले होते. त्यात कॉग्रेसचे धर्मसिंग मुख्यमंत्री तर जनतादलाचे सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री झालेले होते. ते सरकार पाडण्याचे डावपेच कुमारस्वामी खेळले व त्यांनी जनता दलाच्या आमदारांना सरकारमधून बाहेर पडायला लावले. मग उरलेल्या ४० महिन्यात २०-२० महिने भाजपा व जनता दलाला मुख्यमंत्रीपद देण्याचा सौदा झालेला होता. त्यात कुमारस्वामी प्रथम मुख्यमंत्री झाले, तर येदीयुरप्पा उपमुख्यमंत्री झाले. त्या गडबडीत सिद्धरामय्यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. पुत्रप्रेमाने गप्प राहिलेल्या देवेगौडांना झुगारून मग सिद्धरामय्यांनी कॉग्रेसमध्ये आश्रय घेतला. सात वर्षे ते वनवासात गेले आणि अखेरीस २०१३ सालात कॉग्रेसचे नेतृत्व करीत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांना सात वर्षे वनवासात पाठवणारे येदी नव्हते, तर कुमारस्वामी होते. अशा दगाबाजाला आपल्याच त्यागातून पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला हातभार लावणे, कोणाला आवडू शकते? सिद्धरामय्यांची मानसिक स्थिती आज काय असू शकते? येदीयुरप्पा सत्तेच्या बाहेर बसणे त्यांना सुखदायक वाटेल, की कमी आमदार असून कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी बसणे समाधान देऊ शकेल? ही दुखरी बाजू लक्षात घेतली, तर पहिल्याच दिवसापासून कॉग्रेसमधले दहाबारा आमदार नाराज कशासाठी आहेत वा कुमारस्वामींच्या विरोधात कशाला आहेत, त्याचा उलगडा होऊ शकतो. कॉग्रेसच्या आमदारांमध्ये सहभागी राहून जे काम भाजपासाठी सिद्धरामय्या करू शकतात, असा दुसरा कोणी भाजपाचा हस्तक असू शकत नाही. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्याच माजी मुख्यमंत्र्यावर कॉग्रेस गोटात कोणी शंकाही घेऊ शकत नाही ना?
निकालाचे चित्र स्पष्ट झालेले नव्हते आणि सगळे आकडे साफ़ समोर आलेले नव्हते, इतक्यात कॉग्रेसश्रेष्ठींनी परस्पर जनतादलाला म्हणजे कुमारस्वामींना मुख्यमंत्री करायला पाठींबा जाहिर केला. त्यात सिद्धरामय्यांचा परस्पर बळी दिला गेलेला आहे. पण तेव्हाच कॉग्रेस आमदार नाराज असल्याच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या. त्याचा बोलविता धनी कोण असू शकतो? कोणीतरी कॉग्रेस गोटात बसलेलाच तशी सुत्रे हलवू शकतो ना? कॉग्रेसचे काही आमदार गायब होणे, एका हॉटेलात जमवून ठेवलेल्यापैकी दोन आमदार निसटणे. ह्या गोष्टी तर्कापलिकडल्या आहेत. कुछ तो गडबड है भाई! भाजपाने कॉग्रेस जनतादलाच्या कुठल्याही आमदारांना फ़ोडण्याचा वा संपर्क साधण्याचा प्रयास केल्याची एकही भक्कम बातमी नाही. मग कॉग्रेसच्या तंबूतली घबराट आतला कोणी घरभेदी असल्याचीच ग्वाही देणारी आहे. सध्यातरी दुसरा कोणी शंकास्पद माणूस दिसत नाही. डझनभर नवोदित आमदार कुमारस्वामी विरोधात कशाला असू शकतात? त्यांच्यावर या गौडापुत्राने कुठला अन्याय केलेला नाही. मग इतक्या घाऊक संख्येने आमदारांची नाराजी कोणा ज्येष्ठ कॉग्रेस नेत्याची नाराजी असू शकते आणि असाही एकच कॉग्रेसचा प्रभावी नेता आहे. भाजपाच्या बहूमताचा सगळा डोलारा त्याच्याच खांद्यावर पेललेला असू शकतो. म्हणूनच प्रसिद्ध-रामय्या आणि सिद्ध-रामय्या असे दोन चेहरे आहेत. त्यात कॅमेरासमोर येणारा प्रसिद्धरामय्या किती खरा आहे, ते येदींचे बहूमत फ़सले तर दिसेलच. पण येदीनी बहूमत सिद्ध केले तर त्याचा मानकरी वास्तवात (सिद्ध)रामय्याच असू शकतो. यातला कुठला चेहरा विश्वासार्ह आहे आणि कुठला भ्रामक मायावी आहे, त्याचा खुलासा शनिवारी बहूमताचा निर्णय समोर आल्यावरच होऊ शकेल. तोपर्यंत टिव्हीच्या पडद्यावर दिसणारा सिद्धरामय्या निरखून अभ्यासण्याची गरज आहे.
You are great bhau
ReplyDeleteअचानक न्यायपालिका प्रामाणिक आणि विश्वासू दिसते ;)
ReplyDeleteभाऊ यु आर सिंप्ली ग्रेट
ReplyDeleteभाऊ, सुंदर विश्लेषण. आपला तर्क जर खरा झाला तर कोणतीतरी सिदधी आपणास प्राप्त झालेली आहे हे मान्य करावे लागेल.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteएकदम सुक्ष्म निरीक्षक आहात भाऊ
ReplyDeleteमस्तच ! माझ्या डोक्यात पण हाच विचार आला होता ! बघूया उद्या काय होत ते !
ReplyDeleteएकदम सटीक....जास्तीत जास्त संभाव्य भाकीत....! सिद्ध बिभीषण...!!
ReplyDeleteव्वा भाऊ
ReplyDeleteआभारी आहोत, हे पहिल्याच दिवशी सांगितलं असतत तर आम्हांला तीन दिवस विचार करत बसावं लागलं नसत
आता आम्ही निश्चिंत झालो
नमो नमः
सर तुम्ही एकदम वास्तववादी तर्कशुद्ध निरक्षण आहे. ह्या गुढ गोष्टी कोणत्या तर्कशास्त्रा मध्ये नसाव्यात हे जन्मजातच तर्कज्ञान हवे.... सलाम भाऊ
ReplyDelete१००% खरं आहे भाऊ, त्यांची body language hi सगळं सांगुन जाते
ReplyDeleteअशक्य भाऊ सिद्धरामय्या असणे शक्य नाही। लिंगायत आणि हिंदू धर्मात फूट पडणारा माणूस लिंगायत येडी ना बर पाहणार नाही। उद्या भाजप हरणार
ReplyDelete👌👌👌👍👍
DeleteInteresting analysis
ReplyDeleteवारांगनैव नृपनीतिरनेकरूपा|
ReplyDeletePerfect analysis.
ReplyDeleteभाऊ गेले अनेक ठोकताळे चुकले की हो...!
ReplyDeleteअसो, परत फॉर्म मध्ये या लवकर.. खूप अपेक्षा आहेत लोकांना तुमच्या तर्कशुध्द लिखाणावर..
अशक्य भाऊ सिद्धरामय्या असणे शक्य नाही। लिंगायत आणि हिंदू धर्मात फूट पडणारा माणूस लिंगायत येडी ना बर पाहणार नाही। उद्या भाजप हरणार
ReplyDeleteकाय झाले ?हेच होणार हिंदू धर्म विरोधात जे जे शक्य होईल ते खुळचट काँग्रेसचे लोक करत जाणार। इथे प्रश्न सिद्धरामय्या चा नाही राहुल आणि सोनिया आणि खुळचट धर्मनिरपेक्ष लोकांचा आहे।