Monday, June 11, 2018

पगडी, गोटे, पागोटे

pawara bhujbal NCP founding day के लिए इमेज परिणाम

गेल्या वर्षभरात अकस्मात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग, आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यांच्यासह इतरही काहीजणांनी मौन धारण केलेले आहे. त्यातच कपील शर्माचा कॉमेडी शो थंडावला आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनात भलताच कोरडेपणा आलेला आहे. लोकांना हसण्याची नवनवी निमीत्ते शोधावी लागत आहेत. राहुल गांधी काहीसे गंभीर होऊनही बोलू लागले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची झालेली अडचण दुर करण्याची जबाबदारी शरद पवारांनी घेतली आहे किंवा कसे, याची आजकाल शंका येऊ लागली आहे. कारण प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी पवारांसारखा अनुभवी नेता अजब विधाने करू लागला आहे. की त्यांचा आता पुरता तोल गेला आहे, अशी शंका येते. अन्यथा त्यांनी पुणेरी पगडीला हात घातला नसता. दिर्घकाळ त्यांना छगन भुजबळ नावाचा कोणी आपल्याच पक्षाचा ज्येष्ठ नेता होता आणि तो कुठेतरी तुरूंगात जाऊन पडला आहे, त्याचेही स्मरण नव्हते. कालपरवा अनेक कसरती करून भुजबळ जामिनावर सुटून आले, तेव्हा अचानक पवारांना भुजबळ आठवले आणि भुजबळ आठवले म्हटल्यावर पाचसहा वर्षापुर्वी त्याच छगनरावांनी सोमय्या ग्राऊंडवर दिलेली भेटही साहेबांना आठवलेली असावी. तेव्हा सोमय्या मैदानावर पक्षाच्या स्थापना दिवसाचा सोहळा जंगी साजरा झाला होता आणि त्यात भुजबळांनी साहेबांना महात्मा फ़ुले यांच्या खास शैलीतील पागोटे व घोंगडी सन्मानार्थ दिलेली होती. साहेबांनीही ती खुप मिरवली होती. पण नंतरच्या काळात त्यांना पागोटे आठवले नाही, की घोंगडी आठवली नाही. मग भुजबळ तरी कशाला आठवायचे? पण आता भुजबळ साक्षात समोर येऊन उभे राहिले आणि तात्काळ राष्ट्रवादीच्या फ़लकावरही झळकू लागले आहेत. तेव्हा कुठे साहेबांना महात्मा फ़ुले आठवले. पण त्यांच्या डोक्यावर पगडी नव्हेतर पागोटे असते त्याची विस्मृती झालेली आहे.


pawara bhujbal NCP founding day के लिए इमेज परिणाम

रविवारी राष्ट्रवादी कॉग्रेसचा एकोणीसावा वर्धापनदिन साजरा झाला. त्यात साहेबांनी अनेक गर्जना घोषणा केल्या. त्यांचा समाचार सवडीने घेता येईलच. पण आपल्या खास शैलीत त्यांनी यापुढे कुणाचाही सन्मान पुणेरी पगडी देऊन नव्हेतर फ़ुल्यांची पगडी देऊन करावा, असा आदेश जारी केला आहे. पण महात्मा फ़ुले पगडी कधी घालू लागले? त्याचा खुलासा साहेबांनी केलेला नाही. कारण जग ज्या महात्मा फ़ुल्यांना ओळखते, त्यांच्या डोईवर कायम पागोटे असायचे. ते स्वत:ला शेतकर्‍यांचा नेता किंवा प्रतिनिधी मानायचे. स्वाभाविकच शेतकरी कुणब्यांच्या वेशातच जगाला दिसावे, असा फ़ुल्यांचा आग्रह असायचा. पवार साहेबांप्रमाणे सोयीचे असेल तेव्हा पगडी वा सोयीचे नसेल तेव्हा गांधी टोपी; असी शिरस्त्राणाची अदलाबदली फ़ुल्यांनी कधीच केली नाही. पण त्याच्याशी साहेबांना कसले कर्तव्य असायचे? ज्यांना महात्मा फ़ुल्यांचे नेमके कार्य काय होते, ते समजून घेण्य़ासाठी जितेंद्र आव्हाडांची शिकवणी लावावी लागते, त्यांना फ़ुले म्हणजे कोण ते कसे ठाऊक असावे? दोनवर्षापुर्वी सांगलीत एक घटना घडली होती. तेव्हा साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आव्हाड ओबीसी नेता आहेत आणि फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य पुढे नेत असल्याची आठवण करून दिलेली होती. सहाजिकच त्या पत्रामुळे जगाला प्रथमच फ़ुले शाहू आंबेडकर मोठ्या उंच दहीहंड्या लावायचे व भसाड्या आवाजातले कर्णे लावून नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजित करीत, याचा शोध लागला. पवार साहेबांनी हे पत्र लिहीले नसते, तर फ़ुले शाहू आंबेडकर सामाजिक सुधारणा करीत रुढी परांपरा संपवण्यासाठी झटायचे, अशीच गैरसमजूत कायम राहिली असती. पण आता लोकांना त्याचे भान आलेले आहे. सहाजिकच सामान्य लोकांच्या माहितीतले व मनातले महात्मा फ़ुले पागोटे वापरत असल्याचा गैरसमज दुर करण्याचे काम आता साहेबांनी हाती घेतलेले असावे. अन्यथा अचानक त्यांना पगडी आठवली असती?

महात्मा फ़ुले यांना एकदा गव्हर्नरांचे आमंत्रण मिळालेले होते आणि समाजातील थोरामोठ्यांच्या त्या कार्यक्रमात फ़ुले साक्षात कुणबी अवतार धारण करून पोहोचल्याची एक अख्यायिका आहे. कंबरेला लंगोटी, खांद्यावर घोंगडी व माथ्यावर पागोटे, अशा अवतारात त्या आलिशान समारंभाला फ़ुले पोहोचले आणि सगळा समुदाय चकीत होऊन गेला. कारण तिथे एकाहून एक श्रीमंत नामवंत झगझगीत भरजरी वस्त्रेप्रावरणे परिधान करून आलेले होते. पण देशावर राज्य करणार्‍या ब्रिटीश साहेबाला आणि त्यांच्या महान पाहुण्यांना देशातली रयत कुठल्या अवस्थेत जगते हे कळावे, म्हणून फ़ुल्यांनी चक्क असा वेश धारण केला होता. जेव्हा पाचसहा वर्षापुर्वी भुजबळांनी तीच वस्त्रे व वेश पवारांना भेट दिला, या काळात पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खुप मोठे शेतकरी कल्याणाचे काम करण्यात गर्क होते. खरेतर त्यांनीही क्रिकेटच्या जगातील त्या सुटाबुटातल्या लोकांसमोर भुजबळांनी दिलेली घोंगडी परिधान करून जायला हवे होते. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर साहेबांनी अशी ‘टोकाची भूमिका; तिथे व तेव्हा घ्यायला हवी होती. मग निवडणूका राष्ट्रवादी पक्ष हरला नसता, की साहेबांना हल्लाबोलचे नाटक रंगवावे लागले नसते. दुष्काळातही शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणॊ पळवून आयपीएलच्या स्पर्धेला हिरवळ निर्माण करून देण्यातली शेती कशी लाभदायक आहे, ते सिद्ध करता आले असते. कर्जबाजारी शेतकर्‍यांना आत्महत्येच्या मुर्खपणातून बाहेर काढता आले असते. किंबहूना शेतीत ज्वारीबाजरी वा अन्य काही पिकवण्यापेक्षा, क्रिकेटच्या हिरवळीचे पीक काढून क्रिकेटपटू पिकवण्याचे आधुनिक तंत्र विकसित करता आले असते. पण भुजबळांचा सत्कार संपला आणि साहेबांनी घोंगडी व पागोटे कुणाच्या तरी हाती सोपवून, आपले विस्कटलेले केस झटकले आणि भाषणाला उभे राहिले होते. ते पागोटे होते की पगडी हे मग कसे लक्षात रहाणार ना?

असो. आता हातातली सत्ता गेल्यावर का होईना, साहेबांना वारंवार महात्मा फ़ुले आठवू लागले आहेत. शेतकरी आत्महत्या करतात व त्यांना कर्जाचा बोजा खुप असह्य झाला असल्याचाही शोध लागला आहे. कुठल्याही कारणाने का असेना, साहेबांना फ़ुले शाहू आंबेडकर आठवले, हेही थोडके नाही. त्यात फ़ुले पगडी घालायचे हे आठवले हेही नवे संशोधन असावे. जगातल्या अनेक बाबतीत पवार साहेबांचा व्यासंग दांडगा आहे. इतिहासातही साहेबांची ‘श्रीमंती कोकाटून’ सांगण्याइतकी प्रगल्भ आहे. बहुधा श्रीमंतानी शोधलेल्या इतिहासात महात्मा फ़ुले पगडी घालायचे आणि ब्राह्मणी भामट्या इतिहासकारांनी त्याच पगडीला पागोटे ठरवलेले असण्याचीही दाट शक्यता आहे. अन्यथा कालच्या सभेत साहेबांनी फ़ुल्यांची पगडी अशा शब्दोच्चार कशाला केला असता? पगडीच्या खाली डोके असले तर पगडी वा पागोटे यातला फ़रक समजू शकतो. परंतु शिरस्त्राणाच्या खाली एकाहून एक नामचिन श्रीमंत गोटेच गोळा करून ठेवलेले असतील, तर पागोट्याचेही गोटेच होऊन जायचे ना? एकदा त्या उतरंडीला लागले, मग दिग्विजय सिंग वा केजरीवाल व्हायला वेळ लागत नसतो. त्या घसरगुंडीची एक अंगभूत चालना असते आणि जसजशी खोली गाठली जाते, तशी घसरण अधिकच वेगवान होत जाते. अन्यथा देशाची इतकी दुर्दशा झाल्याचे सांगत असताना पवारांना कुणाचा सत्कार करण्याची वा त्यासाठी सन्मानचिन्हे निश्चीत करण्याची बुद्धी कशाला झाली असती? ज्यांना पुणेरी पगडी वा फ़ुल्यांचे कुणबी पागोटे यातला फ़रक सांगता येत नाही की समजून घ्यावा असे वाटत नाही, त्यांच्या तावडीत हा महात्मा सापडावा, हे मराठी शेतकरी कुणब्याचे किती दुर्भाग्य आहे ना? एकाहून एक नर्मदेतले गुळगुळीत गो्टे जमा करून ठेवल्यावर यापेक्षा वेगळे काय व्हायचे? घसरगुंडीला लागल्यावर कुठे थांबावे हे उमजले नाही, तर यापेक्षा अधिक काहीच होऊ शकत नाही.


16 comments:

 1. भाऊ राहून राहून असे वाटते की तुम्ही खूपच काही लिहायचे बाकी ठेवलेय, अजून खूप काही आहे या बाबतीत तुमच्या मनात....

  ReplyDelete
 2. कालच्या सभेत पवारांनी एक चांगले काम केले .ते म्हणजे पैसे अफरातफर प्रकरणी जामिनावर सुटलेल्या भुजबळ यांचा पगडी न घालता पागोटे घालून सन्मान केला .त्यामुळे पगडी अपमान होण्यापासून वाचली व त्याचप्रमाणे आम्ही कशा पधतीचे उमेदवार देणार आहोत हे दाखविले .

  ReplyDelete
  Replies
  1. याचा अर्थ कुणबी पागोटे यास काही सन्मान नाही असे आपणास म्हणायचे आहे का..?

   Delete
 3. The entrance exam of BHU B.Ed 2018 was conducted by the University on 29th April 2018 (Sunday) across various centres. The BHU UET Result 2018 is declared Banaras Hindu University on 2nd June 2018 on its official website which will be followed by the Counselling procedure for the final seat allotment. Candidates who appeared for the exam will be able to check their result by providing the asked credentials in the result link. As per the announcement made by the University, the UET Result 2018 is likely to be declared between 15th and 20th June 2018 and the Counselling procedure will be conducted in the first week of July 2018 after the declaration of the Result.

  ReplyDelete
 4. भाऊ एक नंबर , सणसणीत चपराक मानलं तुम्हाला.

  ReplyDelete
 5. तुम सिरियसली कैकू लेते यारो !!
  फुशाआ के पट्ठे है, चालीस साल से विधानसभा में बैठे हुए है, पुरे बहुजनां पैच्चांते ,इनकी कोई इज्जत है यारो , क्या तो बी समझरे तुम इनकू ??
  खाली बम्मना मिले तो रब्बड कि चप्पला दालके खुंदल खुंदल के देते ईनो !!

  ReplyDelete
 6. Respected Bhau..

  Simply touch of class

  ReplyDelete
 7. आता साहेब खुल्लम खुल्ला आपला ब्राह्मण द्वेष जाहीर करू लागले आहेत. नाही तरी सत्ता मिळायची शक्यता नाही, घ्या गरळ ओकून

  ReplyDelete
 8. “घसरगुंडीची एक अंगभूत चालना असते आणि जसजशी खोली गाठली जाते, तशी घसरण अधिकच वेगवान होत जाते.“🙏🏻

  ReplyDelete
  Replies
  1. आवडली तुमची प्रतिक्रिया !

   Delete
 9. एकदम मस्त,ढोंगी निधर्मी पण च बुरखा फाटला

  ReplyDelete
 10. साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आव्हाड ओबीसी नेता आहेत आणि फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य पुढे नेत असल्याची आठवण करून दिलेली होती. सहाजिकच त्या पत्रामुळे जगाला प्रथमच फ़ुले शाहू आंबेडकर मोठ्या उंच दहीहंड्या लावायचे व भसाड्या आवाजातले कर्णे लावून नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजित करीत, याचा शोध लागला....haahahah ek number

  ReplyDelete