Saturday, June 30, 2018

शौरींचा फ़र्जिकल स्ट्राईक

Image result for arun shourie's souza

चार वर्षापुर्वी १६ मे रोजी लोकसभेच्या निवडणूकीची मतमोजणी संपलेली होती आणि भाजपाला एकपक्षीय बहूमत मिळाल्याचा निकाल समोर आलेला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले आणि दोन दिवसात त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यावर मोदींनी आपले सहकारी व नेत्यांशी मंत्रीमंडळाच्या स्वरूपाबद्दल प्रदिर्घ चर्चा केलेली होती. मग त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार, याविषयी गावगप्पांची लाट आलेली होती. मोदी गुजरात भवनमध्ये बसून विविध नेत्यांना व जाणकारांनाही भेटत बोलत होते. त्यात एक नाव होते अरूण शौरी यांचे. बहुधा मोदी त्यांनाच आपल्या सरकारमध्ये अर्थंमंत्री करणार असल्याच्या गप्पा जोरात होत्या. पण प्रत्यक्ष शपथविधीचा दिवस उजाडला, तरी कोणत्याही पत्रकार किंवा माध्यमाकडे एकाही मंत्र्याचे नाव आलेले नव्हते. राजदीप वा बरखा दत्त हिच्यासारख्या सरकारची बित्तंबातमी बाळगणार्‍यांनाही कोण मंत्रीमंडळात असणार, याचा सुगावा लागू शकला नव्हता. बरखाने तर तेव्हा अचंबित होऊन काही तास उरले असताना साधी अफ़वाही नाही म्हणून नवलाई व्यक्त केलेली होती. अशा स्थितीत केवळ दोनतीन तास आधी मंत्रीमंडळात सहभागी होणार्‍यांची नावे जाहिर झाली आणि त्यात अरुण शौरी यांचे नाव अजिबात नव्हते. मग त्यांना मोदींनी बोलावले तरी कशाला? बहुधा तो राग शौरी अजून विसरलेले नसावेत. कारण मंत्रीमंडळ बनवताना मोदींनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्यांना कटाक्षाने बाहेर ठेवलेले होते. एकदा असा काही निकष बनवला, मग बर्‍याच ढुढ्ढाचार्यांना परस्पर बाजूला केले गेले. त्यापैकी एक शौरी आहेत आणि इतरही आहेत. त्यांना आपल्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखला गेला नाही म्हणून अजून दुखवट्यातून बाहेर पडता आलेले नाही.

खरे तर शौरी हे राजकारणी नव्हेत. ते मुळचे व हाडाचे पत्रकार आहेत. पण भाजपाविषयी आरंभापासून आस्था असल्याने वाजपेयी सरकारमध्ये त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागलेली होती. तेव्हापासून त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली. त्यांचाही उल्लेख पुढल्या काळात भाजपानेते असा होऊ लागला. पण भाजप नावाच्या पक्षासाठी त्यांनी कधी नेमके काय केले, त्याचा खुलासा कोणी दिलेला नाही. वाजपेयी सरकार २००४ सालात सत्तेतून गेल्यापासून शौरी यांनी नेते म्हणवून घेण्य़ाइतके भाजपासाठी नेमके काय केले? त्याचे उत्तर खुद्द शौरी देऊ शकणार नाहीत की त्यांचा नेता म्हणून उल्लेख करणारे कोणी देऊ शकणार नाहीत. मग आज कुठल्याही वादविवादात वा चर्चेत शौरींचा उल्लेख भाजपानेते म्हणून कशाला होत असतो? तर ते मोदी विरोधात हिरीरीने बोलत असतात म्हणून. २००२ पासून माध्यमे व नरेंद्र मोदी यांच्यात छेडली गेलेली लढाई अजून संपलेली नाही. मध्यंतरी २०१४ सालात मोदींनी लोकसभा जिंकली, तेव्हापासून माध्यमातल्या मोदीविरोधी लढाईचे दिग्गज शिलेदार बाजूला पडत गेलेले आहेत. नामोहरम होऊन गेलेले आहेत. पण ते संपलेले नाहीत. विविध विधानसभा व अन्य लहानमोठ्या निवडणूकांत भाजपाचा पराभव झाल्यावर त्यांच्यात नवा उत्साह संचारत असतो आणि ते मोदींना संपण्याचे नवे संकल्प करीतच असतात. मात्र त्यांच्या दुर्दैवाने अजून तरी मोदी संपलेले नाहीत, की त्यांचा करिष्मा वगैरे म्हणतात, तो संपताना दिसत नाही. त्यामुळेच आता आगामी लोकसभेत मोदींना कायमचा धक्का दिला जाईल, अशा आशेवर नवी लढाई सुरू झालेली आहे. त्याचा भाग म्हणून मग शौरी, यशवंत सिन्हा वा शत्रुघ्न सिन्हा यांना पुढे करून शरसंधान चालू असते. यशवंत सिन्हा थंडावले, मग शत्रुघ्न सिन्हा फ़ॉर्मात येतात आणि त्यांना जर थकवा आला, मग यशवंत सिन्हा जोशात येतात. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे आता बहुधा शौरीं तेजीत आलेले असावेत.

कुठलीही केस लढवताना शत्रू गोटातला साक्षीदार फ़ोडण्याला महत्व असते. शत्रू गोटातला कोणी खास तुमच्या बाजूने साक्षीला उभा राहिला, म्हणजे तुमच्या बाजूला बळ मिळत असते. म्हणून जे कोणी असे मोदीविरोधी आघाडी लढवणारे पत्रकार संपादक आहेत, त्यांना कोणीतरी भाजपातलाच मोदींना शिव्याशाप देऊ लागला, मग ऊत येत असतो. यशवंत सिन्हा थंडावले आहेत. शत्रुघ्न सिन्हांनी आप वा लालूंच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ते दोन्ही साक्षीदार कामाचे राहिलेले नाहीत. त्यामुळे नवा कोणी भाजपाचा नेता शिव्याशाप देण्यासाठी आवश्यक होता. तो मिळत नसेल, तर निर्माण करायला हवा होता. त्यामुळे आपोआप शौरी यांची गणना भाजपानेता अशी होऊ लागलेली आहे. तसे बघायला गेल्यास शौरी आरंभापासूनच मोदी सरकारचे विरोधक राहिलेले आहेत. किंबहूना शपथविधीची नावे समोर आल्यापासूनच त्यांना मोदी सरकार चुकीच्या मार्गाने जात असल्याचा साक्षात्कार झालेला होता. पण ते तितके ‘आतल्या गोटातले’ नसल्याने माध्यमांनी त्यांना फ़ारसा भाव दिला नव्हता. त्यापेक्षा यशवंत सिन्हा व शत्रुघ्न वजनदार मोहरे होते. त्याही दोघांची तीच वेदना होती. वाजपेयी सरकारचे मानकरी असूनही त्यांना वयाचा निकष लावून बाहेर बसवण्यात आले वा दुर्लक्षित करण्यात आलेले होते. शौरींचे तसे नव्हते. ते मुळात मंत्रीपदापुरतेच भाजपात आलेले होते. बाकी त्यांचा भाजप पक्षाशी काहीही व्यवहारी संबंध नाही. त्यांनी कधी पक्षाच्या बैठकात भाग घेतला नाही, की पक्षाचे प्रचारकार्य वा अन्य कामे केली नाहीत. आपल्या बुद्धीमत्तेमुळे मंत्रॊपद भोगले हेच त्यांचे पक्षकार्य होते. इतक्या महान पक्षकार्याचा सन्मान पक्षाला सत्ता मिळाल्यानंतरही राखला गेला नाही, म्हणून ते नाराज असल्यास नवल नाही. मग आपली नाराजी त्यांनी कुठे काढायची? ते शब्दप्रभू असल्याने शब्दाची हत्यारे त्यांच्या भात्यात सज्ज असतात.

अलिकडल्या काळात त्यांनी मोदी विरोधाची आघाडी संभाळलेली आहे. ज्या कुठल्या वाहिनी वा वर्तमानपत्राला मोदी विरोधात बातमी टिप्पणी हवी असेल, त्यांच्यासाठी शौरींनी आपले दरवाजे सताड उघडे ठेवलेले आहेत. मग त्यांचे स्वागत मोदी विरोधकांनी केले नाहीतर नवलच होते ना? सध्या कॉग्रेसचे एक काश्मिरी नेते सैफ़ुद्दीन सोझ यांना पक्षातून दुर ठेवले गेलेले आहे. त्यांच्या काश्मिरविषयक मतप्रदर्शनाने कॉग्रेसला अडचणीत आणलेले आहे. त्यामुळे त्यांनी काश्मिरवर लिहीलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडेही कॉग्रेसने पाठ फ़िरवली होती. मग त्या सोहळ्याची बातमी होणार कशी? म्हणून सोझ यांनी प्रसिद्धी मिळवून देणारा हुकमी पत्ता प्रकाशनासाठी आमंत्रित केला, शौरींनाच मुख्य पाहुणा म्हणून आणले आणि त्यांची अपेक्षा शौरींनी पुर्ण केली. मात्र शौरी यांच्यासारखे लोक भरकटलेल्या क्षेपणास्त्रासारखे असतात. ते कुठे जाऊन कोसळतील, याचा भरवसा नसतो. त्यामुळेच शौरी यांनी सोझ यांचे गुणगान करतानाच भाजपाला शिव्याशाप दिले व मोदींना तर झोडपून काढले. तितकीच तर अपेक्षा होती. पण आपल्या तटस्थतेचे प्रदर्शन मांडताना व सोझ यांचे अतिरीक्त कौतुक करताना, शौरी कॉग्रेस पक्षावरही घसरले. सोझ यांच्या पुस्तक व प्रकाशन सोहळ्याकडे पाठ फ़िरवल्याने शौरींनी कॉग्रेसलाही यथेच्छ झोडपून घेतले. सोझ यांची ही अपेक्षा नक्कीच नसावी. कारण या मोदीनिंदेने त्यांच्यासह कॉग्रेस खुश असली, तरी शौरी क्षेपणास्त्र कॉग्रेसवरच उलटल्याने सोझ यांना आता पक्षात नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. माध्यमांसाठी सनसनाटी मिळालेली असली तरी सोझ यांना मात्र त्याची किंमत मोजावी लागेल. शौरी यांना त्याची फ़िकीर करण्याचे कारण नाही. त्यांना आपली जळजळ व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ हवे होते आणि सोझ यांनी ते पुरवले. बाकी मोदींवर असल्या अस्त्रांचा काही परिणाम होत नाही. म्हणूनच शौरींनी मोदींवर केलेला सर्जिकल स्ट्राईक फ़र्जिकल होऊन गेला आहे.

9 comments:

  1. यशवंत सिन्हा , शत्रुघ्न सिन्हा , अरूण शौरी हे नेते व राहूल गांधी .अरविंद केजरीवाल हे विरोधक मोदींना विरोध करून प्रसिद्धी देत आहेत .

    ReplyDelete
  2. भाऊ, शौरी वगैरे काही जण भाजपचे डीप असेट असावेत अशी शंका येते...
    उद्या ह्या लोकांनी ते ज्या पक्षात गेले आहेत त्याना सुधा असाच त्रास दिला तर?

    ReplyDelete
  3. शौरी मंत्रीपद न मिळाल्याने भाजप विरोधात गेलेत म्हनजे मोदींनी या मानसाला आधिच ओळखले असनार.इथे पक्षाचे काम केलेल्या सर्वांनाच संधी मिळते असे नाही काही लोक संघटनेत पन ठेवले जातात पन म्हनुन कोनी पक्ष विरोधात जात नाही शहा पन कुठे मंत्री आहेत पन २०१४ पासुन सतत जिंकुन ते मंत्री पेक्षा मोठे झालेत

    ReplyDelete
  4. या लोकांची मानसिकता समजत नाही. मोदी आवडत नसतील तर त्यांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. पण मोदी आवडत नाहीत म्हणून ज्या तत्वांना आयुष्यभर विरोध केला त्यांच्याशीच हातमिळवणी कसे करू शकतात हे लोक? असे केल्याने त्यांनी आयुष्यभर जे काही चांगले केले असेल त्या सगळ्यावर त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी पाणी फेरले जाते हे या लोकांना समजत नाही का?

    मी कम्युनिस्टांना कितीही नावे ठेवत असलो तरी असल्या लोकांपेक्षा कम्युनिस्ट लोक बरेच जास्त वरचढ आहेत हे नक्कीच. त्यांची तत्वे कितीही गंडलेली असली तरी त्यांची त्यांच्या तत्वांवर आणि विचारांवर अढळ श्रध्दा असते.सोमनाथ चॅटर्जींना पक्षातून काढून टाकल्यावरही त्यांनी २००९ च्या निवडणुकांमध्ये मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाच दिले होते,भाजपला नाही.कारण एकच. त्यांची त्या पक्षाच्या विचारांवर श्रध्दा होती. पक्षाशी मतभेद झाले म्हणून आयुष्यभर ज्या भाजपला विरोध केला त्याच भाजपला स्वत:च्या आयुष्याच्या संध्याकाळी मत द्यायचा करंटेपणा त्यांनी केला नाही.

    त्यातूनही एखाद्याचे मतपरिवर्तन कोणत्याही प्रकारच्या ideological conviction मुळे झाले तरी समजू शकतो. अरूण शौरींच्या बाबतीत तो प्रकारही दिसत नाही. ज्या लोकांना आयुष्यभर शिव्या घातल्या ते लोक आपले वाटायला लागले आहेत याचे कारण एकतर नेता आवडत नाही किंवा त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही हे. असे लोक स्वत:चे हसे करून घेतात.

    ReplyDelete
  5. भाऊ , तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर डॉ . सुब्रहमण्यम स्वामी मात्र खरंच उठून दिसतात. नुसत्या निवडणुकीच्या काळातच नव्हे तर त्याच्याही आधी आणि नंतर सुद्धा ज्यापद्धतीने ते पक्षाची बाजू मांडतात. ते मुळचा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पक्षात आलेले नेते आहेत. उच्च शिक्षित तरुण वर्गावर त्यांचा खास प्रभाव आहे. सगळ्यत महत्वाची गोष्ट म्हणजे ते कधीही मोदी किंवा सत्तेतल्या मंत्र्यांची वाट पाहत बसत नाहीत. ज्या विषयी त्याना खात्री असते ते स्वतः लढा देतात. खरोखर गुणी नेते आहेत. पण दुर्दैवाने त्यांची कदर होताना दिसत नाही. तुमचा काय मत आहे ..?

    ReplyDelete
  6. हे ठराविक ४ पादरे पावटे आहेत...............अतृप्त आत्मे........ यशवंत सिन्हा , शत्रुघ्न सिन्हा , अरुण शौरी आणि चौथा नाना पटोले पूर्वीच बी.जे.पी तुन बाहेर पडला होता. यशवंत सिन्हाही ' बी.जे.पी ' बाहेर पडलं आहे. आता हे २ पावटे उरलेले आहेत. यांनी कितीही मोदींवर दुगाण्या झाडल्या तरी मोदींना काहीही फरक पडत नाही. लालकृष्ण अडवाणी हेही ज्येष्ठ ' अतृप्त आत्मा ' याच सदरात मोडतात. २०१९ च्या निवडणुकीनंतर मोदी परत निवडून आले तर हे सर्वजण ' अडगळीत ' जातील हे निश्चित.

    ReplyDelete
  7. कागदी क्षेपणास्त्र आहे शौरी

    ReplyDelete
  8. अडगळीतले शहाणे आहेत शौरी

    ReplyDelete