Wednesday, May 16, 2018

मोरयेक बुच

kumaraswami gulam nabi के लिए इमेज परिणाम

मंगळवारी विधानसभेची मतमोजणी सुरू झाल्यावर कॉग्रेसला आपल्या हातून सत्ता जाणार हे लक्षात आलेले होते. पण अशावेळी काय करावे याचे भान श्रेष्ठी म्हणवून घेणार्‍या एकालाही नव्हते. रणनिती वा युद्धनितीमध्ये दोन बाजू काळाजीपुर्वक लक्षात घ्याव्या लागतात. एक बाजू असते आपल्या दुबळ्या जागा व आपल्या हाती असलेली अस्त्रे. त्याचवेळी दुसरी बाजू विसरून चालत नाही. ती दुसरी बाजू असते ती शत्रू वा प्रतिस्पर्ध्याच्या जमेच्या बाजू व दुबळी स्थाने. कॉग्रेसला याविषयी काही ठाऊक नसल्याचेच कर्नाटकात दिसून आले. अहंकाराने पछाडलेली माणसे आपल्या बळाचा चलाखीने उपयोग करण्यापेक्षा अहंकाराच्या आहारी जाऊन आत्मघात करून घेतात. ते शत्रूच्या हातचे खेळणे होऊन जातात व प्रतिस्पर्ध्याने लावलेल्या सापळ्यात अलगद येऊन अडकतात. कर्नाटकात आपली सत्ता जाणार हे निश्चीत झाले असताना भाजपाला सत्तेपासून रोखण्यापेक्षा आपल्या हाती जितके आमदार लागतील, त्यांना सुरक्षित जागी हलवण्याला प्राधान्य होते. कॉग्रेस नेते त्यापेक्षा जनता दलाला पाठींबा देऊन भाजपाला अपशकून करण्यात गर्क होते. पण ज्या आमदार संख्येच्या बळावर आपण अपशकून करणार आहोत, त्या आमदारांची देखभाल व हमी घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. म्हणून हे लोक जनतादल व कुमारस्वामींच्या मनधरण्या करण्यात गर्क राहिले आणि शत्रू गोटाला कॉग्रेससहीत जनता दलाच्या नवनिर्वाचित आमदारांशी संपर्क साधण्याची मोकळीक देण्यात आली. सगळी गडबड आता तिथेच होऊन गेलेली आहे. मालवणी भाषेत म्हणतात ‘दार उघडा नि मोरयेक बुच’! नेमकी तशीच काहीशी स्थिती आज कॉगेसची होऊन गेलेली आहे. कारण राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचे दावे करताना निवडून आलेले नवे आमदार श्रेष्ठीच्या मुठीत राहिलेले नाहीत, बेपत्ता झालेत. त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.

घराबाहेर पडताना कोणी चोरी करील म्हणून आपण दाराला कडीकुलूप लावतो. ते दार उघडे ठेवायचे आणि मोरीच्या भोकातून झुरळे वा उंदिरघुशी घरात येतील, म्हणून त्याला अगत्याने बुच लावायचे, असा हा मुर्खपणा आहे. मंगळवारी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसला, तरी निवडणूकीचा निकाल अधिकृतपणे राज्यपालांना मिळण्यापर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्याची काहीही घाई नव्हती. त्यापेक्षा आधी आपले नव्याने निवडून आलेले आमदार गोळा करून त्यांची शिकार होऊ नये याला प्राधान्य देणे अगत्याचे होते. त्या बाबतीत कॉग्रेस पुर्णपणे गाफ़ील होती. उलट गोव्यात वा मणिपुरात भाजपाने जी घाई केली, त्याची नक्कल कॉग्रेसश्रेष्ठी करीत गेले. पण आपल्या पक्षासाठी कर्नाटकात काय हिताचे आहे, त्याचा विधारही त्यांना करावा वाटले नाही. ही आजच्या कॉग्रेसची दुर्दशा आहे. कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून क्रिकेटचा सामना जिंकायला निघालेल्यांच्या हाती संघाचे नेतृत्व असेल, तर यापेक्षा काय वेगळे व्हायचे? वाहिन्या व पत्रकारांना आपण बाजी मारल्याचे प्रदर्शन मांडण्याची घाई झालेल्यांना पक्षहित कसे सुचायचे? कुठून कोण निवडून आला वा त्याला बंगलोरला पक्षाच्या मुख्यालयात तातडीने आणायची कुठलीही व्यवस्था झाली नव्हती. सहाजिकच त्रिशंकू विधानसभा स्पष्ट झाली, तेव्हा नवनिर्वाचित आमदारांना आपली व्यक्तीगत किंमत कळलेली होती आणि आपल्यापुरता निर्णय घ्यायला तेही ‘मोकळेच’ होते. इतर पक्षांशी संपर्क साधण्य़ाची मोकळीक त्यांना मिळालेली होती. आजकाल असे निकाल लागतात तेव्हा आमदारांची पळवापळवी होते, याचे कॉग्रेसला भान नाही काय? देशात अशा पळवापळवीची प्रथा मुळातच कॉग्रेसने निर्माण केली आणि आज त्यांनाच आपला पुर्वेतिहास आठवत नाही काय? असता, तर सर्वात आधी नव्या आमदारांना बंगलोरला आणायला प्राधान्य दिले गेले असते.

पण आजची कॉग्रेस वा कॉग्रेसी नेतृत्व भाजपाच्या यशाने भारावून गेलेले आहे. मग बुद्दू मुलाने बुद्धीमान मुलाची नक्कल करावी, तसे कॉग्रेसी नेते भाजपाच्या डावपेचांची आंधळी नक्कल करत असतात. गोवा मणिपुरात भाजपाने आधी राज्यपालांकडे दावा केला, म्हणून आता कर्नाटकात गुलाम नबी आझाद आधी कुमारस्वामी व देवेगौडांना भेटले आणि नंतर राज्यपालांकडे धावले. पण राज्यपाल वा विधानसभेत गुलाम नबी यांच्यापेक्षा नव्या आमदारांना मोजले जाणार, याचा त्यांना विसर पडला होता. त्याची जाणिव मग उशिरा रात्री काही आमदार गायब असल्याच्या बातम्यांमुळे झाली. चार आमदार संपर्कात नाहीत तर त्यांना शोधायला कॉग्रेसने विमान रवाना केले. यापेक्षा हास्यास्पद काय असू शकते? मुळात त्यांना बेपत्ता होण्याची मुभाच कशी दिली गेली? तर भाजपा राज्यपालांकडे जाण्याच्या आधी आपला दावा मांडण्याची घाई नडली. मोरीच्या भोकातून झुरळ आत येण्याच्या भितीने पछाडलेल्यांना, सताड उघड्या दारातून आमदार पळवले जातील, याची जाणिवही झाली नव्हती. त्याचे कारण स्वपक्षाचे हित बघण्यापेक्षा भाजपाचे नुकसान करणे वा अपशकून करणे; ही कॉग्रेस निती होऊन गेली आहे. त्याचाच हा परिणाम आहे. सत्तर वर्षात देशात दिर्घकाळ राज्य करणार्‍या कॉग्रेसने अशा प्रतिकुल परिस्थितीत, किंवा निवडणूकीत मतदाराने नाकारलेले असताना राज्यपालांचा वापर करून व विरोधकांचे आमदार फ़ोडून अनेकदा सत्ता बळकावलेली आहे. आपला तोच इतिहास आजच्या कॉग्रेस नेतृत्वाला आठवतही नसेल, तर त्या पक्षाला सततच्या पराभवातून कसे सावरता येणार? या ताज्या घटनेने कॉग्रेस मानसिक पातळीवर किती दुर्बळ झाली आहे, त्याचीच प्रचिती आलेली आहे. त्याचे कारणही सोपे आहे. आपल्या पक्षाला नव्याने उभा करण्याची इच्छा संपलेली असून, भाजपाला अपशकून करण्यापर्यंत कॉग्रेसची महत्वाकांक्षा मर्यादित होऊन गेली आहे.

कर्नाटकची निवडणूक बघितली, तरी त्याचा अंदाज येऊ शकतो. उद्या आपल्याला जनतादलाशी युती करावी लागेल तर देवेगौडांना दुखावू नये, याचे भान राखले गेलेले नव्हते. निवडणूकीला दोन महिने बाकी असताना त्याच पक्षातले सहासात आमदार सिद्धरामय्यांनी फ़ोडले होते. येदीयुरप्पा लिंगायत म्हणून त्यांचा पाठीराखा असलेल्या त्या समाजाला धार्मिक दर्जा देऊन भाजपाला दुबळे करण्याचा आततायी डावपेच खेळला गेला. या सगळ्या धावपळीत आपल्या कॉग्रेस पक्षाला मजबूत करणे वा त्याचा मतदार पाया विस्तारण्यासाठी कुठले सकारात्मक काम कॉग्रेसकडून झाले? कॉग्रेस पक्षांतर्गत किती बेबनाव आणि मतभेद होते, ते निकालानंतर समोर येऊ लागलेले आहेत. श्रेष्ठींनी जनतादलाला पाठींबा जाहिर करताच अनेक आमदारांची त्याला नकार देण्यापर्यंत मजल गेली. आपले आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांपासून पक्षश्रेष्ठी किती तुटलेले आहेत, त्याचाच हा पुरावा आहे. भाजपाला हरवण्यासाठी कॉग्रेस तिथेच कमी पडली. लढण्यासाठी नेत्यांचे अहंकार व आत्मवंचना कामाची नसते. त्यापेक्षा कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची एकवाक्यता निर्णायक असते. त्यांच्याकडे पाठ फ़िरवून राहुल वा सिद्धरामय्या भाजपा व देवेगौडांना शह देण्यात मशगुल होते आणि त्यांच्या पक्षाचे दार दरोडेखोरांसाठी सताड उघडे सोडलेले होते. प्रचारात तेच होते आणि निकाल लागत असतानाही कॉग्रेस गाफ़ील होती. त्यांना घरात झुरळे वा उंदिर काही नासाडी करतील याची फ़िकीर होती. पण दरोडेखोर घुसून अख्खे घर लुटून नेतील, याची अजिबात फ़िकीर नव्हती. म्हणून आता तारांबळ उडालेली आहे. एवढे सत्य ज्यांना मान्य करायचीही हिंमत नाही, त्यांच्याकडून कॉग्रेसचा जिर्णोद्धार होण्याची अपेक्षा कशी बाळगायची? मोदी आजच २०१९ हरलेत अशीही समजूत उराशी बाळगून त्यांनी निवांत झोपायला हरकत नसावी.

7 comments:

  1. सुंदर विश्लेषण, भाऊ तुम्ही तर ज्योतिषी झाला आहेत, तंतोतंत तसेच होतेय.

    ReplyDelete
  2. Bhau tumhi bhartiya janta partichy bajune nehmi lihita.
    Aaj suddha bjp ne 100 cr.prateyk aamdarala deu kele aahet
    Tyabaddal kahich ka bolat nahit.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ काय जाणून बुजुन अस लिहित असतील अस मला वाटत नाही ....आता विरोधकच तश्या चुका करत असतील तर त्यांनी काय कराव...?

      Delete
  3. Khare aahe bhau,Congress nehmi radio Cha dav khelte,chhan lekh

    ReplyDelete
  4. बीजेपी ने 100 करोड ची ऑफर दिली अजून एक बिनबुडाचे अफवा। ना पुरावा ना कायदेशीर तक्रार फक्त मीडिया प्रोपौगंडा। आता राज्यपाल चूक कोर्ट चूक निवडणूक आयोग चूक। फक्त काँग्रेस आणि सत्ता हापापलेले लोक बरोबर। राष्ट्रपती सुध्दा चूक। देवा कोण कोण मोदी ला मिळाले।

    ReplyDelete
  5. मोरीतून येणारी झुरळे, उंदीर आणि दारातून येणारे दरोडेखोर या कल्पना अतिशय समर्पक.. सिब्बल, सिंघवी हे भाजपाकरिता काम करीत आहेत की काय असा प्रश्न पडावा इतका मूर्खपणा दिसून येतो आहे..

    ReplyDelete