Monday, June 4, 2018

मनोहर जोशी विजयी झाले

Image result for manohar joshi thackeray

कुमारस्वामी यांना पाठींबा देऊन कॉग्रेसने कर्नाटकात भाजपाची बाजी उलटी फ़िरवली. तेव्हापासून पुढल्या निवडणूकीत विरोधी एकजुटीने भाजपा कसा पराभूत होणार त्याचे समिकरण मांडले जात आहे. पहिल्या दिवशी तर मंचावरच्या नेत्यांनी हात गुंफ़ून उंचावले, तेव्हा आठवड्याभरात राहुल गांधींचा पंतप्रधान म्हणून शपथविधीच उरकला जाण्याची शक्यता दिसू लागली होती. आता ताज्या पोटनिवडणूकांच्या निकालांनी लोकसभा मोदींच्या हातून निसटल्याची ग्वाही अनेकजण देऊ लागले आहेत. भले मतदानाला अजून दहा महिने असतील. ते काय सवडीने होणारच आहे. पण आधीच त्याच्या बातम्या आणि विश्लेषण करायला काय हरकत आहे? अशी एकूण स्थिती आहे. शिवसेनेला तर पालघरमध्ये विजयाची मालिका सुरू झाल्याचेही उमगले आहे. त्यामुळे १९७१ सालातली लोकसभा निवडणूक आठवली. शिवसेना तेव्हा अवघी पाच वर्षाची होती आणि दादरमधून नगरसेवक म्हणून प्रथमच निवडून आलेले मनोहर जोशी लोकसभेला उमेदवार झालेले होते. वरळी परेल दादर व धारावीपर्यंत पस्रलेला हा मध्यमुंबई लोकसभा मतदारसंघ खरोखरच शिवसेनेचा बालेकिल्ला होता. कारण त्या भागातल्या ३० पैकी १९ नगरसेवक तेव्हा सेनेचे होते आणि म्हणूनच जोशी निवडून आल्यात जमा होते. त्यांच्या विरोधात तेव्हा कॉग्रेसचे आर. डी, भंडारे उमेदवार होते आणि प्रचाराची रणधुमाळी उडालेली होती. अखेरच्या टप्प्यात सेनेचा आत्मविश्वास इतका दांडगा होता, की मनोहर जोशी यांनी एक जबरदस्त पोस्टर छापून सर्वत्र चिकटवले होते. अतिशय बटबटीत अक्षरातील मजकूर होता, ‘मनोहर जोशी एक लाख मतांनी निवडून आले’. खाली छोट्या अक्षरात छापले होते, ही बातमी वाचायची असेल, तर शिवसेनेला भरघोस मतदान करा, वगैरे. योगायोग असा होता, की नेमक्या लाखभर मतांनीच निकालाच्या दिवशी मनोहर जोशी पराभूत झाले.

तेव्हाचा प्रचार जोरात असताना आठवडाभर आधी हे पोस्टर छापून चिकटवले गेले होते आणि कॉग्रेसचे भंडारे यांनी त्याचा अखेरच्या दिवसात मस्त उपरोधिक वापर करून घेतला. भंडारे टवाळीच्या सुरात आपल्या प्रचारसभेत लोकांना आवाहन करायचे, की आपली मते वाया घालवू नका. मनोहर जोशी आधीच निवडून आलेले आहेत. त्यांना तुमच्या मतांची गरज नाही. मी अजून निवडून आलेलो नाही. म्हणून आपली बहुमोल मते विजयी झालेल्यांना देऊन वाया घालवू नका. तुमची मते कॉग्रेस उमेदवाराला देऊन मलाच विजयी करा. जोशींना जिंकण्यासाठी त्या मतांची गरज उरलेली नाही, वगैरे. जोशींचा आत्मविश्वास त्यांना नडला आणि अखेरीस लोकसभेत भंडारेच पोहोचले. तो आत्मविश्वास चुकीचा अजिबात नव्हता. कारण विभागात शिवसेनेने आपले संघटनात्मक जाळे विणलेले होते. तुलनेने कॉग्रेस विस्कळीत होती व त्या पक्षात तेव्हा दुफ़ळीही माजलेली होती. पण त्याच्याकडे इंदिराजींसारखा लोकप्रिय राष्ट्रीय नेता होता. भंडारे त्याच बळावर सेनेच्या बालेकिल्ल्यात विजयी झाले होते. लोकसभा, विधानसभा मतदानात मागे पडणारी शिवसेना त्याही काळात पालिकेच्या वॉर्डात इतरांना मागे टाकत होती. निवडणूकीत हे मोठे गुंतागुंतीचे गणित असते. तिथे एका मतदानातला बालेकिल्ला दुसर्‍या मतदानात ढासळून पडतो. लोकसभेच्या दिल्लीतील सर्व सात जागा जिंकणार्‍या भाजपाला विधानसभेच्या ७० पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आल्या आणि लोकसभेत भोपळाही फ़ोडू न शकलेल्या आम आदमी पक्षाला ७० मध्ये ६७ आमदार मिळाले. ही गुंतगुंत ज्याला प्रसंगानुसार उलगडता येते, त्याला निवडणूकीची भाकिते सांगता येतात. नाहीतर मनोहर जोशी विजयी होत असतात. हे देशातल्या प्रत्येक निवडणूकीत होत असते आणि त्याचे खापर मग मतदान यंत्र वा मतपत्रिकेवर फ़ोडून पळवाट शोधली जात असते.

आज मतदान यंत्रावर आक्षेप घेऊन कागदी मतपत्रिकेचा आग्रह धरणार्‍या शिवसेनेची त्या १९७१ च्या पराभवानंतर काय प्रतिक्रीया होती? बोगस मतदानासाठी रशियातून खास शिक्क्याची शाई मागवली गेली. ती शाई वापरून मारलेला शिक्का व मतपत्रिकांनी सर्व गोंधळ केला. तुम्ही कुठल्याही चिन्हावर शिक्का मारलेला असेल, पण काही वेळाने तो शिक्का गायब व्हायचा आणि आधीच अदृष्य शाईने छापलेला गायवासरू चिन्हावरचा शिक्का दृगोचर व्हायचा. अशा रितीने मतपत्रिकेत घोळ करण्यात आला, असाही आरोप सेनेने तेव्हा केलेला होता. कॉग्रेसचा विजय बाईचा, गाईचा नाही तर शाईचा आहे, असा बाळासाहेबांचा आरोप गाजला होता. त्यामुळे आजही विविध जागी जे संशय व्यक्त केले जातात वा आरोप प्रत्यारोप होतात, त्यात नवे काहीच नाही. भाकितांच्या वावड्याही नव्या नाहीत. त्याच्याही आधी मतपेट्या पळवल्याचे आरोप झालेले आहेत. फ़रक किरकोळ आहे. तेव्हा सत्तेत असून जिंकणार्‍या कॉग्रेसवर आरोप व्हायचे आणि आता विरोधात बसल्यावर कॉग्रेसच तसे आरोप भाजपावर करते आहे. बाकी जुने अनुभवी आरोपकर्ते आहेतच. भाजपाची बाजू बदलली आहे. तेव्हा १९७१ सालातही पुरोगाम्यांची एक वेगळी आघाडी होती आणि प्रतिगामी म्हणजे जनसंघ, संघटना कॉग्रेस आणि स्वतंत्र पार्टी अशा पक्षांची आघाडी होतीच. त्यांनी कधी सत्ता मिळवण्य़ाची स्वप्ने बघितली नव्हती, की आव्हाने दिलेली नव्हती. कॉग्रेसला मनमानी करण्यापासून रोखता येण्याइतकी संख्या संसदेत असावी, इतकाच विरोधकांचा प्रयत्न असायचा. त्यातही अपयशच पदरी पडायचे. कशाबशा विरोधकांच्या दिडशेच्या आसपास जागा निवडून यायच्या आणि सगळे शिव्याशाप खाऊनही कॉग्रेस आरामात बहूमताच्या खुप पुढे मुसंडी मारून गेलेली असायची. मग पुन्हा विरोधकांना एकत्र येऊन कॉग्रेसला पराभूत करण्याची दिवास्वप्ने पडू लागायची.

तेव्हा विरोधी पक्षातल्या दुबळ्या संघटना व मुठभर कार्यकर्ते जितकी मेहनत पराभूत होण्यासाठी घ्यायचे; त्याच्या तुलनेत आज जिंकण्यासाठीही विरोधक कष्ट उपसत नाहीत, हा यातला मोठा फ़रक आहे. तर दुसरीकडे फ़ारसे कष्ट न घेताही कॉग्रेसला घवघवित यश मिळत होते. कारण त्यांच्यापाशी देशव्यापि संघटना व मनुष्यबळ अफ़ाट होते. पैशाने निवडणूका जिंकता येत असत्या, तर कॉग्रेस कधीच पराभूत झाली नसती वा आघाडीच्या राजकारणातून विरोधकांना अधूनमधून सत्तेची चव चाखता आली नसती. पण त्यातूनच मग कॉग्रेसमध्ये शैथिल्य येत गेले आणि मनुष्यबळ व संघटना संपत गेली. फ़क्त पैशाने जिंकण्याची वृत्ती वाढत गेली, तर झुंजणार्‍या विरोधकांच्या कार्यबळ व मनुष्यबळासमोर कॉग्रेस नेस्तनाबुत होत गेली. विरोधकांपाशी राष्ट्रव्यापी चेहरा होऊ शकणारे नेतृत्व तेव्हा नव्हते आणि आज कॉग्रेस त्यामुळे मागे पडलेली आहे. उलट याच कालावधीत भाजपाने १९९० नंतर राष्ट्रव्यापी पक्ष वा पर्यायी कॉग्रेस होण्याचे प्रयास आरंभले आणि त्याचाच परिणाम मोदी शहा यांच्या यशाचे खरे कारण आहे. मात्र तेव्हाच्या कॉग्रेसला पराभूत करण्याच्या आघाडीच्या कल्पनेतून आजही विरोधक बाहेर पडलेले नाहीत, की राजकीय अभ्यासक बाहेर पडू शकलेले नाहीत. या नव्या भाजपामध्ये अजून कॉग्रे्स इतके शैथिल्य आलेले नाही आणि आज भाजपा हे निवडणूका लढवणारे महाकाय यंत्र होऊन बसले आहे. काही जागी व पोटनिवडणूकीतले त्याचे अपयश शैथिल्याची साक्ष देणारे असले, तरी सार्वत्रिक निवडणूकातील विजय हे चार दशकापुर्वीच्या कॉग्रेसचीच पुनरावृत्ती आहेत. दुर्दैवाने तेव्हा कॉग्रेसला हरवण्यासाठी विरोधकांचे नेते व कार्यकर्ते जितकी मेहनत घ्यायचे, त्याचाही आज अभाव आहे. किंबहूना त्यातूनच भाजपाचे यश सोपे होत असते. म्हणूनच तेव्हाचे भंडारे आणि मनोहर जोशी आठवले.

6 comments:

  1. एक काळ(२००६-२०१७) असा होता माझ्यासाठी की मी लोकसत्ताच्या संपादकीय साठी वेडा असायचो. आता भाऊ तोरसेकर सर तुमच्या लेखासाठी.

    ReplyDelete
  2. मस्त विश्लेशन भाउ

    ReplyDelete
  3. सर असे म्हणायचे काय? की जो काळ काँग्रेसचा होता तो आता भाजपाचा आहे. पण भाजपा, किंवा जनसंघ व इतर यांचा विरोध त्याकाळात तसाच होता काय? जसा काँग्रेस व इतर करता आहेत. कालच एक पोस्ट वाचली. ती खरी किती खोटी किती. पण RSS मोदीला पर्याय शोधत आहेत. अशी पोस्ट होती. खरच असा पर्याय भाजपा किंवा RSS मधे आहे काय? गडकरीचे सुषमा, राजनाथ, ही नाव होती पण RSS च्या हातात भाजपाचा रिमोट आहे काय... मी हे विचारातोय मी देशभक्त म्हणून...

    ReplyDelete
  4. भाऊ आपण मांडलेल्या प्रमेयचा व्यत्यास म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक निकाल पाहता यावेत .
    EVM बिघडल्यावर गोंदियाला जिल्हाधिकारी तातडीने बदलला जाऊन फेरमतदान होते आणि पालघरला तक्रारीची साधी दखलही घेतली जात नाही हे पाहून गंमत वाटते .दिल्लीवाले मध्यरात्री याचिका करणारे वकील असते तर कायदेशीर लढाई पाहायला मजा आली असती .

    ReplyDelete
  5. भाऊ, सेने बाबतीत हे घडून सेना डोळेझाक करत आहे वाईट वाटते

    ReplyDelete
  6. भाऊ आपण म्हणता ती बाब सद्य स्थितीत काँग्रेसला लागू पडते हे मान्य केले तरी काँग्रेसकडे आलेल्या प्रशासकीय आणि राजकीय अनुभवाला नाकारता येत नाही
    त्यांनी अनेक लढाया केवळ सत्तेच्या माध्यमातून जिंकल्या आहेत .
    भाजप त्यांचा कित्ता गिरवू पाहत असेल तर पांचजन्य चे नॅशनल हॅराल्ड व्हायला वेळ लागणार नाही

    ReplyDelete