Tuesday, May 8, 2018

लाडावलेल्या पोराचे कौतुक

Image result for rahul cartoon mummy

२०१९ सालात कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला तर तुम्ही पंतप्रधान होणार काय? कर्नाटकात प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला असता, त्यांनी ‘नक्कीच होईन’ असे उत्तर दिले. त्याचा अन्वय राहुल पंतप्रधान होणार वा व्हायला तयार असल्याचा लावून, माध्यमात लगेच गदारोळ सुरू झाला. त्यापैकी कोणा पत्रकाराला सर्व काही गंभीरपणे ऐकण्याची वा समजून घेण्याची गरज वाटली नाही. राहुलनी स्वत: होऊन आपण आगामी लढतीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार आहोत असे कुठेही म्हटलेले नाही. त्यांनी तशी परिस्थिती आली तर आपण तयार असल्याचे म्हटले आहे. ह्या बोलण्यातला होकार नकारार्थी आहे, हे मुळात समजून घेतले तरच राहुलच्या विधानाचे विश्लेषण होऊ शकते. जेव्हा एखादा खेळाडू मैदानात उतरतो, तेव्हा तो लढतीच्या पवित्र्यात असतो. आपल्याला पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्या पदावर जाऊन आपण काय करू, असे राहुलनी एकदाही कुठे म्हटलेले नाही. आपण पंतप्रधान होणे ही या खडप्राय देशाची गरज आहे, असे त्यांच्या बालपणीचेच संस्कार असतील, तर तो त्यांना हक्क वाटतो आणि पुढे पुढे ते सामान्य जनतेवरचे उपकार वाटतात. आता राहुलच देशाला वाचवू शकतात, अशी कॉग्रेसजनांची अपेक्षा आहे. राहुलना सातत्याने तेच ऐकावे लागत असेल, तर त्यांनी कृपावंत होऊन होकार भरला, तर नवल नाही. सारखेच पत्रकार मागे लागतात आणि पक्षातले लोकही बोलतात, तर त्यांच्यावर मेहरबानी करण्यासाठी राहुलनी पंतप्रधान व्हायला होकार भरला आहे. पण तशी त्यांची इच्छा नाही की महत्वाकांक्षा नाही. पराक्रम वा विक्रम गाजवण्यासाठी जी इर्षा लागते, त्याचा त्यांच्या वागण्याबोलण्यात संपुर्णपणे अभाव आहे. त्यांना आपली जबाबदारी म्हणून काही करण्याची इच्छा नाही. लोकांना उपकृत करण्यासाठी ते जगत असतात. मग २०१९ साली काय होईल?

आधुनिक लोकशाहीत निवडणूका ह्या पुर्वीच्या लढाईतील मोहिमांसारख्याच असतात. त्यात जिंकण्याचा इर्षेने उडी घ्यावी लागत असते. गंमत वा मौज म्हणून कोणीही निवडणूका लढवू शकत नाही की जिंकू शकत नाही. आपले सर्वस्व झोकून द्यावे लागत असते आणि विजय मिळाल्यावर काय करायचे, त्याचाही आराखडा आपल्यापुढे असावा लागतो. राहुल गांधी त्याबाबतीत संपुर्ण उदासिन आहेत. मागल्या चौदा वर्षापासून हा इसम राजकारणात आहे. पण पुढाकार घेऊन त्यांनी काही केलेले दिसले नाही. जुलमाचा रामराम असल्यासारखे राहुल सार्वजनिक जीवनात वावरत असतात. आधी त्यांना युपीएची सत्ता असल्याने चिंतेचे कारण नव्हते. वडिलार्जित जागेवरून निवडून येण्यात कसली अडचण नव्हती की आव्हान नव्हते. पण चार वर्षापुर्वी पक्षाच्या व घराण्याच्या हातून सत्ता गेली. ते समजायला राहुलना पहिली दोन वर्षे गमवावी लागली. मागल्या दोन वर्षापासून त्यांनी विरोधी पक्ष म्हणून हातपाय हलवणे सुरू केले. पण विरोधक म्हणजे काय करायचे तेही त्यांना ठाऊक नव्हते, की अन्य काय करायचे त्याचा सहकार्‍यांना थांगपत्ता नव्हता. सहाजिकच जुन्या विरोधकांची नक्कल करण्यात उरलेली दोन वर्षे खर्ची पडली आहेत. त्यात सत्ताधार्‍यांवर बेछूट आरोप करणे आणि तोंडी येईल ती विधाने करण्याचे नवनवे पराक्रम राहुलनी पार पाडले. आताही पक्ष संसदेत मोठा ठरला तर पंतप्रधान होऊ शकेन, असे त्यांनी म्हटलेले आहे. पण पक्षाला संसदेत मोठा करणे वा बहूमत मिळवून देण्यासाठी काय करणार, त्याविषयी अवाक्षर राहुल बोललेले नाहीत. विरोधी पक्ष मोदी विरोधात एकवटत आहेत आणि पर्याय म्हणून आपण उभे आहोत, असेही म्हणायचे धाडस राहुलना करता आलेले नाही. मग २०१९ साली पंतप्रधान होणार म्हणजे काय? सगळी गंमतच होते ना? कॉग्रेसचा अध्यक्ष होणे आणि पंतप्रधान होणे यात काहीच फ़रक नाही काय?

आपण कुठल्याही खेळातले वा राजकारणातले उदाहरण घेऊ. त्यात उतरणारे कधी ‘जमले तर’ अशी भाषा बोलत नसतात. पाकिस्तान वाईट खेळला, तर आम्ही जिंकून दाखवू, असे धोनी वा विराट कधी बोलल्याचे आपण ऐकले आहे काय? स्पर्धा जिंकली तर विश्वचषक स्विकारायला पुढे जाईन, असे जगातला कुठला कर्णधार बोलताना आपण ऐकले आहे काय? स्पर्धेत उतरणार्‍या प्रत्येक संघाच्या कर्णधाराचे तेच तर ध्येय असते. निवडणूकीत उतरणार्‍या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री वा पंतप्रधान व्हायचे असते आणि त्याच स्पर्धेत तो असतो. बहूमत मिळाले तर वा सर्वात मोठा पक्ष झाला तर, अशी भाषा ममता वा अखिलेशकडून कोणी ऐकली आहे काय? नसेल तर राहुल गांधी बोलतात, त्यात किती गांभिर्य शिल्लक उरते? त्यातला बालीशपणा कोणी बघू शकत नसेल, तर राजकीय विश्लेषणाचाच बोर्‍या वाजला असे म्हणावे लागेल. घरातल्या लाडावलेल्या पोराने आईमावशीच्या मनधरणीला द्यावे, तसे हे उत्तर नाही काय? आजी भरवणार असेल तर जेवीन म्हणावे, त्यापेक्षा राहुलच्या उत्तरात कोणता वेगळा आशय आहे? आपल्याला पंतप्रधान व्हायचेच आहे आणि मोदींच्या कारकिर्दीत देशाचा झालेला बट्ट्याबोळ आपणच सुधारू शकतो, असा आत्मविश्वास त्या विधानात आहे काय? मोदींना आव्हान देण्यासाठी आज देशातले सर्व राजकीय पक्ष एकत्र व्हायला धडपडत असताना मोदींना हरवणे सोपे राहिलेले नाही, हे शेंबड्या पोरालाही कळू शकते. अशावेळी आपणच एकमेव पर्यायी नेता असू शकतो, हे छातीठोकपणे सांगता आले पाहिजे. नव्हेतर त्यातून हाच आपला पर्यायी नेता असू शकतो असा आत्मविश्वास अन्य पक्षांच्या मनात जागवता आला पाहिजे. इतकेही ज्या व्यक्तीला अजून उमजलेले नाही, तो पंतप्रधान व्हायला तयार आहे म्हणजे काय? आजी वा आईने बनवलेली खीर आहे की लाडू आहे? की भरवला तर खाईन म्हणावे!

लोकशाही स्विकारलेल्या या खंडप्राय देशातली जनता आपल्या मताच्या बळावर उलथापालथ घडवून आणु शकते आणि आजवर त्याची अनेकदा प्रचिती आलेली आहे. अशा जनतेला कोणा प्रेषिताची गरज नाही, की कुणा राजपुत्राच्या मेहरबानीसाठी इथला मतदार लाचार नाही. जो लोकांसमोरची आव्हाने पेलण्यासाठी पुढे येतो, त्याला संधी देऊन भारतीय कौल देत असतात. तशी संधी त्यांनी आजवर अनेकांना दिलेली आहे. विश्वनाथ प्रतापसिंग वा मोरारजींपासून नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांना मतदाराने आजमावलेले आहे. त्यापैकी कोणी जनतेवर मेहरबानी करण्यासाठी पंतप्रधान झालेला नाही. सत्ता गमावल्यावर नामोहरम झालेल्या इंदिराजींनी काबाडकष्ट उपसून पुन्हा पंतप्रधानपद मिळवले होते आणि त्यांनी आपणच पर्याय असल्याचे ठामपणे मतदाराला पटवलेले होते. राहुलना आपल्या आजीचा वारसा हवा आहे. पण त्यातले कष्ट नको आहेत. इंदिराजी अन्य पक्षांच्या मागे नाकदुर्‍या काढत फ़िरत नव्हत्या. चार दशकापुर्वी योगायोगाने याच महिन्यांमध्ये स्वपक्षातील सुभेदारांनाही झुगारून त्यांनी मुठभर निष्ठावंतांना हाताशी धरून इंदिरा कॉग्रेस अशी वेगळी चुल मांडली होती. आज राहुल त्याच पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण त्यांना पदाची उब कळली तरी आजीचे कष्ट वा लढण्याची इर्षा आत्मसात करता आलेली नाही. ‘मोठा पक्ष झाला तर, वेळ आली तर’, ही भाषाच पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. मग शब्दही तसेच आकार घेतात. बहूमत मिळवीन आणि पक्षाला सत्तेवर आणीन, असे राहुल एकदाही बोलत नाहीत. विरोधक एकत्र येत आहेत. जनतेला मोदी नको आहेत, ही भाषा जिंकणारी नसते. महत्वाकांक्षेची नसते. मतदाराला आपल्या पंतप्रधान होण्याची भिक घालण्याची मुजोरी त्यात साफ़ दिसते आणि तीच राहुलसह कॉग्रेसी निवडणूक राजकारणाची समस्या आहे. उडवाउडवीची अशी उत्तरे राजकारणातील उथळपणाच सिद्ध करतात.

2 comments:

  1. उत्तम
    कॉग्रेसचा अध्यक्ष होणे आणि पंतप्रधान होणे यात काहीच फ़रक नाही काय?

    ReplyDelete
  2. मोदींची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पक्षाने नियुक्ती केली होती 2014 च्या प्रचार मोहिमेत मोदी पक्षाला बहुमत द्या म्हणून जीवाचे रान करत होते कोठेही मला पंतप्रधान करा असे अवाक्षरही त्यांनी काढले नव्हते.गांधी घराण्यातील असल्याने आपणच पंतप्रधान पदाचे नैसर्गिक उमेदवार आहोत असा राहुल गांधींचा समज झाला असावा.यालाच म्हणतात सुंभ जळतो पण पीळ जळत नाही. काँग्रेसचे अनेक राज्यात नेतृत्व घरानेशहांच्याच हातात आहे उदा सचिन पायलट अशोक चव्हाण जोतिरादित्य शिंदे राजीव सातव पृथ्वीराज चव्हाण इत्यादी,तर दुसरीकडे अमित शहा प्रत्येक राज्यात नवीन पिढीतील कर्तबगार माणसे पुढे आणत आहेत अशा स्थितीत काँग्रेसचे भविष्य काय असणार आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही

    ReplyDelete