Thursday, May 17, 2018

योद्धा आणि माणूस

himanshu roy के लिए इमेज परिणाम

शेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसतो. अशा दुर्घटनांचे सरसकटीकरण केले जाते आणि त्यावर थातूरमातूर उपाय सुचवले जात असतात. शेतकरी आत्महत्या कर्जबाजारी होण्यातून होतात, ते त्यातले गृहीत आहे. मग त्यासाठी कर्जमाफ़ीच्या मागण्या होतात किंवा त्यासाठी आंदोलने छेडली जातात. अशा निराश वैफ़ल्यग्रस्तांना सरकारने दिलासा द्यावा याविषयी वाद व्हायचे कारण नाही. पण फ़क्त कर्जमाफ़ीने अशा आत्महत्या थांबू शकतात का? ते शक्य असते तर दहा वर्षापुर्वी युपीए सरकारने सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जे माफ़ केली त्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण खाली यायला हवे होते. पण तसे झालेले नाही. उलट नंतरच्या दहा वर्षात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मजेची गोष्ट म्हणजे विविध आकडेवारी प्रसिद्ध होते, तेव्हा कुठेही आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी किती कुटुंबांना कर्जमाफ़ीचा लाभ मिळू शकला ,त्याचा लवलेश आढळत नाही. याचा अर्थच कर्जमाफ़ी व शेतकरी आत्महत्येचा संबंध नसावा. पण ते निमीत्त साधून भलतेच कोणी त्या दु:खाचा लाभ घेऊन जात असावेत. आणखी एक मजेशीर गोष्ट आहे. सहसा शेतकरी आत्महत्येमध्ये महिला शेतकर्‍याची आत्महत्या आपल्याला ऐकायला मिळत नाही. मग आपल्या देशात महिला शेतकरीच नाहीत असा कुणाचा दावा आहे काय? मुद्दा त्यातल्या राजकीय लबाडीचा नसून माणूस आत्महत्येला का प्रवृत्त होतो असा आहे. कितीही प्रतिकुल परिस्थितीत नवर्‍याने आत्महत्या केल्यावर ठामपणे संसाराची जबाबदारी खांद्यावर घेणार्‍या महिला त्याच कुटुंबात आढळतील. महिला इतकी सशक्त असेल, तर त्यापैकीच काहीजणी बलात्कार किंवा तत्सम कारणासाठी आत्महत्या कशाला करतात? मुळात माणसाला आपले जीवन संपवण्याची इतकी ओढ का लागते? हिमांशू रॉय यांनी हा प्रश्न आपल्याला विचारला आहे.

मुंबईचे ख्यातनाम व कर्तबगार पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांनी गेल्या आठवड्यात आपल्याच निवासस्थानी आपल्याच पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही बातमी अकस्मात समोर आली, तितकीच ती धक्कादायक होती. ज्याने कोणी कुठल्याही कारणास्तव या अधिकार्‍याचे भारदार व्यक्तीमत्व बघितलेले असेल, त्यापैकी कोणालाही त्याने आत्महत्या करावी, हे वास्तव पचणारे नाही. पोलिस खात्यात असा आरोग्य व शरीरयष्टी जपणारा अधिकारी विरळाच असतो. पोट सुटलेले बेढब प्रकृती असलेले वरीष्ठ अधिकारी आपण सहसा बघत असतो. पण एखाद्या चित्रपटातला धिप्पाड पिळदार शरीराचा नायक वा अभिनेता शोभावा तशी हिमांशू यांची देहयष्टी होती. हा माणूस नित्यनेमाने व्यायाम करून आपली आरोग्य संपदा संभाळणारा आहे, हे सहज दिसू शकणारे सत्य आहे. अशा व्यक्तीने तुलनेने कोवळ्य़ा वयात आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवण्याचे कारण काय असावे? तर ते कर्करोगाच्या असाध्य बाधेने ग्रासलेले होते आणि त्यातून आलेल्या नैराश्याने त्यांना अशा मार्गाकडे ओढून नेले, असे सांगितले जाते. कर्करोग आता पुर्वीइतका असाध्य राहिलेला नाही आणि आपल्या समोर अनेक रुग्णांनी त्यावर मात केलेली उदाहरणे आहेत. युवराजसिंग हा क्रिकेटपटू तर ऐन भरात असताना कर्करोगाची शिकार झाला. पण कठोर उपचाराला सामोरा जाऊन त्याने या आजारावर मात केल्याचे आपण मागल्या काही वर्षात बघितले आहे. दिर्घकाळ उपचार घेऊन तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला आणि पुन्हा तितक्याच आवेशात खेळूही लागला होता. मग कर्करोगाला असाध्य समजून हिमांशू रॉय यांनी तडकाफ़डकी असा निर्णय कशाला घेतला असावा? माणूस अशा कुठल्या वळणावर येऊन उभा रहातो, की तिथून त्याला समोरचा मार्गही दिसेनासा होतो? यात्रा तिथेच संपवण्याचा मोह अनावर होतो?

प्रेमभंगामुळे आत्महत्या होतात आणि बलात्कार वा तत्सम कारणाने अब्रुच्या कारणास्तावही अनेकजण आत्महत्येचा मार्ग पत्करतात. पण अशावेळी त्यांची मनस्थिती नेमकी काय असते? मानसशास्त्र जाणणारे व त्यातले अभ्यासक त्याची मिमांसा वेगवेगळ्या प्रकारे करीत असतात. पण त्यामध्ये नैराश्य जितके असते, तशीच इतरही कारणे असतात. जन्मापासून माणसाची सगळी झुंज मृत्यूशीच असते. पण ती झुंज चालू असतानाच माणूस वेगवेगळे संकल्प मनाशी करीत असतो वा पराक्रम सिद्ध करण्याचेही निर्धार करीत असतो. साध्या जगण्यात झुंज उरली नाही, म्हणजे माणूस असे निर्धार करीत असतो. पोलिस यंत्रणेत उच्च अधिकारी व्हायला आयुष्य वेचलेल्या हिमांशू रॉय यांच्या आयुष्याचा संकल्प अशा आत्महत्येचा असू शकत नाही. त्यात कुठे अपयशी ठरले असेही काही कारण सापडत नाही. एकाहून एक मोठ्या प्रकरणाचा तपास करण्यापासून प्रशासनात आपली छाप निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेले होते. पण तरीही त्यांना जीवनयात्रा संपवण्याचा मोह आवरला नाही. बहूधा त्याला त्यांची त्यांनीच बनवलेली देहयष्टी कारण असावी. त्यांचे व्यक्तीमत्व बघितले तरी ते व्यायामातून आपली ठराविक शरीरयष्टी कशी दिसावी, याविषयी कमालीचे काटेकोर असल्याचे सहज लक्षात येते. त्याच देहाचा तोच आकार व प्रकार शिल्लक उरणार नसल्याची भिती त्यांना सतावत असावी. कर्करोगाच्या उपचारात जे उपाय योजले जातात, त्याच्या शरीरावर अनेक खुणा उमटतात. कर्करोग मानवी देहाला आतून पोखरून काढत असतो आणि हा माणूस जर आपल्या देहावर मनापासून प्रेम करीत असेल, तर त्या देहाचे रोगाकडून होणारे विकृतीकरण त्याला अजिबात सहन झालेले नसावे. त्याच एका कारणाने त्याच्या मनाचा, संयमाचा व सहनशीलतेचा कडेलोट केलेला असावा काय? कारण अन्य कुठलेही सबळ कारण दिसत नाही.

काही वर्षापुर्वी विजय तेंडूलकर यांची कन्या प्रियाही अशाच आजाराने काळाच्या पडद्याआड गेली. दिर्घकाळ प्रिया कर्करोगाने बाधीत होती. तिने कोणालाही भेटायचे वा सार्वजनिक जीवनात वावरायचे सोडून दिलेले होते. जवळचे मित्र परिचीतही तिला त्या काळात भेटू शकले नाहीत आणि एकेदिवशी तिच्या मृत्यूची बातमी आली. आपले जे रुप जगाने बघितले आहे, त्याला बाधा आणणारे विरुप अशा लोकांना भयभीत करते काय? हिमांशू रॉय तशाच कारणांनी ग्रासलेले होते काय? दोन वर्षापुर्वी त्यांना या आजाराची बाधा झाल्याचे लक्षात आलेले होते. आपल्या प्रकृतीची इतकी काळजी घेणार्‍या या अधिकार्‍याने तात्काळ उपचार घेण्यात कुठलीही कसूर ठेवलेली नव्हती. सहाजिकच त्यांनी उपचार घेण्यात कसूर केली वा निष्काळजीपणा केला असायची कुठलीही शक्यता नाही. बातम्या बघता त्यांचा देह उपचारांना प्रतिसादही देत असावा. पण बाधा झालेले शरीर व निरोगी धडधाकट देहयष्टी, यात मोठा फ़रक पडतो. तसा फ़रक हिमांशू रॉय यांच्या पचनी पडला नसावा काय? कारण ज्या सहकार्‍यांनी आणि अन्य परिचीतांनी नंतर प्रतिक्रीया दिल्या, त्यापैकी प्रत्येकाने रॉय अखेरच्या काळात एकाकी रहात असल्याचे सांगितलेले आहे. ते सेवेत असले तरी उपचारार्थ त्यांनी रजा घेतलेली होती आणि बाहेरचा संपर्क जवळपास थांबलेला होता. उपचाराला देह प्रतिसाद देत असेल, तर बातमी चांगली होती. हुरूप वाढवणारी गोष्ट होती. ते खरे असेल तर आत्महत्येला काही कारण उरत नाही. पण त्याचवेळी जगापासून आपल्याला कोंडून घेण्याच्या त्यांच्या वर्तनाचा खुलासा होत नाही. त्याचे कारण एकच असू शकते आणि ते त्यांच्या देहयष्टीमध्ये आजाराने घडवून आणलेले बदल हेच असू शकते. हिमांशू रॉय शेवटी एक माणूसच होता आणि आपल्या भावना व कर्तव्याच्या चक्रव्यूहात फ़सलेला अभिमन्यूच होता. एका क्षणी भावनांचा कडेलोट त्यालाही आत्महत्येच्या दारात घेऊन गेला.

जगताना या माणसाने आपल्या उद्दीष्ट व कर्तव्यावर जितकी श्रद्धा ठेवली, त्यापेक्षा अधिक हा माणूस आपण ‘कमावलेल्या देहयष्टी’च्या प्रेमात पडलेला असावा. मग त्याला त्या देहाची दुर्दशा आपल्या जीवंत असण्यापेक्षाही असह्य झालेली असावी. तसे नसेल तर उपचाराला प्रतिसाद मिळत असूनही त्याने जगापासून स्वत:ला कोंडून घेण्याची गरज नव्हती. आपण जसे दिसत होतो आणि जी देहयष्टी आपण अभिमानाने मिरवली, ती गमावलेली जगाने बघूच नये; अशा काहीशा समजुतीने हिमांशूंना बहुधा पछाडलेले असावे. तसे बघायला गेल्यास त्याने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपली इच्छा व भूमिका प्रस्थापित करण्याचे खास प्रशिक्षण घेतलेले होते. तो अनुभवी पोलिस अधिकारी म्हणजे योद्धाच होता. पण त्याच्या मनाने व भावनांनी प्रशिक्षीत अधिकार्‍यापेक्षा आपल्या देहयष्टीवर अपरंपार प्रेम केले. त्या देहापेक्षाही त्या देहाचे जे स्वरूप होते, त्याच प्रतिमेच्या प्रेमात हा माणूस आकंठ बुडालेला असावा. म्हणून मग तो देह ढासळताना वा कोसळून पडत असताना त्याला बघवले नाही. ते वास्तव उघड्या डोळ्यांनी सहन करता आले नाही आणि एका पोलिस अधिकार्‍यावर भावनाशील हळव्या माणसाने मात केली. त्याच्यातला पोलिस निष्प्रभ ठरला आणि भावनाविवश झालेल्या हिमांशू रॉय यांनी आपल्या त्याच देहाला अधिक ढासळू देण्यापुर्वीच संपवण्याचा जगावेगळा निर्णय घेतला असावा. तो किती चुक व किती बरोबर हे मानसशास्त्राचे जाणकार ठरवू शकतील. त्याची मिमांसाही करतील. पण एक दुर्दैवी सत्य आहे. एक योद्धा आपल्याच भावनांसमोर पराभूत झाला. आपल्या देहप्रेमाने त्याला इतके गुंगवून टाकलेले होते, की त्याच देहाला माणूस म्हणून जगण्याची आकांक्षा त्यांनी नाकारली. जगणे हीच झुंज असते आणि तोच मानवी जीवनाचा संकल्प असतो, हे सत्य नाकारून त्याने एक चुकीचा आदर्श निर्माण केला. देहाची प्रतिमा जपताला योद्धा ही प्रतिमा उध्वस्त करून टाकली.

5 comments:

 1. हिमांशू रॉय यांच्या मृत्युबद्दलच्या लेखामध्ये तुमच्या जगण्याच्या दृष्टिकोन कळला ,हा लेख लिहिल्याबद्दल भाऊंचे आभार.

  ReplyDelete
 2. Bhau,

  This remind me situation in Holiday Movie. Where a Police officer commits suicide

  ReplyDelete
 3. देह "मी" वाटे ज्या नरा ।
  तो जाणावा आत्महत्यारा॥
  -समर्थ रामदास

  www.dasbodh.com

  ReplyDelete
 4. Atishat chhan lekh bhau, dole ughadle. Jivan ek kaymachi zunz aahe.

  ReplyDelete
 5. भाऊ, यापेक्षा अधिक चांगला लेख तर एखादा मानसोपचार तज्ञही लिहू शकणार नाही. माझा धाकटा भाऊ मानसोपचार तज्ञ आहे आणि त्याचे पेशंट परदेशातून त्याचा सल्ला घ्यायला येतात. त्या आधारावर बोलतोय, ही केवळ स्तुती नाही.

  ReplyDelete