१९९८ नंतर भारतात मतचाचण्यांचे युग सुरू झाले. प्रणय रॉय याला त्यातूनच राजकीय विश्लेषक म्हणून आपली ओळख मिळाली. आरंभी राजकीय अभ्यासक आणि राजकीय पत्रकार या शास्त्रावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण पुढल्या काळात मतचाचण्यांचे शास्त्र विस्तारत गेले आणि अनेकजण त्यात उतरत गेल्यावर आता प्रत्येक लहानमोठ्या निवडणूकीच्या चाचण्या ही नित्याची गोष्ट होऊन गेली आहे. पण जेव्हा या चाचण्यांची जाहिर चर्चा व परिसंवाद होऊ लागले, तेव्हा त्यात शास्त्राला फ़ाटा मिळाला आणि त्याचाही राजकीय प्रचारासाठी सरसकट गैरवापर होऊ लागला. पण बातमीदारीत तो एक मनोरंजक खेळ होऊन गेला. कुठल्याही माहितीत भेसळ केली तर दोष माहितीचा नसतो, भेसळ करणारा गुन्हेगार असतो. म्हणूनच माहितीला दोष देता येत नाही. माहितीचा अर्थ लावणारा लबाड असेल, तर माहिती चुक नसते. मतचाचण्यांच्याही बाबतीत तेच झाले. आरंभीच्या काळात प्रणय रॉय तज्ञ म्हणून काम करीत असे आणि हळुहळू त्याचे व्यावसायिक हितसंबंध निर्माण झाले. मग त्याचेही अंदाज फ़सू लागले. त्याच्या तुलनेत आता या उद्योगात आलेले अनेकजण मुळचेच व्यावसायिक असून, त्यांना मिळणार्या उत्पन्नाची महत्ता वाटू लागली असेल, तर अंदाज फ़सत गेले तर नवल नाही. आताही कर्नाटक निवडणूकीच्या निमीत्ताने अनेक मतचाचण्या समोर आल्या आहेत. कोणीही विधानसभेत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहूमताचा अंदाज व्यक्त केलेला नाही. पण नेमकी अशीच स्थिती वर्षभरापुर्वी उत्तरप्रदेश विधानसभा वा त्याहीपुर्वी लोकसभेच्या निवडणूकीत झालेली होती. कुठलीच चाचणी बहूमताचे भाकित करीत नसताना आलेले निकाल धक्कादायक होते. कर्नाटकातली त्रिशंकू विधानसभेचा अंदाज म्हणूनच तोंडघशी पडण्याची आता खात्री वाटू लागली आहे. किंबहूना कर्नाटकचा उत्तरप्रदेश होणार असेही वाटू लागले आहे.
कर्नाटकचा उत्तरप्रदेश म्हणजे नेमके काय? तर उत्तरप्रदेशात कुठल्याही एका पक्षाला बहूमत मिळण्याची कोणाही जाणकाराला वा चाचणीकर्त्याला खात्री वाटत नव्हती. पण प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा भाजपाने बहूमताच्याही पुढे जाऊन ८० टक्के जागा जिंकलेल्या होत्या. चाचणीकर्त्यांचे अंदाज इतके कशाला फ़सले? दुसरीकडे एक्झीट पोल अनेकांचे यशस्वी का होतात? असे प्रश्न सामान्य माणसाला पडत असतात. उत्तरप्रदेशात अनेक फ़ेर्यात मतदान झाले. त्यात अखेरच्या दोन फ़ेर्या बाकी होत्या, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी वाराणशीमध्ये तीन दिवसाचा मुक्काम ठोकला होता. तर बहुतांश राजकीय अभ्यासकांनी भाजपाच्या पराभवाची भाकिते केली होती. सहाजिकच त्याचेच प्रतिबिंब मतचाचण्यात पडले. एका मतचाचणीने काठावरचे बहूमत भाजपाला देऊ केले होते आणि एका एक्झीट पोलमध्ये भाजपाने पावणेतीनशे इतकी मजल मारली होती. पण प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा भाजपा ४०३ पैकी ३२५ जागा जिंकून गेला. कर्नाटकात नेमकी तशीच परिस्थिती उदभवली आहे. मोदींनी अखेरच्या आठवड्यात प्रचारात उडी घेतली आणि त्याकडेही मोदी भयभीत असल्याच्याच नजरेतून बघितले जात आहे. प्रत्येक चाचणीने त्रिशंकू विधानसभेचे भाकित केले आहे. पण दोन दिवस आधी टाईम्स नाऊ वाहिनीने एक झटपट चाचणी घेतली आणि तिचे आकडे थक्क करणारे आहेत. भाजपाला ५७ टक्के तर कॉग्रेसला २८ आणि जनता दलाला १२ टक्के अशी मतांची टक्केवारी दिलेली आहे. त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. पण अखेरच्या पर्वात मोदींनी जो वादळी प्रचार केला, त्याचा परिणाम जनमानसावर होताना दिसलेला आहे. बाकी सगळ्याच चाचण्या मोदी प्रचारात उतरण्यापुर्वीच्या आहेत. तिथेच सगळी गडबड होण्याची दाट शक्यता आहे. इथे कर्नाटकातही भाजपा इतकी मोठी मजल मारून जाऊ शकतो काय?
योगायोग असा आहे, की उत्तरप्रदेश प्रमाणेच कर्नाटकातही तिरंगी लढत आहे. या तिरंगी लढतीमध्ये देवेगौडांचा पक्ष तिसरा आहे. उत्तरप्रदेशात अखिलेशचा समाजवादी पक्ष सत्तेत व मायावती त्याच्याशी तुल्यबळ असा पक्ष होता. पण विधानसभेच्या लढतीमध्ये समाजवादी व भाजपा अशा लढतीमध्ये मायावतींचा बसपा चिरडला गेला व जमिनदोस्त होऊन गेला. मोदी नावाच्या वादळासमोर अखिलेशचा समाजवादी पक्ष पालापाचोळा होऊन गेला. तर त्याच्याच कुबड्या घेऊन लढणार्या कॉग्रेसला आपल्या मुठभर जागाही टिकवता आल्या नाहीत. कर्नाटकात नेमकी तशीच स्थिती आहे. कॉग्रेस सत्तेत आहे आणि भाजपाशी त्याचे दोन हात चालू आहेत. त्यात जनता दलाचा बसपा झाला तर? म्हणजे आजवर धरून ठेवलेली २०-२२ टक्के मतेही देवेगौडांना टिकवता आली नाहीत तर? खरेच कर्नाटकात मोदीलाट घोंगावत असेल, तर त्यामध्ये कॉग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारला टिकून रहाता येणार नाही. पण कॉग्रेसची धुळधाण होताना जनता दलाचा बोजवारा उडून जाण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशात त्रिशंकू विधानसभेची प्रतिक्षा चालू असताना, सपा-बसपा एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून वंचित ठेवतील काय, अशी चर्चा रंगलेली होती. पण निकालानंतर तशी काही गरज राहिली नाही. मायावती तर इतक्या नामोहरम झाल्या, की त्यांना राज्यसभेत जिंकण्याइतकेही आमदार मिळू शकले नाहीत. आताही कर्नाटकात देवेगौडा त्याच जागी आहेत किंवा तशाच परिस्थितीत आहेत. त्यांना स्वबळावर बहूमतापर्यंत जाणे शक्य नाही. सहाजिकच त्यांचा मतदार वेगळा विचार करू शकतो आणि कॉग्रेस वा भाजपाकडे झुकू शकतो. तसे झाले तर जनता दलाचा पुरता बोर्या वाजल्याशिवाय रहाणार नाही. ह्या शक्यतेला टाईम्स नाऊची झटपट चाचणी दुजोरा देताना दिसते आहे. या चाचणीने जिंकणार्या जागांचे आकडे दिलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी सांगितली आहे.
मतदानापुर्वी व मोदींच्या प्रचाराची अखेर होत असताना घेतलेल्या या झटपट चाचणीने काहीशी उत्तरप्रदेशची झलक दाखवली आहे. मोजक्याच मतदारांशी फ़ोनवरून प्रतिसाद घेतलेल्या या चाचणीने भाजपाला ५७ टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कॉग्रेस २८ व जनता दलाला १२ टक्के मते दाखवली आहेत. खरेच इतका मोठा प्रतिसाद मोदींच्या प्रचाराला मिळाला, तर भाजपा २२४ पैकी १५० ते १८० जागा जिंकू शकेल आणि तसे झाल्यास इतरांसाठी केवळ ५०-७५ जागा शिल्लक उरतात. हे अगदीच अशक्य नाही. कारण उत्तरप्रदेश त्यापेक्षाही मोठे बहूमत देऊन गेला आहे. अवघे ५० टक्के भाजपाला मते मिळाली तरी भाजपा दिडशे जागा मिळवू शकेल. पण भाजपा इतके मोठे यश मिळवताना कॉग्रेसच्या फ़क्त जागा कमी होणार नाहीत वा सत्ताच गमावणार नाही. त्यापेक्षा मोठा फ़टका मायावतींप्रमाणे देवेगौडांना बसण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी त्यांच्याच पक्षाला मोठा फ़टका बसला होता आणि आठदहा टक्के मते त्यांनी गमावलेली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होऊ घातली आहे काय? तसे खरोखर झाले, तर लोकसभा निवडणूकीत प्रादेशिक पक्षांनी कॉग्रेस सोबत जावे किंवा नाही, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. कारण मोदी विरोधाच्या या राजकारणाचा मोठा फ़टका प्रादेशिक पक्षांनाच बसत असल्याचे पुन्हा सिद्ध होईलच. प्रादेशिक पक्षांच्या मरणातून कॉग्रेसला संजीवनी मिळत असल्याचेही सिद्ध होणार आहे. टाईम्स नाऊची ताजी झटपट चाचणी म्हणूनच एका राज्यातील निकालापुरती महत्वाची नसून, देशात मोदी विरोधाची जी आघाडी उभी राहू बघत आहे, त्या संकल्पनेलाच धक्का देणारी आहे. ५७ टक्के ही प्रचंड आकडेवारी आहे. पण ती ४७ टक्के इतकी निघाली तरी कर्नाटकचा उत्तरप्रदेश होऊन जाईल, यात शंका नाही. पण तसे निकाल विरोधी राजकारणाचा व समजूतींचा पायाच उखडून टाकणारे ठरतील.
भाऊ,आपला अंदाज खरा ठरला तर काँग्रेस चे बारा वाजतआलेत असे होईल
ReplyDeleteअसं झालं तर मजा येईल .
ReplyDelete