Thursday, May 24, 2018

बादशाही संपलेले बादशहा

rahul jayaram ramesh के लिए इमेज परिणाम

शनिवारी कर्नाटक विधानसभेत भाजपाचे औटघटकेचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी राजिनामा दिला. त्यानंतर कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून बाकीच्या वाचाळ नेत्यांनी विविध वाहिन्यांवर तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर जयराम रमेश आठवले. तेही कॉग्रेस पक्षातले एक ज्येष्ठ नेता आहेत आणि अलिकडल्या काळात ते फ़ारसे प्रसिद्धी माध्यमात दिसत नाहीत. २०१४ च्या दारूण पराभवापर्यंत कॉग्रेसचे प्रवक्ते वा नेता म्हणून ते सातत्याने वाहिन्यांवर दिसायचे. पण पराभवानंतर त्यांनी जणू राजकीय संन्यास घेतला असावा असेच भासत राहिलेले आहे. कारण क्वचितच कुठून तरी त्यांची मते ऐकायला मिळ्तात. पण इतक्या दारूण पराभवानंतरही डोके ठिकाणावर असलेला तोच एक कॉग्रेस नेता शिल्लक आहे. किंबहूना आपल्या पराभवाची चाहुल लागलेला तोच एकमेव कॉग्रेसनेता २०१४ पुर्वी पक्षात होता. पण लोकशाही जीवापाड जपणार्‍या त्या पक्षात अशा प्रामाणिक मते मांडणार्‍या नेत्याला अजिबात स्थान नसल्याने, त्याची नेहमी गलचेपी होत राहिलेली आहे. हे सत्य ओळखण्याची कुवत असल्यानेच वेड्यांच्या बाजारात बसण्यापेक्षा रमेश गप्प बसत असावेत. अन्यथा त्यांनी कान धरून एक एक कॉग्रेस नेत्याला कानपिचक्याच दिल्या असत्या. त्या शनिवारी कॉग्रेसी नेते आपण कर्नाटकात दिग्विजय साजरा केल्याच्या थाटात बोलत होते आणि त्यांना आपल्या पक्षाची स्वबळावर असलेली कर्नाटकातीला सत्ता संपली, असल्याचेही भान नव्हते. सहाजिकच त्या कॉग्रेस नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळेच जयराम रमेश आठवले. त्यांनी स्वपक्षातील अशा नेत्यांबद्दल गतवर्षी नेमके आकलन कथन केले होते. आपल्या पक्षातले नेते म्हणजे सत्ता गमावलेले सुलतान झालेत. राज्य कधीच गमावले आहे, पण मनातली सुलतानी संपलेली नाही, असेच रमेश यांचे एका मुलाखतीतले शब्द होते. पण ऐकतो कोण व विचार कोण करणार?

गेल्या वर्षी जुलै महिन्यात केरळमध्ये एका परिसंवादात बोलताना जयराम रमेश यांनी हे स्फ़ोटक विधान केले होते. कॉग्रेस पक्ष म्हणजे सत्ता गमावलेल्या सुलतानांचा जमाव असल्याचे हे एक़च विधान त्यांनी केलेले नव्हते. स्वपक्षाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारी अनेक विधाने त्यांनी केलेली होती. त्यापैकी एका विधानाची कर्नाटकच्या नाट्याने खातरजमा करून दिली. भाजपाला रोखल्याचा आनंदोत्सव साजरा करणार्‍या कॉग्रेस नेत्यांना याचे भान नव्हते, की मोठा पक्ष असूनही त्यांनी मुख्यमंत्रीपद जनता दल सेक्युलर या तिसर्‍या पक्षाकडे सोपवलेले आहे. तो भाजपाचा पराभव असला तरी कॉग्रेसचा विजय नक्कीच नाही. पण बरखास्त झालेल्या बादशाहीचा उत्सव मात्र जोरात सुरू होता. कपील सिब्बल, सिंघबी वा अगदी सुरजेवाला व राहुल गांधीही आपण महान साम्राज्य वाचवले, किंवा विस्तारले असल्याचा आवेशात बोलत होते. आणखी एक राज्य गमावल्याची कुठलीही जाणिव त्यात नव्हती. आणि आजच्या कॉग्रेससाठी तीच खरीखुरी समस्या आहे. किंबहूना तीच रमेश यांनी उपरोक्त परिसंवादात मांडलेली होती. २०१४ सालात लोकसभेत दारूण पराभव झाला, तेव्हाच आपण राज्य व सत्ता गमावलेली आहे, याचे तीन वर्षे उलटून गेल्यावरही कॉग्रेसच्या नेत्यांना भान आलेले नाही. ही दुखरी जाणिव रमेश यांनी व्यक्त केली होती आणि त्याची मिमांसा करताना त्यांनी मुख्य दुखण्यालाही हात घातला होता. कॉग्रेससमोर आज कुठले आव्हान उभे आहे? ते आव्हान पंतप्रधान मोदी आहे की अमित शहा अध्यक्ष असलेला भाजपा आहे का? या दोन्हींचा इन्कार करून रमेश म्हणतात, आमच्या पक्षासमोर निवडणूका जिंकण्याचा प्रश्न नाही. तसे प्रसंग याहीपुर्वी अनेकदा आलेले आहेत आणि त्यावर कॉग्रेसने मात केलेली आहे. आज निवडणूका जिंकण्याची काही समस्या नसून पक्षाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे.

शनिवारी कर्नाटकात भाजपाच्या मुख्यमंत्र्याने राजिनामा दिला. त्यामुळे तिथे पुन्हा कॉग्रेसचा मुख्यमंत्री आलेला नाही वा येणार नाही. तर कॉग्रेसच्या पाठींब्याने अन्य कोणा पक्षाचा मुख्यमंत्री सत्तासनावर आरुढ होणार आहे. पण त्याचाच अर्थ एक राज्य कॉगेसने गमावले आहे. तिथे स्वबळावर सत्ता मिळवणार्‍या कॉग्रेससाठी भविष्य उज्ज्वल राहिलेले नाही. कारण जिंकण्यासाठी वा सत्ता टिकवण्यासाठी जसे पक्षाने लढायला हवे, तसा पक्ष आता अस्तित्वात राहिलेला नाही. परिणामी आपले सिंहासन अन्य कुणाला तरी नाकारून तिसर्‍या कुणाला देण्यासाठीही कॉग्रेसला झुंजावे लागलेले आहे. जनता दलाचे आमदार कॉग्रेसच्या निम्मे असूनही कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनवण्याची नामुष्की आलेली होती. त्यात यश मिळवले, तर कॉग्रेसला तोच आपला विजय म्हणून साजरा करावा लागलेला आहे. मग त्याला विजयोत्सव म्हणावे की कुणाच्या पराभवातील विघ्नसंतोष म्हणायचे? त्यातले अपयश ज्याला बघता येईल, तोच त्यावर मात करू शकतो वा तसा प्रयत्न करू शकतो. पण इथे कॉग्रेसच्या नेत्यांना त्याचे भानही नाही. ते आपलीच सरशी झाल्याचा आनंदोत्सव करीत आहेत. कारण आज कॉग्रेस पक्ष म्हणून सुसंघटित उरलेला नाही, किंवा त्याच्यासमोर काही ध्येय उद्दीष्ट राहिलेले नाही. भाजपाला पराभूत करणे व त्यासाठी आपलेही नुकसान झाल्याचाही आनंदोत्सव साजरा करण्यापर्यंत घसरगुंडी झालेली आहे. आपल्यासाठी आपण आज लढत नसून, भलत्या कुणाच्या लाभासाठी झीज सोसत आहोत. त्यासाठीही झुंजावे लागते, यातली बोच जयराम रमेश यांच्या विधानातून आली आहे. पण ती समजून घेण्याचाही विवेक पक्षात उरलेला नाही. किंबहूना त्यातून आपल्या समोरचे संकट काय आहे, त्याविषयी कॉग्रेस किती गाफ़ील आहे, त्याचीही साक्ष मिळून जाते. थोडक्यात आपल्याच पक्षाचा र्‍हास उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेदना रमेश यांना असह्य झाली होती.

२०१४ च्या दारूण पराभवापुर्वी काही महिने त्यांनी पक्षासमोर मोदी हे अपुर्व आव्हान असल्याचे मतप्रदर्शन केले होते. तर पक्षातूनच त्यांची खिल्ली उडवली गेली होती. पण त्यांचे शब्द खरे ठरले आणि ४४ जागांपर्यंत कॉग्रेस घसरली. पण निवडणूकातले यश अपयश महत्वाचे नसते. त्यापेक्षा पक्षाची भूमिका व संघटना महत्वाची असते, ती संघटना भक्कम व धोरणे परिपक्व असतील, तर कुठल्याही संकटावर मात करता येत असते. पराभवाच्या खाईतून नव्याने उभे रहाता येते. १९७७ वा १९९६ अशा अनेक प्रतिकुल परिस्थितीतून कॉग्रेस पक्ष तावून सुलाखुन बाहेर पडलेला आहे. पण त्यावेळची परिस्थिती व उपाययोजना वेगळ्या होत्या. आज राजकारण बदलले आहे, देश बदलला आहे आणि परिस्थितीही आमुलाग्र बदलून गेलेली आहे. आधीच्या काळात प्रत्येक पक्ष व नेता कसा वागेल, त्याचे काही आडाखे असायचे. पण आजकाल मोदी शहांनी राजकारणाचे नियम बदलून टाकलेले आहेत. त्यात जुने ठोकताळे व निकष लागू होत नाहीत. म्हणूनच त्यानुसार कॉग्रेसलाही बदलावे लागेल, असे रमेश यांनी मागल्या जुलै महिन्यातच सांगितलेले होते. त्यानंतर त्रिपुरा भाजपाने जिंकला किंवा प्रतिकुल परिस्थितीतही गुजरात भाजपाने राखला. कारण प्रत्येक राज्यातील परिस्थिती व मांडणी यानुसार मोदी-शहा आपले डावपेच बदलत असतात. त्यांच्या घोषणा बदलतात, त्यांचे धोरण बदलते, त्यांची रणनिती बदलत असते. मग त्यांच्या डावपेचासमोर कालबाह्य झालेले कॉग्रेसी डाव शिजत नाहीत. त्या घोषणा, डावपेच व कल्पनाच जुन्या होऊन गेलेल्या आहेत. कॉग्रेसला त्या स्मृतीरंजनातून बाहेर पडावे लागेल. यापुर्वी सतेत असलेल्यांवर मतदाराची नाराजी हे राजकीय भांडवल असायचे. त्याला शहा मोदींनी शह दिलेला आहे, ते लक्षात घेऊनच लढावे लगणार आहे. नाराज लोक आपल्याकडे झक्कत येतील, या भ्रमातून बाहेर पडायला हवे. हे रमेश यांना कळते, पण राहुलना समजवायचे कोणी?

कर्नाटकात कॉग्रेसची असलेली सत्ता एकाच मुदतीनंतर मतदाराच्या नाराजीवर मात करून टिकवता आलेली नाही. पण त्याच कालखंडात भाजपाने वा मोदी-शहांनी पाच वेळा जिंकलेला गुजरात सहाव्यांदा राखलेला आहे. तिथला मतदार पाच वेळा भाजपाला सत्ता दिल्यावर किती नारा्ज असेल? त्याचा लाभ राहुल वा कॉग्रेसला उठवता आलेला नाही. मात्र एकाच कॉग्रेसी कारकिर्दीत कर्नाटकचा मतदार जितका नाराज होता, त्याचा पुरेपुर लाभ उठवित मोदी-शहांनी कॉग्रेसचे आणखी एक राज्य खासला केलेले आहे. बहूमत भाजपाला मिळालेले नसेल. पण तिथे पहिल्या क्रमांकाचा पक्ष होताना मुठभर जागांनी सत्ता हुकलेली आहे. हेच पाच वेळ गुजरातमध्ये विरोधात बसलेल्या कॉग्रेसला का करून दाखवता आले नाही? कारण त्यांना बदललेले नियम व परिस्थितीचे भान नाही. बादशाही संपुष्टात आली आहे. पण सत्ता गमावलेले सुलतान मात्र आजही त्याच मस्तीत गुरगुरत आहेत. मोदींवर नाराज झालेला मतदार आपल्या पायाशी येऊन लोळण घेईल, अशा प्रतिक्षेत आशाळभूत होऊन परिस्थिती बदलणार नाही. हे सत्य आहे आणि रमेश यांनी ते मागल्या जुलैमध्ये म्हणजे नऊ महिने आधी जाहिरपणे सांगितले होते. पण सुलतान आपल्या मस्तीत आहेत आणि नित्यनेमाने नवनवे फ़तवे जारी करीत आहेत. त्याच फ़तव्यांना सरकारी फ़र्माने समजून आपल्या अकलेचे तारे तोडणार्‍या भाट अभ्यासकांच्या गुणगानाच्या कविता ऐकण्यात सुलतान मशगुल आहेत. अशा भ्रमात जगणार्‍यांना रमेश किती व कसे जागे करणार? स्वप्नरंजनाच्या पलिकडे त्यांना कधी जाता येत नाही, की समोरच्या संकटाला सामोरे जाण्याचे धाडस होत नाही. मग कर्नाटक आपण गमावला हे त्यांच्या मेंदूत कसे शिरावे? म्हणून मग पराभवाचेही सोहळे होऊ शकतात आणि विवस्त्र राजाचीही मिरवणूक थाटामाटात काढली जाऊ शकते. बिचारे जयराम रमेश यांच्या वेदनेवर कोणी मलमही लावणारा शिल्लक उरत नाही.

5 comments:

 1. भाऊ तुमच्या सारखे मोजकेच लोक खरी वस्तुस्थिती लिहितात ,बाकी सर्व काँग्रेस चे गुणगान करण्यात मग्न आहेत ,ते त्यासाठी काहीही बरळतायत ,इतके कि अंधश्रद्ध झालेत स्वतःला पुरोगामी व भाजप ला प्रतिगामी म्हणजे अंधश्रद्ध मानणारे लोकसत्ताकार चक्क जेवा १५ ला result येत होते तेव्हा पटकन एक विडिओ अपलोड करतात तेव्हा भाजप ला बहुमत दाखवत होते म्हणजे ते ट्रेंड चालू होते ,त्यात असा म्हणालाय कि कर्नाटकात सत्तेत येणार लोकसभा हरतो असाच पूर्वी घडलय ,तेव्हा काँग्रेस ने खुश व्हावं ,नंतर भाजप चे बहुमत हुकले तेव्हा परत स्वतःचे शब्द गिळून परत आरती सुरु झाली.म्हणजे व्हिडिओतला खरा मानलं तर आता लोकसभेत भाजप यायला हवं . पण तो विडिओ आता दिसत नाहीये .

  ReplyDelete
 2. भाऊ, काँगेसची कीव येते हो ! त्यांना अजून कर्नाटकात काय झाले आहे ते समजलेच नाही.

  ReplyDelete
 3. खूप छान शब्दात वर्णन केले

  ReplyDelete
 4. मोदींनी फारच खोटी आश्वासने दिलीत ना??
  ठीक आहे आपण २०१९ ला यांना बदलू या
  पण एकदा फसलोत,
  यावेळी फसवणूक होऊ नये यासाठी
  "प.पू. रा गा " किंवा "त्यांच्या अनुयायानीं" किंवा "लष्कर ए फुरोगामी" यांनी काही उत्तरे द्यावीत

  १) तुमच्या राज्यात पेट्रोलचा दर किती असेल
  २) जनतेच्या साधन सुविधांवर बहुसंख्य लोकांचा अधिकार आसेल का?? असेल तर किती प्रमाणात
  ३) आमच्या मते भारताचा असलेला पाक व्याप्त काश्मीर परत भारतात येणार का??? कधी ??
  ४) काश्मीर मधील दगडफेक आणि सैनिकी हत्याकांड थांबेल का ??? कधी ??
  ५) हिंदू समाजाला त्यांचा "पर्सनल लाँ" मिळेल का?? कधी ??
  ६) राममंदिर बद्दल आपले मत स्पष्ट होईल का?? कधी ??
  ७) सध्या मागास वर्गीयांवर होणारे (तथाकथित) हल्ले तुम्ही कसे थांबवणार ??
  ८) सर्व बेरोजगार तरूणांना नोकऱ्या मिळणार का?? कधी ??
  ९) शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफि करणार का ??कधी ?? कशी ??
  १०) जर कर्ज माफि केलीत तर तो खर्च तुम्ही उर्वरीत समाजा कडून कसा वसूल करणार ??
  ११) पाकिस्तान / चीनशी तुमचे परराष्ट्रीय धोरण काय असेल??
  १२) सर्व दहशतवादि हल्ले थांबवणार का?? कसे ??

  उत्तरे द्या
  २०१९ तुमचेच

  ReplyDelete
  Replies
  1. यातलं मोदींनी काय काय केलंय बरं ?

   Delete