Saturday, May 5, 2018

देवेगौडांचे गौडबंगाल

Image result for devegowda cartoon

एखादा माणूस आपल्याला हानीकारक काही वागू बोलू लागतो, तेव्हा त्याच्या वर्तनाशी शंका येऊ लागते. एक तर असा माणूस जाणिवपुर्वक काही डावपेच म्हणून असे वागत असतो, किंवा तो तद्दन मुर्ख असतो. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केलेली विचित्र विधाने, म्हणूनच बुचकळ्यात टाकणारी आहेत. कर्नाटक विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आलेली असून, आठवडाभरात तिथले मतदान व्हायचे आहे. अशा मोक्याच्या क्षणी देवेगौडांचा पक्ष तिथला तिसरा प्रतिस्पर्धी आहे. कॉग्रेस आणि भाजपा य दोन राष्ट्रीय पक्षांच्या स्पर्धेत थेट लढतीचा विचका करणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितले जात असते. त्यात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले नाही, मग गणिते जुळवताना तिसर्‍या चौथ्या पक्षाला मिळालेल्या दोनपाच जागाही महत्वाच्या ठरत असतात. सहाजिकच असे पक्ष कुठल्या बाजूने झुकते माप घालू शकतात, याला महत्व असते. मतचाचण्य़ा बघता प्रत्येकाने त्रिशंकू विधानसभेचे भाकित केलेले असून, तिसरा क्रमांक गौडांच्या पक्षाला दिलेला आहे. त्यामुळे सत्तेची चावी गौडांच्या हाती येईल असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ भाजपा व कॉग्रेसला बहूमताचा पल्ला गाठता येणार नसल्याने गौडा ज्याच्या बाजूने आपले पाठबळ उभे करतील, तोच कर्नाटकात सत्ता बनवू शकतो असे चित्र आहे. अशावेळी आपण भाजपासोबत अजिबात जाणार नसल्याची ग्वाही देण्यासाठी गौडांनी पत्रकार परिषद घेतली. पण त्यात त्यांनी कारण नसताना जे नरेंद्र मोदींचे गुणगान केले, ते चकित करणारे आहे. त्यातून त्यांना काय साधायचे होते, त्याचा अंदाज येत नाही. एक मात्र खरे, की त्यातून त्यांनी भाजपाची मते मोदींमुळे वाढावित, असा प्रयास केला आहे. किंवा राहुलपेक्षा नरेंद्र मोदी हा चांगला नेता व व्यक्ती असल्याचेच सूचित केले आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत ज्येष्ठ नेता असे कशाला बोलतो?

मागल्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी ह्या व्यक्तीभोवती प्रचार व राजकारण फ़िरू लागले. तेव्हा केवळ राजकारणीच नव्हेतर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी मोदी विरोधात पवित्रे घेतले होते. मोदींना लोकांनी मते देऊन पंतप्रधान करू नये, म्हणून टोकाची विधानेही केलेली होती. देवेगौडा त्यापैकीच एक आहेत. मोदी पंतप्रधान झाले तर आपण लोकसभेत रहाणार नाही. निवडून आलो तरी राजिनामा देऊ, असे विधान गौडांनी त्यावेळी केले होते. पण असल्या अपप्रचाराने वा व्यक्तीद्वेषाने लोकशाहीत राजकारण चालत नसल्याचे भारतीय जनतेने मान्यवरांना व राजकारण्यांना दाखवून दिले. थोडक्यात स्पष्ट बहूमताने मोदी पंतप्रधान झाले आणि टोकाची भूमिका घेऊन जनमानस विकृत करणार्‍यांना मतदाराने सणसणित चपराक हाणली होती. सहाजिकच देश सोडून पळून जाऊ, परदेशी जाऊ असली बौद्धीक दिवाळखोरीची भाषा नंतर बंद झाली. राणा भीमदेवी गर्जना करणारे थंडावले. मात्र लोकसभेत निवडून आलेले देवेगौडा यांनी आपला शब्द खरा करण्याचे ठरवले आणि ते लोकसभेचा थेट राजिनामा द्यायला निघालेले होते. पण त्याचा सुगावा लागताच मोदींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि गौडांना राजिनाम्यापासून परावृत्त केलले. आता त्याला चार वर्षे उलटून गेली असून दोघांनीही कधी त्या प्रसंगाचा उल्लेख कुठे केला नव्हता. आताही करण्याची गरज नव्हती. कदाचित आपल्या राजकीय फ़ायद्यासाठी मोदींनी त्याचा संदर्भ कुठे दिला असता, तर समजू शकते. पण याक्षणी मोदी वा भाजपाला कुठलेही श्रेय देण्यात गौडांना कुठलाही राजकीय लाभ असू शकत नाही. मग त्यांनी असली जुनी घटना अकस्मात पत्रकारांना कशाला कथन करावी? मोदींनी एका प्रचारसभेत गौडांचे कौतुक केले आणि त्यांच्या ज्येष्ठतेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही ठामपणे सांगितले. तर गौडांनी हा जुना प्रसंग सांगून त्याला दुजोरा कशाला द्यायचा?

आज आपण अजून लोकसभेत सदस्य राहिलो आहोत, त्याचे श्रेय नरेंद्र मोदींना आहे. कारण त्यांच्याच आग्रहामुळे आपण चार वर्षापुर्वी राजिनामा देण्याचा विचार सोडून दिला होता, असे गौडांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले. एकप्रकारे त्यांनी मोदी कसे लोकशाहीवादी आहेत आणि विरोधी नेत्यांचाही सन्मान राखतात, याचीच या विधानातून ग्वाही दिलेली आहे. तर दुसरीकडे राहुल नित्यनेमाने मोदी लोकशाहीची गळचेपी करतात व विरोधकांचा सन्मान करीत नसल्याचे सांगतात. जो माणूस आपल्या विरोधातील एका ज्येष्ठ नेत्याला खासदारकी सोडण्यापासून परावृत्त करतो, त्याला विरोधकांची गळचेपी करणारा म्हणता येईल काय? एकप्रकारे राहुल गांधींच्या आरोपाला गौडांनी आपल्या याच विधानातून खोडून काढलेले नाही काय? आपण राजिनामा देणार होतो, तर आपल्यासारखे अनुभवी संसदेत असायला हवेत, हा आग्रह धरून मोदींनी आपल्याला रोखले. म्हणून गेली चार वर्षे आपण लोकसभेत आहोत, असे गौडांनी पत्रकारांना सांगितले. हा मोदी विरोधकांना मान देतात व त्यांची भूमिका लोकशाहीत आवश्यक मानतात, याचाच पुरावा नाही काय? त्याची साक्ष देवेगौडांसारखा दांडगा विरोधी नेता देतो, तेव्हा कॉग्रेस व राहुलना खोटे पाडत असतो. मग ही पत्रकार परिषद गौडांनी कशासाठी घेतली असा प्रश्न पडतो. त्यांना आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करायची होती? की मोदींवर राहुल कॉग्रेसकडून होणारे आरोप खोडून काढायचे होते? की मोदींनी जे गौडांचे आपल्या प्रचारसभेत कौतुक केले, त्याची परतफ़ेड करायची होती? वरकरणी त्यांनी आपण भाजपासोबत कधीच जाणार नसल्याची ग्वाही दिलेली आहे. पण त्याचवेळी मोदींचे अवास्तव अवेळी कौतुक करून मतदाराला कोणता संदेश दिला आहे? त्याचा हेतू कोणता, असेही प्रश्न पडतात. गौडांनी या पत्रकार परिषदेतून प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा नवे प्रश्न मात्र उभे केले आहेत.

या विधानसभा प्रचारात कॉग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा इतकाच गौडांच्या जनता दलावर हल्ला केलेला आहे. नुसता विरोधी प्रचारच नव्हेतर आरोपही केलेले आहेत. गौडांचा पक्ष हा भाजपाचा छुपा सहकारी असल्याचा खुला आरोप कॉग्रेस नेहमीच करीत असते. त्याचा अर्थ असा, की पुरोगामी मतांची विभागणी भाजपाला लाभदायक असून गौडांचा पक्ष त्या विभागणीने भाजपाच्या यशाला हातभार लावत आहे. त्याच प्रचाराच्या ओघात राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान व ज्येष्ठ असलेल्या देवेगौडांच्या बाबतीत काही आक्षेपार्ह आरोप केले. तेव्हा तोच संदर्भ घेऊन मोदींनी आपल्या सभेत राहुलना कानपिचक्या दिल्या. गौडांचा पक्ष कुठलाही असो. तो आपल्याबरोबर असला वा नसला, तरी ज्येष्ठतेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे म्हणून मोदींनी गौडांच्या अनुभव व कार्याचे गुणगान केले. त्या गुणगानाला हुरळून आपण निकालानंतर भाजपाला पाठींबा अजिबात देणार नाही, हे सांगायला गौडांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. पण तेव्हाच त्यांनी २०१४ साली आपल्याला मोदींनी सन्मानपुर्वक कशी वागणूक दिली, त्याचाही किस्सा सांगून टाकला. आता त्याची गरज नव्हती. पण त्यातून गौडांना काही साधायचे असेल तर? राहुलपेक्षा मोदी अधिक मुरब्बी राजकारणी आहेत आणि आपल्या विरोधकांचाही ते सन्मान राखतात, हेच गौडांना सांगायचे होते. किंबहूना राहुलपेक्षा मोदींपाशी अधिक सहिष्णूता असल्याची ग्वाहीच त्यांना द्यायची होती आणि मतदाराने निवड करताना राहुलपेक्षा मोदींना झुकते माप द्यावे, असा संदेशच त्यातून पाठवाय़चा होता. आपल्यासारखा विरोधक संसदेत अगत्याने ठेवून घेण्याने मोदींनी लोकशाही जपलेली आहे, असा़च गौडांच्या बोलण्याचा अर्थ आहे. तो मोदींना लाभदायक व राहुल गांधी व कॉग्रेसला अपायकारक आहे. हे गौडांनी मुद्दाम केलेले नाही काय?

एकाच दगडात दोन पक्षी मारणे असे याला म्हणतात. एका बाजूला त्यांनी राहुल गांधींना खोटे पाडले आणि कन्नड ज्येष्ठ नेत्याचा मान मोदीच ठेवतात, असे लोकांच्या मनात घातले. आपल्याला सत्ता मिळणार नसेल तर ती कॉग्रेसलाही मिळू नये आणि भाजपाला मिळाली तरी मोदींच्या माध्यमातून आपली कामे मार्गी लागावित, अशी तरतुद या एका पत्रकार परिषदेतून केलेली आहे. थेट सांगायचे तर बहूमताच्या काठावर उभ्या असलेल्या कॉग्रेस व भाजपा यांच्या स्पर्धेत भाजपाचे पारडे जड व्हायला गौडांनी हातभार लावलेला आहे. कारण त्यांची राजकारणातील थेट लढाई कर्नाटकात भाजपाशी आहे. पण पुरोगामी मतांची लूट करताना त्यांचा प्रतिस्पर्धी कॉग्रेस पक्षच आहे. मग कॉग्रेसच्या मदतीला जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा समोरचा शत्रू म्हणून भाजपाला जीवदान द्यावे आणि इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकला कॉग्रेसपासून मुक्ती द्यावी, असा त्यामागचा हेतू दिसतो. कॉग्रेसचा अस्त झाल्यास त्यांचा मोठा मतदार गठ्ठा भाजपाला पर्याय म्हणून गौडांच्या पक्षाकडे येऊ शकतो. मग अशा कसोटीच्या प्रसंगी कॉग्रेसला जीवदान देऊन आपल्याच पायावर कुर्‍हाड कशाला मारून घ्यायची? सत्ता गेली मग कॉग्रेस आणखी दुबळी होणार आणि त्यातले अनेक नेते गौडांच्या आश्रयाला येणार, हे त्यामागचे गणित आहे. म्हणून मोदींचे गुणगान करताना त्यांच्या पक्षाची नौका बहूमताच्या किनार्‍याला लागण्याची सुविधा गौडांनी अशा विधानातून केली आहे. १५ मे रोजी भाजपाला काठावरचे बहूमत व पर्यायाने सत्ता मिळाली, तर त्याचा खरा मानकरी देवेगौडाच असतील आणि त्यांना असे बोलायची वेळ आणणारे राहुल व सिद्धरामय्या कॉग्रेसी पराभवाचे कारण असतील. कारण गौडांविषयी अनुदार उद्गार काढून त्याच दोघांनी मोदींच्या हाती कोलित दिले आणि गौडांनाही असले घातक विधान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

2 comments:

  1. सुरेख,एका साध्या विधानात येवढा मोठा अर्थ,भाऊंना धन्यवाद

    ReplyDelete
  2. मला एक समजत नाही तोरस्कर साहेब. तुमच्या या लेखात काँग्रेस विषयीची तळमळ जास्त वाटते. भाजपा हा तुम्हा सारख्या विचारवंतांनी हिंदूत्ववादीच ठपका मारलात पण भाजप दलित व मुस्लिम यिंना पण गोंजारत आसतेच.।।...

    ReplyDelete