Friday, June 26, 2015

अण्णा हजारे कशाला गप्प बसलेत?



जुन महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात पावसाळ्याचे वेध लागलेले होते. कारण हवामान खात्याने मे महिन्याच्या अखेरीसच म्हणजे आठवडाभर आधी यावर्षीचा मान्सुन चालू होईल, असे अंदाज व्यक्त केले होते. मात्र कुठेही पावसाचे ढग दिसत नव्हते आणि ब्रेकिंग न्युजच्या हव्यासाने सर्वच वाहिन्या कमी पाऊस म्हणून चक्क दुष्काळाच्या तयारीला लागा, असा सल्ला सरकारला देऊ लागल्या होत्या. त्याच दरम्यान एका मराठी वाहिनीने सादर केलेल्या वार्तापत्रात रत्नागिरीजवळच्या एका मच्छिमार गावातील मुस्लिम कोळ्याची मुलाखत घेतलेली आठवते. वयाची साठी पार केलेला तो कोळी वेधशाळेपेक्षा मोठ्या आत्मविश्वासाने जे बोलत होता, त्याला विज्ञानवादी वा अंधश्रद्धा निर्मूलनवादी हसले असतील. कारण डोळ्यावर येणार्‍या सुर्याच्या उन्हाला हाताचा आडोसा देत, आभाळाकडे बघत, तो कोळी म्हणाला होता, १७ जुनपर्यंत पाऊस पडणार नाही. म्हणूनच सरकारने इशारा दिलेला असला, तरी आमच्या अनुभवावर विसंबून आम्ही समुद्रात मच्छिमारी करायला जात असतो. असे त्याने अनुभवाच्या आधारावर केलेले भाष्य होते. समुद्राकडून येणारे वारे, त्यांची दिशा व वेग यांचा अंदाज घेऊन हा सामान्य कोळी इतके ठाम विधान करू शकला. आणि योगायोग बघा, त्याने दिलेल्या तारखेत किंचित फ़रक पडला नाही. १७ जुनपासून कोकण किनारपट्टीत वादळी वारे घोंगावू लागले आणि पावसाची रिमझीम सुरू झाली. दोन दिवसात पावसाने कोकणासह महाराष्ट्रात येऊन धुमाकुळ घातला. जे अभ्यास करून शास्त्रज्ञानांना उमजत नाही, ते अशा अनुभवी म्हातार्‍यांना कसे लक्षात येते? वादळ अथवा पावसाची शक्यता त्याला कशी कळू शकते? अशा किंवा कुठल्याही विषयावर अक्कल पाजळणार्‍यांनी थोडा त्याचाही विचार करून शोध घ्यायला हरकत नाही. किमान जे लोक वादळ निर्माण करू बघतात व तसे इशारे देतात, त्यांनी तरी तितके कष्ट घ्यायला नकोत का?

मागले दोन आठवडे नेमक्या त्याच कालावधीत राजकारणातही असेच वादळ घोंगावते आहे किंवा तसे भासवले जाते आहे. म्हणजे वेधशाळेने पावसाचे व वादळाचे भाकित करावे, तशा ब्रेकिंग न्युज घोंगावत आहेत. पण टेबलावरचे कागद पंख्याने फ़डफ़डावेत, त्यापेक्षा अधिक काही होताना दिसत नाही. आणि म्हणूनच आम्हाला तो वयस्कर मुस्लिम कोळी आठवला. ज्या आत्मविश्वासाने त्याने मच्छिमारी चालू ठेवतो असे म्हटले, तितक्याच आत्मविश्वासाने या राजकीय वादळाच्या व भ्रष्टाचार गदारोळाच्या कल्लोळाकडे अण्णा हजारे यांनी पाठ फ़िरवली आहे. मागल्या दोन दशकात निदान महाराष्ट्रात तरी अण्णा हजारे हे सरकारच्या विरोधात जनमत तयार होत असल्यास नेमकी पारख करू शकणारे अनुभवी गृहस्थ आहेत. अशा व्यक्तीने सध्याच्या देवेंद्र वा नरेंद्र सरकारवरच्या विविध आरोपाविषयी मौन कशाला पाळले असेल? खरे तर असे विषय अण्णांसाठी खुप जिव्हाळ्याचे असतात. भ्रष्टाचार असो किंवा अन्य कुठला गैरकारभार असो, त्यावर अण्णांनी आवाज उठवला नाही, असे होत नाही. परंतु अण्णा म्हणजे कुठला पत्रकार संपादक किंवा पक्ष प्रवक्ते नाहीत. ते नुसतेच उठून आरोप करत नाहीत. ज्या आरोपांना जनमानसात विश्वासार्हता मिळू शकेल आणि ज्यावर लोकांमध्ये कमालीची नाराजी असू शकेल, अशाच विषयांना अण्णा हात घालतात. हा आजवरचा अनुभव आहे. म्हणजे असे की अण्णा एखाद्या विषयात उतरले, मग त्यामागे जनतेची नाराजी उभी आहे असे सत्ताधार्‍यांना गृहीत धरावे लागते. जेव्हा तशी स्थिती नसेल, तेव्हा अण्णा त्यात भाग घेत नाहीत, किंवा त्यापासून अलिप्त रहातात. दिल्लीत रामलिला ‘मैदान’ मारल्यानंतर मुंबईतले उपोषण गडबडू लागले, तेव्हा अण्णा उठून तीन दिवसात निघून गेलेले होते. ममताच्या रामलिला मैदानावरील सभेला गर्दी जमण्याची शक्यता नव्हती, तर त्यांचे भलेथोरले फ़लक झळकत असूनही अण्णा तिकडे फ़िरकले नाहीत.

अण्णांचे हे कौशल्य सहसा कोणी जाणकार लक्षात घेत नाही. अगदी त्यांचे निकटवर्ति म्हणून मिरवणार्‍यांनाही अण्णांपासून हा धडा घेता येईल. ते शक्य झाले, तर मागल्या महिनाभरात जे भ्रष्टाचार व घोटाळ्याचे वादळ घोंगावत असल्याचा दावा केला जातो आहे, त्यातले तथ्य लक्षात येऊ शकेल. ललित मोदीपासून पंकजा मुंडेपर्यंत कुठल्याही विषयात अण्णा कशाला गप्प आहेत? कारण त्यात उडी घेतली तर लोक आपल्याला समर्थन द्यायला रस्त्यावर उतरणार नाहीत, याची अण्णांनाही पुरती खात्री आहे. लोक उतरणार नाहीत आणि अण्णा अशा बाबतीत मौन पाळणार, म्हणजे ज्या काही बातम्या रंगवल्या जात आहेत, त्या खोट्या पडत नाहीत. पण अशा कुठल्याही किरकोळ बाबतीत गदारोळ केल्याने ते वादळ होत नाही. नुसता गडगडाट कधी वादळाचे परिणाम देत नाही, की त्यातून अपेक्षित हानी घडवून आणत नाही. हे अण्णांना जितके कळते, तितके त्यांच्या पदराआड लपून आपले डावपेच खेळणार्‍यांना उमगत नाही. म्हणूनच मग अण्णा अशा भानगडीत उतरत नाहीत, किंवा आपली शक्ती तिथे पणाला लावण्याचा उथळपणा करीत नाहीत. १९९० च्या दशकात शरद पवार यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधातल्या उपोषणाने अण्णा प्रसिद्धीच्या झोतात आले आणि युती सरकार आल्यावर थंडही बसले. पुढे दोन अडीच वर्षांनी युती विरोधात खुपच आरोप होऊ लागले आणि लोकांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण होत गेले, तेव्हा अण्णा पुन्हा मैदानात आले. पण तोपर्यंत शांत बसण्याचा संयम त्यांनी दाखवला होता. आजही अण्णा शांत आहेत. सुषमा स्वराजपासून पंकजा मुंडे व विनोद तावडेपर्यंत कशावरही अण्णांनी साधे भाष्यही केलेले नाही. कारण अशी वावटळ वादळ उभे करणार नाही, की कसली पडझड होऊ शकणार नाही, याची अण्णांना पक्की कल्पना आहे. त्याचे कारण काय? लोक इतके बधीर झालेत काय?

मागल्या पंधरा वर्षातला कारभार बघितला आणि जी भ्रष्टाचाराची प्रकरणे तीनचार वर्षात पुढे आली, त्याच्या तुलनेत आज ज्याचा गवगवा चालला आहे, त्यांची तुलना सामान्य माणूस करतो. त्याने अत्यंत स्वच्छ राजकारणी म्हणून आघाडीच्या विरोधात शिवसेना किंवा भाजपा यांना निवडून दिलेले नाही. अशा सत्तांतराने राज्यातील वा देशातील सगळा भ्रष्टाचार विनाविलंब ठप्प होईल आणि सर्वत्र सदाचारी कारभार सुरू होईल; अशी कुणाचीही अपेक्षा नाही. मुठभर गदारोळ करणार्‍या सनसनाटी लोकांना मात्र उतावळेपणाने पछाडलेले असते. म्हणून त्यांना कालच्यापेक्षा आज किमान काही बरे आहे, याची जाणिव होत नाही. आज सामान्य माणूस भाजपा सेनेच्या सरकारकडून स्वच्छ कारभाराची अपेक्षा करतो असे जे म्हणतात, त्यांना जनमानस कळत नाही. ते त्यांचे पुस्तकी ज्ञान व अक्कल आहे. वास्तवात आधीच्यापेक्षा थोडे चांगले वा त्यापेक्षा वाईट नसलेले लोकांना मान्य असते. आघाडी सरकारने जो उच्छाद मांडला होता, त्यापेक्षा आजचे सरकार सुसह्य आहे आणि निदान राजरोस लूट करायला बिचकते आहे, एवढेच लोकांच्या संयमाचे कारण आहे. मेलेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात. आताही आघाडीच्या कारकिर्दीत होरपळलेल्या जनतेची आजचे सरकार फ़ुफ़ाट्यात टाकत नाही, तोवर तक्रार नसेल. उत्तराखंडातल्या त्सुनामीत फ़सलेल्यांना जीव वाचला तरी खुप वाटते. ते झाले मग निदान भुक भागवणारा लंगरही पंचतारांकित भासतो. त्यापेक्षा त्या पिडीताची अधिक अपेक्षा नसते. आघाडीच्या कारभाराने गांजलेल्यांना सदाचारी सरकार नको होते, तर सुसह्य सरकार हवे होते. त्याचा अर्थ इतकाच, की तळे राखी तो पाणी चाखी, इतका भ्रष्टाचार लोकांना मान्य असतो. जेसीबी लावून तळ्यातला गाळही उपसून त्याचे भुखंड बनवणार्‍याच्या हातून सुटका झालेले, लोक चिक्की खरेदी वा पदवीच्या वादाने विचलीत होत नसतात. याचा अर्थ भाजपा वा देवेंद्र सरकारला मोकाट रान लोकांनी दिले, असे मानायचे कारण नाही. लोक बारीक नजर ठेवून असतात. बोंबाबोंब करीत नाहीत, थेट कॉग्रेस राष्ट्रवादीसारखे घरी बसवतात, हेही विद्यमान सत्ताधार्‍यांनी लक्षात घ्यावे.

2 comments:

  1. खुप सुंदर आणि परखड विश्लेषण ..भाऊ..

    ReplyDelete
  2. मान गये भाऊ, आपका कलम और अन्नाकी पारखी नजर! दोनोको!!!

    ReplyDelete