Tuesday, May 15, 2018

भक्तांची लक्षणे

Image result for karnataka poll results

मी तसा पत्रकारितेतून निवृत्त झालेला सत्तरीतली व्यक्ती आहे आणि काही वर्तमानपत्रात अधूनमधून लिहीत असतो. बाकी माझे लिखाण सोशल मीडियात पुरते मर्यादित आहे. पण लिहीण्यातले सातत्य आणि अनुभव, यामुळे माझा असा एक वाचकवर्ग या माध्यमात तयार झाला आहे. त्यातले अनेकजण आवडीने माझे लिखाण वाचत असतात आणि अगत्याने काही विषय सुचवितही असतात. तसेच अनेक माझ्यावर रागावलेले वाचकही आहेत. अनेकदा त्यांना काय वाचावे किंवा वाचू नये, याचे भान रहात नाही. त्यामुळे त्यांना माझे लिखाण वाचून त्रास होत असतो. शेवटी प्रत्येक व्यक्तीला आपली काही मते असतात आणि त्यापासून न्यायमुर्तीही सुटू शकत नसतील तर पत्रकार अभ्यासक वा विश्लेषकाने आपण तटस्थ असल्याचा दावा करण्यात काही अर्थ नसतो. माझाही अपवाद करता येणार नाही. तरीही शक्य तितका मी अलिप्तपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात ज्यांना माझी मते त्यांचीच वाटतात, त्यांना ते विश्लेषण आवडते आणि तटस्थही वाटू लागते. परंतु अनेकजण असेही असतात, त्यांना विश्लेषण नको असते तर त्यांच्याच भूमिकेला वा समजूतीला दुजोरा देणारा खुलासा हवा असतो. सहाजिकच अशा लोकांना नावडते विश्लेषण हा पक्षपात वाटतो. जेव्हा असे वाटते, तेव्हा त्यांनी माझेच नव्हे तर पक्षपाती वाटणारे लिखाण वाचणे बंद करणे त्यांच्या हाती असते. पण तसे करण्यापेक्षा हे लोक आगावूपणे मला शहाणपणा शिकवू लागतात. आरोपही करू लागतात. अशांना मग आपल्यापासून दुर करण्याला पर्याय उरत नाही. पण एक मुद्दा शिल्लक उरतोच. अशा लोकांना माझ्या लिखाणाकडे पाठ फ़िरवण्याचा विवेक का सुचत नाही? त्याचे उत्तर भक्ती असे आहे. असे लोक माझ्यावर भक्तीमुळे रागावलेले असतात. त्यांचा माझ्या विश्लेषणावर लिखाणावर विश्वास असतो, म्हणूनच ते रागावून अशा प्रतिक्रीया देत असतात. त्याला मी भक्तीची लक्षणे मानतो.

याचेही एक कारण आहे. मागल्या पाचसहा वर्षामध्ये या सोशल मीडियात सातत्याने लिहीताना माझे राजकीय अंदाज अनेकदा खरे ठरले आहेत आणि त्यामुळे मग अनेकांना माझी भाकिते खरी ठरतात असा भ्रम झालेला आहे. पण वास्तवात माझी अनेक राजकीय भाकिते भयंकर फ़सलेलीही आहेत. कारण मीही कोणी ज्योतिषी नाही की भविष्यवेत्ता नाही. आजवरच्या राजकारण व निवडणूकांचा अभ्यास व तात्कालीन परिस्थितीचे शक्य तितके निर्भेळ आकलन करून, मी माझे लिखाण करीत असतो. पण त्यालाही अनेकदा आपल्या समजुतींची बाधा होत असते. समोर दिसत असलेले सत्य बघण्याला मन तयार नसते आणि त्याच्या परिणामी राजकीय भाकित चुकीचे ठरत असते. दिल्ली वा बिहार निवडणूकांच्या बाबतीत माझा अंदाज साफ़ चुकला होता. मुंबई महापालिकेच्या मतदानाविषयी माझे भाकित साफ़ चुकीचे ठरले होते. पण असे अपवाद करता माझे अंदाज शक्य तितके खरे ठरलेले आहेत. त्यामुळेच माझ्या विश्लेषणाच्या चहात्यांचा असा काही भ्रम झालेला आहे, की भाऊ म्हणतात, म्हणजे तसेच होऊ शकते. किंबहूना भाऊंनी लिहीले म्हणजे तसेच होणार आहे. हा भ्रम मग इतक्या टोकाला जातो, की भाऊने लिहीले म्हणजे खरेच ठरते. त्यातूनच मग भाऊने अमूकच लिहावे किंवा अमूक बाजूने मतप्रदर्शन करावे, असा मुर्ख आग्रह सुरू होतो. त्यालाच मी भक्ती म्हणतो. अशा भक्तांना मान्य होणार नाही असे मतप्रदर्शन झाले, मग ते रागावतात आणि आरोप सुरू करतात. पण एक सत्य त्यांच्याही लक्षात येत नाही, की कितीही मोठा अभ्यासक असला तरी त्याचे प्रत्येक अंदाज खरे ठरत नसतात की तशी शक्यताही नसते. गणित इतके पक्के असते तर कल्पना चावलाच्या अवकाशयानाला अपघात झाला नसता. त्यामुळे माझे वा अन्य कुणाचेही भाकित वा अंदाज खरे मानण्याचे कारण नसते. त्याच्या आहारी जाण्याची गरज नसते.

कधीकाळी प्रणय रॉय याने मतचाचणी हा नवा प्रयोग भारतात आणला, तेव्हा प्रस्थापित पत्रकार माध्यमांना तो खुळेपणा वाटलेला होता. इंडिया टुडे या नियतकालिकाने त्याचा पहिला अंदाज छापतानाही ‘संपादक त्याच्याशी सहमत नसल्याची’ ग्वाही टीप टाकून दिलेली होती. आता तर मतचाचण्यांचे पेवच फ़ुट्लेले आहे. पण प्रणयच्या आजच्या अंदाजामध्ये तितका दम राहिलेला नाही. प्रत्येक निवडणूकीत नवनवी संस्था खरी ठरते आणि आधीची खोटीही पडते. त्यामुळे त्यांच्यावर खोटेपणाचा आरोप करण्यात अर्थ नसतो. आपल्या परीने निवडणूक व मतदाराचा कल लक्षात घेऊन त्यांनी आडाखे बांधलेले असतात. त्यात कुठेतरी गफ़लत झाली, मग अंदाज फ़सतात. तेवढ्यासाठी अशा मतचाचणीकर्त्यांवर संशय घेणे वा त्यांच्यावर आरोप करण्याला अर्थ नसतो. डोळ्यांना सर्व काही दिसत असते. पण आपण सर्व बघत नसतो. डोळे मेंदूकडे सर्व संकेत पाठवतात. पण मेंदू निवडक गोष्टीच बघत असतो व त्यावर प्रतिक्रीया देत असतो. त्याला नावडत्या गोष्टी बघायच्या नसल्या, मग माहिती येऊनही गडबड होते आणि भाकित चुकते. त्याला कोणीही अपवाद नाही. अन्यथा कुठल्याही पक्षाला आपल्याला असलेला धोका ओळखता आला असता आणि पराभव कुठल्याच पक्षाने ओढवून घेतला नसता. पण कोणीतरी जिंकत असतो आणि कोणीतरी पराभव अंगावर ओढवून आणत असतो. त्यात सत्य नाकारणारा पराभूत होण्याला पर्याय नसतो. २०१४ नंतर मोदी विरोधकांची तीच गोची होऊन बसली आहे. मोदी जिंकतात हा त्यांचा गैरसमज असून, विरोधक पराभूत झाल्याच्या परिणामी मोदी जिंकलेले दिसतात. हे सत्य नाकारण्याने मोदी पराभूत होणार नाहीत की विरोधक बाजी मारू शकणार नाहीत. भक्ती सत्य बघू देत नाही आणि सत्यापासून दुर दुर घेऊन जात असते. मात्र सत्य नाकारल्याने त्याचे परिणाम संपवता येत नसतात.

मोदी विजयात आपला पराभव बघायचे नाकारतात, ते आणखी एका नव्या पराभवाला आमंत्रण देत असतात. पराभव सत्य नाकारल्याने वा सत्याला सामोरे जाण्यास नकार दिल्याने होत असतो. मी तितकीच बाजू समोर आणत असतो. मोदी जिंकणार कसे हे सांगताना विरोधक कुठे चुकत आहेत, त्याकडे बोट दाखवण्याने मोदी जिंकतात, असा कोणाचा भ्रम असेल, तर तो माझा दोष नाही. एका ब्लॉगवर खोटेनाटे लिहून वा एकूण माध्यमातून खोट्याचा मारा करून लोकमत फ़िरवता येत नाही. तसे असते तर २००२ पासून माध्यमांनी अखंड मोदी विरोधाची आघाडी लढवूनही मोदी पंतप्रधान झाले नसते. राहुलची इतकी नाचक्की प्रत्येक निवडणूकीत झाली नसती. मी तेच सत्य दाखवण्याचा प्रयास केला असल्याने माझे अंदाज अनेकदा खरे ठरलेले आहेत. पण ते अंदाज असण्यापेक्षा समोर दिसणारी वास्तविकता होती. बहुतांश माध्यमे जेव्हा मोदी विरोधात खोटयानाट्या गोष्टी पसरवित होती, त्याचा आरंभीचा लाभ गैरसमजातून विरोधकांना मिळालाही. पण अखेरीस सामान्य लोकही सत्य बघू लागले आणि त्याच्या परिणामातून माध्यमांना सुटता आले नाही. माध्यमांच्या खोटेपणावर विसंबून राजकारण करणारे विरोधक बचावले नाहीत. दुर्दैव इतकेच आहे, की अशा भक्तांना अजून आपल्या अंधश्रद्धेतून बाहेर पडता आलेले नाही. बाराचौदा वर्षात सर्वत्र खोट्या पडलेल्या त्याच गोष्टी घेऊन असे मोदीत्रस्त पुन्हा एकदा मोदींना पराभूत करायला निघालेले आहेत. अशा लोकांना मग मी पक्षपाती लिहीतो असे वाटत राहिले, म्हणून निकाल बदलत नसतात की त्याचे परिणाम वेगळे येण्याची शक्यता नसते. पण भक्ती आंधळी असते आणि जन्मठेप झाली तरी त्यांना आसाराम भगवान वाटतच असतो. मोदी विरोधकांची अवस्था तशी़च आहे. त्यांना आपल्या समजुती व भ्रमातून बाहेर पडायचे नाही. माझेही भक्त त्यापेक्षा वेगळे असू शकत नाहीत.

माझे बहुतांश अंदाज खरे ठरल्याने अशा मोदीत्रस्त पण भाऊभक्तांना खुळी आशा आहे, की भाऊने मोदी विरोधात लिहावे म्हणजे भाजपाचा पराभव होईल. पण तशी वस्तुस्थिती नाही. मी माझ्या परीने राजकीय विश्लेषण करीत असतो आणि मला जे खरे व योग्य वाटेल, तेच समजावण्याचा प्रयास करीत असतो. त्यातून आपापली मते बनवण्याची प्रत्येकाला मोकळीक असते. प्रसंग, घटनाक्रम, त्याचे जुनेनवे संदर्भ व त्याची दिशा समजावण्याचा माझा प्रयत्न असतो. तो सदोषही असू शकतो. पुढला घटनाक्रम वा परिस्थितीचे परिणाम मी लिहिल्याप्रमाणेच होतील, याची हमी मलाही देता येणार नाही. पण भक्तांची खुळी अपेक्षा अशी असते, की भाऊने लिहीले मग मोदी पराभूत होऊ शकतील वा राहुल जिंकू शकतील. अन्यथा त्यांनी माझ्या लिखाणाकडे वेडसर म्हणून डोळेझाक केली असती. त्यावर वारंवार प्रतिक्रीया देऊन मला शहाणपणा शिकवण्यात आपली उर्जा वाया घालवली नसती. त्याचीच उलट बाजू अशी, की मी जे दोष मोदीत्रस्त विरोधकांमध्ये दाखवतो, ते टाळून त्यांनी आपल्यात सुधारणा केली असती. त्यानेही खुप फ़रक पडू शकला असता. पण आजही त्यांना आपला खुळेपणा सोडायचा नाही. कालबाह्य झालेल्या व अपयशी ठरलेल्याच डावपेचांनी त्यांना जिंकायचे आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचे तर हुशार मुलाने अभ्यसापेक्षा कॉपी करूनच मेरीटमध्ये येण्याचा ह्ट्ट करावा, अशी काहीशी दयनीय मानसिकता मोदीत्रस्तांमध्ये झालेली आहे. सोशल मीडिया वा राजकीय पवित्रे बघितले तर विरोधक २०१३ च्या काळात पुन्हा गेलेले आहेत. तेव्हा जशी मोदींची अखंड टिंगलटवाळी चाललेली होती, तशीच आता सुरू झाली आहे. तेवढ्यावर आपण बाजी मारणार असल्याचा खुळ्यांचा आत्मविश्वास त्यांच्याच पराभवाची ग्वाही देतो आहे. हे सत्य लिहीले, मग माझेही खुळे भक्त माझ्यावर तुटून पडले म्हणून निकाल बदलणार आहेत थोडेच?

6 comments:

  1. नवीन अध्यक्ष सचिन पायलट ठीक असेल की सिंधिया??? आता की डिसेंबर ची वाट पाहिली जाईल??? एक मिश्किल प्रश्न आला मनात...

    ReplyDelete
  2. माध्यमांच्या खोटेपणावर विसंबून राजकारण करणारे विरोधक बचावले नाहीत.
    खरं आहे. Actually माध्यमांच्या खोटेपणावर अवलंबून राजकारण करणारे सत्ताधारी परिणामी विरोधात बसलेत तरी स्वतःला बदलू इच्छित नाहीत. आणि इथेच ते पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आहेत

    ReplyDelete
  3. मा.श्री.श्री.श्री.आंग्लभाषांतरपटू गिरीशजी कुबेरसाहेब यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीबद्दल वर्तवलेली भविष्यवाणी ऐकलीत का भाऊ...

    ReplyDelete
  4. लाख बोललात, भाऊराव. विशेषत: हे वाक्य कळीचा मुद्दा आहे :

    >> मोदीत्रस्त विरोधकांमध्ये दाखवतो, ते टाळून त्यांनी आपल्यात सुधारणा
    >> केली असती. त्यानेही खुप फ़रक पडू शकला असता.

    माझ्या माहितीप्रमाणे बिहार विधानसभा निवडणुकीत मोदीविरोधकांनी आपले दोष टाळले होते. त्याचा त्यांना जबरदस्त फायदाही झाला होता. याचा संदर्भ तुमच्याच लेखात आहे : http://jagatapahara.blogspot.co.uk/2015/11/blog-post_8.html (वरून तिसरा परिच्छेद).

    हे सर्व समजावून सांगणार कोण. आणि सांगितलं तरी ऐकणार कोण! तुम्ही ज्याला अंधभक्त म्हणता त्या लोकांना राजकारण म्हणजे टी-२० सारखी घटकाभर करमणूक करून सत्वर सुख ( = instant gratification) देणारी लढत वाटते. असे लोकं वैचारिक सत्वर-सुख-लक्षणाचे बळी आहेत. सत्वर-समाधानाच्या आड जो येतो तो साहजिकंच खलनायक ठरतो.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  5. We do have lot of expectations from you, but one thing is good you have made everybody realized that one can do mistake

    ReplyDelete