Thursday, May 10, 2018

सत्याचा आवाज ऐकू येतो?

fair and lovely के लिए इमेज परिणाम

नेहमीच्या बातम्या किंवा वाहिन्यांचे रिपोर्ट वाचले तर जगात काहीही चांगले घडत नसावे, असाच आपला समज होऊ शकेल. कारण नित्यनेमाने अल्पवयिन बालिकांवर बलात्कार वा महिलांची हत्या खुन अशाच बातम्यांची रेलचेल असते. कुठे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बंड करत असल्याच्या चर्चा वाहिन्यांवर चालतात, तर कुठे न्यायाधीशाचा अनैसर्गिक मृत्यू वादाचा विषय झालेला असतो. सगळीकडून निराशेचा भडीमार आपल्यावर चालू असतो. जगावे कसे आणि कसल्या आशेवर, उद्याची सकाळ बघायचीही भितीच वाटू लागते. कुठे जगण्याची आशा दाखविल, किंवा जगण्याची उमेद निर्माण करील असे काही ऐकूच येत नाही. खरेच आपले आजचे जग इतके भयंकर झाले आहे काय? असेल तर लोक जीव मुठीत धरून जगत आहेत काय? भितीने प्रत्येकाची बोबडी वळली म्हणून कोणी बोलत नाही काय? समजावे तरी काय सामान्य माणसाने? कारण राजकारणीही देशात भितीचे वातावरण असल्याचे नित्यनेमाने सांगत असतात. माध्यमातूनही तशाच बातम्या येत असतात. मग करायचे काय? एखाद्या रहस्यमय भयपटासारख्या ह्या गोष्टी कानावर पडत असताना आपण इतके निश्चींतपणे जगतोय कसे, असाच प्रश्न पडतो ना? तर हे रहस्य नसून आपल्यापर्यंत येणार्‍या बातम्या भितीदायक आहेत. पण म्हणून बाहेरचे जग तितके भयावह असेलच, असे नाही. एकविसावे शतक माहितीचे युग असल्याचे मानले जाते त्यात तथ्य आहे. माहिती पुरवणारी अनेक नवनवी साधने व उपकरणे आपल्याला उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे माहितीचा महापूरच आलेला आहे. मात्र महापुरात जसा प्रचंड पालापाचोळा वाहून येत असतो, तशीच भेसळयुक्त खरीखोटी माहिती आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असते. त्यापैकी कशावर विश्वास ठेवावा आणि काय नाकारावे, हे आपल्या शहाणपणावर अवलंबून आहे. कारण साधन कुठलेही असले तरी त्याचे फ़ायदेतोटे वापर करणार्‍यावर अवलंबून असतात.

खरे सांगायचे तर माहिती आपल्यापर्यंत कशी व कोण आणतो, याला महत्व असते. अनेकदा आपल्याला हवी असलेली माहिती मिळत नाही आणि मिळाली तरी माहिती आपल्या गरजेपेक्षा ती इतर कोणाच्या इच्छेनुसार आपल्यापर्यंत पाठवली जात असते. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्यावर जो परिणाम साधायचा आहे व ज्याप्रकारे प्रतिक्रीया उमटावी अशी त्याची अपेक्षा असेल, तशीच माहिती आपल्याला पाठवली जात असते. थोडक्यात त्या माहिती वा बातमीमध्ये भेसळ वा काटछाट केली जात असते. कालपरवा केंब्रिज अनेलिटीका नावाच्या कंपनीविषयी खुप गदारोळ झाला, तसाच हा प्रकार आहे. त्या कंपनीने सोशल मीडियात सामान्य ग्राहकाने नोंदलेली आपली व्यक्तीगत माहिती वा सोशल मीडियात व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयांची वर्गवारी करून, लोकांना लक्ष्य केले असा त्यातला आशय आहे. म्हणजे आपल्या आवडी वा आपल्या नावडी विचारात घेऊनच ठराविक माहिती पुढे केली जाते. पर्यायाने आपल्या आवडीनिवडी नियंत्रित केल्या जात असतात. ठराविक गोष्टीच जर आपल्यासमोर आल्या, तर आपण त्यापैकीच एकाची निवड करतो. ठराविकच चित्र आपल्यासमोर उभे केले, तर आपण ते़च परिपुर्ण समजून रागावतो किंवा सुखावतो. पण जे समोर मांडलेले असेल ते सत्य नसते, की वास्तव नसते. उदाहरणार्थ चित्रपट कथा कादंबर्‍यात एका कुणाला उदात्त वा नायक ठरवण्यासाठी खलनायकही रंगवला जात असतो. मग त्याच्या तुलनेत आपण नायक व अन्य पात्रांचे मोजमाप करीत असतो. वास्तवात त्यात रंगवलेला खलनायक खरोखर तितका दुष्ट वा वाईट असतोच असेही नाही. पण त्या कथेपुरता तरी प्रेक्षक वाचकाने त्याला दुष्ट दोषी मानावे, ही कथाकार दिग्दर्शकाची अपेक्षा असते. आपण ती बहुतांश पुर्णही करत असतो. कारण आपण समोर उलगडणार्‍या कथेत ओढले जात असतो.

रामायणातला रावण कितीही राक्षस असला तरी अपहरण केलेल्या सीतेशी त्तो गैरवर्तणूक करत नाही, हा त्याचा चांगुलपणा नाही काय? लक्ष्मणाने ओढलेल्या रेषेला पार करण्याचा गुन्हा रावणाने केलेला नाही. ती रेखा सीतेने पार केली नसती, तर पुढले रामायण घडले असते काय? दुर्योधन द्रौपदीच्या बाबतीत किती नालायक वागला ते आपल्या डोक्यात फ़िट्ट बसवलेले आहे. पण जुगारात आपल्या पत्नीला वस्तू वा मालमत्ता असल्याप्रमाणे पणास लावणार्‍या धर्मराजाचे काय? त्याचे वर्तन सभ्यपणाचे होते काय? त्याच्याकडून तो अतिरेक झालाच नसता, तर पुढले वस्त्रहरण घडले असते काय? थोडक्यात कथेमध्ये खलनायक असा पेश केलेला असतो, की आपण त्या ओघात ओढले जातो आणि बाजूच्या इतर गोष्टींचा विचारही करत नाही. कथानकात आपल्याला एका बाजूने भूमिका घ्यायला भाग पाडले जात असते. हे रामायणात वा कथा चित्रपटापुरते मर्यादित असते असेही नाही. रोजच्या बातम्या जाहिराती वा माहिती तपासून बघितली, तर तिथेही आपले मत बनवायला इतर कोणी आपल्या आवडीवर आक्रमण करीत असल्याचे सहज लक्षात येऊ शकेल. आपल्या नकळत आपल्यावर कितीतरी अशा माहितीचा भडीमार केला जात असतो, की आपण त्यानुसारच निवडी करीत असतो वा निर्णय घेत असतो. किंबहूना अनेक बातम्या वा जाहिराती तर आपल्यावर लादलेल्या असतात. कित्येक पिढ्यांनी ज्या पद्धतीचे जीवन जगले आहे, त्यात अनेक त्रुटी असल्याचे आपल्या माथी रोजच्या रोज मारले जात असते. मग आपल्या जीवनात नसलेल्या त्रुटी दाखवून कृत्रिम गरजा निर्माण केल्या जात असतात. त्या गरजा भागवण्यासाठी आपण खिशातले कष्टाने कमावलेले पैसे बिनतक्रार उडवत सुटतो. पण खरोखरच असा खर्च आवश्यक आहे किंवा नाही, याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कुणा दुसर्‍याच्या इच्छेनुसार आपण पैसे उडवून मोकळे होतो.

अलिकडे पुणे मुंबई रस्त्यावर मोठ्या बांधकाम व्यवसायांच्या जाहिराती झळकत आहेत. नव्या घरांना मागणी घटल्याने किंमतीही कमी झाल्या आहेत. त्याची जाहिरात करताना म्हटले आहे, उरलेल्या दहा लाखाचे काय कराल? म्हणजे असे की तुम्ही एक कोटी रुपयांचे घर आता ९० लाखात घेऊ शकता, त्यामुळे तुमचे दहा लाख रुपये शिल्लक उरणार. जणू ती बचत असल्यासारखा जाहिरातीचा आव आहे. पण बचत कुठून करणार? एक कोटी रुपयांचे घर ९० लाखात घेणार असाल तर दहा लाखाची बचत. किंवा दहा लाख वाचवा असेही सांगितले जात असते. हे दहा लाख वाचवण्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला ९० लाख रुपये खर्चायच्या सापळ्यात ओढले जात असते. ती दहा लाखाची बचत हुरळून जाण्यासाठी असते. प्रत्यक्षात ९० लाख खर्चाला भाग पाडण्याचा डाव असतो. हे सापळे चहूकडे पसरलेले असतात. खरोखर तुमची घर ही गरज असेल तर जिथे तुम्हाला वास्तव्य करण्याचे समाधान मिळेल ते़च घर पुरेसे असते. त्या घरात काय काय हवे, ते तुम्ही गरजेनुसार जमवू शकत असता. पण या जाहिराती अशा मांडलेल्या व रंगवलेल्या असतात, की त्यातल्या अनेक गोष्टी आवश्यक नसतानाही तुम्हाला त्या ओढून घेऊ लागतात. त्याच आपल्या गरजा असल्याचे डोक्यात भिनत जाते आणि त्यासाठी पैशाची अवाढव्य जमवाजमव करण्यात आपण व्यग्र होऊन जातो. आपल्या जगण्यातली शांतता गडबडते. असलेली घरे व सुविधा पुरेशा असतानाही अकारण त्या नव्या घराची चित्रे स्वप्ने तुम्हाला खूणावू लागतात आणि त्यासाठी पैसे जमवणे ही एक नवी विवंचना आपल्या मनात गोंधळ घालू लागते. ती माहिती आपल्या मनाचा कब्जा घेते. इतरांकडून अशा घरांच्या बातम्या माहिती आपल्यापर्यंत येऊन आपल्या आवडीनिवडीवर हुकूमत गाजवू लागतात. म्हणून माहिती कुठून येते आणि कोण माहिती देतो, यला महत्व आहे.

मोबाईलपासून इंटरनेटपर्यंत विविध साधनांनी आपले आजचे आयुष्य इतके व्यापून टाकलेले आहे, की आपल्याला व्यक्तीगत विचार करण्याची सवड फ़ार थोडी मिळत असते. शाळकरी मुले असोत किंवा गृहीणी वा कामधंदा करणारा पिता प्रौढ व्यक्ती असो. त्याच्या मनावर कब्जा मिळवण्यासाठी या साधनांचा सरसकट वापर मुक्तपणे होत असतो. तो राजकीय कारणांसाठी होतो, तसाच व्यक्तीगत जीवनातील गरजा प्रभावित करण्यासाठीही होत असतो. मध्यंतरी गोरेपणासाठी विविध क्रिम विकण्याच्या  जाहिराती जोरात होत्या. अलिकडल्या काळात वाढत्या वयाबरोबर तारूण्य कमी होण्याच्या महिलांच्या काल्पनिक भितीचा गवगवा करून तशाच काही क्रीम वा टॉनिकचा बाजार तेजीत चालवला जातो. महागाई वा गरीबीच्या गप्पा जोरात चालू असतात आणि त्याच देशात खेड्यापाड्यापर्यंत पिण्याचे बाटलीबंद पाणी विकले जाते. तर कसल्या गरीबीवर विश्वास ठेवायचा? खेड्यातल्या मुलांनाही मॅगी वा ब्रेड-केक खाण्यातून कुठला पौष्टीक आहार मिळत असतो? एका बाजूला शाळांमधून सकस आहाराच्या सरकारी योजना राबवल्या जात असतात आणि दुसरीकडे त्या्च गरीब मुलांचे आईबाप मुलांना कुरकुरे वा कुठले तरी वेफ़र्स आवडीने खाऊ घालत असतात. कुपोषणाच्या बातम्या रंगवल्या जातात आणि त्याच परिसरात कुठल्याही किरकोळ टपरीवर असल्या कुरकुरे वेफ़र्सची पाकिटेही लटकलेली असतात. हा सगळा विचित्र भुलभुलैय्या नाही काय? कशाची कशाशी सांगड घालायची? शेतकरी आत्महत्या रंगवल्या जातात आणि त्यात दुष्काळी मानल्या जाणार्‍या परिसरातील आत्महत्या किती असतात? माहितीची आपण किती बारकाईने चाळण लावून तपासणी करतो? बातमी चांगली का नसते आणि प्रत्येकवेळी बातमी वाईटच का असावी लागते? माहितीचा घोळ का होत असतो? गोंगाटात नेहमी सत्याचा आवाज कुठल्या कुठे विरून जात असतो. दाबला जात असतो.

9 comments:

  1. भाऊ एकदम मनातल लिहिल। मलाही हेच वाटते की 100 रुपये साठी एखाद्या माणसाची कशी अडचण होते आणि सरकार कसे चूक आहे हे दाखवून देण्यासाठी न्युज वाले शूटिंग साठी लाखो रुपये खर्च करतात। त्यातून100 जर गरजू माणसाला दिले तर? पण नांही। बातमी ही बातमी म्हणून देत नाहीत तर न्युज चॅनेल्स त्यांचे मत थोपवत असतात। माझे स्पष्ट मत आहे की न्युज चॅनेल्स आणि ही मत थोपवत जाण्याची पत्रकारिता बंद केली तर सामान्य जनता सुखात जगेल

    ReplyDelete
  2. Correct

    N happy n enjoyed to read non political content after long time.

    ReplyDelete
  3. खूप छान आणि सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा लेख भाऊ...

    ReplyDelete
  4. अतिशय योग्य विश्लेषण. गरजा वाढवणं हे विक्रेत्याचं काम आहे, तो त्याचा धंदा आहे. जाहीराती आणि खोट्या बातम्या ह्यांना किती बळी पडायचं ते स्वतः ठरवायचं.

    ReplyDelete
  5. रामायणातला रावण सीतेला हात लावत नाही कारण तो त्याचा चांगुलपणा होता असं म्हणणं निदान आपल्याला शोभत नाही .
    थोडी माहिती घेवून लिहावं भाऊ .

    ReplyDelete
    Replies
    1. मग आपण आपल्या दृष्टीने जे खरं आहे ते सांगा.. अर्थात आपल्या माहितीचा स्त्रोत विचारला जाणार नाही; आपल्या मतावरून तो चटकन ओळखता येईल ..!!

      Delete
  6. ऱावणाने अनेक बलात्कार केले होते. त्याला एका अप्सरेचा शाप होता. त्यामुळे त्याने सीतेला हात लावला नाही.

    ReplyDelete