Wednesday, May 30, 2018

आघाडी आणि धृवीकरण

modi cartoon kureel के लिए इमेज परिणाम

हमको मालूम है जन्नत की हकी़क़त लेकिन
दिल को बहलाने के लिए "ग़ालिब", ये खयाल अच्छा है

कर्नाटकात जे नाट्य रंगले आणि ज्याप्रकारे अवघ्या तीन दिवसात राजकारणाने रंग बदलले; त्यामुळे मोदी विरोधकांच्या अपेक्षांना नवी पालवी फ़ुटली तर नवल नाही. आधीच मागल्या काही दिवसांपासून म्हणजे त्रिपुराचे निकाल लागल्यापासून भाजपा विरोधात एकजुटीने विरोधकांनी निवडणुका लढवण्याची कल्पना गतिमान झालेली होती. त्यातच कर्नाटकात भाजपाचे बहूमत हुकल्यामुळे विरोधकांना आशा वाटू लागली आहे. त्यातून मग एकास एक उमेदवार उभे करून भाजपाची दिल्लीतील सत्ता संपवण्याचे मनसुबे रचले गेल्यास आश्चर्य नाही. अर्थात ही राजकीय पक्ष व नेत्यांची स्वप्ने असणे स्वाभाविक आहे. कुठलाही पक्ष सत्ता मिळवण्यासाठी व आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्याच इच्छेने मैदानात उतरलेला असतो. त्यामुळेच आपल्या एकट्याच्या शक्तीवर नसेल तर इतरांना सोबत घेऊन सत्ताधीशाला पराभूत करण्याचे मनसुबे गैर नाहीत. मात्र अशा कुठल्याही उद्दीष्टाला वास्तवाचा आधार घ्यावा लागतो. पक्षाचे समर्थक अभ्यासक वा जाणकार तसा पाया निर्माण करून देत असतात. सुदैवाने देशातील माध्यमात कार्यरत असलेले शेकड्यांनी लोक मोदीविरोधी आहेत आणि म्हणूनच मोदी विरोधातील आघाडीसाठी ती मोठी जमेची बाजू ठरली असती. पण दुर्दैव असे आहे, की खर्‍याखुर्‍या राजकीय पक्षांपेक्षाही असे जाणकारच भ्रमात वावरत असतात आणि चुकीच्या आधारावर भाजपाला पराभूत करण्याच्या स्वप्नरंजनात मशगुल असतात. आताही भाजपाला पराभूत करण्याचा इरादा करणार्‍यांसमोर अशा भ्रामक आकडेवारी व तपशीलाने एक विजयाचा खोटा आभास निर्माण करून ठेवलेला आहे. मतविभागणीमुळे भाजपाला इतके यश मिळाले आणि म्हणूनच एकत्र येऊन विरोधकांनी मतविभागणी टाळली, तर भाजपाला सहज पराभूत करता येईल, असा फ़सवा सिद्धांत पुढे आणला गेला आहे. त्यावरच विरोधकांचे मनसुबे रचलेले आहेत.

मोदी वा भाजपा विरोधातील सर्व लहानसहान पक्षांनी एकजुट केली व भाजपा समोर एकास एक उमेदवार उभे केल्यास भाजपाचा सहज पराभव होऊ शकतो, असा तो सिद्धांत आहे. त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही. म्हणजे ती शक्यता कोणी नाकारू शकत नाही. पण सगळे पक्ष एकदिलाने एकत्र येऊन तितका समजूतदारपणा दाखवतील अशी कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण जेव्हा प्रमुख पक्षाच्या विरोधात अशी एकजुट होते, तेव्हा त्यांच्या आधीच्या मतांची बेरीज होते, यात तथ्य नाही. उलट त्यातून एकप्रकारचे वेगळे धृवीकरणही होत असते आणि त्याचाही लाभ प्रमुख पक्षाला मिळत असतो. उदाहारणार्थ मोदींना ३१ टक्के मेते मिळाली व विभाजनाने त्त्यांना बहूमत मिळवून दिले, हीच मुळात खोटी गोष्ट आहे. सहाजिकच अशा खोट्या पायावर उभे राहून मतविभागणी टाळून मोदींना पराभूत करता येणार नाही. याचे कारण असे, की मोदी वा भाजपाने गेली लोकसभा निवडणूक एकहाती व स्वबळावर लढवलेली नव्हती. तर अनेक लहानसहान पक्षांना सोबत घेऊन लढवली होती. त्यात भाजपाला ३१ टक्के व इतर मित्रपक्षांना मिळून १२ टक्के मते मिळालेली होती. म्हणजेच मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ४३ टक्के मतदान झालेले आहे, मग केवळ ३१ टक्के मते घेऊन मोदी यशस्वी झाले, हा दावा फ़सवा ठरतो. तोच आधार घेऊन खेळलेले राजकारण म्हणूनच फ़सत जाऊ शकते. गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या हे सत्य असले, तरी प्रत्यक्षात आधीच्या विधानसभेपेक्षा भाजपाची मते अडीच टक्क्यांनी वाढलेली होती. कर्नाटकातही दोन टक्के मते वाढलेलीच आहेत. पण त्याचा जागा बहूमतापर्यंत जाण्यात लाभ होऊ शकला नाही. फ़ुलपूर गोरखपूरच्या जागा पोटनिवडणूकीत भाजपाने गमावल्या, तरी त्यात सपा बसपाच्या मतांची बेरीज लोकसभेच्या वेळेपेक्षा कमीच होती. म्हणूनच कागदावर आकडे मोजून व मांडून भाजपाच्या पराभवाची रणनिती आखली जाऊ शकत नाही.

विविध राजकीय पक्षांनी एकत्र यायचे ठरवले, तरी त्यांनी कॉग्रेस सोबत जाण्यातूनही त्यापैकी अनेकांची मते कमी होऊ शकतात. बंगालच्या विधानसभा मतदानात डाव्या आघाडीने कॉग्रेसशी हातमिळवणी केली आणि त्यांचाच बोर्‍या वाजला. त्याचा लाभ भाजपला मिळून त्याची बंगाली मते वाढलेली आहेत. त्याचेच प्रतिबिंब मग कालपरवा स्थानिक निवडणूकांमध्ये पडले आणि आता बंगालमध्ये भाजपा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. त्याचे श्रेय भाजपाच्या नेतृत्वापेक्षा चुकीच्या हातमिळवणी व आघाडी बनवण्याला जाते. जे पक्ष मुळातच कॉग्रेसला पर्याय म्हणून उभे राहिले व वाढले, त्यांनी त्याच कॉग्रेसशी हातमिळवणी केल्यावर त्यांच्या बिगरकॉग्रेसी मतदाराने कुठे बघायचे? असा मतदार मग भाजपाकडे गेला. उत्तरप्रदेशातील सपा-बसपा यांची शक्ती कॉग्रेसच्या विरोधातली होती. युपीए काळात त्यांनीच मनमोहन सरकारची पाठराखण केल्यामुळे त्यांना फ़टका बसला. त्यांचा मतदार मोठ्या संख्येने भाजपाकडे आला. हेच महाराष्ट्रात शेकाप, जनता दल अशा पुरोगामी पक्षाचे झालेले आहे. त्यांचा मतदार हळूहळू भाजपाकडे वळत गेला. ही बाब समजून घेतली तर लक्षात येते, की अशा आघाड्या मतदारांचे विरुद्ध बाजूने धृवीकरण करत असतात. त्रिपुरात डाव्यांना संपवायला कॉग्रेस उभी राहिली नाही आणि भाजपाने त्यात पुढाकार घेताच, शून्यातून तो पक्ष इशान्येकडील त्या राज्यात थेट सत्तेपर्यंत पोहोचला. मतविभागणी हा सिद्धांत योग्य असला तरी तो चुकीच्या पद्धतीने वापरून धृवीकरणाला हातभार लावला जाऊ शकतो. त्याचा साधासरळ अर्थ असा, की गेल्या लोकसभेत भाजपाना ३१ टक्के मते मिळाली होती, ती नव्या धृवीकरणाने वाढून ४० च्याही पुढे जाऊ शकतात. त्यात मोदी वा भाजपा कार्यकर्त्यांची मेहनत नसेल, तर आघाडीमुळे मिळालेला तो बोनस असेल. नेमके हेच १९७१ व १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिराजींसाठी झालेले होते.

ज्यांना हा विषय समजून घ्यायचा आहे, त्यांनी इंदिराजींनी जिंकलेल्या १९७१ व १९८० या निवडणूकांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्या आधीच्या मतदानात कॉग्रेस पक्षाला जितकी मते मिळाली होती, त्यापेक्षा इंदिराजी तीनचार टक्के अधिक मते घेऊनच जिंकल्या होत्या. मजेची गोष्ट म्हणजे त्यांच्या विरोधात आजच्या सारखे विरोधक एकवटलेले व एकसुरी झालेले होते. तेव्हाचे तेच तमाम राजकीय पक्ष व नेते नाकर्ते व दिवाळखोर म्हणून मतदाराच्या मनातून उतरलेले होते. त्याचाच लाभ इंदिराजींना मिळून गेलेला होता. जेव्हा अशी मतविभागणी टाळण्याचा प्रयोग झाला, तेव्हा इंदिराजींना अधिक यश मिळाले. १९७७ चा पराभव आणिबाणीच्या पार्श्वभूमीवरचा होता. पण अडीच वर्षात जनता पक्षाच्या नाकर्तेपणाने इंदिराजींचा प्रतिसाद वाढवून दिला होता. त्यामुळे मतविभागणी टाळणे वा एकजुटीच्या गर्जना करणे उपयोगाचे नाही. त्यापेक्षा संघटित होऊन जनतेपर्यंत पोहोचण्याला महत्व आहे. इथेच मोदी-शहांनी आधीच मोठी बाजी मारलेली आहे. २०१४ च्या अपुर्व यशानंतरही हे दोन्ही नेते क्षणाचीही विश्रांती न घेता पक्षाचा विस्तार व मतदार वाढवण्यात गढून गेलेले आहेत. बंगाल, ओडिशा, आसाम वा इशान्येकडील राज्यात त्यांनी पक्षाची व्यापक जनतेपर्यंत पोहोचणारी संघटना उभारण्यात कुठली कसूर ठेवलेली नाही. केरळात मार्क्सवादी हिंसाचाराचा सामना करीतही पक्षाला वाढण्याचे प्रयास सुरू आहेत. त्याच्या नेमक्या उलट्या बाजूला बाकीचे त्यांचे विरोधक उभे आहेत. पक्ष व संघटना बांधणीकडे पाठ फ़िरवून या बहुतेक विरोधकांनी माध्यमातून व प्रचारातून विरोधी राजकारण चालविले आहे. म्हणून डाव्याची जागा भाजपा व्यापत गेला आहे आणि अन्य राज्यातही कॉग्रेसची जागा आकुंचित होत गेली आहे. म्हणून गुजरातमध्ये नाराज असलेल्या मतदाराला जमवणे कॉग्रेसला साधले नाही, की कर्नाटकात असलेली सत्ता राखणेही शक्य झालेले नाही.

प्रत्येक पक्षाचा आपला असा ठरलेला मतदार असतो. पण तो सगळा त्याच पक्षाची विचारसरणी वा नेतृत्वाशी बांधील नसतो. त्यातला बराच मतदार अन्य कुठला तरी पक्ष नको म्हणून तुमच्या पक्षाकडे आलेला असतो. अशाच नकोश्या पक्षाशी तुम्ही युती आघाडी केली, तर तो मतदार दुरावतो आणि त्याला नकोशा पक्षाच्या विरोधातल्या अन्य पक्षाकडे ओढला जातो. जे बंगाल, केरळ व त्रिपुरात घडलेले आहे. इतर अनेक राज्यातही घडले आहे. कर्नाटकात १९९५ पुर्वी भाजपा कितीसा होता? पण कॉग्रेसच्या मदतीने देवेगौडा पंतप्रधान झाले आणि त्यांचा कॉग्रेस विरोधातला मतदार हळुहळू भाजपाकडे सरकत गेला. पर्यायाने त्या राज्यात भाजपा वाढत गेला. देशव्यापी आघाडी कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली आकाराला आली, तर तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा, बंगाल, केरळ अशा राज्यात त्या कॉग्रेसविरोधी मतदाराला कुठला पर्याय शिल्लक राहिल? याप्रकारे अनिच्छेने भाजपाकडे आलेल्या मतदारानेच भाजपाला वाढवलेले आहे. त्याला प्रतिधृवीकरण म्हणता येईल. हेच इंदिराजींना मोठे करून गेले होते आणि आता मोदींनाही बहुधा त्याचाच लाभ मिळू शकेल. कारण जे कोणी पक्ष मोदी विरोधात राष्ट्रीय आघाडी बनवून मतविभागणी टाळण्याचे डावपेच आखात आहेत, त्यांचा पायाच कॉग्रेस विरोधातला आहे. त्यापैकी अनेकांनी अलिकडल्या काळात कॉग्रेसचा मतदार खाऊनच आपला पाया विस्तारलेला आहे. सहाजिकच त्यांचा मतदार नाराजीने भाजपाकडे जाईल, तसाच उरलेला पुन्हा कॉग्रेसकडे वळण्याचाही धोका आहे. तोटा भाजपाचा होणार नाही. पण या गडबडीत असे पुरोगामी पक्ष मात्र आपल्याच प्रभावक्षेत्रात नामशेष होऊन जातील. अजित सिंगांचा लोकदल किंवा महाराष्ट्रातला शेकाप, आसामची गणपरिषद हे पक्ष त्यातच संपलेले आहेत. आघाडी हा अभ्यासकांचा खेळ असेल, पण अनेक लहानसहान पक्षांसाठी जीवनमरणाचा खेळ असतो. पंडितांचे मन रिझवायला उत्तम. शायर गालिबने तेच तर म्हटले आहे ना?

4 comments:

 1. Yes! media barons will be entertained. No more than that! You quoted gaalib appropriately

  ReplyDelete
 2. भाउ हे वीश्लेषक दसेंदिवस पराभवाने म्नहजे पुरोगामीपक्षांच्या, बौ्दधििक दिवाळखोर झालेत तुम्ही म्हन ता तस बघायला मिळतय जशी गोष्ट टक्केवारीची तिच जागांची लोकसत्ता म्हने भाजपच्या जाागा बहुमतापेक्षा २च जास्त राहील्यात बहुमत गेल ४ वर्षात अरे nda कडे330 जागाआहेत त्यातले बिगर भाजप खासदार मोदींच्या नावावर निवडुन आलेत बरेचसे आणि ते कबूल पन करतात उदा शिवसेना upमधिल अपनादल बरेसचे.ही अव्स्था असेल पुरोगामी लोकांची तर मोदींना ते हवेच आहे कारन त्यांना विरोधा पक्ष गाफिल हवाच आहे

  ReplyDelete
 3. आजतक वाहीनीवर कर्नाटकचा तमाशा झाल्यावर आज एक प्रोगाम दाखवत होते.त्यात बंगालमधील cpim चे पिडीत कार्यकर्ते दाखवत होते ते ममतांच्या पक्षाने केलेले पंचायत निवडनुकीतील हाल कथन करत होते आणि सोबत दाखवलेली क्लिप तर बघवत नव्हती.उ्दया फोटोत हात सोबत उंचावल्यावर बंगलुर मध्ये. खरोखरच ममता व cpim एकत्र आले तर ते येचुरींचे पिडित कार्यकर्ते कुठे जातील? नाही आले ममता व डावे एकत्र तरी भाजप तो ग्रॅंड फेमस कर्नाटक विधानसौदामधील फोटो दाखवुन आठवन करुन देनार नाही कशावरुन.

  ReplyDelete
 4. भाऊ लेख जतन करून ठेवतो, २६ मे, २०१९ रोजी प्रसिद्ध करायला.

  ReplyDelete