Sunday, May 6, 2018

आणखी एक सत्वपरिक्षा?

modi के लिए इमेज परिणाम

सध्या सर्वांचे लक्ष कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीकडे लागलेले आहे. तिथे भाजपाला सत्ता मिळणार की कॉग्रेस पुन्हा बहूमत जिंकणार, अशी चर्चा सगळेच करीत आहेत. अशा चर्चांसाठी लागणारे खाद्य मतचाचण्या पुरवित असतात आणि आजकाल अशा कुठल्याही चर्चेत मतदान म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींची कसोटी लागत असते. ग्रामिण भागातील जिल्हा परिषद निवडणूक असो, किंवा कुठलीही पोटनिवडणूक असो, त्यात मोदींचीच सत्वपरिक्षा चालू असते. म्हणजे त्यात भाजपा जिंकणार की हरणार, असा रोख असतो आणि त्यात समजा भाजपा जिंकला, म्हणून काहीही फ़रक पडत नाही. हरला तर मोठा फ़रक पडल्याचे समाधान अनेकांना मिळत असते. कारण अशी प्रत्येक लहानसहान हार म्हण्जे २०१९ सालात मोदींच्या लोकसभेतील पराभवावरचे शिक्कामोर्तब आहे, अशी चर्चा करणार्‍यांना खात्री वाटत असते. म्हणून मग गुजरात विधानसभेत भाजपाच्या काही जागा कमी होऊन सहाव्यांदा त्यांनीच सत्ता मिळवली, तर त्यात नैतिक पराभव शोधला जात असतो आणि त्रिपुरातला मोठा विजयही लबाडी ठरवणारे युक्तीवाद केले जातात. त्यामुळे मोदींना कुठला फ़रक पडत नसतो. कारण प्रत्येकवेळी विजयी होण्याचे आव्हान त्यांनीच स्वत:ला देऊन ठेवलेले असल्याने त्यांना आराम नावाची गोष्ट नकोच असते. मग कर्नाटकची निवडणूक त्याच दिशेने वाटचाल करीत असेल, तर नवल कुठले? आताही कॉग्रेसला पुन्हा सत्ता मिळवणे हे आव्हान असल्याचे कोणी बोलत नाही, तर भाजपा सत्ता कशी मिळवणार, याची चर्चा जोरात आहे. पण तिचा सूर व आशय बघितला तर कॉग्रेसच्या वाट्याला पराभव येणार हे त्यातले गृहीत आहे. तो पराभव मोदी घडवून आणणार किंवा नाही, इतकेच त्यातले कुतूहल आहे. लढाईत यशापयश अपरिहार्य असते. मोदींनी ती वस्तुस्थिती स्विकारली आहे. तिथेच मग त्यांची इतरांशी तुलना होऊ शकत नाही.

पुढल्या शनिवारी कर्नाटकातले मतदान व्हायचे आहे आणि तीन दिवसांनी तिथली मतमोजणी व्हायची आहे. समजा त्यात कॉग्रेसला सत्ता गमवावी लागली वा तिथे बहूमत हुकले तर जनता दल त्यांच्या सोबत जाऊन भाजपाला सत्तेबाहेर ठेवले जाईल. उलट भाजपाने म्हणजे मोदींनी आरंभलेली मोहिम यशस्वी होऊन कर्नाटकही भाजपाच्या खिशात गेला, तर मोदींची सत्वपरिक्षा संपलेली असेल काय? अजिबात नाही. तितक्याच आवेशात कर्नाटक म्हणजे उर्वरीत भारत नसल्याचे युक्तीवाद ऐकू येऊ लागतील. कर्नाटकात पाच वर्षे सत्ता भोगलेल्या कॉग्रेसला मतदाराच्या नाराजीला तोंड द्यायचे होते आणि त्याचा परिणाम भोगावा लागला, असे सांगितले जाईल. पण तो विजय मोदींनी मिळवून दिला असे कोणी बोलणार नाही. चार वर्षे उलटून गेल्यावरही मोदीलाट अजून प्रभावी असल्याची कबुली कोणी देणार नाही. फ़ार कशाला गेल्या चार वर्षापासून मोदींनी केलेल्या कारभारानंतर अच्छे दिन कुठे आहेत, असला प्रश्न विचारणेही थांबणार नाही. हा सगळा बुद्धीवाद किवा राजकीय विश्लेषण किती हास्यास्पद आहे ना? लागोपाठ चार वर्षे एक नेता आपल्या पक्षाला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जातो आणि अनेक राज्यातल्या निवडणूका एकामागून एक जिंकून देतो, तर त्याची लोकप्रियता मान्य करून तिचे रहस्य उलगडण्याची इच्छाही नसावी, यापेक्षा अभ्यासकांच्या बुद्धीची कुठली शोकांतिका असावी? हातात असलेली सत्ता व पक्षाची लोकप्रियता गमावत गेलेली कॉग्रेसची चार वर्षाची वाटचाल, हे राहुल गांधी म्हणजे पर्यायाने कॉग्रेसी नेतृत्वाचे दारूण अपयश असल्याची प्रामाणिक चिकित्सा का होऊ शकत नाही? सत्वपरिक्षा त्या कॉग्रेस पक्षाची आहे, हे सत्य ज्यांना उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही की समजत नाही, त्याला अभ्यासक तरी का म्हणायचे? ही अशी राजकीय अभ्यासाची शोकांतिका कशामुळे झालेली आहे?

सामान्य माणसाचे मन व मत याच्याशी असलेली पत्रकार व माध्यमांची नाळ अलिकडल्या काळात संपुर्णपणे तुटलेली आहे. लोक कसा विचार करतात, जगातल्या घटनांकडे लोक कसे बघतात व त्यातून काय समजून घेतात, ह्याचा मागमूस आजच्या पत्रकारितेत आढळून येत नाही. म्हणून मग अशा भोंगळ विश्लेषणाकडे एकूण माध्यमे भरकटलेली आहेत. त्यांना घडलेल्या घटनाक्रमाचे विश्लेषण करता येत नाही, की राजकीय भविष्याची दिशाही ठरवता यते नाही. मोदीलाट ओसरली असेल, तर विरोधक एकजुटीने लढायची भाषा कशाला बोलतील? कॉग्रेस व सिद्धरामय्यांनी अप्रतिम काम केलेले असेल, तर पुरोगामी मतांच्या विभागणीसाठी देवेगौडांना आरोपी बनवण्याची कॉग्रेसला गरज काय? येदीयुरप्पा इतकेच भ्रष्ट असतील, तर भाजपाच्या विजयाचे भय इतरांनी बाळगण्याचे कुठलेही कारण उरत नाही. यापैकी कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होत नाही की विश्लेषण होत नाही. सहाजिकच जो मतदार आहे, त्याच्या मनातले माध्यमांना काही सांगता येत नाही. मतचाचण्य़ा सादर करतानाही समालोचन करणार्‍यांना आपल्याच आकड्यांवर विश्वास दाखवता येत नाही. मोदी हा मुद्दा बाजूला ठेवला तरी कॉग्रेस आणि भाजपा यांना अपेक्षित मतांमध्ये फ़ारसा फ़रक दिसत नाही, हे आकडे बोलतात. पण चर्चा करणार्‍यांनाच ते पटत नाहीत. त्यात पुन्हा मोदींच्या लोकप्रियतेची भर घातली, तर भाजपाचे पारडे जड होऊ शकेल, हे सत्य स्विकारता येत नाही. तिथेच सगळी गडबड होऊन जाते. कारण विश्लेषणाला बसलेल्यांच्या मनात मोदी या व्यक्तीविषयी अढी असते आणि ती त्यांना सत्याकडे डोळसपणे बघू देत नाही. परिणामी प्रत्येक निवडणूक जिंकणार्‍या मोदींसाठी येणारी प्रत्येक नवी निवडणूक सत्वपरिक्षा असते आणि सतत राज्य व निवडणूका गमावूनही राहुल गांधींसाठी कुठलीच निवडणूक आव्हानही नसते. हा कसला चमत्कारीक विरोधाभास आहे?

याचा अर्थ असे विश्लेषण करणार्‍यांनी राहुलकडून कॉग्रेस पुर्णपणे बुडवली जाणार हे मनोमन स्विकारलेले सत्य आहे. त्यामुळे प्रयत्नपुर्वक मेहनत घेऊन राहुलनी एक राज्य राखावे किंवा नवे राज्य जिंकावे, ही आता कोणाची अपेक्षा राहिलेली नाही. मात्र अशा प्रत्येक लढतीमध्ये मोदींना डिवचून राहुल किती प्रमाणात अंगावर घेतात, ही अपेक्षा उरलेली आहे. सहाजिकच मोदींचा पराभव बघायला उतावळे झालेल्यांची चर्चा हे राजकीय विश्लेषणाचे स्वरूप होऊन गेलेले आहे. त्यामुळे कर्नाटक मोदींना मिळणार काय, ही वस्तुस्थिती असताना कर्नाटक मोदी राखणार काय, अशा स्वरूपाची चर्चा होऊ लागते. सत्वपरिक्षा ही काहीतरी राखण्यासाठीची लढाई असते आणि तशी लढाई आज भाजपा नव्हेतर कॉग्रेस लढते आहे. पर्यायाने ती सिद्धरामय्या व राहुलसाठी सत्वपरिक्षा आहे. कॉग्रेसच्या हाती असलेले तेच शेवटचे महत्वाचे व मोठे राज्य आहे, तेही गमावले तर राहुलसाठी टिकवण्यासारखे काहीच शिल्लक उरणार नाही. इतक्या दुर्दशेत पोहोचलेल्या पक्षासाठी कर्नाटक ही सत्वपरिक्षा असते. एवढेही ज्यांना समजू शकत नाही, त्यांच्याकडून कुठला अभ्यास व्हायचा आणि कसले विश्लेषण सामान्य माणसाला सांगणार? म्हणूनच असल्या चर्चा निरर्थक होत गेलेल्या आहेत. अशा चर्चांचे फ़ड रंगवले जातात आणि निकालाच्या दिवशी त्याचे पितळ उघडे पडलेले असते. मग मोदींची सत्वपरिक्षा म्हणून दोनतीन आठवडे घसा कोरडा करून सांगणारे मोदींचा करिष्मा कायम असल्याचे सांगून आपली चर्चा गुंडाळत असतात. एकप्रकारे यातून माध्यमे व अभ्यासकांची विश्वासार्हता संपत चालली आहे. पण कोणी शहाणा व्हायला तयार नाही. खरेच मोदी लाट ओसरलेली असती, तर २०१९ साठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याच्या गमजा कशाला केल्या असत्या? विरोधक घाबरले असल्याची ती खुण असताना सत्वपरिक्षा कोणाची होत असते?


5 comments:

  1. ज्यांच्यात काही तरी सत्व व स्वत्वही उरलेले असेल त्यांचीच सत्वपरीक्षा होणार ना ?

    ReplyDelete
  2. अप्रतिम भाऊ!
    अगदी चपखल
    - योगेश तिवारी
    पुणे

    ReplyDelete
  3. सर्व प्रकारच्या परिक्षा सोन्यालाच द्याव्या लागतात.हीनकस धातूंना तशी आवश्यकता नसते.

    ReplyDelete
  4. Bhausaheb,once again a very accurate interpretation of the situation!

    ReplyDelete
  5. खुपच सुंदर आणि चपखल लेख! ओघवती भाषा आणि मुद्देसुद मांडणी!

    सहज विषय निघाला म्हणून मी माझ्या ब्लाॅगची लिंक सादर करीत आहे. वाचून पहा. आपली प्रतिक्रीया जरूर कळवा.
    http://thetdilse.blogspot.com/2017/11/blog-post.html?m=1

    ReplyDelete