Monday, May 7, 2018

अनगायडेड मिसाईल

Image result for bhujbal

जवळपास सव्वा दोन वर्षाच्या तुरूंगवासातून ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांची जामिनावर मुक्तता झालेली आहे. आज घडीला त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेसचा नेता म्हणावे किंवा नाही, याविषयी अनेकांच्या मनात शंका असल्या, तर नवल नाही. कारण या सव्वा दोन वर्षात भुजबळ राजकारणाचे जितके खाचखळगे शिकलेले आहेत, तितके बहुधा त्यांनी आपल्या चार दशकाच्या राजकीय वाटचालीत अनुभवलेले नव्हते. दोन दशकापुर्वी राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली, तेव्हा शिवसेनेच्या निशाण्यावर भुजबळ होते आणि पुढल्या काळात युतीची सत्ता उलथून पाडण्यात आघाडीचा शिलेदार म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी कोणी विसरू शकत नाही. म्हणूनच सत्तांतर होऊन आघाडी सरकार आले, त्यात भुजबळांची वर्णी उपमुख्यमंत्री म्हणून लागलेली होती आणि त्यांनी आपली कारकिर्द अनेक कृतींमधून गाजवली होती. एका क्षणी तर तेलगी प्रकरणात त्यांना राजिनामा द्यावा लागला आणि नंतर पक्ष सोडण्याचे विचारही त्यांच्या डोक्यात घोळत होते. पण पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. पण तो अतिशय अपमानास्पद रितीने हिरावून घेण्यात आला होता. तिथपासून भुजबळ यांचे स्वपक्षातील स्थान डळमळीत झालेले होते. मोदी लाट देशाचे राजकारण बदलत असताना महाराष्ट्रातही सत्तांतर झाले आणि भुजबळांना सव्वा दोन वर्षापुर्वी एका घोटाळा प्रकरणी तुरूंगात जावे लागले. अजून त्याचा निकाल लागलेला नाही. पण त्यांना जामिनही नाकारला गेला, तेव्हा त्यांच्यासाठी स्वपक्षाने काय केले हा प्रश्न आहे. भुजबळांना त्याचे वैषम्य वाटले तर गोष्ट वेगळी. कारण तेच यातील पिडीत आहेत. पण सामान्य लोकांच्याही राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्याकडे केलेले संपुर्ण दुर्लक्ष नजरेत भरलेले आहे. भुजबळ एकाकी जामिनाची व कोर्टाची लढाई लढत राहिले. पक्षाने त्यांच्यासाठी कुठली हालचाल केली, असे एकदाही दिसले नाही.

भुजबळांच्या अटकेनंतर पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी आपल्यालाही कधी अटक होते, याची प्रतिक्षा असल्याची उपरोधिक टिप्पणी केलेली होती. पण आपल्याच पक्षाचा एक धडाडीचा नेता भुजबळ याच्या मुक्तीसाठी पवारांनी पुढाकार घेतल्याचे एकही उदाहरण नाही. अगदी अलिकडे तुरूंगात भुजबळांचे काही बरेवाईट होऊ शकते, अशी भिती व्यक्त करण्यात आली. तेव्हा पवारांनी मुख्यमंत्र्यांना खास पत्र लिहून त्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल, अशी भूमिका घेतली होती. त्यापेक्षा अधिक काहीच नाही. हा सगळा पुर्वेतिहास बघितला तर जामिनावर सुटका झाल्यानंतर भुजबळांचा पवित्रा काय असेल, हा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने भुजबळ दोन दिवसात कार्यान्वीत होतील असे म्हटलेले आहे. पण भुजबळ यांच्या भडीमाराची दिशा व नेम कोणावर असेल, ते आज कोणी सांगू शकत नाही. १९९९ सालात कॉग्रेस पक्षात फ़ुट पडली, तेव्हा भुजबळ विधान परिषदेत विरोधी नेता होते आणि राज्यातील पवार गटाचे नेतृत्व करायला त्यांनी आपली सर्व शक्तीच पणाला लावलेली होती. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या सोहळ्यापासून पुढल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीतही भुजबळांनी सगळा भार आपल्या खांद्यावर पेलला होता. पण जेव्हा केव्हा भुजबळ अडचणीत सापडले, तेव्हा पक्ष वा नेतृत्व त्यांच्या मागे तितके खंबीरपणे उभे राहिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याविषयी वाद होण्याचे कारण नाही. आता आयुष्याच्या अखेरच्या पर्वात गमावण्यासारखे भुजबळांपाशी काहीही उरलेले नाही आणि महत्वाकांक्षा बाळगण्याचे वय उरलेले नाही. मग तुरूंगातल्या मानसिक यातनांची बोचरी वेदना त्यांना राजकारणात कुठल्या दिशेने घेऊन जाईल, हे मोठे रहस्य आहे. किंबहूना पुढले काही आठवडे राज्यातील राजकारण भुजबळांविषयीच्या रहस्याभोवती फ़िरणार आहे.

आज विधान परिषदेतील विरोधी नेता असलेले धनंजय मुंडे यांनी भुजबळांची भेट घेतल्यावर ते कार्यान्वीत होणार असल्याचे म्हटले आहे. पण जामिन मिळतानाही इस्पितळात उपचारार्थ दाखल असलेल्या भुजबळांची भेट घेण्यास राष्ट्रवादीचा कोणी नावाजलेला नेता फ़िरकला नव्हता, ही बाब नजरेत भरणारी आहे. मुंडे यांना पुढे करण्यात आले, तरी ते तुलनेने कनिष्ठ नेताच आहेत. मग याला पक्षाचे दुर्लक्ष म्हणायचे काय? मागले दोन महिने राज्यभर हल्लाबोल आंदोलन छेडणार्‍या पक्षाच्या कोणाही वरीष्ठ नेत्याला जामिनानंतरही भुजबळांची भेट घेण्याची गरज वाटलेली नाही, हे अधिक बोलके धोरण नाही काय? मागल्या सव्वा दोन वर्षात भुजबळांविषयी पक्षाने दाखवलेली अनास्था आणि इतर पक्षातल्या लोकांनी व्यक्त केलेली आस्था, राजकीय अनिश्चीततेचे लक्षण आहे. अर्थात भुजबळांनी आपले पत्ते अजून उघडलेले नाहीत आणि परिस्थितीचे योग्य आकलन केल्याशिवाय ते काही भूमिका लगेच घेण्याची शक्यता नाही. प्रामुख्याने अजून निवडणूका दाराशी आल्या नसताना काहीही उलटसुलट बोलून आपले पत्ते खुले करण्याइतके भुजबळ दुधखुळे नाहीत. योग्य वेळ व योग्य संधीची प्रतिक्षा करण्याइतका मुरब्बीपणा त्यांच्यात अनुभवातून आलेला आहे. किंबहूना सव्वा दोन वर्षाच्या तुरूंगवासात त्यांना चिंतन मनन करण्यासाठी भरपूर अवधी मिळालेला आहे. त्यात त्यांनी केलेले आत्मपरिक्षणच त्यांच्या भावी राजकारणाची दिशा निश्चीत करणार आहे. आधी प्रकृती धडधाकट करून घेईपर्यंत ते आपल्या मनातले बोलण्याची शक्यता बिलकुल नाही. शिवाय लोकसभा वा विधानसभेला वर्ष दिडवर्ष असताना घाई करायचीही गरज नाही. म्हणूनच छगनरावांचे भुज-बळ राजकारणात कुठल्या बाजूने उभे राहिले वा कोणावर चाल करून जाईल, हे आताच सांगता येणार नाही. आजही ते राष्ट्रवादीचे आमदार व नेता आहेत. उद्या काय होईल व कसे होईल, हा म्हणूनच कुतूहलाचा विषय आहे.

तांत्रिकदृष्ट्या भुजबळांची सुटका झाली आणि त्यानंतरही प्रकृतीच्या कारणास्तव ते इस्पितळातच रहातील अशी बातमी होती. त्यांना भेटायला कार्यकर्त्यांनी गर्दी केली असेही सांगितले जात होते. मात्र भेटायला धाव घेणार्‍यांमध्ये कुणाही ज्येष्ठ श्रेष्ठ राष्ट्रवादी नेत्याचे नाव ऐकायला मिळत नव्हते. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भुजबळांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करणारे शरद पवार, यांनीही या सुटकेविषयी कुठली प्रतिक्रीया देण्याचे कशाला टाळले? न्याय मिळाला वा दिलासा वगैर असेही काही पवारांना म्हणावेसे वाटलेले नाही. हे कसले संकेत मानावेत? भुजबळांचीही कुठल्याही बाजूने स्पष्ट शब्दातली प्रतिक्रीया आलेली नाही. भुजबळांचे व पवारांचे हे मौन धक्कादायक आहे. सांगलीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाली, तर पवारांनी अगत्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आव्हाडांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. प्रामुख्याने तेव्हा आव्हाड हे आपले ओबीसी समाजातील नेते असल्याचा उल्लेख लक्षणिय होता. तो भुजबळ ओबीसी नेते राहिले नसल्याचाच संकेत होता काय? नसेल तर सव्वा दोन वर्षानंतर कोंडवाड्यातून बाहेर पडलेल्या भुजबळांना शुभेच्छा देण्याइतकेही सौजन्य कुणा पवार कुटुंबियाला का दाखवता आलेले नाही? जितके पवार कुटुंबाचे मौन शंकास्पद आहे, तितकेच भुजबळांनी जामिनावर मतप्रदर्शन करायचे टाळणेही बुचकळ्यात टाकणारे आहे. म्हणूनच हे ‘अनगायडेड मिसाईल’ कुठल्या दिशेने झेप घेईल वा कुठे जाऊन आदळेल ह्याची चिंता अनेकांना भेडसावणारी आहे. किमान राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटिल किवा माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना तरी परळला फ़िरकायला हरकत नव्हती. पण त्यापैकीही कोणी त्या दिशेने एकही पाऊल टाकलेले नाही. मागले दोन महिने हल्लाबोल करणारे अनपेक्षित हल्लाबोलच्या भितीने भेदरले आहेत काय?

5 comments:

  1. भाऊ तुमची विश्लेषण करण्याची क्षमता खूप छान तर आहेच, किंबहुना आम्ही सर्व फॉलोअर त्यासाठीच तुमचे चाहते आहोत. एखाद्या विषयाचे जे आकलन किंवा दृष्टिकोन तुम्ही उलगडून दाखविता त्याला तोड नाही. अप्रतिम ! या लेखाच्या अनुषंगाने मला असे वाटते की आपण देत असलेली हेडलाईनही अतिशय समर्पक व चपखल असते. 'अनगायडेड मिसाईल' , 'देवेगौडांचे गौडबंगाल', 'उडत्याचा पाय खोलात', वरकरणी अर्थ न लागणारे हे शब्द, लेख वाचल्यावर किती चपखल त्या लेखाला लागू पडतात, हे लगेच समजून येते.......कदाचित अशाच काही हटके गोष्टींमुळे आम्ही तुमचे फॅन आहोत....

    ReplyDelete
  2. १. उगवत्या सूर्याला नमस्कार.
    २. पक्षासाठी केलेल्या कामाच्या बदल्यात पद दिले आणि अनिर्बंध माया जमवण्याचे स्वातंत्र्य दिले होते की.
    ३. माया पचविण्याची शक्ती पक्ष कसा देईल?

    ReplyDelete
  3. बेसिकली अशा वृत्ती सत्तेच्या राजकारणासाठी नेमक्या कशा वापरायच्या आणि आपला वापर कसा करू द्यायचा, हे ही मंडळी नीट समजून असतात. अशी बरीच उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे आपल्या दैनंदिन ओढाताणीत व्यस्त असलेला साधा माणूसही त्याच्या कळत किंवा न कळत पण या खेळात गुरफटत असतो. आताही तशीच धकाधकी सुरू आहे. आणि यामुळे किंवा यातून फक्त अस्थिरता आणि आशाश्वतीच फोपवती राहणार आहे. ����

    ReplyDelete
  4. भाऊ आपला लेख अतिशय सुरेख

    ReplyDelete
  5. बळीचा बकरा... स्वतःला आणि पुतण्याला वाचवण्यासाठी.. पुढचा बकरा शोधून ठेवलेला असेलच..

    ReplyDelete