Sunday, May 20, 2018

स्वर्ग नरकातला फ़रक

heaven hell के लिए इमेज परिणाम

१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव्हती. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन आठवले गटाला हाताशी धरून राज्यात प्रथमच आघाडीचे राजकारण केले. त्यात मुख्यमंत्रीपद टिकवले होते. मग त्यांच्याच पुढाकाराने पहिली जागतिक मराठी परिषद भरवली गेली. त्यात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व गांधी घराण्याचे निष्ठावंत अशी ओळख असलेले वसंतराव साठे, या नेत्याने भाषण करताना एक मजेशीर गोष्ट सांगितली होती. एका पत्रकाराला इश्वर प्रसन्न होतो आणि कुठलेही वरदान मागण्यास सांगतो. पत्रकारही शोधपत्रकार असतो. त्यामुळे देवावर विश्वास नसूनही तो अजब गोष्टीची मागणी करतो. आपल्याला नरकात जायचे आहे, अशी मागणी त्याने केल्यावर देव चकित होतो. ‘वत्सा मी वरदान मागायला सांगतो आहे आणि ही शापवाणी उच्चारण्याचा आग्रह कशाला धरून बसला आहेस’ असे देव विचारतो. तेव्हा आपल्या निर्भिडपणाला जागून पत्रकार उत्तर देतो, हे देवा, खरोखर तू अस्तित्वात असल्याची मला खात्री नाही की विश्वास नाही. त्यामुळे स्वर्गाच्या कल्पनेवरही माझा विश्वास नाही. मग नरकाची भिती मी कशाला बाळगू? नरकाची भिती घालून सामान्य लोकांच्या भावनांशी खेळणार्‍या पाखंडी लोकांना मला उघडे पाडायचे आहे. म्हणूनच मला नरकात जायचे आहे आणि मेल्यावर नाही तर आताच जायचे आहे. तू खरा देव असशील तर मला लगेच नरकात पाठवून दे. तिथल्या वस्तुस्थितीचे ग्राऊंड झिरो रिपोर्टींग मला करायचे आहे. विषण्ण होऊन देव तथास्तु म्हणतो आणि क्षणार्धात समोर नरकाचे भव्य प्रवेशद्वार पत्रकाराला दिसू लागते. दार वाजवताच एक अक्राळविक्राळ यमदूत दार उघडतो आणि अदबीने पत्रकाराला आत घेतो. समोरचे दृष्य बघून पत्रकाराचे डोळे लकाकतात. आपल्याला अपुर्व सत्य उमजल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर झळकू लागतो.

समोर रांगोळ्या घातलेल्या असतात. पत्रकाराच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. जागोजागी कमानी उभारलेल्या असतात, आसपास शेकड्यांनी गुढ्याही फ़डकत असतात. समोर येणारा प्रत्येकजण अदबीने बोलत असतो. पत्रकाराला इतका सन्मान आजवर कुठल्या संस्था पुढार्‍यानेही दिलेला नसतो. सुवासिनी त्याला ओवाळण्यासाठी तबक घेऊन सज्ज असतात वगैरे. पुढला काही काळ पत्रकार नरकाचे पुर्ण अवलोकन करतो आणि त्याला प्रत्येक जागी धक्का बसतो. कारण आजवर त्याने नरकाची जी वर्णने ऐकलेली असतात, त्याला इथल्या अनुभव तडा देणारा असतो. सहाजिकच बारीकसारीक टिपणे घेऊनच पत्रकार नरकवास संपवतो. पृथ्वीतलावर अवतरला, मग ब्रेकिंग न्युज कोणाला सांगू वा कोणाला नको, इतकी घाई झालेली असते. पण संयम राखून तो शांत चित्ताने नरकाचे प्रदिर्घ वार्तापत्र दहाबारा लेखांकात ग्रथित करतो. त्याच्या त्या शोधपत्रकारितेचा सन्मान होतो आणि संपादक मंडळीही खुश होऊन जातात. त्याच्या त्या वार्तापत्रांनी इतकी ख्याती मिळवलेली असते, की त्याला विचारवंत घोषित केले जाते. अशीच वर्षे निघून गेल्यावर त्याचेही वय संपुष्टात येते आणि खरेखुरे मरण त्याला येते. मर्त्यलोकातील अवतार उरकून हे गृहस्थ चित्रगुप्ताच्या खिडकीसमोर येऊन उभे रहातात. त्यांचे दिर्घकालीन प्रामाणिक व पुण्यवंत जीवन चित्रगुप्ताच्या डेटामध्ये नोंदलेले असते. सहाजिकच चित्रगुप्तही त्या महापुरूषाला स्वर्गात पाठवण्याचे आदेश जारी करतो. तर संतापलेला पत्रकार आत्मा निषेधाचा सूर लावतो. स्वर्गाच्या भ्रामक विश्वात आपल्याला जाय़चे नाही तर पुरोगामी नरकात वास्तव्य करायचे असल्याचे सांगून टाकतो. बिचारा चित्रगुप्त अवाक होतो. हा पुण्यवंत नरकात जाण्याचा आग्रह का धरतोय, तेच चित्रगुप्ताला उमजत नाही. पण तो पुण्यवंत असल्याने त्याच्या आवडीला प्राधान्य असते आणि त्याची इच्छा चित्रगुप्त पुर्ण करतो. पत्रकाराच्या चेहर्‍यावर समाधान पसरते.

आता पुन्हा पत्रकार त्याच नरकाच्या दारासमोर उभा असतो आणि ते दार किलकिले होऊन उघडते. आतला यमदूत जांभया देत बाहेर येतो आणि पत्रकारावर खेकसतो. कशाला आलास तडफ़डायला, म्हणून दोनचार अर्वाच्च शिव्याही हासडातो. त्याचे ते वर्तन पत्रकाराला चकीत करते. पण ओळखपत्र बघून यमदूत पत्रकाराची कॉलर पकडून फ़रफ़टत त्याला दाराच्या आत घेऊन जातो. तिथे घाण माजलेली असते. दुर्गंधी सुटलेली असते. येणाराजाणारा पत्रकाराला लाथा मारत असतो. संतापलेला तोच पत्रकार यमदूताकडे नाराजी व्यक्त करतो. तेव्हा यमदूत त्याच्या कंबरड्यात लाथ घालून त्याला फ़ुटबॉलसारखा उडवून देतो. एका चिखलाच्या डबक्यात जाऊन पत्रकार पडतो. त्याला नरकवासी मंडळींचे हे वर्तन समजतच नाही. आपण आधी आलो तेव्हा अतिशय सुसंस्कृत सभ्य वागणारे हेच लोक असे अजब का वागत आहेत, त्याचाच त्याला अंदाज येत नाही. म्हणून तो पत्रकार दबल्या आवाजात घाबर्‍याघुबर्‍या एका दुसर्‍या यमदूताला म्हणतो, हे काय चालू आहे? अरे मी एकमेव पत्रकार आहे, ज्याने हजारो वर्षे नरकाविषयी जगभर चाललेली बदनामी पुसून काढणारी लेखमाला लिहीली. नरक स्वर्गाहून किती सुंदर आहे, त्याचा गौप्यस्फ़ोट केलेला होता आणि तुमच्या नरकाविषयीचे गैरसमज दुर करण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावलेली होती. आज तुम्हीच मला असा वागवित आहात? हा सगळा काय प्रकार आहे? दुसरा यमदूत शांतपणे खुलासा करता झाला. मिस्टर पत्रकार, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इथे अनधिकृत आलेले आहात. तुमची जागा स्वर्गात असताना इथे गर्दी करायला यायचे नाही. दुसरी गोष्ट मागल्या खेपेस आलात तेव्हा पाहुणे होता आणि आमच्याकडे मार्केटींग चालू होते. आता तुम्ही इथे कायमचे रहिवासी म्हणून आलेले आहात. म्हणून तुम्हाला कुठलीही सवलत मिळू शकत नाही. इतके बोलून झाल्यावर यमदूताने त्या पत्रकाराच्या नाकावर ठोसा मारून त्याला बाजूच्या उकिरड्यात ढकलून दिले.

इतका अनुभव घेतल्यावर पत्रकाराला मार्केटींग आणि पत्रकारिता यातला फ़रक लक्षात आला. किंबहूना त्याला नरकाचा स्वर्ग करण्यातली चुक उमजली होती. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे सामान्य लोक नरक व स्वर्गात काय फ़रक समजतात, त्याचाही साक्षात्कार झाला. पण उपयोग नव्हता. स्वर्ग की नरक याची निवड त्याने आपली बुद्धी व विवेक वापरून केलेली होती. आता त्यापासून सुटका नव्हती. हा नंतरचा पत्रकार आत्मा कुठला लेख लिहू शकला नाही. त्यामुळे मेल्याशिवाय नरक दिसत नाही असा आणखी एक गौप्यस्फ़ोट करायची संधी त्याला मिळाली नाही. पण आजही अनेक पत्रकार शोधपत्रकारितेच्या आहारी जाऊन नरकाला स्वर्ग ठरवण्यासाठी धडपड करीतच असतात. कालपरवा कर्नाटकात भाजपाच्या दाव्याचा फ़ज्जा उडाला, तेव्हा बहुतांश पुरोगामी पत्रकार संपादकांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या होत्या. आपण नरकाला स्वर्ग सिद्ध केल्याचा त्यांच्या चेहर्‍यावरचा अपरिमीत आनंद बघून वसंतराव साठे यांच्या कथेतल्या त्या पत्रकाराचा आनंद आठवला. त्याचा चेहराही जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहिला. कर्नाटकात जे काही झाले व पुढे होणार आहे, त्याला पुरोगामी विजय समजून नाचणार्‍यांना आपण मार्केटींगच्या योजनेची चव चाखली, हे अजून कळलेले नाही. कारण हा तात्पुरता अनुभव आहे आणि मुदतबंद सवलत आहे. लौकरच खर्‍याखुर्‍या विरोधी एकजुटीचा तमाशा सुरू होईल, तेव्हा विविध पक्ष व नेते एकमेकांच्या लाथाळ्या करतील आणि स्वर्ग नरक यातला फ़रक अनेक पत्रकारांनाही कळू शकेल. मात्र तो अनुभव लिहीण्यासारखा नसेल. कारण आपण कसे मुर्ख ठरलो, त्याचा तपशील कथन करायची हिंमत नसते त्यालाच तर निर्भिड बाणेदार पत्रकार विचारवंत म्हणून ओळखले जाते ना? म्हणून तर हजारो वर्षे झाली, तरी सामान्य माणसे स्वर्ग नरकाच्या कल्पना मान्य करतात. शहाण्यांना मात्र नरकात लाथ खाल्ल्याशिवाय त्यातला फ़रक समजत नसतो.


10 comments:

 1. एकूणच कर्नाटकमधील प्रकरण पाहून लोकसभा निवडणुकीत काही त्रास नको म्हणून भाजपा ने मुद्दामहून जास्त त्रास घेतला नाहि असे वाटते .

  ReplyDelete
 2. जनता दल ( कर्नाटक विधानसभा ) - : एकूण जागा लढविल्या >> २१८ , जागा हरल्या >> १८० , जागा जिंकल्या >> ३८ , डिपॉझिट जप्त झालेल्या जागा >> १४७

  ReplyDelete
 3. Excellent bhau

  ReplyDelete
 4. आजच अमित शाह नि एका टीव्ही वर दिलेल्या मुलाखतीत सरळ स्पष्टच सांगून टाकलं आणि ते त्यांनी स्वतःच केल ते म्हणाले आमच्यावर ४ दिवस घोडेबाजाराचा आरोप होतोय पण काँग्रेस ने तर पूर्ण तबेलाच खरेदी केलाय ,म्हणजे काँग्रेस ने स्वतेचेच आमदार खरेदी केलेत त्यांना करावे लागलेत अमित
  शहा नि त्यानां करायला लावलाय .bjp च एका दिवसाचं सरकार बनलं नसत आणि bjp ने सरळ माघार घेतली असती तर हॉटेल ड्रमा झाला नसता काँग्रेस चे आमदार मूर्ख नाहीत ज्यांना या परिस्थितीत स्वतःचे मूल्य कळत नाही दोन तर बाहेर बसूनच ब्लॅकमेल करत होते आणि दोन अपक्ष आमदार काय असेच काँग्रेस बाजूने आले नाहीत . ते आधी येदिरुप्पा कडे गेले होते तिथे त्यांना काही मोल मिळाले नाही म्हणून ते काँग्रेस कडे आले कारण ते दोन्हीकडे दिसत होते .टेन्शन शेवट पर्यंत ठेवलं कारण भाव वाढावा आणि नंतर सगळं सोडूनच दिल आणि राहुल गांधींना १० मिनिटात येऊन शहा ना accused muderder मोठ्या तोऱ्यात म्हणायला सोनियांनी करोडो किंमत मोजलीय ती पण तात्पुरती ,हे सर्व पुरोगामी पत्रकार,पार्टी याना माहित नाही असा नाही पण मोदींना हरवलं हे नुसतं दाखवण्याची ती किंमत आहे आणि मोदींनीच ती वसूल केलीय

  ReplyDelete
  Replies
  1. किती रसातळाला जाणार अजून?

   Delete
 5. भाऊ, छान मार्मिक लिखाण केले आहे.

  ReplyDelete
 6. अप्रतिम भाऊ,
  भाऊ अप्रतिम
  शब्द आणि विचार संपलेत
  सादर प्रणाम

  ReplyDelete
 7. लोकसत्ताकारांना तर आभाळ ठेंगणे झालंय . काय लिहू आणि किती लिहू असं झालंय....
  कदाचित हर्षवायू होईल असं दिसतंय....

  ReplyDelete
 8. अमित शहा नक्कीच मुरलेले राजनितीकार आहेत आणि कर्नाटकात जे घडलं त्याचा जमाखर्च त्यांनी निश्र्चीतच मांडलेला असणार. पण मला वाटते बिजेपीनी या युतीस सरकार स्थापन करू दिले असते आणी सहा-आठ महीन्यात सरकार पाडण्याची रणनिती ठेवली असती तर बरेच फायदे झाले असतें. एक तर कांग्रेसला आज या ऊसन्या विजयाचा स्वाद चाखता आला नसता आणि 2019 च्या तोंडावर सरकार पाडून निवडणूकीत फायदा घेता आला असता.

  या तथाकथीत विजयामुळे कांग्रेस आणि एकुणच विरोधकांचे अवसान वाढले व त्यांच्या ध्रुविकरणाला चालना मिळाली. शपथविधीला ममतां पासून लालूपूत्रां पर्यंत सगळे एकत्र येणार. हे टाळता आले नसते का?

  ReplyDelete